जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत.
January 30, 2020
एका दशकापेक्षा ही अधिक काळात सुबोध भावे यांनी नाटकं, दूरचित्रवाणी-मालिका, चित्रपट अशा सर्व दृकश्राव्य माध्यमातून सहज सुंदर आणि ओघवत्या अभिनय शैली मुळे रसिक मनावर अधिराज्य केलं.
June 18, 2013
वासुदेव गायतोंडे हे भारतातील सर्वाधिक नावाजलेले अमूर्ततावादी चित्रकार होते. अमूर्त घटनांना दृश्यरुप देण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९२४ रोजी नागपूर येथे झाला.
झेन फिलॉसॉफी आणि आध्यात्मिक शिकवणुकीने प्रेरित झालेले ख्यातकिर्त, मराठमोळे भारतीय वासुदेव गायतोंडे यांचा गोव्यातील एका खेडेगावात जन्म झाला. त्यांचे घरातील टोपणनाव ‘बाळ’ होते आणि मित्रांमध्ये ‘गाय’ ह्या नावाने ते प्रसिद्ध होते.
म्हापसा शहराजवळील उस्कुई गावचे हे मूळ कुटुंब. गायतोंडे यांचे वडील बोल्टन प्रेसमध्ये सहाय्यक व्यवस्थापक होते. त्यांच्या वडिलांचे प्रेसशी संबंधित काम असूनही विज्ञानापासून कायद्यापर्यंत आणि ज्योतिषापासून आयुर्वेदापर्यंत त्यांचा दांडगा अभ्यास होता. घरातच ग्रंथसंग्रह असल्याने वासुदेवास वाचनाची गोडी लहानपणीच लागली. गायतोंडे कुटुंबातील कुणीतरी एक गावातील देवळाच्या भिंतींवर चित्रे काढायचा. ते बघून छोट्या वासुदेवास चित्र काढावेसे वाटू लागले. त्यांचे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले. वासुदेव गायतोंडे मुंबईत सुरुवातीला महापालिका शाळेत शिकले व नंतर गोखले हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. त्यांचे चित्रे काढणे चालूच होते. थोड्याच दिवसांत ते मुंबईतील कलाप्रदर्शनांना हजेरी लावू लागले. घरून ह्या संदर्भात त्यांना प्रोत्साहन मिळाले नाही.‘वाटेल त्या’ मुलांबरोबर मिसळायला त्यांना परवानगी नसे, त्यामुळे लहानपणापासून आपसूकच ते एकटे होत गेले.
त्यांनी १९४३ मध्ये एका खाजगी आर्ट स्कूलमध्ये नाव दाखल केले व त्या तयारीमुळे १९४५ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये त्यांना थेट तिसर्याख वर्षात प्रवेश मिळाला. जे.जे.च्या भव्य परिसराचा त्यांच्यावर चांगला परिणाम झाला. जगन्नाथ अहिवासी हे त्यांना रचनाचित्र शिकवत. अडूरकर पेन्सिल ड्रॉइंग आणि भोंसुले मास्तर जलरंगचित्रण व व्यक्तिचित्र शिकवत. अहिवासी आणि भोंसुले मास्तरांचे गायतोंडे हे लाडके विद्यार्थी होते.
आर्ट स्कूलच्या काळातच गायतोंडे यांनी बौद्ध वाङ्मय, जपानी चित्रकला, मृद्पात्रे (पॉटरी), कविता यांचाही अभ्यास या काळात केला. निसर्गदत्त महाराज, रमण महर्षी, सोयरोबानाथ अंबिये, संतवाङ्मय, कला, साहित्य, तत्त्वज्ञान असे विविध विषय त्यांच्या वाचनात होते. त्या काळात जे.जे.च्या पटांगणात दरवर्षी जे. कृष्णमूर्ती हे तत्त्वज्ञ आपली प्रवचने देण्यास येत. ह्या प्रवचनांचा फार मोठा परिणाम त्यांच्या जीवनावर झाला.
गायतोंडे यांना १९४८ मध्ये जे.जे.मधून पदविका मिळाली व चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यामुळे फेलोशिपही मिळाली. त्यांनी १९४९/५० या काळात जे.जे.मध्ये साहाय्यक शिक्षक म्हणून काम केले. त्यांनी केलेली ही एकमेव नोकरी होती. काही मतभेद होऊन त्यांनी १९५० मध्ये ही नोकरी सोडली व पूर्णवेळ चित्रकार म्हणून जगण्यास सुरुवात केली.
हुसेन, सूझा, रझा, आरा, गाडे आणि बाकरे ह्यांनी १९४८ मध्ये ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रूप’ स्थापन केला. नंतर गायतोंडे त्यात सहभागी झाले. ह्या ग्रूपतर्फे १९४९ मध्ये भरवलेल्या समूह प्रदर्शनात त्यांचा सहभाग होता. त्यानंतर काही चित्रकारांनी ‘बॉम्बे ग्रूप’ स्थापन केला, त्यातही गायतोंडे होते. ह्या ग्रूपचीही काही प्रदर्शने झाली. ह्या साऱ्यांत होणाऱ्या कलाविषयक चर्चा, वादविवादांत गायतोंड्यांचा सक्रिय सहभाग असे आणि त्यांच्या मताला सहकलाकारांमध्ये मान होता.
मुंबईत १९५७/५८ मध्ये वॉर्डन रोडवर भुलाभाई देसाई मेमोरिअल इन्स्टिट्यूट सुरू झाली. संगीत, चित्रकला, नाट्यक्षेत्रातील कलाकारांच्या कलासाधनेसाठी इथे उत्तम वातावरण होते आणि कलावंतांना तिथे अतिशय स्वस्तात स्टूडिओ मिळण्याची सोय होती. गायतोंडे यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. ह्या इन्स्टिट्यूटसमोरच्या बाकावर बसून समुद्राकडे पाहत गायतोंडे तासन्तास चिंतन करत. नाट्य, नृत्य, चित्र अशा सर्व कलांमध्ये काहीतरी नवीन करू पाहणार्याह कलाकारांचा इथे राबता असे आणि परस्परांत संवादही असे. गायतोंडे इथेच अल्काझी, विजया मेहता इत्यादींच्या संपर्कात आले.
१९६४ साली मिळालेल्या रॉकफेलर शिष्यवृत्तीद्वारे गायतोंडे न्यूयॉर्कला गेले. तिथे त्यांनी अमेरिकेतील विविध चित्रशैलींचा अभ्यास केला. त्यानंतर ते जपानला गेले. जपानमध्ये त्यांच्यावर झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव पडला.१९७२ मध्ये ते भारतात परतले आणि शेवटपर्यंत त्यांनी दिल्लीत वास्तव्य केले.
दिल्लीत १९७४ च्या आसपास त्यांची ओळख ममता सरन ह्या चित्रकर्तीशी झाली. त्यांची मैत्री आणि सोबत गायतोंडेंना अखेरपर्यंत लाभली. ममता यांनी त्यांची शेवटपर्यंत काळजी घेतली. ते १९९७ ते २००१ ह्या काळात ममताबरोबर गुडगाव येथे एकत्र राहिले. अॅरबस्ट्रॅक्ट आर्ट म्हणजेच अमूर्त कला त्यांनी आत्मसाद केली होती आणि त्याला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. वर्ष २०१५ मध्ये क्रिस्टी या सुप्रसिद्ध संस्थेने मुंबईत वासुदेव गायतोंडे यांच्या ऑईल पेंटिंगचा लिलाव केला होता.मार्च २०२१ मध्ये चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या चित्रांनी पुन्हा एकदा रेकॉर्ड बनवले.१९६१ साली बनविलेले त्यांची एक निळ्या रंगाची ऑईल पेंटिंग्स ३९.९८ कोटी रुपये म्हणजेच ५५ लाख अमेरिकन डॉलर्सना विकली गेली.
हे कोणत्याही भारतीय कलाकाराच्या आतापर्यंतच्या सर्वात महागड्या चित्रांपैकी एक ठरले आहे. वासुदेव गायतोंडे यांनी स्वत: चा विक्रम मोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये गायतोंडे यांनी १९७४ मध्ये तयार केलेली ऑईल पेंटिंग सुमारे ३६ कोटींमध्ये विकली गेली होती. जेव्हा जग कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देत होते, तेव्हा ही किमया त्यांच्या चित्रानं साधली होती.
सतीश नाईक यांनी 'गायतोंडे' हा मराठीत ग्रंथ संपादित केला आहे. सतीश नाईक यांनी संपादित केलेल्या 'गायतोंडे' या ग्रंथाचे जानेवारी २०१६ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. गायतोंडे यांच्यावरील एक इंग्लिश पुस्तक 'सोनाटा ऑफ सॉलिट्युड: वासुदेव संतू गायतोंडे या नावाने आहे. दृश्यकलेच्या क्षेत्रात योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकारांना दरवर्षी ‘वासुदेव गायतोंडे कला जीवनगौरव पुरस्कार’ राज्य शासन प्रदान करते. वासुदेव गायतोंडे यांचे १० ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ सतीश नाईक/ नितीन दादरावाला/दीपक घारे
August 10, 2021
नाटय़, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा तिन्ही माध्यमांद्वारे रसिकांत लोकप्रिय झालेले फारुख शेख यांनी वकिलीचे शिक्षण घेत असतानाच नाटय़क्षेत्रात प्रवेश केला. त्यांचा जन्म २५ मार्च १९४८ रोजी झाला. ७०-८० च्या दशकात फारूक शेख यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. समांतर चित्रपट आणि तसेच मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये त्यांचा मुक्त संचार सुरू होता. त्यांिनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यां चा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेतबद्दुर, गरम हवा इत्यािदी चित्रपट गाजले. `क्लब ६०′ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. `यह जवानी है दिवानी’ या चित्रपटामध्ये त्यांनी रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेला सिकंदर मिर्झा प्रेक्षकांना खूपच भावला होता. सहजसुंदर अभिनय ही त्यांची जमेची बाजू होती. मा.फारुक शेख यांनी अनेक हिंदी मालिकांमध्येही काम केले होते. `चमत्कार’, `जी मंत्रीजी’, `श्रीकांत’ या मालिकांमधील त्यांच्या अभिनयाने एक वेगळाच प्रभाव निर्माण झाला होता. झी टिव्हीवरील प्रसिद्ध `जीना इसी का नाम’ या शोचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते. या शोमध्ये त्यांनी अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलाखतही घेतली होती. सत्यजित रे, मुज्जफर अली, हृषिकेश मुखर्जी आणि केतन मेहता यांसारख्या दिग्दर्शकांसोबत फारुक शेख यांनी काम केले होते. शबाना आझमी, दीप्ती नवल अशा अभिनेत्रींसोबत फारूक शेख यांची जोडी अधिक गाजली. त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांच्या आवाजामध्ये एक वेगळेपणा होता. त्यांची विनोदशैली आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची वृत्ती यासाठी फारुक शेख यांची ओळख होती. फारुख शेख निव्वळ कलाकार नव्हते, तर माणुसकी जपणारे कलाकार होते. एक अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता, प्रचंड अभ्यासू कलावंत, असे फारुख शेख यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. प्रसन्न व्यक्तिमत्त्व, निरागस चेहरा आणि सहजसुंदर अभिनय या गुणांमुळे समांतर चित्रपटांत काम करतानाही फारुख शेख सर्वसामान्य चित्रपट रसिकांचे ‘नायक’ बनलेले होते. मा. फारुख शेख यांचे २७ डिसेंबर २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 10, 2017
समीरण वाळवेकर यांनी ‘आजच्या ठळक बातम्या’ (टेलिव्हिजन पत्रकारितेवरील अभ्यासपूर्ण ग्रंथ), चॅनल ४ लाईव्ह’ (मराठी लोकप्रिय काल्पनिक कादंबरी), चरित्रात्मक ग्रंथ : ‘फिनोलेक्स पर्व’ (प्रल्हाद पी छाब्रिया यांच्या वरील) ही तीन पुस्तके लिहिली आहेत.
January 10, 2022
(१८२५-१८८४)
जन्म-१६ मे १८२५
मुळ नाव - विनायक लक्ष्मण
महाराष्ट्राचे आद्य गणिती व अर्वाचीन भास्कराचार्य, गणिततज्ञ व खगोल शास्त्रज्ञ,
१८४० साली वयाच्या १५ व्या वर्षी कुलाबा वेधशाळेतील या म्हणून नेमणुक.
१८५९ डेक्कन मधे कायमची नौकरी, ३ वेळा हंगामी प्रिन्सीपल म्हणून नेमणूक.
१९६२ साली अंकगणिताचे पहिले पुस्तक
१८६५ शुध्द निरयन पंचांग सुरू, टिळक पंचागचे मुळ प्रर्वतक
March 11, 2015
बोबडे बोल हा एकमेव गुण असुनही केवळ त्यावर अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपट करणारे मधू आपटे हे एकमेव कलावंत असतील. मधुकर शंकर आपटे हे मधू आपटे यांचे पुर्ण नाव.
March 2, 2022
स्वानंद कुलकर्णी हे महाराष्ट्रातील इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेतील नामांकित नाव. साम मराठी, एबीपी माझा, टी.व्ही ९ महाराष्ट्र आणि झी २४ तास अश्या वृत्तवाहिनी मध्ये पत्रकार तसंच निर्माता या पदावर काम केले होते.
November 12, 2014
December 15, 2010
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला.
त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली. १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.
पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. नंतर त्यांची छ्त्तीसगड राज्यातील खैरागढ येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली. तसेच शीव येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले. त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर. भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो. त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या.
आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे. त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 1, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti