जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्यामला वनारसे मूळ पेशाने मानसशास्त्रज्ञ. मानव संसाधन विषयातल्या तज्ज्ञ. अनेक कंपन्या व संस्थांमधून प्रशिक्षक म्हणून त्यांचा नावलौकिक. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सामाजिक संस्था, चळवळी, महिला संघटना, अशा सर्वत्र त्यांनी चित्रपट या माध्यमाचा कल्पक वापर करून त्या त्या विषयांची मांडणी केली. मुले आणि महिला हे त्यांचे विशेष आस्थेचे समूह. तिथेही त्यांनी आवर्जून चित्रपट या माध्यमाचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संदर्भात वापर केला. इतर कलामाध्यमाविषयीही त्यांना आस्था आहे. संगीताचे मानसशास्त्र, घाशीराम कोतवाल- एक अभ्यास ही त्यांची पुस्तके याची साक्ष आहेत. सत्यजित राय आणि भारतीय मन्वंतर या पुस्तकातून त्यांनी सत्यजित राय यांच्या चित्रपटांतून उभ्या राहणार्या भारतीय समूहमनाचे विस्तृत विश्लेषण केले आहे.
कलेचा वारसा श्यामलाताईंना बालपणापासूनच लाभला. वडील फोटोग्राफर होते. दृश्यकलांकडे पाहण्याची दृष्टी तिथून मिळाली, पण निमित्त घडले पुण्यातल्या एका चर्चासत्रातल्या व्याख्यानाचे. फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे तत्कालीन संचालक प्रा. सतीश बहादूर यांचे एक व्याख्यान श्यामलाताईंनी ऐकले आणि चित्रपटांकडे पाहण्याची त्यांची दृष्टीच बदलून गेली. चित्रपटांचा कलामाध्यम म्हणून विचार, सूक्ष्म विश्लेषण, मौलिक लेखन, भाषांतरे करून त्यांनी चित्रपट अध्यापनाची एक पद्धती विकसित केली. विविध समूह व शैक्षणिक संस्थांसाठी चित्रपटविषयक अभ्यासक्रम आखण्यात पुढाकार घेऊन विलक्षण झपाटलेपणाने त्यांनी चित्रपटसंस्कृतीचा प्रसार करण्याचे काम केले. बहादुरांचे लेखन संग्रहित करणे, प्रसिद्धीपरान्मुख असणार्या बहादुरांच्या लेखनाला उचित व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या लेखनाची मराठीतून भाषांतरे करणे ही कामेही त्यांनी गुरूनिष्ठेतून केली. आज प्रा. सतीश बहादूर हयात नाहीत, परंतु बहादुरांनी घातलेला चित्रपट विश्लेषण, लेखन, अध्यापनाचा हा पाया विस्तृत करण्याचे कार्य त्या आज वयाची सत्तरी ओलांडल्यावरही करीत आहेत. चित्रपट संस्कृतीतील बहादूर स्कूलच्या त्या एकमेव प्रसारक आहेत.
मुंबईत झालेल्या दहाव्या आशियायी चित्रपट महोत्सवात श्यामला वनारसे यांना सत्यजित राय स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. चित्रपटसंस्कृतीचा व्रतस्थपणे प्रसार करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आजवर प्रा. सतीश बहादूर, अरुणा वासुदेव, बासू चटर्जी, एच. एन. नरहरी राव यांना देण्यात आला आहे. डॉ. श्यामला वनारसे हेदेखील याच गौरवशाली परंपरेतले एक नाव.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. राजन गवस यांनी भाऊं पाध्ये यांच्या साहित्यावर पीएच. डी. केलेली आहे. राजन गवस यांनी साधारण ऐंशीच्या दशकात लिहायला सुरुवात केली. कविता, कथा, कादंबरी आणि ललित लेखन अशा मार्गावरून त्यांची लेखणी चालत राहिली. या सा-याच लेखनात राजन गवस यांच्या लेखनाचे तीन पैलू प्रामुख्यानं नजरेत भरतात. त्यांची विश्वजवात्सल्य आणि कारुण्यानं भरलेली आणि भारलेली दृष्टी, निर्णयच नव्हे तर मतही न देता वास्तवाच्या तटस्थ पण कलात्मक दर्शनानं वाचकावर दाखवलेला विश्वा स आणि तिसरं म्हणजे कृषिप्रधान जगण्याकडे एकाच वेळी आतून येणा-या जाणिवेने आणि दूरस्थ तटस्थपणे (क्वचितप्रसंगी आत्मटीकेनेदेखील) पाहण्याची क्षमता. या तीन पैलूंमध्ये उपजतच अंतर्विरोध आहेत, ताण आहेत; पण ते संतुलित करणं हेच राजन गवस यांचं कौशल्य आहे. उदाहरणार्थ, पहिला पैलू कारुण्य आणि विश्ववात्सल्य. म्हणजे गवस आपल्या कथेतल्या वरकरणी खल किंवा चूक वागणार्याल पात्रांचीही टर किंवा खिल्ली उडवत नाहीत, निवेदनकर्त्याला मिळणारा उपजत फायदा घेत अशा पात्रांच्या चुका सव्याज त्यांच्या पदरात टाकत नाहीत. दोनच उदाहरणं घेऊ या. ‘भंडारभोग’ या जोगत्याच्या जीवनावरच्या कादंबरीत सुरुवातीच्या भागात क‘व्वा वगैरे पात्रं अंधश्रद्धेनं अत्यंत अडाणी, चुकीचं आणि अन्याय्य वागत असतानादेखील गवस यांच्यातला निवेदक अशा पात्रांचा उपहास करत नाही.
संपूर्ण तादात्म्यानं आणि सहानुभावानं त्यांचं चित्रण करतो. दुसरं उदाहरण- ‘तणकट’ कादंबरीत गौतम वगैरे पात्रं उघड उघड चुकीच्या मार्गानं आणि अल्पावधीत मोठा लाभ मिळवण्यासाठी गैरमार्गावर जातात, पण गवस यांचा निवेदक कोणतीही बाजू घेत नाही, उलट त्या त्या पात्राला समजून घ्यायचं आवाहनच करतो वाचकाला. हे दुर्मिळ आहे. करुणेबरोबरच आढळणारी ही तटस्थता चकित करणारी आहे. कारण त्यांच्या तथाकथित नायकालादेखील झुकतं माप द्यायचा आक्रस्ताळा उपद्व्याप इथे नाही. शक्यतो मतं बनवण्याचं स्वातंत्र्य वाचकालाच द्यायचं परिपक्व भान दाखवतात गवस. अजून एक अंतर्विरोध म्हणजे कधी राजन गवस यांचा नायक किंवा निवेदक कृषिसंस्कृतीचं प्रतिनिधित्व करतो, तर कधी त्या संस्कृतीपासून दूर गेलेल्या, अपराधगंड बाळगणार्या व्यक्तींचं प्रतिनिधित्व करतो. या दोन्ही भूमिका कित्येकदा एकमेकांविरुद्ध उभ्या असतात, पण गवस यातही आपलं निर्णायक मत लादत नाहीत हे विशेष.
राजन गवस यांनी प्रामुख्याने तीन-चार विषयांवर लिहिलं आहे. सर्वप्रथम म्हणजे ‘देवदासी’ आणि ‘जोगते’ या अनिष्ट रूढींच्या भयावह वास्तवाचं चित्रण. ‘चौंडकं’, ‘भंडारभोग’ या कादंब-या आणि ‘खांडुक’, ‘हुंदका’ यासारख्या कथांमधून ते प्रगटतं. दुसरा विषय म्हणजे गावपातळीवर चालणारं पंचायती, सोसायट्या वगैरेमधलं राजकारण आणि त्याला असलेली जातीयतेची डूब. ‘धिंगाणा’, ‘कळप’, ‘तणकट’ या कादंब-या आणि ‘ठराव’, ‘नवाचं तीन चतुर्थांश’ वगैरे कथांतून हे चित्रण प्रभावीपणे आलं आहे. एकूणच गावगाड्याचं प्रभावी चित्रण इथे दिसतं. तिसरं म्हणजे ग्रामजीवनापासून दुरावलेल्या सुशिक्षित माणसांचा अपराधगंड हे आशयसूत्र त्यांच्या अनेक कथांचा विषय झालं आहे, आणि याचबरोबर आत्मनिर्भर होऊ पाहणारी स्त्री हाही त्यांच्या अनेक कथांचा विषय आहे. ‘रिवणावायली मुंगी’, ‘तळ’, ‘घुसमट’ अशा अनेक कथा स्त्रीकेंद्री आशय व्यक्त करतात. एकूणच, हरवत चाललेली मूल्यं, निसर्ग आणि माणूसपण हे त्यांच्या ललित लेखनचे विषय आहेत. बाईचं जगणं मात्र नेहमीच त्यांच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहे.
भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच. विशेषत: ‘चौंडकं’ आणि ‘भंडारभोग’ या सुरुवातीच्या कादंब-यांनंतरच्या लेखनाबाबत हे विशेष जाणवतं. ‘धिंगाणा’ कादंबरीतलं पहिलं वाक्य ‘आमचा बाप मला उपकाराखातर जेवाय घालतो हा त्याचा समज’ असं आहे. ही मानसिकता नेमाडे यांच्या नायकाची वाटते. या कालखंडातल्या गवस यांच्या कादंब-यांवर या परात्म, हताश नायकाने केलेल्या दंभस्फोटांची गडद छाया आहे. या लेखनाला अनुकरण किंवा प्रभाव यापलीकडे जाऊन बघायला हवं. त्यात एका विशिष्ट वाङ्मयीन दृष्टीचा डोळस स्वीकार दिसतो आणि ‘तणकट’च्या निमित्ताने आपली स्वत:ची वाट ओळखण्याचा ठळक प्रयत्नही दिसतो. या दृष्टीनं ‘कळप’ या कादंबरीची अर्पणपत्रिका आवर्जून बघावी अशी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट/ संजय भास्कर जोशी
November 21, 2018
भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित "जिंदादिल" भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी झाला. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ येथे वकिली व्यवसायास सुरुवात केली. वकीली व्यवसायात भाऊसाहेबांनी फौजदारी खटल्यां मध्ये भरपूर यश संपादित करून वकील म्हणून नावोलौकिक मिळवला.
भाऊसाहेब स्वतः वेदपंडीत, वकील, शिकारी होते, शिकारीचा तर त्यांचा छंद नुसता शौर्य दाखविण्यासाठी नव्हता, तर श्वापदांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्याचे निरीक्षण करुन भाऊसाहेबांनी कथा लिहिल्या होत्या, ज्या किर्लोस्कर, युगवाणी, अमृत इत्यादी अनेक मसिकात प्रकाशित झाल्या होत्या, त्यात शिकारीतील शौर्या पेक्षा, प्राण्यांच्या अभ्यासाला प्राधान्य असायचे. कालांतराने कायद्याने शिकारीला बंदी आली, त्यामुळे भाऊसाहेबांची शिकार पण बंद झाली, मोतीबिंदू मुळे भाऊसाहेबांच्या दोन्ही डोळ्यांची नजर गेली आणि त्याच कारणास्तव वकिली पण बंद करावी लागली, पण इतके होऊनही भाऊसाहेब हतबल झाले नाहीत, वेदाध्ययन,संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होतेच, त्यातील चंपू प्रकारात शायरीचा उगम असल्याचे ते म्हणत, त्यातूनच त्यांनी मराठी शायरीची रचना केली, त्यांची शायरी ही उर्दू भाषेतील शायरी पेक्षा वेगळी होती, त्यातून नेहमीच स्वाभिमानी आणि अपेक्षित अशा शायरीची रचना त्यांनी केली, पुढे मा.भाऊसाहेबांच्या शायरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला, महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या अनेक भागात त्यांचे कार्यक्रम होऊन लोकप्रिय झाले.
भाऊसाहेबांची मराठी शायरी, मराठी मुशायरा, मैफिल, दोस्तहो, जिंदादिल ही पुस्तके प्रकाशित झाली, खऱ्या अर्थाने त्यांनी मराठी शायरी आणि गझल हा प्रकार रुजवली आणि ती रसिकापर्यंत पोहोचवली. त्यांच्या " दोस्त हो" आणि " जिंदादिल " ह्या संग्रहानी मराठी साहित्याप्रेमीना वेड लावले. मा.भाऊसाहेब पाटणकर यांचे २० जून १९९७ रोजी निधन झाले.
भाऊसाहेब पाटणकरांची शायरी
पेड वेणीचे तुझ्या तू सोडू नको मागे पुढे
आम्ही तरी कैसे बघावे सारखे मागे पुढे
आलो तुझ्या दुनियेत नव्हतो चोर वा डाकू आम्ही
एकही ना चीज इथली घेऊनी गेलो आम्ही
तेही असो आमुच्या सवे आणिला ज्याला ईथे
भगवन अरे तो देहही मी टाकूनी गेलो ईथे
आजवरी बेधुंद जैसा मांड आम्ही गाईला
त्याच त्या तल्लिनतेने जोगिया ही गाईला
जाणतो इतुकेच आम्हा मस्तीत आहे गायचे
लोकहो हे दैव जाणे काय केव्हा गायचे
येतो असाही काळ केव्हा काही असेही गायचा
जोगिया डोक्यात आणिक मांड असतो गायचा
कौशल्य माझ्या गायनाचे कळलेच ना कोणा कधी
गेलो असा गाऊन नाही बेसूरही झालो कधी
सन्मानिले वैराग्य आम्ही शृंगार ही सन्मानिला
अंकावरी आहे रतिच्या बुद्ध येथे झोपला
विसरला दुनियेस आपुल्या गुंजनाही विसरला
कमलपोषी भृंग आता कमलासही त्या विसरला
हे आले वैराग्य आम्हा निष्कामता ऐसी आली
तैसी नको नुसतीच जेथे दाढी हवी लुंगी हवी
"आपुल्याच दाती ओठ आपुला चावणे नाही बरे,
हक्क अमुचा अमुच्यासमोरी मारणे नाही बरे"
भाऊसाहेब पाटणकरांची स्वत:च्या मृत्युवरील ही शायरी.
जन्मातही नव्हते कधी मी, तोंड माझे लपविले
मेल्यावरी संपूर्ण त्यांनी, वस्त्रात मजला झाकले
आला असा संताप मजला, काहीच पण करता न ये
होती आम्हा जाणीव की, मेलो आता, बोलू नये
कफ़न माझे दूर करुनी, पाहिले मी बाजूला
एकही आसू कुणाच्या, डोळ्यात ना मी पाहिला
बघुनि हे, माझेच आसू धावले गालावरी
जन्मभर हासून मी, रडलो असा मेल्यावरी
मरता आम्ही, शोकार्णवी बुडतील सारे वाटले
श्रद्धांजली तर जागजागी देतील होते वाटले
थोडे जरी का दु:ख माझे, असता कुणाला वाटले
जळण्यातही सरणात मजला, काहीच नसते वाटले
ऐसे जरी संतोष तेव्हा मानिला इतुकाच मी
कळलेच ना तेव्हा कुणा कफ़नात जे रडलो आम्ही
त्यांचेच हे उपकार ज्यांनी, झाकले होते मला
झाकती प्रेतास का ते तेव्हा कुठे कळले मला
लाभला एकांत जेव्हा, सरणात त्या माझ्या मला
रोखता आलाच नाही, पूर अश्रूंचा मला
जेव्हा चिता ही आसवांनी, माझी विझाया लागली
चिंता कसा जळणार आता, ह्याचीच वाटू लागली.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2017
स्वरसम्राट भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांनी आपल्या स्वरांची भुरळ अवघ्या जगालाच घातली होती. आज सकाळी ८ वाजता पुण्यात , ८९ वर्षांच्या ह्या स्वरभास्कराचा अस्त झाला.
January 24, 2011
नाट्यसमीक्षक, टीकाकार, भाषाअभ्यासक आणि इतिहासाचे जाणकार होते.
July 27, 2017
भारतीय रसायनशास्त्रज्ञ. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. नंतर ते त्या महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. विज्ञान प्रसारासाठी मराठीतून भाषणे दिली, मराठी वृत्तपत्रे आणि मासिकातून लेख लिहिले.
सृष्टीज्ञान या विज्ञान मासिकाच्या संपादक मंडळावर काम केले. आकाशवाणीवरून भाषणे दिली.
जन्म १८९९
मृत्यू १९८०
माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष
December 15, 2010
शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.
November 1, 2019
दादा कोंडकेंच्या चित्रपटांनी आईची ही प्रतिमा बदलून रागात प्रेम व्यक्त करू पाहणारी, आपल्या मुलाच्या भल्यासाठी त्याला अस्सल गावरान शिव्या घालणारी आई रत्नमाला यांच्यारूपाने चित्रपटसृष्टीला दिली. आईच्या रूपातील रत्नमाला यांनी या आईच्या बदललेल्या भूमिकेला खऱ्या अर्थाने न्याय दिला, म्हणूनच त्यांनी साकारलेली ही ‘आये’ चित्रपटसृष्टीत अजरामर झाली. किंबहुना रत्नमाला यांचे दादा कोंडकेंची ‘आये’ हेच नाव चित्रपटसृष्टीत रूढ झाले आणि आजतागायत ते तसेच आहे.
June 22, 2022
भालचंद्र नेमाडे, भाऊ पाध्ये आणि रंगनाथ पठारे यांच्या साहित्यावर राजन गवस यांनी बारकाईनं अभ्यास करून समीक्षात्मक लेखन-संपादन केलं आहे. गवस यांच्या साहित्यात मांडणी आणि अभिव्यक्तीवर कळत-नकळतपणे या साहित्यिकांचा प्रभाव पडलेला दिसतोच.
June 29, 2022
आपलं ठाणे बहुआयामी व्यक्तीमत्वांची मांदियाळीच! अशी अनेक व्यक्तीमत्व आपल्या ठाण्यात आहेत ज्यांनी आपल्या कार्यातनं आणि कर्तृत्वातनं आपली वेगळी ओळख जगासमोर ठेवली. असंच ठाण्यातलं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त जनसंपर्क अधिकारी
November 17, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti