(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय - articles sub site

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री रीमा लागू

    रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. त्यांचा जन्म २१ जून १९५८ रोजी झाला. एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना मा.रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. 'हिरवा चुडा', 'हा माझा मार्ग एकला' अशा चित्रपटांतून 'बेबी नयन' नावाने बालकलाकार म्हणून मा.रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.

    ७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, 'कलयुग' या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. 'रिहाई'सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा 'कयामत से कयामत तक', 'मैंने प्यार किया', 'हम आप के हैं कौन', 'वास्तव', 'कल हो ना हो' मधल्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष, सविता, घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नयन भडभडे च्या रीमा लागू झाल्या.

    रीमा लागू यांनी 'श्रावणसरी' या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. मा.रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही मा.रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते. मा.रीमा लागू यांचे १९ मे २०१७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर

    हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, संगीत गुरू व आग्रा घराण्याचे गायक पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर ऊर्फ अण्णासाहेब रातांजनकर यांचा जन्म १ जानेवारी १९०० रोजी झाला. त्यांचे वडील श्री नारायण गोविंद रातंजनकर हे ब्रिटिश राजवटीत पोलिस अधिकारी होते, तसेच उत्तम सतारवादकही होते. वयाच्या सातव्या वर्षी श्रीकृष्ण नारायण रातंजनकरांनी कारवारच्या पं. कृष्णम् भट्ट (कृष्णभट्ट होनावर) यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास प्रारंभ केला. त्यांना ग्वाल्हेर घराण्याचे पं.अनंत मनोहर जोशी व नंतर आग्रा घराण्याचे उस्ताद फैय्याज खान यांचेही मार्गदर्शन लाभले. किशोर वयातच त्यांनी अनेक संगीत परिषदांना आपली उपस्थिती लावली.

    १९११ मध्ये त्यांनी गायक व संगीतज्ञ पं. विष्णू नारायण भातखंडे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली व आजमितीला ते भातखंडेबुवांचे सर्वात ख्यातनाम शिष्य मानले जातात. १९२६ मध्ये त्यांनी मुंबई विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्यांनी लखनौच्या भातखंडे म्युझिक इन्स्टिट्यूट चे मुख्याध्यापकपद कैक वर्षे भूषविले व संगीत क्षेत्रातील अनेक नामी मंडळींना संगीत शिक्षण दिले.

    पं.रातंजनकर हे अनेक वर्षे लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. नंतर त्यांची छ्त्तीसगड राज्यातील खैरागढ येथील इंदिरा संगीत कला विश्व विद्यालयाचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. तिथून त्यांना पुन्हा भातखंडे संगीत संस्थान विश्व विद्यालयाच्या मुख्याध्यापकपदी २ वर्षांसाठी आमंत्रित केले गेले. मुंबईच्या भारतीय विद्या भवनाच्यी ’भातखंडे संगीत आणि नर्तन विद्यापीठा’ची स्थापना रातंजनकरांनी केली. तसेच शीव येथील ’श्रीवल्लभ संगीतालय’ त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आकारास आले.

    त्यांच्या शिष्यवर्गात के.जी. गिंडे, चिदानंद नगरकर, व्ही.जी. जोग, दिनकर कैकिणी, शन्नो खुराणा, सुमती मुटाटकर, आचार्य प्रभाकर चिंचोरे, सी.आर. व्यास, पं.एस.सी.आर. भट्ट, चिन्मय लाहिरी व संगीत दिग्दर्शक रोशनलाल यांचा समावेश होतो. त्यांनी आग्रा घराण्याच्या ध्रुपद व ख्याल शैलीतील अनेक रचना गायल्या. आपले उस्ताद भातखंडेबुवा यांप्रमाणेच त्यांनी ८०० पेक्षा जास्त चिजा रचल्या. या चिजा त्यांनी 'सुजन' या टोपणनावाने बांधल्या होत्या. त्यांचे शिष्य के.जी. गिंडे यांनी त्या चिजांची पद्धतशीरपणे कागदोपत्री नोंद करून ठेवली आहे.

    त्यांनी अभिनव गीतमंजरी, अभिनव संगीत शिक्षा, तानसंग्रह, हिंदुस्थानी संगीताची स्वरलिपी, यांसारखी अनेक पुस्तकेही लिहिली. तसेच रजनी कल्याण, केदार बहार, सावनी केदार, मार्ग बिहाग, यमनी बिलावल, सालग वराळी, गोपिका वसंत, हंसरंजनी अशा नव्या रागांचीही रचना पंडित रातंजनकरांनी केली. अण्णासाहेब रातांजनकर यांचे १४ फेब्रुवारी १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • इटलीचा हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी

    मुसोलिनीने विरोधकांना सोडले नाही. त्याने विरोधी पक्ष बरखास्त केले. त्यांच्या कार्यालयांना कुलूप ठोकले. त्यांचा इतका छळ केला की अनेक जण देश सोडून पळून गेले. एखाद्या विरोधकाला पकडले तर त्याला स्वतःचा बचाव करण्याचा, अपील करण्याचा हक्क देणारे कायदेच बदलून टाकले. कुणीही विरोधात बोलले की, मुसोलिनी ‘राष्ट्रवाद’चा मुद्दा सांगायचा. त्याने विरोधी पक्षाला तर संपवलेच, पण स्वतःच्या फॅसिस्ट पक्षातील त्याच्या विरोधकांच्या तोंडालाही कुलूप लावले. त्याच्या पक्षातील मातब्बर नेता दीनो ग्रांदीला राजदूत म्हणून लंडनला पाठविले, लिआंद्रो अर्पिनाती याला लिपारी बेटावर धाडले, सोफानी याला मंत्रिमंडळात स्थानही दिले नाही. अशा तऱ्हेने मुसोलिनीची कार्यपद्धती सुरू होती.

  • कवी अरुण बालकृष्ण कोलटकर

    १९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ जेजुरी ‘ या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले.

  • संगीतकार राम कदम

    मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी मिरज येथे झाला. राम कदम यांच्या घरात कलेचं काहीही वातावरण नव्हतं, परिस्थिती यथातथाच, शाळेतील अभ्यासातही लक्ष नव्हते. त्यांना लहानपणापासून वाद्यांबाबत फार आकर्षण होतं यामुळे राम कदम यांच लक्ष कायम बॅंन्डपथकाकडे जायचं. इथेच ते क्लॅरोनेट वाजवायला शिकले. पुढे पथकात वाजवू लागले. प्रभात चित्र संस्थेचे छायाचित्रकार ई.महमद मूळचे मिरजेचेच. त्यांनीच राम कदम यांना पुण्याला बोलावून घेतलं. वयाच्या २२ व्या वर्षी राम कदम प्रभातमध्ये दाखल झाले ऑफिसबॉय म्हणून!

    पगार महिना ७ रुपयेप्रमाणे सेवा सुरू झाली. शांतारामबापूंची खोली झाडताना राम कदम यांना कमीपणा कधीच वाटला नाही. उलट एवढय़ा प्रतिभासंपन्न व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळतेय याचा आनंद झाला. हळूहळू प्रभातच्या संगीत विभागात त्यांचा प्रवेश झाला आणि मान्यवर संगीतकाराचा त्यांना सहवास लाभला. प्रभात चित्र संस्था आदर्श विचार मूल्यांवर चालणारी होती त्यामुळे इथे जे घडत असे ते पवित्र, सर्वोत्कृष्ट आणि चिरंतन टिकणारे असायचे. राम कदमांच्या आयुष्यातील ही १० वर्षे त्यांच्यातील कलावंताला घडवणारी होती. इथेच त्यांना पु. ल. देशपांडे, देव आनंद, गुरुदत्त यांचा सहवास लाभला, पण स्वातंत्र्यानंतर प्रभातचाही उतरणीचा कालखंड सुरू झाला. राम कदम प्रभातमधून बाहेर पडल्यावर त्यांना कोल्हापूरहून भालजी पेंढारकर यांनी बोलावले.

