एखादा माणूस किती बुद्धिवान असू शकतो हे जर अनुभवायचे असेल तर श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचने आणि ग्रंथ संपदा अनुभवावी. प्रचंड स्मरणशक्ती , वाणीवर प्रभुत्व , ओघवती भाषा ,विनम्र निवेदन ,अनेक ग्रंथांचे ज्ञान , अतिशय सुस्पष्ट विचार हे श्री शंकर अभ्यंकर यांचे वैशिष्ठ आहे.
त्यांचे ग्रंथ घरात असणे, ते वाचणे हे तुमच्या घराचे वैभव असेल .मी प्रथम श्री शंकर अभ्यंकर यांची प्रवचनमाला ऐकली ती हनुमान व्यायाम शाळेच्या पटांगणात.त्यानंतर मी त्यांची अनेक प्रवचने ऐकली. त्यांच्या आदित्य प्रतिष्ठान’ या संस्थेतर्फे लोणावळ्याजवळ जगातील पहिले संत विद्यापीठ साकार झाले असून येथे देशातील प्रत्येक प्रांतातील संतवाङ्मयाचे जतन केले जाणार आहे. या ठिकाणी देशातील प्रत्येक प्रांताच्या संतवाङ्मयातील सुमारे दोन लाख ग्रंथांचे जतन करण्यात येणार आहे. तसेच संतवाङ्म्मयाविषयीची आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थाही उभारण्यात येणार आहे. बारावी इयत्तेनंतर संतवाङ्मयाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम सुरू करण्याचाही संस्थेचा मानस आहे. या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत केले जाणार असून तो पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षे लागतील.
तुम्हाला जर घरी वाचन करायला वेळ मिळत नसेल तर तुमच्या कार मध्ये श्री शंकर अभ्यंकर यांच्या सी डि , एम पी ३ ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी केलेले व्याख्यान तुम्ही जर ऐकलेत तर मंत्रमुग्ध व्हाल .शिवरायांच्या आधीच्या अनेक पिढ्यांचा, सूर्यवंशी शिसोदिया राजपूत घराण्याचा इतिहास ऐकताना खूप आनंद होतो. शिवशाहीर महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याखानात ऐकलेला इतिहास पुन्हा शंकर अभ्यंकर यांच्या तोंडून ऐकताना इतिहासातील अनेक बारकावे लक्षात येतात. तुमच्या कार मध्ये त्यांची "छत्रपती शिवाजी महाराज "हि एम पी ३ जरूर ठेवा.तुमचा लांबचा प्रवास अत्यंत सुखकारक करण्याची क्षमता या एम पी ३ मध्ये आहे.
कोल्हापूरला श्री महालक्ष्मी च्या दर्शनाला जाताना मी कार मध्ये त्यांचे श्रीसूक्ता वरील प्रवचन ऐकतो. श्री सूक्त ऐकले कि मनातील गोंधळ कमी होण्यास खूप मदत होते. पुन्हा पुन्हा ऐकले तरी समाधान न होणारे त्यांचे विचार प्रत्तेक तरुणानी ऐकले पाहिजेत .
संतवाङ्मयाचा त्यांचा अभ्यास Analytical analysis करणारा आहे.समर्थ रामदास स्वामींवर बोलणारे श्री अभ्यंकर तुम्हाला त्यांच्या ज्ञान आणि विद्वत्ते समोर नतमस्तक होण्यास भाग पाडतात.
त्यांच्या प्रत्तेक भाषणात देशप्रेम तुम्ही अनुभवाल. भारत देशाबद्दल त्यांनी मांडलेले विचार त्यांच्या "भारतीय संस्कृती" वरील भाषणात तुम्हाला अंतर्मुख करतील .त्यांनी लिहिलेल्या भक्ति कोश या ५ प्रचंड ग्रंथात तुम्हाला भारतीय आचार्य , भारतीय सांप्रदाय ,भारतीय संत , भारतीय तीर्थ क्षेत्रे व मंदिरे आणि भारतीय उपासना या संबंधात प्रचंड माहिती मिळेल. त्यांचा प्रत्तेक ग्रंथ शेकडो पानांचा आहे.सुदैवाने माझ्या संग्रहात हे पाचही खंड आहेत.
