(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • १० मे – कवी ग्रेस यांची जयंती

    कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी...'ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता' या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.

    माणिक सीताराम गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस यांची मर्ढेकरोत्तर नव कवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवींमध्ये गणना होते. ग्रेस मूळचे नागपूरचे. त्यांचे वडील सैन्यात होते. नागपुरातील कर्नल बाग परिसरात त्यांचं बालपण हलाखीच्या परिस्थितीत गेलं. आईच्या अकाली निधनामुळे नोकरी व शिक्षण यांच्यात मेळ साधत त्यांना आपली प्रतिभा जपावी लागली. १९६६ मध्ये ते नागपूर विद्यापीठातून मराठीमध्ये एम.ए. झाले. त्यानंतर दोन वर्षं त्यांनी धनवटे नॅशनल कॉलेजमधे अधिव्याख्याता म्हणून नोकरी केली. १९६८ पासून १९९७ साली निवृत्त होईपर्यंत ते नागपूरमधील वसंतराव नाईक समाजविज्ञान संस्थेत (मॉरिस कॉलेज) मराठीचे प्राध्यापक होते. निवृत्तीनंतर काही काळ ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या मराठी विभागात सौंदर्यशास्त्र या विषयाचं अध्यापनही करत होते. ग्रेस यांच्या लिखाणाला सुरुवात झाली १९५५ सालापासून. 'छंद', 'सत्यकथा' या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह 'संध्याकाळच्या कविता' प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली.त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. मा.ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे मा.ग्रेस वारंवार म्हणायचे. मा.ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. मा.ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. 'चर्चबेल' हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर 'मितवा', 'संध्यामग्न पुरुषाची लक्षणे', 'मृगजळाचे बांधकाम', 'वाऱ्याने हलते रान', 'ओल्या वेळूची बासरी' हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. " मा.माणिक गोडघाटे यांनी कवी म्हणून 'ग्रेस' हे नाव धारण करण्यामागे कारण ठरली ती लोकप्रिय पाश्चात्त्य अभिनेत्री इन्ग्रीड बर्गमन. 'द इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस' या चित्रपटात इन्ग्रीडसंबंधी 'शी इज इन ग्रेस' असं वाक्य उच्चारलं जातं. हे वाक्य ऐकल्यानंतर आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि आपल्याला प्रतिभेचा पहिला साक्षात्कार झाला, असं ग्रेस यांनी म्हटलं आहे. इन्ग्रीडचे ऋण आठवणीत राहावं यासाठी त्यांनी कायमस्वरूपी 'ग्रेस' हेच नाव लावलं. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, "मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते'. मा.ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि...’ या गीताबद्दल, मा.ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली. त्यांच्या विषण्ण मनाने ही कविता लिहिली. ग्रेस यांच्या कवितेतल्या शब्दांना हृदयनाथ मंगेशकरांच्या सुरांनी साद घातली आणि एक अजरामर गीत जन्माला आलं...

    ती गेली तेव्हा रिमझिम
    पाऊस निनादत होता
    मेघात अडकली किरणे
    हा सूर्य सोडवीत होता...

    पावसाचा रिमझिम निनाद दु:खाचा सांगावा घेऊन येणारा...आई गेल्यानंतरचं पोरकेपण सांगणारा...जाणारी ती आई होती म्हणून घनव्याकूळ करणारा... हृदयनाथ मंगेशकरांच्या स्वरांमधून ग्रेस यांची ही कविता ऐकताना आपल्या मनाची अवस्था कशी होते हे सांगण्यासाठी शब्द बापुडे होतात. पावसाच्या प्रत्येक थेंबात दु:ख ठिबकत राहावं ना, अगदी तसच वाटत राहतं. त्यांच्या इतर ''भय इथले संपत नाही'',घर थकलेले संन्यासी '',पाऊस कधीच पडतो''अशा या सुंदर कवितांना ही हृदयनाथ यांनी आपल्या सुरेल स्वरांच्या कोंदणात बसवून अजरामर केले आहे. ग्रेस यांच्या ''संध्याकाळच्या कविता''या संग्रहाला १९६८ मध्ये महाराष्ट्र सरकारचे ''कवी केशवसुत''पारितोषिक मिळाले .त्यांच्या ''वाऱ्याने हलते रान'' या ललितबंध संग्रहाला २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.२०१२ साली ''युनिक फीचर्स ''ने आयोजित केलेल्या ''दुसऱ्या मराठी ई साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषविले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील अतिशय गुणी व प्रतिभाशाली संगीतकार रोशन हे ग्रेस यांचे आवडते संगीतकार. 'चर्चबेल' या ललित गद्याच्या पुस्तकात ग्रेस यांचा 'रोशनची गाणी' या शीर्षकाचा अतिशय सुंदर लेख आहे. त्यात सुरवातीलाच ग्रेस म्हणतात, 'मी रोशनचे छायाचित्र पाहिले आहे, पण त्याला भेटू शकलो नाही. भेटायची खूप इच्छा होती. अशा ब-याच गोष्टी राहून गेल्या आहेत; राहून जातात. मृत्यू असं काही करुन जातो.' ग्रेसनी, रोशन यांनी संगीतबद्ध केलेल्या 'बहुबेगम' चित्रपटातील कव्वालीतील वाकिफ़ हूं खूब इश्क की तर्जे-बयां से मैं, ऐसे में तुझको ढूंढके लाऊं कहां से मैं! या ओळी उद़्धृत करुन, रोशनना आदरांजली वाहिली होती. ग्रेस यांचे २६ मार्च २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    ग्रेस यांचे कवितासंग्रह
    संध्याकाळच्या कविता (१९६७)
    राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४)
    चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७)
    सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५)
    सांजभयाच्या साजणी (२००६)
    बाई! जोगिया पुरुष (२०१२)

    ललितबंध संग्रह
    चर्चबेल (१९७४)
    मितवा (१९८७)
    संध्यामग्न पुरुषाची लक्षणे (२०००)
    मृगजळाचे बांधकाम (२००३)
    वाऱ्याने हलते रान (२००८)
    कावळे उडाले स्वामी (२०१०)
    ओल्या वेळूची बासरी (२०१२)

    ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस होता
    https://youtu.be/pM3eOOP786w
    भय इथले संपत नाही.
    https://youtu.be/x88r7JI4ljU
    तुला पाहिलें मी नदीच्या किनारीं
    https://youtu.be/e_-9GiAMInY

      May 10, 2017


  • कलादिग्दर्शक, निर्माता, दिग्दर्शक विष्णू गोविंद दामले

    दामले आणि फत्तेलाल यांनी मिळून १९३६ मध्ये ‘संत तुकाराम’ हा बोलपट दिग्दर्शित केला. सर्व भारतभर हा बोलपट झळकला व या बोलपटाने नाव कमावले. हा बोलपट मराठी भाषेत असला तरी भाषेची अडचण कुठेही न येता भारतातील सर्वभाषिक प्रेक्षकांनी त्याला उत्तम दाद दिली. ‘संत तुकाराम’नंतर दामले-फत्तेलाल यांनी ‘संत ज्ञानेश्वर’ (१९४०), ‘गोपाळकृष्ण’ (१९४०) आणि ‘संत सखू’ (१९४१) असे चित्रपट दिग्दर्शित केले.‘संत तुकाराम’ हा चित्रपट व्हेनिस फिल्म फेस्टिवलला पाठवला होता. त्या प्रसंगी तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असा त्याचा सन्मान झाला.

      July 5, 2022


  • अभिनेता ओमी वैद्य

    अभिनेता ओमी वैद्य यांचा जन्म १० जानेवारी १९८२ रोजी युका व्हॅली, कॅलिफोर्निया, अमेरिका येथे झाला.

    ओमी वैद्य यांनी लॉस एंजेलिस काउंटी हायस्कूल फॉर आर्ट्समधून पदवी प्राप्त केली आणि नंतर कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ येथे शिक्षण केले. ओम वैद्य यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनेता, दिग्दर्शक, संपादक, लेखक, दूरदर्शन प्रस्तुतकर्ता म्हणून काम केले आहे.

    3 इडियट्स या चित्रपटासाठी त्यांना स्टार डेब्यू मेल ऑफ द इयर पुरस्कार मिळाला. त्याला 3 इडियट्ससाठी 2010 चा लायन्स गोल्ड अवॉर्डही मिळाला होता. २०१० मध्ये त्यांना 3 इडियट्स या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. 3 इडियट्स या चित्रपटा नंतर ओमी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. चतुर रामलिंगम हे पात्र रसिकांच्या प्रचंड पसंतीस पात्र ठरले होते.

    अरेस्टेड डेव्हलपमेंट, द ऑफिस, दिल तो बच्चा है जी, देसी बॉईज यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये ओमीने उत्कृष्ट भूमिका साकारल्या.

    सिनेमाच नाही तर ओमी वैद्य जाहिरातींमधूनही झळकत असतो. जाहीरातक्षेत्रातही ओमी फार लोकप्रियत बनला आहे.

    ओमी वैद्य यांनी ऑगस्ट २००९ मध्ये मीनल पटेल सोबत लग्न केले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      January 10, 2022


  • थोर साहित्यिक व गीतकार शांताराम आठवले

    शांताराम आठवले यांचे वडील ग्वाल्हेरच्या सरदार शितोळे यांचे पुण्यातील कारभारी होते. त्यांचा जन्म २१ जानेवारी १९१० रोजी झाला. शांताराम आठवल्यांचे शिक्षण पुण्याच्या भावेस्कूल मध्ये झाले. “बेबंदशाही,“शिवसंभव” या सारख्या नाटकात अभिनय व दिग्दर्शन करुन ती क्षेत्रेही आठवल्यांनी शाळेत असतानाच गाजवली. सुप्रसिद्ध कादंबरीकार ह.ना.आपटे यांची व आठवलेंची पत्र मैत्री होती. त्यांच्या कवितांचा पहिला संग्रह “एकले बीज” या नावाने १९३८ साली म्हणजे ते प्रभातकवी झाल्यानंतर प्रसिद्ध झाला. त्या पाठोपाठ १९४० साली “बीजांकुर” हा दुसरा प्रसिद्ध झाला. “सकाळ”, “स्वराज्य” ”अश्या वर्तमानपत्रात तर “मनोहर”, “वांग्मयशोभा” यांसारख्या मासिकांमधून व “शालापत्रक” या लहान मुलांच्या मासिकात त्यांच्या कविता नेहमी प्रसिद्ध होत असत. “ प्रभात फिल्म कंपनी आपटे यांच्या 'भाग्यश्री' या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार करू इच्छित होती. भेटीत त्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. चित्रपटाचे नाव ठरले “अमृतमंथन”. शांताराम आठवलेंच्या साध्या सोप्या काव्यरचनेने आपटे खूपच प्रभावित झाल्यामुळे त्यांनी अमृतमंथन चित्रपटाची गीते लिहिण्यासाठी आठवले यांचे नाव सुचवले आणि सुदैव असे की ते मान्यही झाले. मा.शांताराम आठवले यांना प्रभातमध्ये गीतकार, पद्यलेखक आणि सहाय्यक दिग्दर्शक अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. 'अमृतमंथन' नंतर “संत तुकाराम”,“कुंकू”,“गोपालकृष्ण”,“माझा मुलगा”,“संत ज्ञानेश्वर”,“शेजारी”,“संत सखू”,“दहा वाजता” आणि “रामशास्त्री” या प्रभात चित्रपटांसाठी आठवले यांनी गीते लिहिली. काव्य, भाषेचा गोडवा, साधेपणा आणि सोपेपणा राखायचे अवघड काम शांताराम आठवले यांनी केल्या मुळेच त्यांचे स्थान “मराठी चित्रपटगीतांचे आद्यकवी” असे आहे. त्यांच्या अशा नाव लौकिकामुळे त्यांना, प्रभातच्या चालकांच्या परवानगीने, “भरतभेट”,“आपले घर” अशा काही प्रभात बाहेरच्या चित्रपटांसाठीही गाणी लिहावी लागली यामध्ये भाग्यरेखा”,“बेलभंडार”,“झंझावात”, “वहिनीच्या बांगडया”, “शेवग्याच्या शेंगा”,“आई मला क्षमा कर”,“पडदा”,“सुभद्राहरण”,“वावटळ” या चित्रपटांचा समावेश आहे. शांताराम आठवले यांनी “शांतिचिया घरा”,“बकुळफुले”,“वनातली वाट”,“कुंडलीनी जगदंबा”,“सुखाची लिपी”,“ओंकार रहस्य” आणि “प्रभातकाल” या सारखी एकापेक्षा एक सरस पुस्तके लिहिली.याशिवाय त्यांच्या भाव कविता, चारोळ्या, बालगीते यासारखे वाङ्मय देखील लोकप्रिय ठरले आहेत. मा.शांताराम आठवले २ मे १९७५ रोजी यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- janasampark.com
    शांताराम आठवले यांची अधिक माहिती वेब साईट http://www.shantaramathavale.com

      January 23, 2017


  • मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव

    भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली. नंतर त्यांना "सही रे सही" नाटकातून ओळख मिळाली. त्यांच्या इतर नाटकांमध्ये "श्रीमंत दामोदर पंत", "ऑल द बेस्ट", "आमच्या सारखे आम्हीच" आणि "ढॅण्ट ढॅण" या नाटकांचा समावेश आहे. नाटकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यासोबत त्यांची जोडी जमली. या जोडीनी अनेक यशस्वी नाटके व चित्रपट दिले आहेत. भरत जाधव हे त्यांच्या कॉमिक टाइमिंग साठी ओळखले जातात. भरत जाधव यांनी ८५ चित्रपट, ८ दूरचित्रवाणी मालिका आणि ८५०० हून अधिक नाटकाचे प्रयोग केले आहेत. मराठी चित्रपट व्यवसायात व्हॅनिटी व्हॅन असणारा तो पहिला अभिनेता आहे. सही रे सही या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते व त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे 'अमे लई गया, तमे रही गया' या नावाने गुजराथीत भाषांतर झाले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2017


  • सत्यदेव दुबे

    बुजुर्ग रंगकर्मी पं. सत्यदेव दुबे यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुठल्याही पुरस्कारासाठी किंवा मानसन्मानासाठी त्यांनी कधीच काही केलेले नाही. नाटक या एकमेव वेडाने झपाटलेले हे झाड मध्य प्रदेशातील बिलासपूरहून मुंबईत प्रथम आले ते चक्क क्रिकेटमध्ये करीअर करण्यासाठी! परंतु हिंदी चित्रपट दिग्दर्शक विजय आनंद यांनी त्यांना मुंबईतल्या नाटय़सृष्टीशी परिचय करून दिला आणि दुबे क्रिकेट सोडून रंगभूमीकडे वळले.

    इब्राहिम अल्काझी या नाटय़क्षेत्रातील भीष्माचार्याकडे त्यांनी नाटकाचे पहिले धडे गिरविले. त्यांच्या ‘थिएटर युनिट’ या संस्थेत साहाय्यक म्हणून दुबेंनी शागिर्दी पत्करली आणि पुढे अल्काझी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये गेल्यावर त्यांच्या थिएटर युनिटची सूत्रे दुबेंच्या हाती आली. विजया मेहता आणि दुबे हे दोघेही अल्काझींचे शिष्योत्तम असले आणि दोघांनीही प्रायोगिक-समांतर रंगभूमी हीच आपली कर्मभूमी मानली होती तरी त्यांच्या दिशा मात्र वेगवेगळ्या राहिल्या. पाच दशकांत दुबेंनी आपली समांतर रंगभूमीशी असलेली नाळ कधीच तोडली नाही. दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’शी (NSD) समांतर असे ‘नॅशनल स्कूल ऑफ दुबे’ (NSD) देशभरात अस्तित्वात आहे. त्यांची शिष्यमंडळी केवळ मराठी, हिंदी आणि इंग्रजी नाटय़सृष्टीतच नाहीत, तर बॉलिवूडमध्येही आहेत. तरूण रंगकर्मीचा घोळका त्यांच्याभोवती कायम असतो. दुबे हिंदीभाषिक असले तरी त्यांनी अनेक मराठी नाटके दिग्दर्शित केली आहेत. कणकवली नाटय़संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड करावी, असा आग्रह संमेलनाच्या संयोजकांनी धरला होता. परंतु नाटय़ परिषदेच्या त्यावेळच्या धुरिणांनी कोत्या वृत्तीचे दर्शन घडवत हा आग्रह अव्हेरला होता. दुबेंचे मराठी रंगभूमीवरील मौलिक योगदान त्यांना ज्ञात नव्हते, ही वस्तुस्थिती होती. विजय तेंडुलकर, गो. पु. देशपांडे, महेश एलकुंचवार, श्याम मनोहर, चं. प्र. देशपांडे, चेतन दातार आदींची मराठी नाटके त्यांनी केली. कुसुमाग्रजांच्या कवितांवर आधारीत ‘आयुष्यात पहिल्यांदाच’ हा आगळा रंगाविष्कारही त्यांनी सादर केला. ‘आधेअधुरे’, ‘अबे बेवकूफ’, ‘संभोग से समाधी तक’, ‘अंधायुग’, ‘एज्युकेटिंग रिटा’, ‘हयवदन’, ‘डॉन जॉन इन हेल’ अशी अनेक नाटके त्यांनी केली. नाटककाराच्या संहितेवर दिग्दर्शकीय कुऱ्हाड चालवून तिचे आपल्या पद्धतीने अर्थनिर्णयन करण्याचा पायंडा त्यांनी पाडला. त्यामुळे अनेक लेखक त्यांच्यावर नाराज झाले. पण त्यांनी लेखकांच्या नाराजीची कधीच पर्वा केली नाही. दुबे हे भणंग, कलंदर, अवलिया रंगकर्मी आहेत. त्यांच्या व्यवहाराची काळजी नेहमी त्यांच्या शिष्य व हितचिंतकांनीच वाहिली. त्यांच्या कार्यशाळांतून अनेक लेखक घडले. सत्यदेव दुबे हे मूळचे रा. स्व. संघाचे. पण ही विचारधारा त्यांनी कलेच्या क्षेत्रात आणली नाही. गो. पु. देशपांडेंसारख्या डाव्या नाटककाराची नाटकेही त्यांनी तितक्याच आत्मीयतेने सादर केली. हिंदुत्वाचा पुरस्कार ते त्यांच्या वक्तव्यांतून करीत असले तरी त्यात कडवेपणा आढळत नाही. हिंदुत्ववादी भाजपच्या कथनी व करणीत अंतर दिसल्यावर त्यांच्या विरोधात लोकसभेची निवडणूक लढवायलाही त्यांनी कमी केले नाही. त्यांनी काही नाटकेही लिहिली. त्यातून त्यांचे आयुष्य तुकडय़ा-तुकडय़ांत समजून घेण्यास मदत होते. त्यांच्या मतांवर नेहमीच जोरदार चर्चा, वादविवाद होत असतात. ‘थिएटर मर रहा है’ असे म्हणणारे दुबे दुसरीकडे सातत्याने नाटके करतच असतात. कारण ते त्याशिवाय जगूच शकणार नाहीत.

      August 5, 2017


  • जनरल अरुणकुमार वैद्य

    जनरल अरुणकुमार वैद्य यांचे वडील अलिबागचे कलेक्टर म्हणून कार्यरत असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण इंडस्ट्रीज हायस्कूल अलिबाग येथे, व कॉलेज शिक्षण एलफिन्स्टन कॉलेजमध्ये झाले. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९२६ रोजी अलिबाग येथे झाला. त्याचप्रमाणे ४ वर्षे पुण्यात रमणबागेतही शिक्षण झाले. शिक्षण चालू असताना मिलिटरीत जाण्याची त्यांना विलक्षण ओढ होती. १९४४ साली त्यांनी इमरजन्सी कमिशन मिळवले व ३० जानेवारी १९४५ ला त्यांना कायम कमिशन मिळाले. त्यांना रॉयल डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये कमिशन मिळाले. जनरल वैद्य ही एक अशी असामी होती ज्यांनी १९६५ व १९७१ च्या युद्धात अतुलनीय शौर्य गाजवुन सन्मान मिळवले होते. ते भारतीय भूदलाचे १३ वे भूदलप्रमुख होते.

    १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना महावीर चक्रपुरस्कार मिळाला. नंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. १९६५ चा खेमकरणचा पाकिस्तान बरोबरचा लढा मोठा अविस्मरणीय झाला. पाकिस्तानची पहिली सशस्त्र पलटण आत घुसली होती. त्या सैन्याला घोड्याच्या नालाच्या आकाराची व्यूहरचना करून ३६ तास रणकंदन करून पाकिस्तानचे एम्४७ व एस् ४८ हे प्रचंड पॅटन रणगाडे त्या काळी लेफ्टनंट कर्नल असलेल्या वैद्यांनी खिळखिळे करुन टाकले. ते सुद्धा डेक्कन हॉर्स जवळील जुन्या “शेरमन” रणगाड्याच्या सहाय्याने, खेमकरण विभागात पाकिस्तानचे ३६ रणगाडे उडवले. ६ सप्टेंबर १९६५ रोजी अतुल शौर्याबद्दल त्यांना महावीरचक (व्हिक्टोरिया क्रॉस सदृश) मिळाले.

    त्यांची बदली ईस्टर्न कमांडमध्ये त्रिपुरा, आसाममध्ये नागा टोळीवाल्यांचा बंदोबस्त करण्याकरता झाली. तिथे योजना चातुर्य दाखवून त्यांनी नागांचा तथाकथित जनरल मोबू अंगामी व इतर सशस्त्र नागांना पकडले. १९७१ साली, सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख म्हणून वसंतार नदीवर पाकिस्तानचे सैन्याशी घनघोर लढाई झाली आणी पाकिस्तानच्या सैन्याला धुळ चारली.

    १ ऑगस्ट १९८३ रोजी भारताचे जनरल म्हणून त्यांनी सूत्रे हातात घेतली. “जनरल” म्हणून त्यांची एक विशिष्ट कामगिरी वाखाणण्या सारखी होती. २०,००० फूटांवर अतिशित, जिथे तापमान उणे ४०° असते अशा “सियाचीन” प्रदेशात लढाईस तयार करण्यात आलेली हिंदुस्थानी सेना तळ ठोकुन बसली होती. रशियन बनावटीच्या टी-७२ बरोबरीचा अर्जुन रणगाडा तयार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

    तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशाप्रमाणे त्यांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात सैन्य घुसवून ऑपरेशन ब्ल्यू स्टार यशस्वी केले. त्याचे सूत्र त्यांनी आखून दिले. अरुणकुमार वैद्य यांना संगीताची आवड होती. त्यांना पोस्टाची तिकिटे जमवण्याचा त्यांना छंद होता. सुमारे दहा हजार तिकिटांचा संग्रह त्यांचेपाशी होता. भारतीय भूदलातून निवृत्त झाल्यावर अरुण वैद्य पुण्यात स्थायिक झाले. १० ऑगस्ट १९८६ रोजी बाजारातून घरी परतत असताना दुचाकीवरुन आलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर बंदुकीतुन ८ गोळ्या झाडल्या. वैद्यांना डोक्यात आणि मानेत गोळ्या लागल्या व त्यांचे घटनास्थळीच निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 10, 2021


  • सुप्रसिध्द मराठी विनोदी लेखक चिं.वी.जोशी

    जन्म: १९ जानेवारी १८९२

    'सुधारक' या पत्राचे संपादक वि. रा. जोशी हे त्यांचे वडील. पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण. फर्ग्युसन कॉलेजातून बी.ए. (१९१३), एम्.ए. (१९१६) झाले. पाली भाषेचा विशेष व्यांसग १९२० पासून बदोद्यात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य. प्रथम आठ वर्षे बडोदा कॉलेजात पाली, इंग्रजी आणि मराठी या भाषांचे प्राध्यापक. १९२८ पासून बडोदा सरकारचे दप्तरदार. १९४९ मध्ये निवृत. बडोद्याच्या वास्तव्यात गुजराती भाषेशी त्यांचा उत्तम परिचय झाला.निवृत्तीनंतर पुण्यास आल्यावर मराठी साहित्य परिषदेच्या कार्यात सहभाग.

    बडोद्याच्या 'सहविचारिणी सभे' च्या विद्यमाने निघणा-या 'सहविचार' ह्या नियतकालिकाचे ते एक संपादक होते. 'अ मॅन्युअल ऑफ पाली सध्दम्मप्पकासिनि' (संपादन), 'पाली कंकॉर्डन्स' (कोश), 'जातकांतील निवडक गोष्टी... (१९३०)', 'शाक्यमुनि गौतम' (१९३५), 'बुध्दसंप्रदाय व शिकवण' (१९६३) , ही त्यांची ग्रंथनिर्मिती त्यांच्या पालीच्या व्यासंगाची द्योतक आहे; पण याहीपेक्षा चाळीसांवर पुस्तके लिहून त्यांनी मराठी विनोदाच्या क्षेत्रात जी कामगिरी बजावली ती विशेष महत्त्वाची होय.

    विनोदी लेखनाची प्रेरणा त्यांना कोल्हटकर-गडक-यांच्या कोटित्वयुक्त लेखनातून मिळाली व त्याचा ठसा आपणास त्यांच्या प्रारंभीच्या 'एरंडाचे गु-हाळ... (१९३२)' मधील लेखन व 'चिमणरावांचे च-हाट... (१९३३)', मधील विवाहविषयक लेख यांवर स्पष्ट दिसतो. या मराठी लेखकांबरोबरच मार्क ट्वेन, डब्ल्यू. डब्ल्यू. जेकब्स, जेरोम के जेरोम, हर्बर्ट जेकिन्स, स्टीफन लीकॉक यांच्या विनोदी लेखनाचे संस्कार त्यांच्यावर झाले.

    पूर्वीच्या विनोदकरांप्रमाणे त्यांनीही चिमणराव व गुंडयाभाऊ अशी मानसपुत्रांची जोडगोळी जन्मास घातली आणि तिला विविध लोकव्यवहारांतून फिरवून आणले. पण त्यांच्या चित्रणात अतिशयोक्तीपेक्षा स्वभावोक्तीवर आणि समाजसुधारणेच्या मंडनापेक्षा मानवी स्वभावातील साध्यासुध्या विसंगतींच्या दर्शनावर भर राहिला. त्यांची निवेदनशैलीही मर्मभेदक कोटित्वापेक्षा मार्मिक व स्वभाविक संवादानी नटलेली आहे. त्यामुळे त्यांचे लेखन निबंधरूप होण्या ऐवजी त्याला ललित कथेचा घाट प्राप्त झाला व त्यातून मध्यमवर्गीयांचे एक अस्सल व स्वयंपूर्ण विश्व साकार झाले. वर उल्लेखिलेल्या पुस्तकांशिवाय वायफळाचा मळा' (१९३६), आणखी चिमणराव (१९४४), ओसारवाडीचे देव (१९४६), गुंडयाभाऊ (१९४७), रहाटगाडगं (१९५५), हास्यचिंतामणी (१९६१), बोरीबाभळी (१९६२), हे त्यांचे विनोदी लेखसंग्रह प्रसिध्द आहेत. 'चिमराव स्टेट गेस्ट' ह्या त्यांच्या एका कथेवरुन काढण्यात आलेला 'सरकारी पाहुण' हा चित्रपट महाराष्ट्रात विलक्षण गाजला होता. चिं.वी.जोशी यांचे निधन २१ नोव्हेंबर १९६३ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२२३०१७३३
    संदर्भ. ग्लोबल मराठी

      November 21, 2018


  • बॉलिवूडचे प्रसिध्द गायक उदित नारायण

    उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले. १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तर'मधून मिळाली. या सिनेमातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत. मा.उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

      January 3, 2017


  • थोर मराठी कवी व लेखक बा.सी.मर्ढेकर

    बा.सी.मर्ढेकर यांचा जन्म १ डिसेंबर १९०९ रोजी झाला. त्यांना मराठी नवकाव्याचे प्रवर्तक मानले जाते. मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते बा.सी. मर्ढेकर हे भाषा प्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहीले. मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मा.बा.सी.मर्ढेकर हे मराठीतील नवकवितेचे आद्य प्रवर्तक म्हणून ओळ्खले जातात. केशवसुतांनंतरचे मराठीतील एक युगप्रवर्तक कवी म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो. त्यांचे संपूर्ण नाव बाळ सीताराम मर्ढेकर असे होते. मर्ढेकरांनी काही काळ ‘टाइम्स ऑफ़ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम केले होते. १९३८ मध्ये आकाशवाणी केंद्राचे आधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. समीक्षक म्हणूनही ते प्रसिद्ध होते. मराठीत नवटीकेचा प्रांरभ त्यांनीच केला. त्यांचे समीक्षा ग्रंथ अतिशय महत्वाचे समजले जातात.

    बा.सी.मर्ढेकर यांची ग्रंथसंपदा: रात्रीचा दिवस, पाणी, तांबडी माती या कादंबर्याा आणि ‘सौंदर्य आणि साहित्य ’ ‘वाड्मीयीन महात्मता ’हे समीक्षा ग्रंथ, तसेच काही संगीतिका त्यांनी लिहिल्या आहेत. बा.सी.मर्ढेकर यांचे २० मार्च १९५६ साली निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 1, 2016