    गांधीहत्येनंतर भालजींचा जयप्रभा स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला व त्यावेळी ‘मीठ भाकर’ या चित्रपटाची प्रिंटही भस्मसात झाली. भालजी यांनी तो सिनेमा परत बनवला. त्याचं संगीत राम कदम यांचं होतं! (पण पूर्वीच्या शर्थीनुसार संगीतकार म्हणून कशाळकर यांचेच नाव श्रेयनामावलीत राहिलं!) रामभाऊ नाराज झाले, पण लवकरच त्यांना ‘गावगुंड’ हा सिनेमा स्वरबद्ध करायला मिळाला. पण सुरुवातीची १० वर्षे कदमांची परीक्षा पाहणारी ठरली. यश कायमच हुलकावणी देत होतं. नशिबाचे फासे कायमच उलटे पडत होते. सुधीर फडके, वसंत पवार यांच्याकडे सहायकाचं काम चालूच होतं. १९५९ सालच्या अनंत मानेच्या ‘सांगते ऐका’तील ‘बुगडी माझी सांडली गं जाता साताऱ्याला’ ही फक्कड लावणी रामभाऊ कदम यांनी स्वरबद्ध केली होती. पण ही कामगिरी सहाय्यकाच्या रूपातली असल्याने रसिकांना उशिरा लक्षात आली.

    ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. मराठी लावणीचे लावण्या खुलवून राम कदम यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. राम कदम यांनी जवळपास १२० मराठी चित्रपटाना संगीत दिले. यात त्यांनी तब्बल ११४ गायकांना संधी दिली. यात लता मंगेशकर, आशा, उषा, मोहम्मद रफी, पं.भीमसेन जोशी, वसंतराव देशपांडे, शोभा गुर्टू , मन्ना डे आदी मान्यवरांचा सहभाग आहे.

    बाजीराव मस्तानीच्या पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे. पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणाले. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६ साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती.

    श्री.मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने मा.राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे. मा.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

  • स्मरणीय भूमिका करणार्‍या दुर्गा खोटे

    चित्रपट कलाकारांकडे पाहण्याचा दृष्टोकोन दूषीत होता त्या काळात दुर्गा खोटे यांना चित्रपटात येणे भाग पडले. मुलीने चित्रपटात काम करणे घरच्या लोकांना पसंत नव्हते. दुर्गा खोटे यांनी चित्रपटात अशा भूमिका केल्या की चित्रपटातील महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून टाकला. चांगल्या घरातील महिलाही अभिनय क्षेत्रात येऊ शकतात असा एकप्रकारे संदेशच त्यांनी दिला.

  • दिग्गज कसोटीपटू, यशस्वी कर्णधार अजित वाडेकर

    अजित वाडेकरांनी क्रिकेट हेच आपले करिअर निवडले व यशस्वी क्रिकेटपटू, कर्णधार, संघप्रशिक्षक, संघटक अशा विविध भूमिका अजित वाडेकर समरसून जगले. अजित वाडेकर हे शैलीदार डावखुऱ्या फलंदाजीमुळे रसिकांचे आवडते फलंदाज होते. तो स्ट्रेट ड्राइव्ह, तो कव्हर ड्राइव्ह, तो ऑन ड्राइव्ह हे सर्व लाजबाब.

  • दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे

    कळीदार कपूरी पान’, ‘चांदणे शिंपीत जाशी’, ‘जय जय महाराष्ट्र माझा’ अशा दर्जेदार काव्य रचना करणारे कविवर्य राजा बढे
    राजा बढे हे नावाप्रमाणंच राजा-माणूस होते. मा.राजा बढे हे नामवंत गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे कवी... त्यांचा जन्म १ फेब्रुवारी १९१२ रोजी झाला. रुबाबदार,प्रसन्न व्यक्तिमत्त्व, राजस छबी, कुसुमकोमल भावनांना शब्दबद्ध करणारा, कोमलवृत्तीचा हा प्रतिभासंपन्न कवी, पण मनात देशभक्तीचा स्फुलिग सांभाळणारा राष्ट्रप्रेमी म्हणजे मा. राजा बढे. आजच्या पिढीला कदाचित राजा बढे हे नावसुद्धा माहीत नसेल. परंतु ज्यांच्या गीतांची सुदैवाने चिरफाड न होता त्यावर रिमिक्सचा मुलामा चढलेला नाही, अशी गीते राजा बढे यांच्या नावावर आहेत. मा.राजा बढे यांचे जन्म नागपूरचा. प्राथमिक शिक्षण छिंदवाडा येथे तर माध्यमिक शिक्षण नागपूरच्या टिळक विद्यालयात झाले. १९३५ मध्ये त्यांनी पंजाब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. पुण्याच्या दैनिक ‘सकाळ’मध्ये संपादकीय विभागात त्यांनी नोकरी केली. नागपूरच्या दैनिक ‘महाराष्ट्र'मध्ये एक वर्ष ते सहसंपादक होते. त्याचवेळी ‘वागीश्वरी'च्या संपादक मंडळात ते कार्यरत होते. पुढे साप्ताहिक ‘सावधान' मध्ये मावकर-भावे यांच्यासोबत त्यांनी कार्य केले. दरम्यान कॉलेज करून पदवी प्राप्त करण्याचा त्यांचा प्रयत्न अपुरा राहिला. त्यांनी बरचसं स्फुटलेखन "कोंडिबा' या टोपणनावानं केलं. वयाच्या सतरा-अठरा वर्षांपासूनच कविता लिहू लागले. नवकवींच्या काव्यसंग्रहात राजा बढे यांच्या कवितांना विशेष स्थान असे. 'ओहोळ' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह. कवितांची आवड जोपासणाऱ्या बढे आई-वडिलांच्या निधनानंतर मोठा भाऊ म्हणून लहान भावंडांची जबाबदारी, पालनपोषण यातच सर्वस्व मानून स्वत: अविवाहित राहिले. १९४० च्या आसपास चित्रपट व्यवसायात त्यांनी प्रवेश केला. ‘सिरको फिल्म्स' मध्ये दोन वर्ष त्यांनी कामे केली. १९४२ मध्ये ते "प्रकाश स्टुडिओ'त रुजू झाले आणि त्यांनी "रामराज्य' चित्रपटाची गाणी लिहिली. महेश कौल सोबत ‘अंगुरी' चित्रपटात काम केले. पुढं १९४४ मध्ये ते मराठी रंगभूमीकडं वळले. आळतेकर यांच्या "लिट्‌ल थिएटर्स'च्या "कलेसाठी सारस्वत' नाट्यप्रयोगात त्यांची भूमिका होती. ‘संत बहिणाबाई,' ‘गळ्याची शपथ' या चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले. १९५६ ते १९६२ या कालखंडात ते आकाशवाणीवर ‘निर्माता' म्हणून कार्यरत होते. आपल्या वाङ्मयीन अभिरुचीला पोषक ठरतील, अशा व्यवसायांसी धरसोड ते आयुष्यभर करीत राहिले, तरी आपले कवित्व ते सतत सांभाळून होते. "चांदणे शिंपीत जाशी, चालता तू चंचले', "दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी', "प्रेम केले काय हा झाला गुन्हा?' इत्यादी सुरेल भावगीतं त्यांनी लिहिली. स्त्रियांचे मनोभाव आकर्षकरीत्या शब्दबद्ध करण्यात बढे सिद्धहस्त होते. "वाट कशी चुकले रे', "कधी न पाहिले तुला', "होशी तू नामानिराळा', "काय कोणी पाहिले,' "मला मोहू नका' इत्यादी गीतांमधून व्याकुळता, विरहार्तता, मीलनातुरता असे मनोभाव त्यांनी नाट्यपूर्ण रीतीनं चितारले आहेत. संस्कृत काव्याचा त्यांचा चांगला अभ्यास होता. आपली भाषा अलंकृत करण्याची क्षमता त्यांच्यात असली तरी संस्कृत शब्दांच्या भाराखाली ती दडपली जाणार नाही, याचं भान बढे यांच्या गीतांमध्ये दिसतं. बढे यांचा उर्दू शायरीचाही अभ्यास होता. त्या पद्धतीच्या भावाविष्काराचा ढंग आणि कल्पनाविलासाची पद्धत बढे यांनी त्यांच्या काही गझलसदृश भावगीतांमध्ये अंगीकारली. स्वातंत्र्यवीर सावरकर हे बढे यांचं परमदैवत होतं. दिग्दर्शक विजय भट यांच्या 'रामायण' चित्रपटाकरिता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी गीतकार म्हणून राजा बढे यांचे नाव सुचविले. या चित्रपटातील 'सृजनहो परिसा रामकथा, जानकी जीवन विरह व्यथा' हे बढे यांनी लिहिलेले गीत काळजाचा ठाव घेणारे ठरले. त्यानंतर महात्मा विदूर, गळ्याची शपथ अशी काही चित्रपटांसाठी गीतलेखन त्यांनी केले. हे करीत असताना व्यावसायिक हेतू त्यांनी कधीच ठेवला नाही. धोतर, कुडता असा वेष आणि वरण-भात प्रिय असणाऱ्या बढेंच्या लेखी पैशाला फारसे महत्त्व नव्हते. कामाला महत्त्व देणाऱ्या बढेंच्या अनेक भावगीतांमधून कवीच्या भावना हळुवार प्रकट होतात आणि मनाला विलक्षण आनंद देऊन जातात. म्हणूनच लता मंगेशकर, आशा भोसले बढे यांच्या गीतांवर प्रेम करीत. ‘हसताच नार ती अनार मनी फुले' ही बढे यांची गजानन वाटवे यांनी गायिलेली, ‘हसतेस अशी का मनी' लता मंगशकरांनी गायलेली, तर ‘चांदणे शिपीत जा' ही आशा भोसले यांनी गायिलेली गीतरचना , कुमार गंभर्वांनी ‘प्रेम केले काय हा झाला गुन्हा' ही बढे यांची गायिलेली रचना लोकप्रिय झाली. मा.राजा बढे हे कट्टर हिदुत्ववादी होते. स्वा. सावरकर हे त्यांचे दैवत होते. त्यांचे राष्ट्रप्रेम त्यांच्या ‘क्रांतिमाला' (१९५२) या संग्रहातून वेळोवेळी दिसून येते. त्यात २१ कविता आहेत. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील देशभक्तिपर गीते आहेत. प्रत्यक्ष सावरकरांनी ‘प्रस्तावनेत' ‘‘आपण स्वत:च नामवंत, सुप्रतिष्ठित प्रतिभासंपन्न साहित्यिक असल्याने, माझ्या प्रस्तावनेची गरज नाही'' असे गौरवोद्गार काढले आहेत. १९३५ ते १९५९ दरम्यानच्या सामाजिक-राजकीय घडामोडींचे पडसाद यात आहेत. ‘विस्मृतीत गुंफलेली क्रांतिमाला', ‘गगनात आज जो चंद्र सुखे मिरवावा । ते तेज घेऊनी करिती काजवे कावा । तो बाबू गेनू, कोतवाल उरलेले । विसरलो अनामिक किती बळी गेलेले', ‘सुजला सुफला देश आमचा', ‘हिमालय थिजला । थिजला धीरचा । गंगा सिधुतुनी वाहतो प्रवाह रुधिराचा' अशा सर्वच कवितांमध्ये मंगल पांडे, हुतात्मा फडके, चाफेकर, सेनापती बापट अशा क्रांतिवीरांची नावे गुंफून त्यांना विस्मृतीत टाकल्याचे दु:ख व्यक्त केले आहे. ‘घडू दे पुन्हा एकदा भारत' मधून सावरकरांच्या दिव्य देशभक्तीचा गौरव केलेला असून, ‘नवोन्मेषशाली कवींच्या कवे' असे सावरकरांना संबोधले आहे. मा.राजा बढे यांनीच. १९६४ साली मुंबईत मा.बढे यांच्या पुढाकाराने प्रथमच कथाकथनचा कार्यक्रम झाला, या कार्यक्रमात पु. ल. देशपांडे, गदिमा यांनी प्रथमच कथा कथन केल्या होत्या. मुंबई आकाशवाणीवरच्या नोकरीनंतर बढे यांनी छोटे छोटे माहितीपट करून दिले. नंतर बंधू बबनराव यांच्या मदतीनं त्यांनी "स्वानंद चित्र' ही संस्था उभी केली आणि "रायगडचा राजबंदी' हा संभाजीमहाराजांच्या जीवनावरील चित्रपट काढला. गीत, गझल याप्रमाणेच ‘चारोळी' हा रचनाप्रकार बढे यांनी हाताळला. ‘कोंडिबा' हे टोपण नाव वापरून काही राजकीय वात्रटिका त्यांनी लिहिल्या... त्या मुंबईच्या ‘विविधवृत्त' साप्ताहिकातून प्रकाशित झाल्या होत्या. मा.राजा बढे हे केवळ कवी नव्हते. काव्याखेरीज ‘किती रे दिन झाले,' ही पत्रमय कादंबरी; ‘स्वप्नगंधा',‘चतुर किती बायका,' ‘ही रात सवत बाई,' ‘पेचप्रसंग,' ‘अशी गंमत आहे' अशी पाच नाटके त्यांनी लिहिलीत... तरी बढेंची ओळख कवी म्हणूनच कायम राहिली. "गर्जा महाराष्ट्र माझा' हे महाराष्ट्रगीत म्हणजे कविवर्य राजा बढे यांच्या काव्यप्रतिभेचा परमोच्च बिंदू होय. १९६० साली संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली. या विजयानिमित्त बढे यांच्या या रचनेची ध्वनिमुद्रिका "एचएमव्ही'नं तयार केली. शाहीर साबळे यांच्या खड्या आवाजातील आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांचा स्वरसाज असलेल्या या गीताने महाराष्ट्राची थोरवी सातासमुदापार पोहोचवली.. संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ठिकठिकाणी कार्यक्रमांत ऐकवलं जाणारं हे गीत आजही तितकंच ताजं, टवटवीत आहे. मा.राजा बढे यांना पान खायची भारी हौस होती. याच पानावर त्यांनी 'कळीदार कस्तुरी पान' लावणी लिहिली. ती सुलोचना चव्हाण यांनी अशा ठसक्यात गायिली की, भल्याभल्यांना पानाचा मोह आवरायचा नाही. पण अनेकांना ती राजा बढे यांनी लिहिली आहे, हे माहित पण नसेल.
    त्यांनी एक कविता स्वतःविषयीच लिहिली... ते दोन "राजां'चं वर्णन होतं.
    तेव्हा आणि आता...

    एक राजा -
    टोपी किंचित उंच, नीट कलती बाजूस डोकावित
    खासे धोतर, पायघोळ अगदी, टाचेवरी लोळत..
    ओठांनी रसरंग फेकित सदा या मंगलाचे धडे
    आहे काय म्हणुन काय पुसतां? तो हाच राजा बढे..

    दुसरा राजा -
    टोपी सोडून, मुंबईस फिरतो, आता सदा बोडखा
    बंगाली डगला, न पालट दुजा, खाक्या जुना सारखा..
    आहे तोच विडा, अजूनही तसे, ते मंगलाचे सडे
    जैसा नागपुरात, आजही तसा, तो हाच राजा बढे..
    ज्येष्ठ दिवंगत कविवर्य वा. रा. कांत यांनी बढे यांच्याविषयी म्हटलं आहे:-
    "आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देणाऱ्या कविता लिहिण्याचं ‘चांद्रव्रत' त्यांनी निष्ठेनं पार पाडलं, यातच त्यांची थोरवी आहे....हा कवी जन्मभर चांदणं शिंपीत जगला आणि चांदणं शिंपीत शिंपीत अचानक निघून गेला. ह्या "चांद्रव्रती'ची आठवण विझणं अशक्य!!''
    राजा बढे यांचे ७ एप्रिल १९७७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

    राजा बढे यांचे कवितासंग्रह
    ‘हसले मनी चांदणे', ‘माझिया माहेरा जा', ‘क्रांतिमाला', ‘मखमल', ‘मंदिका'.

  • छत्रपती संभाजीराजे

    कोल्हापूरच्या राजघराण्याचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे संभाजीराजे छत्रपती कायमच जनतेशी जोडलेले असतात. मराठा आरक्षण असो किंवा गड किल्ल्यांचा लढा असो, यात ते अनेक वर्षांपासून सक्रीय असलेले दिसतात. आपले विचार आणि भूमिका ते कायमच स्पष्टपणे मांडत आले आहेत.

  • हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील विद्वान पं. रामाश्रेय झा

    पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे.

    जितेंद्र अभिषेकी यांनी पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये कमला बोस, शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत.

    २००५ मध्ये पं रामाश्रेय झा यांना संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता मा.पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट