कार्यकाळ: २१ जून १९९१ ते १६ मे १९९६
जन्म: २८ जून १९२१
मृत्यू: २३ डिसेंबर २००४
राव यांच्या सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळविण्यासाठी रुपयाचे अवमूल्यन तसेच खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे काही निर्णय घ्यावे लागले. राव यांनी दहशतग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका घेतल्या. त्यानंतर पंजाबमध्ये शांतता निर्माण झाली.
व्यासंगी वृत्तीचे पी. व्ही. नरसिंह राव यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटविला. त्यांच्या कारकीर्दीत देशात नवीन आर्थिक धोरणांचा प्रारंभ झाला. राव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यातील वंगारा या गावी. झाला. उस्मानिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठामधून विद्या ग्रहण करणाऱ्या राव यांचे मातृभाषा तेलुगूबरोबरच इंग्लिश, मराठी, उर्दू, कन्नड आणि हिंदीवरही प्रभुत्व होते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासह हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभाग घेणाऱ्या राव यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली. केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, परराष्ट्र आणि संरक्षण यांसारखी महत्त्वाची खातीही त्यांनी सांभाळली. १९७७ सालच्या काँग्रेस विरोंधी लाटेतही ते विक्रमी मतांनी विजयी झाले. १९९१ साली लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधानपदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर राव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली. २१ जून १९९१ साली त्यांनी भारताचे नववे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
राव यांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते. त्यांना अनेक राजकीय वादळांना तोंड द्यावे लागले. १९९६ सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आणि नरसिंह राव यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला.