जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चव्हाण, विमल
लढवय्या साम्यवादी चळवळीतील आपल्या साथीदाराचा संसार नेटाने चालवताना डाव्या चळवळीमध्येही योगदान देणाऱ्या त्या तिघीजणी. एकाच पक्षाशी म्हणजे लाल निशाण पक्षाशी बांधिलकी असलेल्या या तीन रणरागिण्यांचे अवघ्या काही दिवसांच्या अंतराने निधन झाले आणि एक पर्व संपले.
विमल चव्हाण यांची ओळख केवळ यशवंत चव्हाण यांच्या पत्नी अशी कधीच नव्हती. ते एक स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. विमल चव्हाण म्हणजे पूर्वाश्रमीच्या विमल हेमाडी.
मडगाव गोव्यात नारायणराव हेमाडी या प्रतिष्ठित व्यापाऱ्याच्या घरात त्यांचा १९१७ मध्ये जन्म झाला. मोठा परिवार होता. कॉन्व्हेंट शाळेत शिक्षण झाल्यामुळे इंग्रजी भाषेवर मराठी इतकेच प्रभुत्व होते. शाळेत असल्यापासूनच स्वभाव बंडखोर होता. बायबलच्या क्लासवरून त्यांनी शाळेच्या व्यवस्थापनाविरुद्ध लढा दिला होता. १९३८ च्या सुमारास त्या कोल्हापूरला वडीलबंधू प्रभाकर हेमाडी यांच्याकडे महाविद्यालयीन शिक्षणासाठी आल्या. तेथे लेखक, कलाकारांचा राबता असे. स्वाभाविकच विमलताईंवर सांस्कृतिक संस्कार झाले. त्या विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर होत्या. कोल्हापूरमध्ये सायकलवरून फिरणारी ही एकमेव मुलगी. याच दरम्यान त्यांनी यशवंत चव्हाण यांना पाहिले. कोल्हापूरमध्ये झालेल्या ऐतिहासिक सभेनंतर यशवंत चव्हाण यांच्यावर वॉरंट निघाले आणि त्यांना भूमिगत व्हावे लागले. त्यावेळी ते हेमाडी यांच्या घरी राहिले आणि नंतर विमलताईंच्या प्रेमाच्या बेडीत अडकले. १९४५ मध्ये त्यांचे लग्न अवघ्या पाच रुपयात झाले. अनेकदा दोघांचे राजकीय मतभेद होत. तरीही पतीबद्दल त्या नेहमी ‘माय हजबंड इज अ जेम’ असेच सांगत. स्वातंत्र्य लढय़ाला विरोध करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करणाऱ्या नवजीवन संघटनेमध्ये त्या सुरुवातीपासून होत्या. त्या संघटनेचे म्हणजेच आताच्या लाल निशाण पक्षाची मंडळी अगदी अलीकडच्या काळापर्यंत कम्युनवर राहत होती. विमलताई आणि यशवंत चव्हाण तेथेच राहत. डॉ. माधव चव्हाण हे त्यांचे पुत्र. जनचळवळीतल्या मंडळींप्रमाणेच विमलताईंनी पूर्णवेळ नोकरी केली आणि यशवंतराव पूर्णवेळ राजकारणात राहिले. खार येथील बी. पी. एम. हायस्कूलमध्ये त्या शिक्षिका होत्या. नोकरीच्या अखेरच्या काळामध्ये त्या या शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका होत्या. नोकरीमुळे आपल्याला राजकारणात सक्रिय होता आले नाही, ही खंत त्यांना अखेपर्यंत होती.
August 5, 2017
सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.
December 7, 2011
स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला.
April 20, 2016
संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या कन्या डॉ. अपर्णा मयेकर .पूर्वाश्रमीच्या रेखा डावजेकर यांनी जागवलेल्या आठवणी..
१५ नोव्हेंबर १९१७ ला पुण्याजवळ कोंडुर येथे दत्तात्रेय शंकर डावजेकर ऊर्फ डी. डी. यांचा जन्म झाला. तो दिवस होता दिवाळीतला पाडवा. अतिशय शुभ दिवस. डी. डीं.चे वडील शंकर डावजेकर हे उर्दू, मराठी नाटके व कीर्तनात तबला वाजवीत असत. त्यामुळे डी. डीं.ना लहानपणापासूनच संगीताचे बाळकडू मिळाले. दुर्दैवाने डी. डी. चार वर्षांचे असतानाच त्यांची आई बाळंतपणात दगावली. डी. डी. पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूलमध्ये शिकले. बुद्धीने अतिशय तल्लख. वर्गात पहिला नंबर कधी सोडला नाही. इंजिनीअर व्हावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती, पण गरिबीमुळे ते जमणे नव्हते. इयत्ता पाचवीत असताना साबणाच्या डबीत त्यांनी रेडिओ बांधला होता. ते सातवीत असताना लंडनला मेकॅनोची स्पर्धा होती. तेथे डी. डीं.च्या सर्किटला पहिले बक्षीस मिळाले. नूतन मराठीमध्ये असताना डी. डीं.च्या वर्गात दादा खरे म्हणून होते. त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स या विषयातील मॅगझिन्स येत असत. ती वाचून डी. डी. नवनवीन काही बनवण्याचा प्रयत्न करीत असत. तबलाही डी. डी. दादांकडूनच शिकले.
त्यावेळी स्वातंत्र्यलढय़ात प्रभातफेऱ्या निघत. या प्रभात फेऱ्यांतल्या गाण्यांना चाली लावून डी. डी. गात असत व इतरांनाही शिकवत असत. यादरम्यान नभोवाणीवरही ते गाण्यांना संगीत देऊ लागले. जलतरंग, दिलरुबा, हार्मोनियम व तबला ही वाद्ये ते लीलया वाजवीत. पुण्याच्या ससून हॉस्पिटलमध्ये डी. डीं.चे अॅोपेंडिक्सचे ऑपरेशन झाले तेव्हा ते तिथे रोज दिलरुबा वाजवीत. डॉक्टर मंडळी ते ऐकायला येत असत.
वाल्हे येथील इंदुमती बनसोड यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यावेळेस डी. डी. कोल्हापुरात राहत होते. राजारामपुरीत मालती बंगला येथे ते वास्तव्यास होते. अभिनेत्री बेबी नंदा यांचे पिताश्री मा. विनायक यांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये ते संगीतकार म्हणून नोकरीस होते. एकदा विनायक त्यांना म्हणाले, ‘अरे दत्ता, आज एक मुलगी गाण्याची ऑडिशन द्यायला येईल.’ नंतर एक सडपातळ, खूप लांब केसवाली आणि दोन वेण्या घातलेली एक मुलगी ऑडिशनला आली. साधारण १३-१४ वर्षांची असावी. डी. डीं.ना वाटले, की एवढी लहान मुलगी काय गाणार? पण जसे तिने गाणे सुरू केले, डी. डी. आश्चर्यातच पडले. अतिशय गोड आवाज, उत्कृष्ट हरकती, तालाची उत्तम समज! तिला कुठे ठेवू अन् कुठे नको असे डी. डीं.ना होऊन गेले. ‘अजून एक गाणं म्हण.. एक चॉकलेट देतो,’ असे करत करत डी. डीं.नी तिच्याकडून सात-आठ गाणी गाऊन घेतली. धावतच ते मा. विनायकांकडे गेले व म्हणाले, ‘ती मागेल तो पगार द्या; पण तिला नोकरीत ठेवून घ्या. फार गुणी मुलगी आहे.’ यावर मा. विनायक हसून म्हणाले, ‘अरे दत्ता, ही लता. माझी पुतणी! दीनानाथ मंगेशकरांची मुलगी!!’ अशा तऱ्हेने स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांची ऑडिशन घेण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. ‘माझं बाळ’ या चित्रपटात पाचही मंगेशकर भावंडांना प्रथम पाश्र्वगायनाची संधी देण्याचा मानही डी. डीं.नाच मिळाला. तद्वत लतादीदींचे पहिले हिंदी चित्रपटगीत ‘पा लागू करजोरी’ (चित्रपट : ‘आपकी सेवा में’) हेपण डी. डीं.नीच कम्पोज केले होते. अशा तऱ्हेने या स्वरसम्राज्ञीचे पदार्पणाचे मराठी व हिंदी चित्रपटगीत देण्याचा मान डी. डीं.ना मिळाला. वसंतराव देशपांडेंसारख्या दिग्गज गायकाला ‘पेडगावचे शहाणे’मध्ये डी. डीं.नी प्रथम गाणे दिले. पंडित जितेंद्र अभिषेकींनीही पहिले पाश्र्वगायन डी. डीं.कडेच केले होते. ते म्हणजे.. ‘गोमू माहेरला जाते हो नाखवा’!
त्यांनी सुधा मल्होत्राला ‘गोवलकोंडा का कैदी’ या चित्रपटात पहिल्यांदा ब्रेक दिला. त्यांनी अभिनेता प्रेमनाथलाही या चित्रपटात गायला लावले. माणिक दादरकर (माणिक वर्मा) यांची पहिली एच. एम. व्ही. रेकॉर्ड डी. डीं.नीच काढली. पं. हरिप्रसाद चौरासिया व अनिल मोहिले यांनाही पहिला ब्रेक त्यांनीच दिला. कोल्हापुरात असताना डी. डी. आणि लताबाई एकत्र खेळतही असत. लताबाई व आशाबाई यांच्याकडून डी. डीं.ना बरेच काही शिकावयास मिळाले. आणि त्यांनीही डी. डीं.वर मोठय़ा भावाप्रमाणे माया केली. लताबाईंनी ‘आनंदघन’ नावाने संगीत दिले. त्या चित्रपटाचे संगीत संयोजन व पाश्र्वसंगीत डी. डीं.नी केले आहे. मुंबईत आल्यानंतर डी. डी. काही काळ एच. एम. व्ही.मध्ये नोकरीला होते. तेथे जी. एन. जोशी आणि गजानन वाटवेंशी त्यांची ओळख झाली. वाटवेंचे काही कार्यक्रमही डी. डीं.नी वाजवले. ‘थांबते मी रोज येथे’, ‘कुणी बाई गुणगुणले’ ही आशाबाईंची एच. एम. व्ही. रेकॉर्ड, त्याचप्रमाणे ‘गेला कुठे बाई कान्हा’, ‘तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला’ ही लतादीदींची एच. एम. व्ही. रेकॉर्डही तेव्हाच प्रसिद्ध झाली. ही सर्व गाणी डी. डीं.नीच लिहिली व त्यांना चालीही दिल्या. नंतर सी. रामचंद्रन यांच्याकडे डी. डीं.नी साहाय्यक म्हणून काम केले. रोशनजी व चित्रगुप्त (आजचे संगीतकार आनंद-मिलिंद यांचे वडील) यांच्याकडेही त्यांनी काम केले. त्याबरोबरच स्वतंत्रपणे संगीत दिग्दर्शन देणेही सुरूच होते. पण डी. डीं.ना खरा ब्रेक मिळाला तो ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटापासून! त्याला महाराष्ट्र सरकारचे पारितोषिक मिळाले. हा चित्रपट तवायफच्या जीवनावर होता. गाण्यात तो बाज असावा म्हणून डी. डी. व दिग्दर्शक राजा ठाकूर हे काही दिवस रेडलाइट एरियात जाऊन गाणी ऐकायचे. नंतर ‘तेरे वादे भी सपने दिखाते रहे’ हे गाणे आशाताईंच्या आवाजात रेकॉर्ड झाले व त्यांनासुद्धा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार मिळाला.
मग मात्र डी. डीं.कडे चित्रपटांची रीघ लागली. डी. डीं.चा पाश्र्वसंगीत देण्यात हातखंडा होता. त्यामुळे राजा परांजपेंनी त्यांना ‘पाठलाग’ हा भयपट दिला. फक्त पाच वादकांमध्ये केलेले ‘या डोळ्यांची दोन पाखरे’ हे गाणे प्रचंड गाजले. ‘नको मारूस हाक’ हे गाणेही लोकप्रिय झाले. डी. डीं.ना व आशाताईंना पुरस्कार मिळाले. पुन्हा ‘पडछाया’मध्ये ‘बाई माझी करंगळी मोडली’, ‘उठ शंकरा, सोड समाधी’ ही गाणी गाजली. गजानन जागीरदार, धर्माधिकारी, राजा ठाकूर, यशवंत पेटकर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या मातब्बर लोकांबरोबर डी. डीं.नी काम केले. वसंतराव जोगळेकर, राजदत्त यांच्यासमवेतही त्यांनी काम केले. डी. डीं.ना नवनवीन प्रयोग करायला आवडत. ‘काका, मला वाचवा’ या चित्रपटात ‘सा सागर उसळे कैसा’ हे सप्तसुरांचे गाणे डी. डीं.नी ग. दि. माडगूळकरांकडून लिहून घेतले. ‘साऊंड अॅाण्ड म्युझिक’ या चित्रपटातील गाण्यावरून ती कल्पना घेतली होती. ‘आसावल्या मनाला’ या गाण्यात डी. डीं.नी तोडी रागात शुद्ध धैवत लावला होता. ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’, ‘पाहू रे किती वाट’, ‘संथ वाहते कृष्णामाई’, ‘धरतीची लेकरे’ यासारखे अनेक चित्रपट डी. डीं.नी केले.
याशिवाय रेडिओच्या अनेक संगीतिका, बालचित्रवाणीचे चित्रपट, अनेक माहितीपटही त्यांनी केले. १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त आमचे नेहमी कार्यक्रम होत. एका हुतात्मादिनी ऑगस्ट क्रांती मैदानात मला इंदिरा गांधींच्या शेजारी बसून गाण्याची संधी मिळाली. डी. डी. हे बहुगुणी व्यक्तिमत्त्व होते. ते संगीतकार होते, तसेच कवी आणि लेखकही होते. त्यांनी लिहिलेली ‘सांतानेरीचा अपघात’ ही भयकथा वाचली की अंगावर काटा येतो. ‘विज्ञानयुग’ या मासिकात इलेक्ट्रॉनिक्स या विषयावर त्यांची लेखमाला येत असे. माझा मोठा भाऊ विजय हा इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर आहे. त्याच्या मदतीने त्यांनी अनेक म्युझिकल इन्स्ट्रमेंट्स बनवली. इलेक्ट्रॉनिक तानपुरा, स्वरमंजुषा, सूरपेटी, लेहेरासाथी. त्यात वेगवेगळे ६०० ताल होते. सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे भारतातील पहिला सिंथेसायझर डी. डीं.नी बनवला. त्याला तेव्हा क्लेव्हायोलिन म्हणत. पूर्वी परदेशी सिंथेसायझर अवाढव्य असत. डी. डीं.नी हा सिंथेसायझर सुटसुटीत बनवला. कौतुकाची गोष्ट म्हणजे आर. डी. बर्मनच्या साहाय्यकांनी तो आर. डीं.च्या जवळजवळ ३०० रेकॉर्डिग्जमध्ये वाजवला. डी. डी. उत्कृष्ट टॅप डान्सर होते. त्यावेळची प्रसिद्ध अभिनेत्री बेबी आचरेकर हिच्याबरोबर डी. डीं.नी चित्रपटात टॅप डान्स केला होता. तसेच केवळ तीस सेकंदांत समोरच्या व्यक्तीचे रेखाचित्र डी. डी. काढत असत. आमच्या भीमराववाडीच्या दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावरील चित्र नेहमी डी. डी.च काढत. एकदा एका काळ्या कागदावर तेली खडूंनी केशरी रंगात ‘मंगळावरचा माणूस’ हे चित्र त्यांनी काढले होते. ते ग. दि. माडगूळकरांना एवढे आवडले, की त्यांच्या ‘पंचवटी’ बंगल्यात ते त्यांनी हॉलमध्ये लावले होते. ग. दि. मा. एकदा म्हणाले होते, की- ‘मी लिहिलेल्या काव्यात जर कधी बदल करावयाचा असेल तर तो अधिकार मी फक्त डी. डीं.ना देईन. कारण त्यांना काव्याची जाण आहे.’
डी. डीं.ना परिस्थितीमुळे स्वत:ला फार शिकता आले नाही. त्यामुळे आम्ही भावंडांनी खूप शिकावे असा त्यांचा व आईचा आग्रह असे. त्याप्रमाणे विजय इलेक्ट्रॉनिक इंजिनीअर, विनय ऊर्फ पप्या सिव्हिल इंजिनीअर आणि मी डॉक्टर झाले. धाकटी बहीण ललिता (डॉली) हिचे ड्रॉइंग अतिशय सुंदर असल्याने तिने जे. जे. स्कूलमध्ये कलाशिक्षण घेतले. डी. डीं.कडे एवढे कलागुण असूनही त्यांचे म्हणावे तसे चीज झाले नाही. त्यामुळे मी त्यांना ‘शापित योगी’ म्हणते. योगी- कारण ते स्थितप्रज्ञ होते. कौतुक झाले, नाव मिळाले म्हणून गर्व नाही. आणि वाईट परिस्थिती आली म्हणून विषादही नाही. जेव्हापासून मला कळायला लागले- माझे वडील डी. डी. म्हणजे खूप ‘मोठा माणूस’ आहे- मला खूप आश्चर्य वाटायचे. माझ्या मैत्रिणींना खूप उत्सुकता असायची. ‘ए रेखा, एकदा आम्हाला डी. डीं.ना बघायचंय,’ असे त्या म्हणत. मग मी त्यांना घरी घेऊन आले की त्यांचा भ्रमनिरास व्हायचा. वडील नेहमी पांढरा सदरा, पायजमा किंवा पांढरी चड्डी अशा वेशात असायचे. एकदम साधे. डामडौल नाही. भपका नाही. लोकांच्या अपेक्षेत डी. डी. म्हणजे ‘स्टाईलबाज’ माणूस असावा. पण मग सहवासात आल्यावर त्यांचा साधेपणा, ज्ञान, मिश्कील स्वभाव याने ते समोरच्याला जिंकायचे. मला नेहमी म्हणायचे, ‘शेवटच्या क्षणापर्यंत माणसाने काहीतरी शिकत राहावे. काहीतरी नवीन करावे, म्हणजे मेंदू तल्लख राहतो.’ एक गोष्ट आठवते. वयाच्या २४ व्या वर्षी मी रेखा डावजेकरची ‘सौ. अपर्णा मयेकर’ झाले. पण इतक्या वर्षांत मी त्यांना कधीही रागावलेले बघितले नाही.
वसंतराव जोगळेकरांचा ‘शेवटचा मालुसरा’ हा चित्रपट डी. डीं.नी केला. ‘तुझे रूप राणी’ या गाण्यासाठी महेंद्र कपूरना अॅशवार्ड मिळाले. पुढचा ‘हा खेळ सावल्यांचा’ हा चित्रपट डी. डीं.नी साइन केला. त्यासाठी रवींद्र साठेंना घेऊन गाणेही बसवले. आणि अचानक वसंतराव जोगळेकरांकडून फोन आला- ‘डावजेकर, हा चित्रपट मी हृदयनाथला (बाळ) देत आहे.’ आम्ही सगळे नव्र्हस झालो. पण डी. डी. म्हणाले, ‘अरे वा! बाळ गुणी संगीतकार आहे. छान संगीत देईल. माझ्या त्याला शुभेच्छा!’ किती मोठे मन! चित्रपट हातातून गेला याचे दु:ख तर नाहीच; उलट बाळला मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्या. म्हणूनच मी डी. डीं.ना योगी म्हणते. अजातशत्रू असणे म्हणजे काय, हे त्यांना पाहून कळावे. आयुष्यात त्यांना बरेच पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचे, सूरसिंगार, लता मंगेशकर पुरस्कार, झी जीवनगौरव पुरस्कार, ग. दि. मा. पुरस्कार, वगैरे वगैरे. पण डी. डी. नेहमी जमिनीवरच!
साधे घसरून पडण्याने माकडहाड दुखावले गेले आणि एका आठवडय़ातच माझ्या वाढदिवसाच्या दिवशी ते अनंतात विलीन झाले. कॉलनीतली माणसे म्हणाली, ‘अजून डी. डी. आम्हाला ‘वॉक’ करताना दिसतात.’ डी. डी. नेहमी म्हणायचे, ‘मला पुनर्जन्म नाही.’ कदाचित परमेश्वराला पण त्यांचे सुंदर संगीत कायम ऐकावेसे वाटले असेल.
डॉ. अपर्णा मयेकर
संकलन.संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 27, 2017
वैद्यक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन ठाण्याचे मानबिंदु ठरलेले डॉ. गडवाल हे ठाण्यातलं एक यशस्वी व्यक्तिमत्व! डॉ. गडवाल यांनी “बॉटॅनिकल रॉ मटेरियल” समजल्या जाणार्या “सोनामल वायरम” या वृक्षाच्या जंगली प्रजातीमधून तयार होणारी “सोनालम क्रॉप” ही औषधी वनस्पती जगासमोर आणली.
May 23, 2014
ज्येष्ठ डॉक्टर सुभाष रामकृष्ण म्हसकर यांनी ‘इतिहास वैद्यकशास्त्राचा’ हा ज्ञानाचा ठेवा पुस्तकरूपाने वाचकांना उपलब्ध करून दिला. म्हसकर यांच्या घराण्यात गेली शंभर वर्षे डॉक्टरी व्यवसाय परंपरेने चालत आलेला आहे. एका शतकात आत्तापर्यंतच्या पाच पिढ्यांमध्ये एका घराण्यात ५४ यशस्वी डॉक्टर्स निपजले ही एक विक्रमी घटना म्हणता येईल.
June 8, 2011
फक्त दूरदर्शन होते, चॅनल्सचा सुळसुळाट नव्हता तेव्हा टीव्हीवर चमकणाऱ्या प्रत्येक चेहर्याला ग्लॅमर होते. यात चारूशीला पटवर्धन हे नाव ‘बेस्ट थ्री’मध्ये होते.
June 4, 2011
साडेतीनशे वर्ष झाली तरी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या राजसदरेवर शिवरायांचा पुतळा नव्हता. मेघडंबरी म्हणजे छत्र आहे, पण त्या मेघडंबरी मध्ये शिवरायांचा पुतळा नाही अशी परिस्थिती होती. या मेघडंबरीत पुतळा बसविणे हि काही सामान्य गोष्ट नव्हती. हा किल्ला भारतीय पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असल्याने तेथे कोणतीही नवीन गोष्ट करण्यास बंदी होती. यासाठी युवराज संभाजीराजेंनी पुरातत्व खात्याशी सातत्याने पाठपुरावा करून पुतळा बसविण्यास परवानगी मिळवण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी मिळत नव्हती. शेवटी ६ जुन २००८ हा दिवस पुतळा बसविण्यासाठी निश्चित करण्यात आला.
February 11, 2022
मराठी सिनेमांच्या संगीतासाठी सध्या आघाडीच्या नावांमध्ये घेतलं जाणार एक नाव म्हणजे चिनार-महेश. चिनार खारकर आणि महेश ओगले या जोडगोळीने संगीतकार म्हणून मराठीतल्या अनेक सिनेमांच्या गाण्यांना संगीत दिलं. या दोघांनी एकत्रच मराठी सिनेइंडस्ट्रीत संगीतकार म्हणून श्रीगणेशा केला तो २००४ साली.
January 13, 2019
सारंगी हे तंतुवाद्य, खरेतर साथीचे. एवढेच नाही, तर कोठीवर, दिवाणखान्यात तवायफ सादर करत असलेल्या ठुमरी-कजरी-चैतीसारख्या उपशास्त्रीय गाण्याला साथ करणारे वाद्य म्हणून सारंगी तशी 'बदनाम' होती. त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९२७ रोजी झाला. परंतु विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात या सारंगीला स्वतंत्र वाद्य म्हणून स्थान मिळवून देण्याचे काम सारंगिये पंडित रामनारायण यांनी केले. वाजवण्यास अतिशय अवघड परंतु तरीही कानाला अतिशय गोड असणाऱ्या या वाद्यावर रामनारायण यांनी लहान वयातच प्रभुत्व मिळवले. पं. रामनारायण यांचे घराणे राजस्थानातील उदयपूरचे. संगीतसेवा त्यांच्या घराण्यातच. आजोबा-पणजोबा-खापर पणजोबा सारेच गायन-वादनात रमलेले. वडील नाथुजीदेखील दिलरुबावादक.
सारंगी मात्र कुणीच वाजवली नव्हती. मात्र, त्यांच्या घराण्याचे गुरू असलेले गंगागुरू यांनी त्यांच्या घरी ठेवलेली सारंगी पाचव्या वर्षीच रामनारायण यांच्या हाती लागली. मग सारंगी त्यांचा ध्यास आणि श्वास बनली. साहजिकच पहिले धडे त्यांच्याकडून मिळणे स्वाभाविकच होते. परंतु नंतर त्यांना गायक म्हणून घडवले ते उदयलाल, माधव प्रसाद यांनी. या दोहोंच्या पश्चात १९४३ साली रामानारायण गुरुच्या इच्छेनुसार पुढचे शिक्षण घेण्यासाठी लाहोरला अब्दुल वाहीद खान यांच्याकडे गेले. तिथे लाहोर आकाशवाणीवर गायक म्हणून अर्ज केला. परंतु तिथे संगीत विभागात अधिकारी असलेल्या जीवनलाल मट्टू यांचे रामनाराण यांच्या हाताकडे लक्ष गेले आणि त्यांच्या लक्षात आले की हा तर सारंगीवादकही आहे. मग मट्टूंनी त्यांना सारंगीवादक म्हणूनच घेतलं व अब्दुसल वाहदी हुसेन यांच्याकडून संगीताचे धडेही देवविले. मग रामनारायण यांचे आयुष्यच पालटले.
आत दडलेला सारंगिया उफाळून आला व बोटांची जादू पाझरत राहिली ती आजवर. फाळणीनंतर ते दिल्ली आकाशवाणीत आले. परंतु त्यांच्यातला सर्जनशील वादक अस्वस्थ होता. म्हणून शेवटी ते मुंबईत आले. मुंबईने त्यांना साथ दिली. सिनेमात उमेदवारी केली. ओ. पी. नय्यर यांचा लाडका वादक अशी त्यांची ख्याती झाली आणि त्यांच्या अनेक गीतांना या सारंगीने चार चाँद लावले. तिथे नौशादपासून ओपी नय्यर यांच्यापर्यंत सर्वांनी सारंगीचा योग्य वापर करून घेतला. ओ. पी. नय्यर यांच्या संगीतातील सारंगी हा या वाद्याचा एक बेमिसाल रंग होता. सारंगी दु:खी पार्श्वभूमीप्रमाणेच आनंदी आणि रोमँटिक गाण्यांतही त्यांनी अनोख्या पद्धतीने खुलवली. कहीं पे निगाहें कहीं पे निशाना, मैं प्यार का राही हू, आज कोयी प्यार से दिल की बाते कह गया, रातों को चोरी चोरी बोले मोरा कंगना या सारख्या गाण्यांना ओ. पी. नय्यर यानी पं. रामनाराण यांचा सुरेख वापर करून घेतला.
बॉलीवूड मध्ये काम कून ही स्वतंत्र कलाकार म्हणून प्रतिष्ठा त्यांना मिळाली नव्हती. मग त्यांनी मुंबईत सारंगीवादनाचे स्वतंत्र कार्यक्रम सुरू केले. रसिकांनी सुरुवातीला त्यांच्या सारंगीला नाके मुरडली. पंडितजींनी जिद्द सोडली नाही. काही काळ ते कुणा ना कुणाच्या साथीने कार्यक्रम करत राहिले. लवकरच एकल कार्यक्रम सुरू केले आणि मग भारतासहित जगभर तुफान लोकप्रियता मिळाली. त्या वेळच्या एचएमव्ही कंपनीसाठी त्यांनी सारंगीच्या तीन रेकॉर्डस् दिल्या आणि त्यांची नवी ओळख पटू लागली.
पं. रविशंकर यांच्यानंतर परदेशात भारतीय संगीत पं. रामनाराण यांनीच पोहोचविले. अमेरिका आणि युरोपचा दौरा करून या भारतीय वाद्याला जागतिक संगीतात स्थानापन्न करण्यासाठी रामनारायण यांनी सत्तरच्या दशकात खूप दौरे केले. त्यांना आजवर 'संगीत नाटक अकादमी'पासून 'पद्मविभूषण'पर्यंत अनेक मानाचे किताब देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या पं. भीमसेन जोशी पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. वाद्यावरील प्रभुत्व आणि त्याला सर्जनशीलतेची जोड मिळाल्यामुळे त्यांचे वादन अभिजाततेच्या दर्जाचे होते. पंडित रामनारायण सारंगी बद्दल म्हणतात.
‘सारंगी हे सांगीतिकदृष्ट्या अत्यंत समृद्ध भारतीय वाद्य आहे. ते केवळ आर्त वा करुण वाद्य नाही. उलट सारंगी म्हणजे ‘सौ रंगी’ असा अर्थ आहे. विविध सांगीतिक शक्यता, नव्या वाटांचे रंग खुलवणारी ती सारंगी आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti