जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जयशंकर दानवे यांनी सिनेसृष्टी उत्कृष्ट खलनायक व चरित्र अभिनेता म्हणून गाजवली तर नाट्यसृष्टीत ते उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक व खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. राजकपूरना प्रथम “वाल्मिकी” चित्रपटात नारदाचा मेकअप करून हिंदी सिनेसृष्टीला शो मन देणारे अशी त्यांची ओळख होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी एकूण ६५ चित्रपट आणि १३४ नाटके केली.
March 1, 2022
मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक दत्ता धर्माधिकारी यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी कोल्हापुर येथे झाला. शांतारामबापूं नंतर हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीत यश मिळवणारा दिग्दर्शक म्हणून दत्ता धर्माधिकारी याचं नाव घ्यावं लागेल. दत्ताजींचं शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्याच वेळी "पाध्येबुवा‘कडं त्यांनी शास्त्रोक्त गायनाच्या शिक्षणाचे धडेही गिरवले; पण त्यांचे वडील जगन्नाथराव वारल्यामुळं शिक्षण अर्धवट सोडून ते पुण्यात आले आणि नोकरी करायची म्हणून प्रभात स्टुडिओत त्यांनी "टाइमकीपर‘ची नोकरी स्वीकारली; पण त्यांचं मन त्यात रमत नव्हतं. त्यांना व्ही. शांताराम यांच्यासारखा मोठा दिग्दर्शक व्हायचं होतं. ते क्षेत्र त्यांना खुणावत होतं.
चराचरसृष्टीचा "टाइमकीपर‘ ब्रह्मदेव; त्यानं दत्ताजींच्या कुंडलीत शुभवेळेची नोंद केली; ते शांतारामबापूंचे व दामले-फत्तेलाल यांचे सहायक दिग्दर्शक झाले! आणि १९५० मध्ये त्यांनी "मायाबाजार‘ (हिंदी व मराठी) हा चित्रपट स्वतंत्रपणे दिग्दर्शित केला. सुलोचना, बेबी शकुंतला, उषा किरण (यांना दत्ताजींनी नायिकेची प्रथम संधी दिली), राजा गोसावी, शरद तळवलकर (यांनाही रजतपटावर प्रथम संधी दिली), सूर्यकांत, चंद्रकांत, राजा परांजपे, राजा नेने, जयश्री गडकर, रेखा, चित्रा आदी कलावंतांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली आपल्या भूमिका उत्तम प्रकारे साकारल्या. मराठीबरोबरच हिंदीतले प्रथितयश मोतीलाल, सोहराब मोदी, नलिनी जयवंत, गीता बाली, निरुपा रॉय, मीनाकुमारी आदी कलाकारांनीही त्यांच्या दिग्दर्शनाखाली काम केलं होतं.
"बाळा जो जो रे‘, "स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी‘, "भाग्यवान‘, "चिमणीपाखरं‘, "एक धागा सुखाचा‘, "अबोली‘, "सावधान‘, "सुहागन‘ (हिंदी) चित्रपटांबरोबरच "अखेर जमलं,‘ "आलिया भोगासी‘, "लग्नाला जातो मी‘, असे विनोदी चित्रपट काढून त्यांनी लोकांना खळखळून हसवलंही. याशिवाय "थांब लक्ष्मी कुंकू लावते‘, "विठू माझा लेकूरवाळा‘, "सतीचं वाण‘, "सतीची पुण्याई‘, "सुदर्शनचक्र‘, "भक्त पुंडलिक‘ इत्यादी धार्मिक व पौराणिक चित्रपट तितक्या च समर्थपणे त्यांनी दिग्दर्शित केले. "भाग्यवान‘, "दीप जलता रहे‘, "मुझे सीने से लगा लो‘, "दौलत का नशा‘ इत्यादी हिंदी चित्रपटांचंही दिग्दर्शन त्यांनी केलं. "दैवे लाभला चिंतामणी‘, "कुंकू जपून ठेव‘ इत्यादी यशस्वी नाटकं त्यांच्या नावावर जमा आहेत. "कुंकू जपून ठेव‘ या नाटकात नायिकेच्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती, तीही वयाच्या साठाव्या वर्षी. त्यांचा "महात्मा‘ हा चित्रपट पु. ल. देशपांडे यांच्या "भाग्यवान‘ नाटकावर आधारित होता आणि तो मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषांमध्ये निर्माण केला होता. एकच चित्रपट एकाच वेळी तीन भाषांमध्ये निर्माण करणारे दत्ताजी हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातले पहिले निर्माता-दिग्दर्शक होते. सर्व समीक्षकांनी या चित्रपटाचं यथोचित कौतुक केलं होतं. दत्ताजींचं हास्य ही त्यांना ईश्व-रानं दिलेली देणगी होती आणि कोणत्याही संकटात ते हास्य त्यांना सोडून गेलं नाही. साधेपणा हा त्यां चा गुण होता.
एवढंच नव्हे तर, संगीतकार वसंत पवार यांना हिंदी चित्रपटात त्यांनी संधी दिली व त्यांचा रुबाब वाढावा म्हणून त्यांना वूलनचा सूटही शिवून दिला होता. आपल्या "स्टाफ‘वर त्यांचं मनस्वी प्रेम होतं. त्यामुळंच एक चित्रपट पूर्ण झाल्यावर दुसरा चित्रपट सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरीच्या काळातला पगारही ते देत असत! काही काम न करताही आपल्या या कुटुंबाला ते सहा-सहा महिने पोसत असत. स्वतः उत्तम दिग्दर्शक असूनही आपले सहकारी अनंत माने यांना आपल्या मराठी व हिंदी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची संधी त्यांनी दिली होती. एखाद्या संतानं प्रेमळ मानवाचं रूप घेऊन तो या मायावी चित्रपटसृष्टीत वावरतोय, असं दत्ताजींना पाहून वाटायचं. दत्ता धर्माधिकारी यांचे ३० डिसेंबर १९८२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 2, 2018
अंधांना नेहमीच मार्ग दाखवावा लागतो असे नाही.अनेक अंधानी जगाला जगायला व जगवायला शिकविले.अंध असूनही तिने देशासाठी पदक जिंकले, तरीही देशातील जनता रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करणार.
December 24, 2024
स्त्रियांना वर्ज्य असणार्या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया.
एकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या स्वप्नांना साकार करण्यासाठी केवळ जिद्द लागते. जिद्दीशिवाय खडतर स्वप्न साकार करणं कठीणच. त्यातही सर्वसामान्य घरात जन्मलेल्या महिलांना तर ते त्याहून कठीण. लहानपणापासूनच विविध क्षेत्रांत आपलं नाव उमटवणा-या रेश्माला एका अशा क्षेत्रात काम करायचं होतं जिथे स्त्रियांनी जाण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल.
बारावी झाल्यावर नक्की कोणतं क्षेत्र निवडायचं याविषयी तिच्या मनात खलबतं सुरू होती. खरं तर तिला पायलट व्हायचं होतं. मात्र त्यावेळेस पायलटसाठी तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र तिने हिरमुसून न जाता एका वेगळ्या करिअरचा शोध घेत राहिली. याच शोधात असताना र्मचट नेवीविषयी माहिती सांगणा-या व्याख्यानाबद्दल तिला कळलं. र्मचट नेवी हे क्षेत्र रेश्माला वेगळं वाटलं, त्यामुळे हे व्याख्यान ऐकण्याची तिची इच्छा झाली. व्याख्यानात या क्षेत्राविषयी तिने ऐकलेली माहिती तिला फार आवडली.
काहीतरी आव्हानात्मक, कठीण, अशक्य करण्याची तिची धडपड या र्मचट नेवीच्या करिअरमुळे पूर्ण होणार होती. त्यामुळे आता याच क्षेत्रात तिला जाण्याची इच्छा झाली. या क्षेत्रात आल्यावर स्वत:चं वैयक्तिक आयुष्य लांब होतं. घरच्यांपासून वर्षानुवर्षे दूर राहावं लागतं. अथक परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो. लहानपणापासून खेळ, नृत्य अशा गोष्टींमध्ये अव्वल असणारी रेश्मा आता मरिन क्षेत्रात जाऊ पाहत होती. आपली मुलगी इतरांच्या पावलांवर पाऊल न ठेवता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करतेय हे तिच्या पालकांना जाणवलं आणि त्यांनीही तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं.
मुळातच अभ्यासू विद्यार्थी असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्याआधी तिने या क्षेत्रात येणा-या सर्व गोष्टी तपासल्या. म्हणजेच शिक्षण झाल्यावर नोकरी कशी मिळते, पगार किती असतो, सर्वात वरची पोस्ट कोणती? त्यासाठी किती अभ्यास लागतो? त्या अभ्यासाला किती वर्षे जातात? या सा-या गोष्टींची खातरजमा करून तिने अभ्यासाला सुरुवात केली.
या मुलाखतीत ती बोलताना तिने सांगतिलं की, ‘मला एकतर आकाशात उडायचं होतं किंवा पाण्यावर राहायचं होतं. वस्तुत: जमिनीवर नसतानाही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ती र्मचट नेवीमध्ये चिफ ऑफिसर आहे. नेहमीच्या मार्गावर चालून, १० ते ५ नोकरी करून घर-संसार सांभाळायचा एवढया माफक अपेक्षा मुलींच्या असतात. मात्र या अपेक्षांना छेद देत आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तिला वाटतं.
या क्षेत्रात काम करण्याविषयी आणि काम करताना आलेल्या अडचणींविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘मुळातच या क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी फार आहे. शिवाय आपल्या या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करावा अशी काही लोकांची इच्छाही नसते. पुरुषांच्या समुदायात राहून त्यांच्यासोबत मिळून-मिसळून काम करणं फार कठीण आहे. त्यांच्यात समरस होण्यासाठीच फार वेळ लागतो. कठीण काम असल्यामुळे महिलांना एखादं काम जमणारच नाही अशी समजूत पुरुषांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन करणं सर्वप्रथम काम मानलं जातं. आपल्या सहका-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टया सक्षम राहणंही तितकंच गरजेचं आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘शिपमध्ये असल्यामुळे निसर्गातले अनेक चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. सूर्य क्षितिजाला जाताना त्याचा होणारा लालबुंद रंग म्हणजे नैसर्गिक जादूच वाटते. असे विविध निसर्गातील चमत्कार नेहमी अनुभवता आले.’
‘जेव्हा मी पहिल्यांदाच बोर्ड-शिपवर गेले तेव्हा प्रत्येक ऑफिसर मला एकच प्रश्न विचारत होते की, का तू र्मचट नेव्हीमध्ये यायचं ठरवलंस? या निर्थक प्रश्नांमुळे मी कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचे, शिवाय माझ्यातला आत्मविश्वासही कमी व्हायचा. आजही महिलांना त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी जर कष्ट पडत असतील तर महिलांनी केवळ चूल आणि मूल याच संकल्पनेत रमायचं का?’ असं ती म्हणते.
‘र्मचट नेवीमध्ये करिअर करण्याचा माझा निर्णय किती चुकीचा आहे असं काहींनी मला येथे जाणवून दिलं. मात्र या टिपिकल संकल्पनेतून मला समाजाला बाहेर काढायचं होतं. कालांतराने माझं काम पाहून माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पुरुषांप्रमाणे मीही काम करू शकते, असं त्यांना जाणवलं आणि अल्पावधीतच माझे वरिष्ठ माझ्यावर विश्वासाने काम सोपवू लागले. र्मचट नेवीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर मी जेव्हा तिकडे रुजू झाले त्यावेळेस माझ्या मापाचे युनिफॉर्म तिथे उपलब्धच नव्हते,’असं रेश्मा सांगत होती.
रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणं खरं तर फार अवघड काम आहे. वेगळी वाट धरणा-या महिलांच्या आयुष्यात अनेक संकटंही येतात; मात्र ती संकटं दूर सारून त्यातूनही नवा दृष्टिकोन साधून जी स्त्री नैया पार करते तिलाच आजची खरी सक्षम स्त्री म्हणायला हवं, त्यामुळे रेश्मा मुरकरही त्यापैकीच एक आहे. आज ती र्मचट नेवीमध्ये चीफ ऑफिसर पदावर आहे.
विचार केला नसेल अशा सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळतायत. या सा-या यशामागे तिच्या आई-वडिलांनी तिला मोलाची साथ दिली म्हणून ती पुढे जाऊ शकली असं ती अभिमानाने सांगते. खेळ, कला आणि अभ्यास अशा सा-या गोष्टींचा यथासांग मेळ घालत तिने तिची सारी स्वप्नं पूर्ण केलीत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात रेश्माने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली हे आजच्या महिला दिनाच्या दिवशी सांगणं म्हणजे फार कौतुकाची गोष्टच ठरेल ना!
-- स्नेहा कोलते
April 6, 2017
शर्मिला टागोर, मुमताज आणि हेमा मालिनी सारख्या ताकदीच्या नायिका पडदा गाजवत असताना जया भादुरी या नावाने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म ९ एप्रिल १९४८ रोजी जबलपुर, मध्य प्रदेश येथे झाला. सत्तरच्या शतकात सर्वसामान्य, नाकासमोर चालणा-या मुलीला ग्लॅमरच्या जगात पाय रोवणे कठीण होते. पण, जया भादुरी यांचा साधेपणा, निरागसता प्रेक्षकांना एवढा भावला की बस्स.. आपल्या शेजारी रहाणा-या मुलीबद्दल जशी आत्मियता असते तशीच त्यांना प्रेक्षकांकडून मिळाली.
जया भादुरी यांना सर्वप्रथम बंगाली निर्माते सत्यजीत रे यांनी 'महानगर' या चित्रपटात संधी दिली.
ऋषिकेश मुखर्जी यांनी 'सुमन' मध्ये त्यांचा अभिनय पाहिला आणि आपल्या 'गुड्डी' या चित्रपटासाठी शालेय विद्यार्थिनीची भूमिका दिली. 'गुड्डी' चित्रपटही गाजला आणि जया भादुरी यांना लागलीच राजश्री प्रोडक्शनचा की फिल्म ‘उपहार' या चित्रपटाची नायिका बनण्याची संधी मिळाली. पारंपारीक पेहराव, सामान्य वागण्याने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. अत्यंत कुशलतेने आपल्या इमेजमध्ये बदल केला आणि पिया का घर, अनामिका, परिचय, कोरा कागज, अभिमान, मिली, कोशिश सारखे उत्तम चित्रपट केले. ताकदीची अभिनेत्री म्हणून ओळख झाल्यावर त्यांच्यासमवेत काम करताना भलेभले कलाकरही घाबरत असत. अमिताभ बच्चन आणि संजीवकुमार यांच्याबरोबर त्यांनी अधिक काम केले. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांची पहिली भेट पुण्याचा फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूटमध्ये झाली. त्यानंतर ते गुड्डीच्या सेटवर भेटले. बंगाली संस्कृतीनुसार ३ जून १९७३ मध्ये दोघांचा विवाह पार पडला होता. अमिताभ आणि जया बच्चन या जोडीचे 'चुपके चुपके', 'अभिमान,' 'सिलसिला' आणि 'जंजीर', 'एक नजर' 'कभी खूशी कभी गम' हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. लग्नानंतर त्या संसारात रमून गेल्या. आज बच्चन परिवार जगातील ग्लॅमरस, प्रसिद्ध आणि श्रीमंत परिवार आहे. त्यांचे कुटूंब सुपरस्टार असले तरी त्यामागे जया भादुरी बच्चन यांचे मोठे योगदान आहे, हे सर्वज्ञात आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जया भादुरी यांची गाणी व चित्रपट
https://youtu.be/neCQg_V765U
https://youtu.be/kkTj4kyfhN8
https://youtu.be/YBhs0DBcDYs
April 9, 2017
लोकप्रिय गीतकार प्रा. भालचंद्र गजानन खांडेकर यांचा जन्म २८ जून १९२२ रोजी झाला.
“चंद्रप्रकाश”, “गंधसमीर” हे त्यांचे कवितासंग्रह. प्रेमातील विविध भावछटांचे उत्कट प्रकटीकरण त्यांच्या कवितांतून दिसतेच, परंतु दांभिकता, अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याची प्रवृत्तीही दिसते. “श्लोक केकावली”, “संजीवनी” या काव्याची तसेच “सं. एकच प्याला”, “सं. शारदा” या नाटकांची संहितासंपादने त्यांनी केली.
जन्मदिनाच्याच तारखेस, २८ जून १९९० रोजी त्यांचे निधन झाले.
#Bhalchandra Gajanan Khandekar
November 10, 2016
जुन्या काळातील एक मराठी कवी.
November 4, 2016
अनेक वर्षांपासून लंडन, न्यूयॉर्क, रोम, इराण, चीन, तिबेट अशा अनेक देशांना भेटी देऊन त्या अनुभवाला शब्दबद्ध करणाऱ्या मीना प्रभू यांनी या प्रवासवर्णने साहित्य प्रकाराला आजही ताजेतवाने ठेवले आहे.
July 16, 2022
१९६४ मध्ये मुंबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना संघाचे आठ गडी बाद झालेले असताना बोर्डेंनी हिंमतीने किल्ला लढवला व अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवून दिला. त्यावेळी प्रेक्षकांनी त्यांना डोक्यावर घेतले. त्यावेळी त्यांची बॅट गेली ती त्यांना परत मिळालीच नाही.
July 21, 2021
बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले.
बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले.
कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली.
एचएमव्ही सोबत १९४१ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते.
कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले. मा.सुधीर फडके यांनी सुमारे ११० चित्रपटांना तर सुमारे २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे.
बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे.
गायक-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले मा.सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वीह ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाटगाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते. पहली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून आजही पहिल्या तारखेला वाजत आहे.
संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील ५६ गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात १८०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी ठरला होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते.
स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता. त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे.
अमेरिकेतील ‘इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय ‘दिनानाथ संगीत पुरस्कार’ व राज्यशासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ व ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ त्यांना लाभले.
सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti