सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा लाभलेले आणि मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून ६० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्रीराम कृष्ण नानिवडेकर हे ठाण्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व!
जसे प्रत्येक शहरात सामाजिक बांधिलकी मानून निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात, त्याचप्रकारे माणूसकीच्या नात्याने ठाण्यात समाजकार्याचा वसा श्रीराम नानिवडेकर यांनी जपला आहे. मूळचे मेकॅनिकल इंजिनिअर असलेले भाऊ घरच्या परंपरेप्रमाणे सामाजिक कार्यातही सहभागी झाले. २०/२५ वर्षे महाराष्ट्राबाहेर नोकरी करुन १९८४ सालापासून भाऊ ठाण्यातील गणेशवाडी भागात वास्तव्य करत आहेत.
भाऊंचे वडील महात्मा गांधींच्या आश्रमात ३ वर्षे राहून आलेले ! तसेच १९४२ साली स्वातंत्र चळवळीत त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. असा सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा घेऊन आलेले भाऊ, लहानपणापासूनच सामाजिक कार्यात सहभागी होत आले आहेत. भाऊ स्वत: नेहमीच महाराष्ट्र मंडळ व इतर सामाजिक उपक्रमांत भाग घेत असत. अशा या भाऊंनी “आनंदवन स्नेही मंडळ” “विद्यादान सहाय्यक मंडळ” अशा सामाजिक संस्थांची स्थापना केली. ज्या संस्थांचं ठाण्यातील सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.
२००३ साली बाबा आमटे यांच्या आनंदवनासाठी काम करणारे “आनंदवन स्नेही मंडळ” त्यांनी स्थापन केलं. आज मंडळाचे सुमारे १०० कार्यकर्ते मुंबई व सर्व उपनगरांत कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे २००८ साली स्थापन केलेल्या “विद्यादान सहाय्यक मंडळा” द्वारे समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. आज संस्थेने ७६ विद्यार्थी (आठवीपासून बी.ई. / एम्.बी.ए. पर्यंतचे) दत्तक घेतले असून त्यांच्यासाठी संस्थेने १०-११ लाख रुपयांचं अंदाजपत्रक केलं आहे. अशा या विविध सामाजिक उपक्रमातून भाऊंनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
March 11, 2015
मराठी नाट्यसृष्टीतील एक अत्यंत वलयांकित व्यक्तिमत्त्व म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाट्य वर्तुळात प्रभाकर पणशीकरांना “पंत या नावाने ओळखले जात असे. त्यांनी `नाट्यसंपदा’ या त्यांच्या नाट्यनिर्मितीसंस्थेच्या माध्यमातून उत्तमोत्तम नाटकांची मेजवानी मराठी रसिकांना दिली.
May 7, 2014
मराठी वाङ्मयविश्वात कवी, कादंबरीकार, नाटककार, समीक्षक व संपादक अशी ओळख असलेल्या पु.शी.रेगे उर्फ पुरुषोत्तम शिवराम रेगे यांचा जन्म २ ऑगस्ट १९१० रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मिठबाब येथे झाला. त्यांचे शिक्षण मुंबई व लंडन येथे बी.ए. पर्यंत झाले होते. लंडनच्या “स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स“ मधून त्यांनी बी.एस्सी. ची पदवी संपादन केली होती. अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून विविध महाविद्यालयांतून त्यांनी काम केले. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते निवृत्त झाले.
रेगे पाश्चात्य काव्याच्या काही लकबी मराठीत आणण्याचा प्रयत्न करीत होते. इटालियन कवींच्या प्रेमकवितांनी व त्यातून वाहणार्या उत्कट अशा मनोहर भावनांनी त्यांच्या कवीमनावर भुरळ पाडली होती. म्हणून त्यांच्या कवितांमधून स्त्री शक्ती आणि तिचे स्त्री देहधारी स्वरूप हेच वेगवेगळ्या स्वप्निल रूपांमध्ये प्रकट होताना दिसते.
संस्कृतप्रचुर शब्दकळांची सतत होणारी मधुर पखरण हेदेखील त्यांच्या कवितांचे अनोखे वैशिष्टय होते. रेगे यांचे जीवनविषयक विचार ऐकले की साहित्याप्रती त्यांनी बाळगलेली निष्ठा व निरपेक्ष प्रेम लगेच कळून येते. “जीवन जगले तर साहित्य जगेल असे नसून साहित्य जगले तरच जगण्यासारखे काही उरणार आहे“; अशी त्यांची श्रध्दा व धारणा होती.
“फुलोरा“, “दोला“, “गंधरेखा“, “पुष्कळा“ , “दुसरा पक्षी“, “आणि प्रियाळ“ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत; “रूपकथ्थक“, “मानवा“ यांतील काही कथा गुजराती, फ्रेंच, जर्मन, स्वीडिश, स्पॅनिश ,रशियन आणि चिनी या भाषांत भाषांतरित झाल्या आहेत. तसेच “सावित्री“, “अवलोकिता“, “रेणू“ , आणि “मातृका“ या कादंबर्या दर्जेदार व अर्थपूर्ण आहेत. “छांदसी“ हा रेगेंच्या समीक्षालेखांचा संग्रह असून १९६८ मध्ये त्याची सुधारित आवृत्ती प्रकाशित झाली आहे.
रंगपांचालिक आणि दोन नाटके या त्यांच्या संग्रहामध्ये “माधवी: एक देणे“ ,’रंगपांचालिक“ आणि “कालयवन’ अशी तीन छोटी नाटके समाविष्ट झाली आहेत. रेगे यांच्या या नाटकालाही काव्यामयता लाभलेली असून, या नाटकांची त्यांनीच हिंदीत भाषांतरे केली आहेत. त्याचबरोबर “पालक“ , “मध्यतंर“ व “चित्रकामारव्यम्“ ही नाटुकली नियतकालिकांतून प्रसिद्ध झाली आहेत.
पु.शि.रेगे यांनी १९६५ मध्ये रशियाचा येथे मॉस्को लघुकथा या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात एक भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी सहभाग घेतला होता. १९६५ मध्ये केरळ येथे झालेल्या अखिल भारतीय लेखक परिषदेचे ते उद्घघाटक होते. वर्धा येथे १९६७ साली आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.
१७ फेब्रुवारी १९७८ रोजी पु.शि.रेगे यांचे मुंबईत निधन झाले.
January 14, 2015
मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार म्हणजेच भास्कर भागवत.
January 3, 2015
कार्यकर्ता आणि ज्येष्ठ विचारवंत यांचा अपवादात्मक असा संगम वसंत पळशीकर यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला आहे.
त्यांचा जन्म हैदराबादमधला. महात्मा गांधींच्या चळवळीतील वडिलांच्या संस्कारात ते वाढले. इंटरनंतर शिक्षण सोडून ते सामाजिक कार्याकडे वळले. गांधींजींच्या विचारांचा चिकित्सक स्वीकार त्यांनी केला. आचार्य विनोबा भावे, अण्णासाहेब सहसबुद्धे, साने गुरुजी, रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, बाबा आमटे यांच्या कार्यात वेळोवेळी सहभागी होत त्यांनी स्वत:ला अधिक समृद्ध केले. भूदान आंदोलन, आनंदवन, ओरिसातील कोरापूर येथे सर्वसेवासंघाच्या कामात त्यांचा सक्रिय वाटा होता.
सन १९५९ मध्ये ते महाराष्ट्रात परतले आणि प्रबोधनाच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. मात्र हे काम ते प्राध्यापकीय अलिप्तपणे नव्हे, तर व्रत म्हणून पार पाडत आले आहेत. समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत यांच्यासारख्या वैचारिक नियतकालिकांचे संपादन त्यांनी दीर्घकाळ केले, तसेच कार्यकर्त्यांची शिबिरे, वैचारिक परिषदा-संमेलने यांतही तेवढ्याच कळकळीने मार्गदर्शन केले. देशभरातील परिवर्तनवादी गट, प्रयोगशील संस्था यांना त्यांच्या मांडणीचा लाभ होत आला आहे.
संथ, अनाक्रमक शैली, पण ठाम युक्तिवाद हे त्यांचे वैशिष्ट्य. एकांगीपणा, साचेबद्ध गृहितांवर आधारित भोवतालच्या घटितांचा अर्थ लावण्याची खटपट, सखोल चिकित्सेपेक्षा दुसर्याला निरुत्तर करण्यातील आनंद यापासून त्यांचे लेखन आणि संवाद कायम दूर राहिला. त्यामुळेच त्यांची मांडणी अंतिमत: पटो वा न पटो, त्यातून विचाराला चालना देणारी, आपल्या समजांचा पुनर्विचार करण्यास भाग पाडणारी निरीक्षणे मिळत नाहीत असे कधी होत नाही. राजकारण, समाजकारण, शिक्षण, साहित्य-कला, विज्ञान, संस्कृती, स्त्री-पुरुष संबंध, चिरंजीवी विकास यासारख्या क्षेत्रांत त्यांनी मूलगामी लेखन केले आहे. समग्रतेचे भान हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. विचारांशी सुसंगत अशीच त्यांची जीवनशैलीही आहे. त्यामुळे त्यांच्या विचारांना सच्चेपणा लाभला आहे.
समाजाच्या धारणेच्या, उन्नयनाच्या दृष्टीने किती मोलाचा विचार दिला, ही एखाद्याला 'विचारवंत' संबोधायचे की नाही याची एक कसोटी आहे, असे त्यांनी लिहून ठेवले आहे. या कसोटीला खुद्द पळशीकर उतरतात, असाच निवाडा त्यांचे वाचक करतील. गेली काही वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांच्या लेखनात खंड पडला असला, तरी चिंतनात नाही.
महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाने मराठी भाषा दिनी वसंत पळशीकर यांचा 'जीवन गौरव' पुरस्काराने केलेला सन्मान हा विचारी मराठीजनांसाठी कृतज्ञता सोहळाच होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
अवघे १५०० रुपये घेऊन १९९१ साली नाशिकमध्ये आलेले विराज लोमटे यांनी यशश्री ग्रुप या बांधकाम कंपनीची सुरुवात करून २० वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत मराठी पाऊल पडते पुढे हे दाखवून दिले आहे.
सांगली येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विराजने आई - वडिलांच्या आग्रहाखातर बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेतले. सांगलीसारख्या छोट्या शहरात कर्तृत्वाला संधी नाही म्हणून नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. आर्किटेक्ट जयंत देशमुख यांच्या कंपनीत दोन वर्षे नोकरी करून १९९४ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
पीडब्ल्यूडीमधील बांधकाम ठेकेदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक औद्योगिक इमारती, खासगी बंगलो व अनेक संस्थांच्या इमारती बांधल्या. स्वत:ची आवड म्हणून प्लॅनिंग करीत आर्किटेक्चरल फर्मही काढली. या फर्मला पहिल्याच वर्षी सांगली येथे वसंतदादा स्मारकाच्या डिझाइनसाठी पारितोषिकही मिळाले.
सांगली, नाशिक, शिर्डी, कोपरगांव, देवळाली, सटाणा, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, विविध बँका आदींच्या आर्किटेक्चरल पॅनलवर त्यांची संस्था काम करते आहे. शिर्डी येथील हॉटेल, नाशिक येथील बंगल्यांसाठी त्यांची डिझाइन्स वापरली जात आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅनही त्यांच्या संस्थेने बनविला आहे.
बांधकाम व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता व पारदर्शकता यामुळे यशश्री, भाग्यश्री, धनश्री, विजयश्री, श्रीगणेश, अपूर्वाई, गझल, धन्वंतरी, श्रीयोगेश्वर, श्रीसूर्यमाला हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उदघाटनापूर्वीच पूर्ण बुक होणारा त्र्यंबकचा श्रीवरद व पुण्याच्या डी. एस. के. समूहाबरोबर साकारण्यात येत असलेला सुवास्तू प्रकल्प हे त्यांच्या व्यवसायाच्या मानांकनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपताना पर्यावरण रक्षणासाठी ३०० वृक्षांचे रोपण व संगोपन, मोदक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. लघुउद्योग भारती या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मानद सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६० टक्के इतके मतदान घडविण्यासाठी नाशिक सिटीझन फोरमने राबविलेल्या मतदार जागृती अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
December 15, 2010
प्रसिद्ध नवनाथांपैकी एक असलेले संत निवृत्तिनाथ हे संत ज्ञानेश्वरांचे मोठे भाऊ आणि गुरु होते. नाथ संप्रदायातील गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना दीक्षा दिली.
ज्ञानेश्वर, सोपानदेव, मुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई यांचा माता-पित्याच्या वात्सल्याने सांभाळ केला. निवृत्तिनाथांनीच ज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका(ज्ञानेश्वरी) लिहून काढली.
सुमारे चारशे योगपर, अद्वैतपर आणि कृष्णभक्तिपर असे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निवृत्तिनाथांनी केली आहे. निवृत्तिदेवी, निवृत्तिसार आणि उत्तरगीताटीका असे तीन ग्रंथही निवृत्तिनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते; तथापि ते अनुपलब्ध आहेत. धुळ्याच्या श्रीसमर्थवाग्देवतामंदिरात ‘सटीक भगवद्गीता’ आणि ‘समाधि बोध’ अशी दोन हस्तलिखिते निवृत्तिनाथांची म्हणून ठेवली आहेत.
ज्ञानेश्वर आणि सोपानदेव समाधिस्त झाल्यानंतर मुक्ताई अन्नपाणी त्यागून परलोकवासी झाली व पुढे लवकरच निवृत्तिनाथांनीही त्र्यंबकेश्वरला देह ठेवला. त्यांची समाधी तेथेच बांधण्यात आलेली आहे.
June 3, 2015
रावसाहेब, रावबहादुर, पद्मभूषण (१९५७), पुणे विद्यापीठाची डी. लिट. पदवी इत्यादी अनेक मान-सन्मान ज्यांना लाभले ते गोविद सखाराम सरदेसाई म्हणजेच ‘रियासतकार सरदेसाई’ यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील गोविल या गावी १७ मे १८६५ साली झाला.
January 22, 2010
नागवेकर, राहुल
‘नॅशनल जिऑग्राफी बी’ हीदेखील अखेर शालेय ज्ञानस्पर्धाच, पण ती साधीसुधी नव्हे.. विजेत्याला थेट ‘नॅशनल जिऑग्राफिक सोसायटी’चे आजीव सदस्यत्व मिळते, शिवाय कॉलेज शिक्षणासाठी २५ हजार डॉलरची शिष्यवृत्ती आणि ‘नॅट-जिओ’तर्फे गल्पागॉस बेटांवरील सफरीत सहभागी होण्याची संधी! हे सारे अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील शुगरलँड भागात राहणाऱ्या ऊर्मिला सबनीस-नागवेकर आणि मनोज नागवेकर यांचा सुपुत्र राहुल याने गेल्या गुरुवारी मिळवले.
राहुलची भूगोलाची आवड लहानपणापासूनचीच. चौथीत असतानापासून मला नकाशे पाहायला आवडत, असे त्याने सांगितले आहे. मात्र, त्याच्या पालकांनीदेखील कमी मेहनत घेतलेली नाही.. त्याला आवडते, म्हणून गेली सहा वर्षे याच स्पर्धेच्या टेक्सास राज्यस्तरीय फेऱ्या त्याला दाखवण्यासाठी हे आई/वडील त्याला नेत होते. त्याची तयारी व्हावी, म्हणून वडील मुद्दाम कठीण-कठीण प्रश्न काढत आणि कधी वडील, कधी आई त्याच्याकडून ते सोडवून घेत. ‘मलाही प्रश्न कठीणच वाटत, तो सोडवे’ असे ऊर्मिला सांगतात. अखेर यंदा त्याला ‘क्वेल व्हॅली मिडल स्कूल- मिसूरी’ या त्याच्या शाळेने या स्पर्धेत सहभागाची संधी दिली. टेक्सास राज्यातील १०० विद्यार्थ्यांच्या प्राथमिक फेरीतून उपान्त्य फेरीच्या १० जणांत राहुल पोहोचला, तिथे अगदी शेवटच्या दोघांतून राहुलच जिंकल्याने अखिल अमेरिकी फेरीसाठी जाणार हे पक्के झाले. या अखिल अमेरिकी फेरीत दहापैकी सात स्पर्धक दक्षिण आशियाई (बहुश: भारतीयच) वंशाचे होते! अगदी कार्तिक कर्णिक हा मूळ महाराष्ट्रीय स्पर्धकही होता. स्पर्धेत काही कारणाने ते मागे पडले, पण प्रत्येकाच्याच पालकांनी मेहनत घेतली असेल. भारताकडे होणाऱ्या प्रवासामुळे लहानपणीच भूगोलाची गोडी या मुलांना लागली असावी, असे कुणा अमेरिकी तज्ज्ञाचे म्हणणे. अखेरच्या फेरीत वंश जैन आणि राहुल नागवेकर हे दोघे होते.. तीन प्रश्नांची उत्तरे दोघांनी अचूक दिली. अखेर बव्हेरियात, डॅन्यूब नदीकाठच्या कोणत्या शहरात पवित्र रोमन राज्याच्या कायदेमंडळाचे मुख्यालय इ. स. १६६३ ते १८०६ पर्यंत होते?’ - या प्रश्नावर ‘ रेन्गेन्सबर्ग ’ असे बिनचूक उत्तर आठवीतल्या राहुलने दिले!
August 5, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti