किराणा घराण्याचे गायक पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर जन्म २ जानेवारी १९३७ रोजी श्रीवर्धन तालुक्यातील " दिवेआगर येथे झाला.
अच्युत अभ्यंकर यांनी आकाशवाणी येथे अनेक गाण्याचे कार्यक्रम केले. तसेच पं. अभ्यंकर यांनी देश–विदेशांत असंख्य मैफिली सादर केल्या. आपले गुरु पं. फिरोझ दस्तुर यांचा अनमोल ठेवा पुढील पिढीपर्यंत पोहचविण्याच्या कार्यात स्वत:ला झोकून देऊन पं. अभ्यंकर यांनी ठाण्यातील अनेक संगीत संस्थात संगीत विद्यादानाचे अमूल्य काम केले. १९९२ ते १९९५ सालापर्यंत मुंबई विद्यापीठात हिंदुस्थानी संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. पं अभ्यंकर यांना सुरमणी, गायनाचार्य, संगीत ऋषी या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ठाणे महापालिकेतर्फे २००६ साली ‘ठाणे गौरव पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
पं अभ्यंकर यांच्या तालमीत ठाण्यातील अनेक नावाजलेले गायक आणि गायिका गायकीचे धडे घेतले. डॉ वरदा गोडबोले, लीला शेलार, विभावरी बांधवकर, मधुवंती दांडेकर, प्रणव पटवर्धन हे यापैकी काही. पं राम मराठे यांच्यासह अच्युत केशव अभ्यंकर यांनी संगीत मंदारमाला या नाटकाच्या काही प्रयोगांमध्ये विशेष भूमिका बजावली होती. पं. अच्युत केशव अभ्यंकर उर्फ पं. ए के अभ्यंकर यांचे ९ एप्रिल २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.मराठी सृष्टी/इंटरनेट
बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते.
नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी क्षेत्रात गेली दोन दशकं लेखक, अभिनेता व दिग्दर्शक म्हणून वावरणाऱ्या अभिराम भडकमकर यांचा जन्म ७ जानेवारी १९६५ रोजी झाला.
नाटक, सिनेमा, कथा, कादंबरी या सर्वच क्षेत्रात सहजपणे वावरणारा हा कलावंत.. रुढार्थानेसुद्धा कलावंतच... कारण तो अभिनयसुद्धा करतो... आजच्या घडीला उत्तम आणि दर्जेदार लिहिणा-या लेखकांपैकी एक महत्वाचे नाव म्हणजे अभिराम भडकमकर...
चुड़ैल हा कथासंग्रह असो किंवा बालगंधर्व'सारखी एका अवलिया कलावंताचा विशाल जीवनपट असलेली कादंबरी असो किंवा आजच्या मालिका विश्वाच्या पडद्यामागल्या वास्तवाचं भीषण दर्शन घडवणारी 'एट एनी कॉस्ट' ही कादंबरी....
भडकमकर यानी लेखक म्हणून एक विशिष्ट स्थान निर्माण केलेले आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालायाचे स्नातक असलेले भडकमकर सतत कुठल्या ना कुठल्या 'लेखन' प्रयोगात व्यस्त असतात. पछाडलेला या चित्रपटा मध्ये "समीर" ची भूमिका अभिराम ने साकारलेली आहे.
आई, ए रेनी डे, खबरदार, देवकी, पाऊलवाट, बालगंधर्व या चित्रपटाना अभिराम भडकमकरची पटकथा आहे. अभिराम भडकमकर यांनी आम्ही असू लाडके हा मराठी चित्रपट दिग्दर्शोत केलेले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
http://www.abhirambhadkamkar.com/
१९४७ मध्ये गरीबांचे राज्य या चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. कुंकवाचा धनी या १९५० मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी शांताबाई आपटे यांच्याबरोबर नायकाची भूमिका प्रथमच केली.
गोगा कपूर यांचे खरे नाव रविंद्र कपूर पण ते बॉलीवूड मध्ये गोगा कपूर या नावाने काम करत असत. अनेक चित्रपटात सपोर्टींग व्हिलनची भूमिका करणाऱ्या गोगा कपूर यांनी अभिनय क्षेत्रात रंगभूमीच्या माध्यमातून पदार्पण केले.
भारतीय सिनेमाच्या ट्रॅजेडी क्वीन मीनाकुमारी यांचा जन्म १ ऑगस्ट १९३२ रोजी झाला.
मीनाकुमारी यांचे मूळ नाव महजबी बानो होते. मीनाकुमारी हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली.
मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. मीना कुमारी यांना कलेचा वारसा आई-वडिलांकडूनच मिळाला. त्यांचे वडील अली बक्ष हे चित्रपट तसेच पारसी रंगभूमीवरील एक कलाकार होते. काही चित्रपटांत संगीतकार म्हणूनही त्या काळी त्यांनी काम केले होते. आई इक्बाल बानो, पूर्वाश्रमीची प्रभावती देवी ही एक प्रसिद्ध नृत्यांगना होती. कामिनी या नावाने ती रंगभूमीवर अभिनय करत असे. पंडित रवींद्रनाथ टागोर यांच्या परिवाराशी तिचे जवळचे नातेसंबंध होते.
मीना कुमारी यांना परिवारात ‘मुन्ना’ या नावाने संबोधले जात असे. चौथ्या वर्षापासूनच तिच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. विजय भट्ट यांचा ‘लेदर फेस’ हा त्यांचा बालकलाकार म्हणून पहिला चित्रपट. खरंतर त्यांना शिकायची खूप इच्छा होती. पण चित्रपटांत अभिनय करून तिला लहानवयातच कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली. अधुरी कहानी, फरजद ए हिंद, लाल हवेली, अन्नपूर्णा, तमाशासारख्या वीस चित्रपटांत त्या बाल कलाकार ‘बेबी मीना’ म्हणून चमकल्या.
नायिका म्हणून अभिनय केलेला ‘बच्चों का खेल’ हा त्यांचा पहिला चित्रपट. बैजू बावरा, आझाद, कोहिनूर अशा काही चित्रपटांतून मीनाकुमारी यांचे लोभस दर्शन प्रेक्षकांना घडले. छोट्याच्या चणीची, निरागस, खट्याळ, प्रेमळ, त्यागी, रुपात विलक्षण गोडवा असलेली मा.मीनाकुमारी पडद्यावर वेगवेगळ्या स्वरुपात अनुभवायला मिळाली.
काही निखळ विनोदी भूमिकाही त्यांच्या वाट्याला आल्या पण पडद्यावर त्यांनी साकारलेल्या 'शोक'नायिकेलाच प्रेक्षकांनी उचलून धरलं. चित्रलेखा, बहुबेगम, गझल, दिल आपण और प्रीत पराई, मी चूप रहूंगी, शारदा, काजल अशा अनेक चित्रपटांतून मीनाकुमारी यांनी दर्जेदार अभिनयाने स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले.
३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास ९० पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिक मानले गेले.
त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा ट्रॅजिक होते. १९५३ साली वयाने पंधरा वर्षे मोठे असलेल्या आणि विवाहित असलेल्या दिग्दर्शक कमाल अमरोहीशी त्या विवाहबद्ध झाल्या. सुरवातीची काही मोजकी वर्षे जरा बरी गेली पण नंतर दोघांमधील वैचारिक अंतर वाढू लागले. त्यानंतर अवघ्या सात वर्षांनी म्हणजे १९६० साली त्यांची वैवाहिक कारकीर्द घटस्फोटापर्यंत पोहोचली.
'साहिब, बीवी और गुलाम' या सिनेमामध्ये मीना कुमारी यांनी धाकट्या सूनेची भूमिका साकारली होती. केवळ या पात्रामुळेच त्या दारूच्या आधीन गेल्या होत्या असे म्हणतात. करिअरच्या यशोशिखरावर पोहोचल्यानंतर आपले दु:ख लपवण्यासाठी मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. प्रेमात वारंवार धोका खाल्ल्याने त्यांचे मन खचून गेले होते. त्या सतत ख-या प्रेमाच्या शोधात असायच्या. परंतु या झगमग जगात त्यांनी केवळ धोका आणि विश्वासघातच मिळतच गेला. त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला. याला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य मद्यपानात बुडवून टाकले.
फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मीना कुमारी ह्या पहिल्या अभिनेत्री. १९५३ साली फिल्मफेअर पुरस्काराला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या दोन्ही वर्षी ‘बैजू बावरा’ आणि ‘परिणिता’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी त्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या. पुढे ‘साहिब बिवी और गुलाम’ आणि ‘काजल’ चित्रपटांतील भूमिकांसाठी असे एकूण चार फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाले. दहाव्या फिल्मफेअर पुरस्कारावेळी ‘मैं चुप रहूंगी’, ‘आरती’ आणि ‘साहब बिवी और गुलाम’ चित्रपटांसाठी सर्वत्कृष्ट नायिकेच्या पुरस्कारासाठीची नामांकने मीनाकुमारी यांनाच मिळालेली होती.
मीनाकुमारी ह्या अभिनेत्रीबरोबरच गायिका तसेच कवयित्रीदेखील होती. मात्र आपल्या रचना प्रकाशित करण्याचा फारसा प्रयत्न तिने कधीच केला नाही. ‘नाझ’ या नावाने तिच्या काही उर्दू रचना प्रकाशित आहेत. अभिनेत्री मधुबाला मीना कुमारीच्या आवाजाची चाहती होती. दिलीप कुमार तिच्यासमोर नि:शब्द होत असे तर राजकुमार आपले संवाद विसरून जात असे. अभिनेता भारतभूषण तिच्या एकतर्फी प्रेमात होते.
१९८१ मध्ये आलेल्या ‘मीनाकुमारी की अमर कहानी’ नावाच्या चित्रपटात मीना कुमारी यांची दर्दभरी अजीब दास्तां मांडण्यात आली होती.
मीनाकुमारी यांचे ३१ मार्च १९७२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
मीनाकुमारी यांनी अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=qkD39k9xaVQ&vl=hi
https://www.youtube.com/watch?v=Nq0TKmbp7No
"मालगुडी डेज'सह आपल्या इतर लेखनाने भारतासह जगभरातील वाचकांना भुरळ घालणारे भारतीय लेखक आर.के. नारायण यांचे पुर्ण नाव रासीपुरम कृष्णस्वामी अय्यर नारायणस्वामी. त्यांचा जन्म १० ऑक्टोबर १९०६ रोजी झाला.
१९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी कल्पून स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट 'दि गाईड' यावर गाईड नावाचा हिंदी चित्रपट निघाला.
दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज.जोशी यांनी केले आहे. आर.के.नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित १९८० च्या दशकात दूरदर्शनच्या राष्ट्रीय प्रसारणात ‘मालगुडी डेज्’ ही मालिका प्रसारित झाली होती. त्या मालिकेसाठी नारायण यांचे बंधू प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी काढलेल्या रेखाचित्रांमुळे ती मालिका आणि ते पुस्तक यांच्या लोकप्रियतेत भरच पडली. मालगुडी या एकाच गावातील विविध व्यक्ती, घटना, परिसर, बदलत्या जगाच्या तिथे उमटणार्या पाऊलखुणा, त्यातून तिथे बदलत जाणारे विश्व, अगदी लहान मुलापासून ते इंग्रजी साहेबाकडे कारकुनी करणार्याल नव-बूर्ज्वा समाजाचे वेधक चित्रण त्या पुस्तकाने केले. प्रचंड लोकप्रिय झालेल्या या मालिकेचे काही वर्षांपूर्वी ‘मालगुडी डेज् रिटर्न’ या नावाने पुनप्रसारणही करण्यात आले होते. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या मालिकेचे तेव्हा ३९ भाग प्रसारित झाले होते. मालिकेतील ‘स्वामी’ हा लहान मुलगा, त्याचे मित्र आणि त्यांचे भावविश्व मालिकेतून सादर करण्यात आले होते. आर. के. नारायण यांनी लिहिलेल्या काही लघुकथांवर ही मालिका आधारीत होती. साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियनलेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जात असे. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. नारायण यांना पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी आदी सन्मान मिळाले होते. आर.के.नारायण यांचे १३ मे २००१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मुंबई महापालिकेच्या शाळेत शिपाई म्हणून नोकरी केली. आणि १९६१ मध्ये शिपायाचे शिक्षक झाले. महापालिकेच्या नायगाव नंबर एक शाळेत त्यांची शिक्षक म्हणून नोकरी सुरू झाली. ते तेव्हापासून गिरणगावचे “सुर्वे मास्तर’ झाले.
मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार दत्ताराम मारुती मिरासदार उर्फ द. मा. मिरासदार यांचा जन्म १४ एप्रिल १९२७ रोजी झाला.
काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते.
व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. 'एक डाव भुताचा' या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तसेच अनेकदा त्यांच्या विनोदालाही कारुण्याची झालर असल्याचे दिसून येते. एक डाव भुताचा आणि ठकास महाठक ह्या दोन चित्रपटांच्या संवादलेखनाबद्दल त्यांना पारितोषिके मिळाली आहेत. ‘व्यंकूची शिकवणी’ ह्या त्यांच्या गाजलेल्या विनोदी कथेवरुन गुरुकृपा हा मराठी चित्रपट काढण्यात आला होता. मराठी साहित्यिकांनी विनोदी वाङ्मयात ज्या अजरामर कथा लिहिल्या त्यात द. मा. मिरासदार यांची ‘माझ्या बापाची पेंड’ आणि ‘भुताचा जन्म’ यांचा समावेश व्हायला हरकत नाही. 'मिरासदारी' या पुस्तकातली 'भुताचा जन्म' ही कथा प्रसिद्ध आहे. ही लोकप्रिय कथा या वर्षी बारावीच्या अभ्यासक्रमातल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात आहे. द.मा.मिरासदार यांच्या 'भुताचा जन्म' या कथेवर बनलेली शॉर्टफिल्म आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये गाजली. ही कलाकृती रोममध्ये होणाऱ्या फेस्टिवलमध्येही दाखवली गेली.
द. मा. मिरासदार यांच्या खास विनोदी शैलीतल्या निवडक कथांचा अत्यंत सुरस संग्रह म्हणजे मिरासदारी हे पुस्तक. गेल्या काही वर्षांत मराठी ग्रामीण कथेच्या उदयाबरोबर ग्रामीण वातावरणाशी संलग्न असणारी हास्यजनक कथा जन्माला आली. तिच्यात वृत्तीची विविधता आहे, केवळ एकसुरीपणा नाही. मिरासदारांच्या या कथांतून एक अनोखी मिश्किलपणाची, चमत्कृतीपूर्ण वळणांची व गमतीदार विक्षिप्तपणाची झाक वाचकाला अतिशय भावली. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.
मिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे.
द. मा. मिरासदार हे नेहमीच त्यांच्या मार्मिक आणि शैलीदार विनोदांसाठी प्रसिद्ध राहिले आहेत. महाराष्ट्रातील विविध गाव आणि तिथे राहणारी माणस आपल्याला नेहमी मिरासदारांच्या कथेतून भेटत राहतात. 'चकाट्या' मध्ये ही अशाच काही गावात आणि शहरात राहणाऱ्या अवली माणसाच्या आणि त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्यांच्या कथा आपल्याला वाचायला मिळतात फक़्त शाब्दिक विनोद न करता प्रासंगिक विनोद लेखनातून वठवणे आणि साध्या लिखाणातून वाचकाला गुंतवून ठेवणे यातच लेखकाचे यश मानता येईल . 'शिवाजीचे हस्ताक्षर' ही कथा तर अप्रतिम.
द. मा. मिरासदार यांना विंदा करंदीकर जीवनगौरव, पुलोत्सव जीवनगौरव' पुरस्कार मिळाला होता.
मराठी सिने-नाट्य कलाकार रवींद्र मंकणी हे द. मा. मिरासदार यांचे जावई.
द. मा. मिरासदार यांचे २ ऑक्टोबर २०२१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
कथा कथन - द. मा. मिरासदार यांच्या आवाजात..
https://www.youtube.com/watch?v=4yy-dYVTrow
https://www.youtube.com/watch?v=_NCs6yL1chE
https://www.youtube.com/watch?v=I0DUFPBj33k
हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.
पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली.
माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं. बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''
काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''
आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti