गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते. झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.
१९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द' कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. मा.परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- समीर गायकवाड./ इंटरनेट
हंसराज बेहल यांच्या घरी कोणत्याही प्रकारचे संगीताला पोषक वातावरण नसताना फक्त संगीताची ओढ होती म्हणून त्यांनी अंबाला इथे आचार्य चिरंजीवलाल यांच्याकडे संगीताचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९१६ रोजी अंबाला येथे झाला. त्यानंतर काही काळ संगीत शिकवणे, स्टेज प्रोग्राम करणे, काही गाण्यांचे रेकोर्डिंग करणे यामध्ये काही काळ त्यांनी व्यतीत केला. हा सारा अनुभव गाठीशी घेऊन १९४४ साली ते मुंबईत आले. तिथे त्यांचे एक नातेवाईक चुन्नीलाल बेहल यांनी त्यांची ओळख पृथ्वीराज कपूर यांच्याशी करून दिली. या ओळखीमुळे मा.हंसराज बेहल यांना त्यांचा पहिला स्वतंत्र संगीत दिग्दर्शनासाठी चित्रपट मिळाला. तो होता दिग्दर्शक ए.बी. इराणी यांचा “पुजारी”. या चित्रपटात बेबी मुमताज (म्हणजेच मधुबाला) हिने गायलेले एक गाणे खूप गाजले ते म्हणजे “भगवान मेरे ग्यान का दीपक जला दे”. १९४७ साली “दुनिया इक सराय” या चित्रपटात त्यांनी मीनाकुमारी कडून सुध्दा काही गाणी गाऊन घेतली. त्यातले हे एक “सावन बीत गयो, माई री”. मा.हंसराज बेहल यांच्याकडे सुरवातीच्या काळातील काही गाणी जसे “दिल-ए-नौशादको जीने की हसरत हो गई तुमसे” गायल्यानंतर मा.हंसराज बेहल यांनी लता मंगेशकर यांना आपल्या मूळ मोकळ्या आवाजात गायचा सल्ला दिला आणि त्यांच्याकडून मेहनतीने तशी गाणी गाऊन घेतली. बॉलीवूड मध्ये मा.हंसराज बेहल हे “मास्टरजी” या टोपणनावाने प्रसिध्द होते.
मोहम्मद रफी मास्टरजींकडे गायले तेव्हा त्यांनी रफी साहेबांना मोकळ्या आवाजातच गायला लावले. मास्टरजींनी अनेक नवीन लोकांना संधी दिली. त्यात एक नाव आहे मधुबाला झवेरी. तसेच गीतकार वर्मा मलिक आणि गीतकार नक्श लायल्पुरी यांना सुध्दा मास्टरजींनी पहिली संधी दिली. पण मास्टरजींची सर्वात मोठी फाईंड म्हणजे आशा भोसले. मास्टरजींच्याच “चुनरिया” चित्रपटातील एका कोरस मध्ये गाणाऱ्या आशाजींचा आवाज मास्टरजींनी बरोबर हेरला. आणि आपल्या पुढच्या चित्रपटात मध्ये त्यांना गायची संधी दिली. त्यांचे पहिले गाणे “है मौजमंि अपने बेगने, दो चार इधर दो चार उधर”. त्यानंतर आशाजींना आपल्या चित्रपटात गाऊन घेण्यासाठी चढाओढ सुरु झाली. मा.हंसराज बेहल यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात कलेची, संगीताची निस्सीम सेवा केली. आपल्या भावासोबत त्यांनी एन. सी. फिल्म नावाची एक कंपनी बनवून काही चित्रपटांची निर्मिती सुध्दा केली. “लाल परी”, “मस्त कलंदर”, “राजधानी”, “चंगेज खान” यासारखे काही चित्रपट त्यांनी बनवले. संगीताचे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. “जहा डाल डाल पर सोने की चिडिया करती है बसेरा, वो भारत देस है मेरा” या गाण्यासाठी त्यांना सर्वोच्च राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. मा.हंसराज बेहल यांनी हिंदी चित्रपटसंगीताला आपल्या पंजाबी ढंगाच्या संगीताने नुसतेच नटवले नाही तर अनेक संगीतात अलौकिक देणग्या दिल्या.हंसराज बेहल यांचे २० मे १९८४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / misalpav.com
हंसराज बहेल यांच्याबद्दल आणखी एक माहिती जाता जाता..........
आपल्या कामाबद्दल आणि शांत मनमिळाऊ स्वभावाने अगदी लाखात एक असे गणले जाणारे मा.हंसराजजी आणखी एका बाबतीत लाखात एक होते. म्हणजेच त्यांचे हृद्य हे शरीराच्या उजव्या बाजूला होते. सर्वसाधारणपणे माणसाचे हृद्य हे डाव्या बाजूला असते पण उजव्या बाजूला हृद्य असणे हे लाखात एकाचेच असते. अर्थात ही गोष्ट त्यांच्या डॉ. कडून कळलेली आहे. (चेंबुरचे डॉ. रवी साठे).
संदर्भ.इंटरनेट/ misalpav.com
हंसराज बहेल यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=1VrSAH4BbIU
प्रतिभावान संगीतकार व गायक श्रीधर फडके (Shridhar Phadke) यांचा जन्म ९ सप्टेंबर १९५० रोजी झाला.
मराठी संगीतातील सुधीर फडके तथा बाबूजी या अजरामर नावाचा वारसा समर्थपणे पेलणारे गायक आणि संगीतकार म्हणजे श्रीधर फडके. गीत-कवितेतील अर्थाला, शब्दांतील सौंदर्याला अधोरेखित करण्याची सुधीर फडके यांची गायनशैली श्रीधर फडके यांनी जाणीवपूर्वक आत्मसात केली असली तरी त्यांनी स्वत:चा स्वतंत्र ठसा उमटवला आहे. त्यांना घरचा समृध्द वारसा असला तरी संगीतकार किंवा गायक व्हायचं असं काही त्यांनी ठरवलेलं नव्हतं. पितृसहवास हा मौलिक ठेवा असला तरी त्यांच्या लहानपणी गाण्याशी त्यांचा संबंध ऐकण्यापुरताच होता. आधी शिक्षण पुरं कर असं वडिलांनीच बजावलं होतं. मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयातून फिजिक्स व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांत एम.एस्सी. केल्यावर ते पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले व त्यांनी न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटर सायन्स या विषयात एम.एस. पदवी संपादन केली. त्यांच्या संगीत-प्रवासाला आरंभ झाला अमेरिकेतच. कॅम्लिन कंपनीच्या मालती दांडेकर अमेरिका भेटीवर आल्या होत्या. त्यांनी श्रीधर फडके यांना हरिपाठाचं पुस्तक दिलं व 'देवाचिया व्दारी, उभा क्षणभरी....' या अभंगाला चाल लावण्याची विनंती केली. त्याप्रमाणे मा.श्रीधर फडके यांनी चाल बांधली व तेथेच, कोलंबिया विद्यापीठातील कार्यक्रमात खुद्द सुधीर फडके यांनी त्या चालीवर तो अभंग गायला. 'तो आपल्या आयुष्यातील जपावासा वाटलेला क्षण' असं श्रीधर फडके म्हणतात.
लक्ष्मीची पाऊले या चित्रपटातील “फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश” हे गीत त्यांनी लावलेल्या चालीमुळे लोकप्रिय झालं. सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत ’बाबुजी’ (सुधीर फडके) व आशा भोसले यांनी गायलं होतं. संगीत हा श्रीधर फडके यांचा व्यवसाय नसल्यानं त्यांनी कधी तडजोड केली नाही. सवंगपणाला बळी पडून त्यांनी कधी रतीब घातला नाही किंवा चालींच्या जिलब्या पाडल्या नाहीत. त्यांना कवितेची सखोल जाण आहे. ‘मन मनास उमगत नाही ’ ही ग्रेस यांची कविता. त्यांनी पहिल्या चार ओळींना चाल लावली. पण पुढील ओळींचा अर्थ उमगेना. तेव्हा त्यांनी आपल्या चालीचं घोडं तसंच पुढ दामटलं नाही तर त्यांच्या आवडत्या कवीपैकी एक असलेले सुधीर मोघे यांना आपली अडचण सांगून चाल लावलेल्या ओळी ऐकवल्या आणि 'तुम्हाला या ओळींच्या आधारे काही सुचलं तर पाहा' असं सुचवलं. मा.सुधीर मोघे सिध्दहस्त कवी, त्यांनी श्रीधर फडके यांची विनंती मान्य केली व पुढील ओळी लिहून दिल्या.
स्वप्नातील पदर धुक्याचा
हातास कसा लागावा
आधार कसा शोधावा
मन मनास उमगत नाही.
श्रीधर फडके यांच्या तळमळीला मोघे यांनी सृजनात्मक प्रतिसाद दिल्यानं एका सुरेल गीताचा जन्म झाला. कवितेवर असं कलम करून घेण्याची किमया मा.श्रीधर फडके यांनी आणखी एकदा घडवून आणली. वैद्य यांच्या पुढील ओळी श्रीधर फडके यांना फार भावल्या त्या अशा...
कुठे जातात भेटून
कशा होतात ओळखी
आणि आपली माणसे
कशी होतात पारखी
या ओळीदेखील फडके यांनी सुधीर मोघे यांना ऐकवल्या व पुढील ओळी लिहून देण्याची विनंती केली. त्यानुसार मोघें यांनी पुढील ओळी रचल्या....
कुण्या देशाचे पाखरू
माझ्या अंगणात आले
त्याचे पंख परदेशी
परी ओळखीचे डोळे
श्रीधर फडके यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले नसले तरी त्यांच्या अनेक चाली रागांवर आधारित आहेत. उदाहरणार्थ ओंकार स्वरूपा (बैरागी भैरवी),ऋतू हिरवा(चारुकेशी), फिटे अंधाराचे जाळे(मिश्र भैरवी), सांज ये गोकुळी(पूर्वाकल्याण व यमनकल्याण), मी राधिका, मी प्रेमिका (मधुकंस).
एखादं गाणं आवडलं की चाल लावण्यासाठी झगडणं काही तासांपासून ते सहा महिन्यांपर्यंत असू शकतं असं श्रीधर फडके म्हणतात.‘ मना लागो छंद, नित्य गोविंद गोविंद ’ या एकनाथांच्या अभंगाला चाल सुचायला सहा महिने लागले. एकदा तर गंमतच झाली. कविवर्य ग्रेस यांच्या ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ’ या कवितेला चाल लावायची होती. त्या दिवशी ते पुण्यात होते, दिवसभरात काही सुचलं नाही. पण मुंबईला परतायच्या प्रवासात पनवेलच्या आसपास चाल मनात दाटून आली. ती हरवू नये , सांडू नये म्हणून श्रीधर फडके ती चाल मुंबईला पोचेपर्यंत गुणगुणत राहिले. प्रत्येक चालीची कुंडली वेगळी असते असं सांगून फडके म्हणतात, “ अंतरा व मुखडा या प्रमाणे त्यांतील नि:शब्द जागाही एकाच लयीत गुंफण आवश्यक आहे. त्यामध्ये त्रुटी राहिल्या तर छोटया तुकड्या तुकड्यांत गाणं ऐकल्याचा भास निर्माण होतो. गाणं कसं असावं, चाल कशी बांधावी, उत्तम चाल कशी असावी हे मी बाबुजींकडून शिकलो.”
श्रीधर फडके यांनी सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांपैकी मनाचे श्लोक , ओंकार स्वरूपा, अवघा विठ्ठलु, ऋतू हिरवा या ध्वनिफिती/ सीडीज यशस्वी झाल्या, त्याबद्दल त्यांना प्लॅटिनम डिस्क प्रदान करण्यात आली. स्वत:चं खास तंत्र व गायनशैली विकसित केलेल्या श्रीधर फडके यांनी अभंग, भावगीतं, भक्तिगीतं, विराण्या, गजल, नाट्य संगीताचा बाज असलेली गाणी असे अनेक प्रकार लीलया सादर केले आहेत. त्यांना ‘वारसा लक्ष्मीचा’ या चित्रपटासाठी ‘पुत्रवती’ या चित्रपटासाठी, ‘लेकरू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट संगीतकार म्हणून तीन वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. श्रीधर फडके यांनी आत्ता पर्यंत अठरा मराठी चित्रपटांचे व एका हिंदी चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन, सतरा ध्वनिफितींचे संगीत दिग्दर्शन, ३ मराठी व ११ गुजराथी नाटकांचे व पाच दूरदर्शन मालिकांचे संगीत दिग्दर्शन केले आहे.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. अशोक जैन / थिंक महाराष्ट्र
श्रीधर फडके यांनी गायलेली, संगीत दिलेली काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=GKOEi9p_VaM
https://www.youtube.com/watch?v=BMNQF1OfHWQ
https://www.youtube.com/watch?v=AqH-TkK9NSk
https://www.youtube.com/watch?v=7T8PqtOGsLI&t=1096s
https://www.youtube.com/watch?v=1V2pB9KCidE&t=287s
अभिनयातलं कर्तृत्व आणि सार्वजनिक जीवनातलं दातृत्व अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेष्ठ ठरलेले अभिनेते म्हणजे चंद्रकांत गोखले. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२१ रोजी मिरज येथे झाला. त्यांचे बालपण मिरज इथेच गेले. अभिनयाचं बाळकडू त्यांना मिळालं ते आपली आजी दुर्गाबाई आणि आई कमलाबाई यांच्याकडून. "चित्ताकर्ष' ही त्यांची घरची नाटक मंडळी होती. वडिलांच्या अकाली निधनामुळे कमलाबाई आपल्या मुलांना बरोबर घेऊन विविध नाटक कंपन्यांमधून भूमिका साकारीत संसार चालवीत होत्या. घरची आर्थिक परिस्थिती साधारण असल्यामुळे छोट्या चंद्रकांतला शालेय शिक्षण काही घेता आलं नाही, परंतु त्यानं त्याचा विपरीत परिणाम आपल्या जडणघडणीवर होऊ दिला नाही. कमलाबाईंनीच त्याला घरी राहूनच लिहायला-वाचायला शिकविलं. विशेष म्हणजे कधीही शाळेत न गेलेल्या चंद्रकांतनी कालांतरानं मिरजेच्या ब्राह्मणपुरीतील प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापकपद भूषविलं. वयाच्या सातव्या वर्षीपासून चंद्रकांतनी नाटकात काम करण्यास सुरवात केली.त्यांनी वयाच्या नवव्या वर्षी ’पुन्हा हिंदू’ या नावाच्या मराठी नाटकाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले.
७ दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत यांनी साठाहून अधिक मराठी नाटकांतून व साठाहून अधिक मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. चंद्रकांत यांच्या कारकिर्दीला वळण मिळण्याचा योग आला तो दीनानाथ मंगेशकर यांच्यामुळे. १९३७-३८च्या सुमारास चंद्रकांतना खुद्द दीनानाथांकडून तब्बल ७० ते ८० बंदिशी शिकण्याची संधी मिळाली. मा. दीनानाथांना गोखले पितृस्थानी मानत. या वेळी त्यांनी काही संगीत नाटकांमधूनही भूमिका केल्या. इथून पुढं त्यांनी रंगभूमी गाजवली. सुरवातीच्या काळात "बेबंदशाही' आणि "पद्मिनी' यांसारख्या नाटकांमधून स्त्री-भूमिकाही त्यांनी केल्या. "नटसम्राट', "पुण्यप्रभाव', "भावबंधन', "राजसंन्यास', "बॅरिस्टर', "पुरुष', "पर्याय' ही त्यांची काही गाजलेली नाटकं. "बॅरिस्टर' हे त्यांचं आवडतं नाटक होतं. "पुरुष' या नाटकावर नाना पाटेकर, रीमा लागू यांच्याएवढाच चंद्रकांत गोखले यांचाही प्रभाव होता. "रायगडचा राजबंदी' या चित्रपटात चंद्रकांत गोखले यांनी शिवाजी महाराजांची, तर चित्तरंजन कोल्हटकर यांनी संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारली होती. याच नाटकात दुर्गा खोटे सोयराबाईंच्या भूमिकेत झळकल्या होत्या. या तिघांची रुपेरी पडद्यावरील जुगलबंदी प्रेक्षकांसाठी अक्षरशः पर्वणी ठरली होती. त्यांनी भूमिका केलेल्या नाटकांपैकी भावबंधन, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, बेबंदशाही, राजे मास्तर, बॅरिस्टर, पुरुष ही प्रमुख नाटके होत. मराठीशिवाय त्यांनी काही हिंदी चित्रपटांमधूनदेखील भूमिका रंगवल्या.
कृश शरीरयष्टी, उत्कृष्ट वक्तृत्वशैली आणि भावनेला भेदणारी संवादफेक हे चंद्रकांत गोखले यांच्या अभिनयाचं वैशिष्ट्य. सच्चेपणा आणि साधेपणा हे त्यांचे मोठे गुणवैशिष्ट्य होते. सात दशकांची आपली कारकीर्द चंद्रकांत रघुनाथ गोखले यांनी विविधांगी भूमिकांनी गाजवली. प्रत्येक भूमिकेवर ते आपला ठसा उमटविण्यात यशस्वी ठरले.मा. चंद्रकांत गोखले हे गायकही होते. त्यानी ख्याल गायकीचे शिक्षण घेतले होते. गदिमा लिखीत, सुधीर फडके यांनी संगीत दिलेल्या गीतरामायण या गीत काव्यातील १० व्या गीताचे (चला राघवा चला'चे) गायन चंद्रकांत गोखले यांनी केले होते. चंद्रकांत गोखले यांना विष्णुदास भावे पुरस्कार, बालगंधर्व पुरस्कार, व्ही. शांताराम पुरस्कार यांसारखे मानसन्मानही मिळाले. मा.चंद्रकांत रघुनाथ गोखले यांचे २० जुन २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
८६ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्याय वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल.
“अयोध्येचा राजा” या चित्रपटाने दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस 'प्रभात फ़िल्म ' चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.
http://www.prabhatfilm.com/home.htm
अयोध्येचा राजा
१९३२
पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३१४२ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११०६०/ ६-२-३२
निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना. वि. कुलकर्णी
संवाद :ना. वि. कुलकर्णी
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल
वेषभूषा :एच्.एस्.काकडे
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :कुमार दिगंबर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, मा. विनायक, मानाजीराव माने, शंकरराव भोसले
गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
शब्दांचे जादूगार, अंधारावर ममत्वाचा अधिकार गाजवणारे आणि कवितेला "सखी' म्हणून आपल्या अस्तित्वातच सामावून घेणारे कवी म्हणजे सुधीर मोघे. त्यांचा जन्म ८ फेब्रुवारी १९३९ रोजी सांगली जिल्ह्यातील किर्लोस्करवाडी येथे झाला.खरे म्हणजे ते एक कवीच पण आपल्या कवितेची अभिव्यक्ती इतर माध्यमातून करायला देखील मागे राहिले नाहीत आणि म्हणूनच त्यांनी गीतकार, संगीतकार, लेखक, चित्रकार, लघुपट निर्माते, दिग्दर्शक अशा अनेक भूमिकातून आपले कवित्व मांडले. सुधीर मोघे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुणे येथे. पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कविता लेखनास सुरुवात केली. १९७२ मध्ये ते पुण्यात कायमच्या वास्तव्यास आले. तेव्हा त्यांनी ‘स्वरानंद प्रतिष्ठान’च्या ‘आपली ओळख’ या कार्यक्रमातून निवेदनास सुरुवात केली. स्वरानंद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भावगीतांचा कोश तयार करण्याचे काम मोघे यांनी हाती घेतले होते. कोश जवळपास पूर्ण होण्याच्या मार्गवर होता. आपल्या निवेदन शैलीतून त्यांनी निवेदनाचा मापदंड उभा केला. दरम्यान, त्यांचे ‘नक्षत्रांचे देणे’ व ‘स्मरणयात्रा’ हे दोन कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय झाले. प्रत्येक वर्षी किमान एक चित्रपट करावा अशी त्यांची अपेक्षा होती.
चित्रपट गीतलेखन, संगीत दिग्दर्शन, ललित लेखन, पटकथा व संवाद लेखन, रंगमंचीय आविष्कार अशा अनेक प्रांतांत आपला ठसा उमटवला. सहजसुंदर शब्दरचना करणारे कवी-गीतकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांचे ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’, ‘लय’, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती’ असे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांसाठी गीतलेखन केले. तसेच त्यांनी अनेक गाण्यांना संगीतही दिले. दूरदर्शन व आकाशवाणीसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम केले. फिटे अंधाराचे जाळे, सांज ये गोकुळी, एकाच या जन्मी जणू, रंगुनी रंगात सा-या, गोमू संगतीनं, आला आला वारा अशी एकापेक्षा एक सरस गीते त्यांनी लिहिली.
साहित्य व संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना अनेक मानसन्मान मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार त्यांनी तब्बल चार वेळा पटकावला होता. नाट्यअभिनेते मा.श्रीकांत मोघे हे सुधीर मोघे यांचे थोरले बंधू.
सुधीर मोघे यांचे निधन १५ मार्च २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
सुधीर मोघे यांच्या कविता संग्रह: ‘आत्मरंग’, ‘गाण्याची वही’, ‘पक्ष्यांचे ठसे’ - ३ हून अधिक आवृत्त्या, ‘लय’ - एकाहून अधिक आवृत्त्या, ‘शब्द धून’, ‘स्वतंत्रते भगवती.’ गद्य : ‘अनुबंध’, ‘गाणारी वाट’, ‘निरांकुशाची रोजनिशी.’ सुधीर मोघे यांचे चित्रपट गीते
‘आत्मविश्वास’, ‘एक डाव भुताचा’, ‘कळत-नकळत’,‘चौकट राजा’, ‘जानकी’, ‘पुढचं पाऊल’, ‘राजू’, ‘लपंडाव’, ‘शापित’, ‘सूर्योदय’,‘हा खेळ सावल्यांचा.’ संगीत दिलेली गीते : ‘अज्ञात तीर्थयात्रा’, ‘भन्नाट रानवारा मस्तीत शीळ’, ‘भेटशील केव्हा माझिया जीवलगा’, ‘माझे मन तुझे झाले’,‘रंगुनी रंगात सार्या.
सुधीर मोघे यांचे संगीत दिग्दर्शन ‘कशासाठी प्रेमासाठी’ (मराठी चित्रपट), ‘सूत्रधार’ (हिंदी चित्रपट), ‘स्वामी’, ‘अधांतरी’, ‘नाजुका’ (मराठी मालिका), ‘हसरतें’, ‘डॉलर बहू’, ‘शरारते’ (हिंदी मालिका).
"महान" या एकाच शब्दात ज्यांचे वर्णन करता येईल असे संगीतकार सचिन देव बर्मन उर्फ एस.डी.बर्मन सर्वार्थाने दादाच होते. त्यांचा जन्म १ आक्टोबर १९०६ रोजी झाला. केवळ १०० हिंदी चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पण मेलडी, ओर्केस्ट्रेशन, चाली, शब्दांची आणि गायकांची अचूक निवड या गोष्टींमुळे भारंभार संगीत देणाऱ्या इतर संगीतकारांपेक्षा ते खुप वेगळे होते. मणीपूरच्या राजघराण्यातले असल्याने वागण्या-बोलण्यात एक प्रकारची हुकुमत आणि रुबाब होता. सर्व जिनीयस लोकांचा असतो तसा एक प्रकारचा उर्मट, आढ्यताखोर आणि विक्षीप्तपणाही त्यांच्या वागण्यात होता. पण या सर्व अवगुणांवर त्यांच्या संगीतातल्या विविधतेने मात केली. आणि रसीकांना कायम मोहात पाडेल असे संगीत त्यांनी दिलं. एकाच चित्रपटात नायक / नायीकांसाठी त्यांनी बिनदिक्कत पणे वेगवेगळ्या गायकांचा वापर केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. त्यांच्या चित्रपटातला देव आनंद एकाच चित्रपटामधे कधी किशोरच्या तर कधी रफी, हेमंतकुमार, तलत यांच्या आवाजात गायचा आणि विशेष म्हणजे त्या त्या ठिकाणी तोच आवाज योग्य वाटायचा. गायकांप्रमाणे त्यांच्या गाण्यातल्या वाद्यांची निवडही अचूक असायची. स्वत: गायक असले तरी आपला आवाज त्यांनी कधीही कुठल्या नायकाला किंवा सहकलाकाराला दिला नाही. त्यांनी गायलेली गाणी ही कायम पार्श्वभुमीवर वाजायची आणि त्या त्या चित्रपटातल्या कथेचा एक हिस्सा बनायची. उदा. "गाईड" मधले "वहॊं कौन है तेरा, मुसाफीर जायेगा कहॊं" असो किंवा "सुजाता" मधलं "सुन मेरे बंधू रे, सुन मेरे मितवा" असो, ही गाणी म्हणजे त्या चित्रपटाच्या कथेचाच एक भाग होती. बर्मनदांची आणखी एक देणगी म्हणजे किशोर कुमार यांच्या आवाजाचा त्यांनी केलेला वापर. "आराधना" मुळे किशोर जरी गायक म्हणून घोडदौड करू लागला असले तरी या आराधनापुर्वी किशोरच्या आवाजातली अनेक अजरामर गीते ही बर्मनदांनीच दिली आहेत. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचं काही काळ लता आणि नंतर रफीशी पटत नव्हतं.
पण किशोरच्या बाबतीत ही गोष्ट कधीच घडली नाही. एखाद्या गायकाने गायलेले गाणे जर त्यांच्या मर्जीस आले नाही तर ते उघडपणे चारचौघात त्या गायकाला ही गोष्ट सुनवीत असत. "सुजाता" मधलंच तलतचं "जलते है जिसके लिए" हे गाणं याचं उत्तम उदाहरण आहे. अनेक रिर्हसल करूनही शेवटपर्य़ंत मा.तलत यांना हे गाणं जसं बर्मनदांना अभिप्रेत होतं तसं गाता आलं नव्हतं. शेवटी दिग्दर्शक बिमल रॊय यांनी रदबदली करून हा वाद मिटवला. विशेष म्हणजे संगीतकाराला शेवटपर्यंत न रुचलेलं हे गाणं तलतच्या सर्वोत्कृष्ट गाण्यांमधलं एक आहे. किशोर कुमार यांच्या प्रमाणेच मन्ना डे यांच्या उत्कर्षाला देखील बर्मनदाच जबाबदार आहेत. आधी काही पौराणीक चित्रपटांची गाणी गाऊन आणि अपयशी ठरून कलकत्त्याला परत जाण्याच्या विचारात असलेल्या मन्नादांना त्यांचं पहिलं लोकप्रिय गीत - उपर गगन विशाल - हे बर्मनदांनीच दिलं. या गाण्याचं वैशीष्ट्य म्हणजे हे गाणं आधी बर्मनदांच्या आवाजात रेकॊर्ड होऊन त्याचं चित्रीकरणही झालं होतं. पण त्याच सुमाराला बर्मनदांचं निर्माता अशोक कुमारशी (चित्रपट - मशाल) बिनसलं.
पण व्यावसायिक करारामुळे बर्मनदांनी चित्रपटाला संगीत तर दिलं पण आपला आवाज वापरायला नकार दिला आणि हे गाणं मन्नादां कडे आलं. सिच्युएशन कुठलीही असो, भाव कुठलाही असो, हिरो-हिरोइन कोणीही असो, मा.एस.डी.बर्मन यांच्याकडे गाण्याचे काम असणे म्हणजे १०० टक्के निश्चिंत! गाणे त्या ठिकाणी चपखल तर बसणारच, ते हिटसुद्धा तेवढेच होणार. जणू काही परिसच. गायक-गायिका असो वा गाणे, बर्मनदांनी ज्याला हात लावला त्याचे सोने झाले.
एस.डी. बर्मन यांचे ३१ ऑक्टोबर १९७५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मराठी चित्रपट संगीत लोकप्रिय करण्यात ज्या मोजक्या संगीतकारांचे कर्तृत्व कारणीभूत ठरले त्यात राम कदम यांचे स्थान वरचे आहे. त्यांचा जन्म २८ ऑगस्ट १९१६ रोजी झाला. ‘पिंजरा’, ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’, ‘झुंज’, ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’, ‘पाहुणी’, ‘सुशिला’, ‘पारध’, ‘गड जेजुरी जेजुरी’ अशा कित्येक संगीतमय चित्रपटांची देणगी मराठीला मिळाली ती केवळ राम कदम यांच्यामुळे. त्यांच्या संगीतामुळे अनेक चित्रपट तरले, विक्रमी ठरले. असं म्हटलं जाते कि, गझल करावी तर मदन मोहननी, कव्वाली करावी तर रोशननी, भावगती करावं तर वसंत प्रभूंनी आणि लावणी करावी तर राम कदम यांनीच! मराठी लावणीचे लावण्या खुलवून त्यांनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. मायबाप रसिकांनी दिलेली 'लावणी सम्राट' ही बिरुदावली अभिमानाने मिरवली. कलाकाराला आयुष्यात किमान एक संधी अशी मिळते की जिचे तो सोने करुन जातो. ‘पिंजरा‘ ही संगीतकार राम कदम यांना मिळाली व त्या संधीचे राम कदम यांनी सोने केले. बाजीराव मस्तीनी या चित्रपटातील पिंगा गाण्याबाबत पानीपतकार विश्वास पाटील यांनी या गाण्याबाबत एक नवा मुद्दा समोर आणला होता. तो म्हणजे, मुळात 'पिंगा ग पोरी पिंगा...' याची चाल प्रसिद्ध मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधली आहे.
पिंगा.. ही चाल मूळ मराठी संगीतकार राम कदम यांनी बांधलेली असून त्यांनी संगीतबद्ध केलल्या तीन चित्रपटांतील गाण्यांत त्यांनी ही चाल वापरली असल्याचे विश्वास पाटील म्हणतात. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९६२ सालचा अनंत माने दिग्दर्शित भाग्यलक्ष्मी, १९७५ सालचा व्ही शांताराम प्रोडक्शनचा चंदनाची चोळी अंग अंग जाळी आणि १९७६साली अनंत माने दिग्दर्शित पाहुणी या चित्रपटांतील गाण्यांत राम कदमांनी ही चाल वापरली होती. मधु पोतदार यांनी ‘संगीतबद्ध राम कदम’ या नावाने राम कदम यांचे पुस्तक लिहिले आहे. या संगीतकाराच्या संपूर्ण कारकीर्दीचा तपशीलवार आढावा त्यात घेतला आहे.राम कदम यांचे १९ फेब्रुवारी १९९७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
संगीतकार राम कदम यांची काही गाणी
अ आ आई, म म मका
अहो अहो कारभारी हो
आई उदे ग अंबाबाई
आज या एकांत काली
आली आली हो भागाबाई
आली ठुमकत नार लचकत
आली बाई पंचिम रंगाची
आल्या नाचत नाचत
उठा उठा हो सूर्यनारायणा
एक लाजरा न् साजरा
औंदा लगीन करायचं
कशी नशीबाने थट्टा आज
कळी कळी उमलते पाकळी
वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे साहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले. पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.
हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.
Copyright © 2025 | Marathisrushti