त्यांचे विचार ऐकल्यावर मला प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पुन्हा प्रगट झाले कि काय असे वाटत राहते. गेली ४ वर्षे मी त्यांचे विचार वाचतो आणि ऐकतो आहे. वयाचा विचार न करता ज्यांच्या पायाशी बसून ज्ञान मिळवावे अशी त्यांची योग्यता आहे. या नव्या वर्षात माझ्या या पोस्ट मुळे एका व्यक्तीने जरी त्यांचे साहित्य अनुभवले तरी मला खूप आनंद होईल .
चिंतामणी कारखानीस -
February 18, 2016
स्नेहप्रभा प्रधान यांचे दहा वर्षांपर्यंतचे त्यांचे बालपण नागपूर, पुणे, मुंबई, कलकत्ता, लाहोर आणि अन्य शहरांत गेले. परिणामी १८ वर्षाच्या होईपर्यंत त्यांना चार भाषा अस्खलित बोलता येऊ लागल्या. त्यांना कुत्र्या-मांजराचे आणि अन्य प्राण्यांचे खूप प्रेम होते. आपण डॉक्टर बनावे अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्यांना कॉलेजमध्ये जाण्याचे सुख मिळाले नाही. वडिलांनी कुटुंबाचा त्याग केलाआणि स्नेहप्रभा प्रधानांची सर्व जबाबदारी त्यांच्या सतत आजारी असणाऱ्या आईवर पडली. अशा वेळी त्यांचे कुटुंबस्नेही व बॉम्बे टॉकीजचे चित्रपट निर्माते चिमणभाई देसाई मदतीला धावले आणि स्नेहप्रभा प्रधानांची चित्रपटांतील अभिनयाची कारकीर्द सुरू झाली. त्या आधी स्नेहप्रभा प्रधान या मो.ग. रांगणेकर यांच्या नाट्यनिकेतन या नाट्यसंस्थेच्या नाटकांतून कामे करीत असत. पहिली मंगळागौर या चित्रपटात लता मंगेशकर यांनी स्नेहप्रभा प्रधान यांच्या धाकट्या बहिणीची भूमिका केली होती.
स्नेहप्रभा प्रधान यांना १९४० मध्ये प्रकाशित झालेल्या ’सजनी’, ’सिव्हिल मॅरेज’ आणि ’सौभाग्य’ या चित्रपटांत चिमणभाई देसाईंच्या ओळखीमुळे कामे करायला मिळाली. त्याच वर्षी किशोर शाहू यांच्या नायिका म्हणून स्नेहप्रभा प्रधान यांना बॉम्बे टॉकीजच्या ’पुनर्मिलन’ या चित्रपटात भूमिका मिळाली. चित्रपटात त्यांनी गायलेले ’नाचो नाचो प्यारे मन के मोर’ हे गाणे अफाट गाजले. किशोर शाहू त्यांच्या प्रेमात पडले, त्यांचे लग्न झाले पण ते लग्न जेमतेम एक वर्ष टिकले.
नंतर त्यांची घट्ट मैत्री जुळली ती डॉ. शिरोडकर यांच्यासोबत. १९५० च्या सुमारास स्नेहप्रभा प्रधान यांचे डॉ. शिरोडकरांशी लग्न झाले, आणि त्या मुंबईत स्थिरावल्या. त्यांनी पुढची काही वर्षे मराठी नाट्यसेवेसाठी व इतर सामाजिक कार्यासाठी खर्च केली. स्नेहप्रभा प्रधान मात्र शेवटपर्यंत स्वतंत्र, पुरोगामी आणि बिनधास्त जीवन जगल्या. शेवटची वर्षे ४० वर्षे मात्र, त्यांनी आपले जीवन प्रसिद्धिपराङ्मुखपणे व शांतपणे व्यतीत केले. स्नेहप्रभा प्रधान यांनी पुनर्मिलन, पहिली मंगळागौर ,सजनी, सिव्हिल मॅरेज, सौभाग्य या चित्रपटात कामे केली.
स्नेहप्रभा प्रधान यांचं आत्मवृत्त "स्नेहांकिता‘ वाचण्यासारखे आहे. ७ डिसेंबर १९९३ रोजी स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन झाले.
स्नेहप्रभा प्रधान यांनी लिहिलेली पुस्तके
पळसाला पानं तीन (ललित लेखसंग्रह)
रसिक प्रेक्षकांस सप्रेम (स्नेहप्रभा प्रधान यांच्या भूमिकांचे विश्लेषण करणारे लेख)
सर्वस्वी तुझाच (नाटक)
स्नेहांकिता (आत्मचरित्र).
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 7, 2017
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांनी मुंबई विद्यापीठातून बी.ए. पदवी मिळवली. त्यांचा जन्म ७ जानेवारी १९२० रोजी झाला. पुढे त्यांनी एम.ए. व पीएच्.डी. पदव्याही मिळवल्या. "Contribuiton of Women writers in Marathi Literature" या प्रबंधावर त्यांनी पीएच्.डी. ही पदवी संपादन केली. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता. महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा प्रगाढ अभ्यास त्यांनी त्यांच्या आयुष्यभर केला. सरोजिनी बाबर या महाराष्ट्र विधानसभा (१९५२-५७), महाराष्ट्र विधानपरिषद (१९६४-६६) व भारतीय राज्यसभा (१९६८-१९७४) या सभागृहांच्या सदस्या होत्या. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांनी दुर्मीळ आणि अप्रकाशित लोकसाहित्य संकलित केले आणि ’लोकसाहित्य शब्दकोश’ आणि ’भाषा व संस्कृती’ या पुस्तकांमधून प्रकाशित केले. "समाज-शिक्षण माला" हे मासिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समितीवर सरोजिनी बाबर यांनी सभासद म्हणून काम केले. नंतर डॉ.सरोजिनी बाबर यांची या समितीच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली. हे काम त्यांच्या अतिशय आवडीचे आणि जबाबदारीचे होते. लोकसाहित्य, लोककला आणि एकूणच लोकजीवनाच्या अभ्यासाचे क्षितिज आणखी विस्तारले. समितीने महाराष्ट्राच्या निरनिराळ्या भागातल्या लोक वाङ्मयाचा खूप मोठा संग्रह केला. यात ओव्या, गीते, कथा, कहाण्या, म्हणी, खेळगाणी, उखाणे मोठ्या प्रमाणात समाविष्ट आहेत. महाराष्ट्रातील देवधर्माची, सण-उत्सवांची, रीतीरिवाजांची, अनेक कलांची माहिती आहे. डॉ. सरोजिनी बाबर यांचे १९ एप्रिल २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
डॉ.सरोजिनी कृष्णराव बाबर यांची कविता
अडगूळं मडगूळं, सोन्याचं कडबुळं ..
खेळायला आलं ग, लाडाचं डबुलं..
गालात हासून, ओठात बोलून...
हातानं खेळीत, काय ग म्हणालं...
जावळात भुरभुरलं, नजरेत खुदखुदलं ...
सोन्याच्या ढीगाव, बाळ ग बैसलं...
रांगत रांगत, हअम डौलात...
गुडघ्याव रेलून, काय ग पाहिलं ...
फुरफुरी मारून, दिलं ते थुंकून...
कारंजं उडवीत, कसं ग रागावलं...
झेप झेपावून, तोल सावरून...
नाचून नाचून, पाय खुळखुळलं...
काजळ तितीट, बाळाच्या मुठीत...
माझ्या जीवाचं, सुख दाटलं...
April 19, 2017
अभिजीत चव्हाण यांनी रंपाट,गोजिरी,सायकल आणि बऱ्याच मराठी सिनेमात लक्षवेधी भूमिका केल्या आहेत. अगली, रॉकी हँडसम आदी हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी उत्तम काम केले आहे. तसेच पु.ल. देशपांडे ह्यांच्यावर आलेल्या “भाई” ह्या बायोपिक मध्ये आचार्य अत्रे ह्यांची भूमिका अभिजीत सरांनी केली आहे.
April 11, 2022
सबनीस कुटुंब मूळचे पुसाळकर. कोकणातल्या पुसाळहून देशावर आलेले. वसंत सबनीस यांचे शालेय शिक्षण पंढरपुरात झाले तर, पुणे येथील फग्यूर्सन महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. बी. ए. पर्यंत शिक्षण घेतल्यावर महाराष्ट्र सरकारची नोकरी त्यांनी केली. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९२३ रोजी सोलापूर येथे झाला.
पुण्यातल्या वास्तव्यात, पु. ल. देशपांडे, राम गबाले, शरद तळवलकर यांच्याशी झालेली घट्ट मैत्री त्यांच्या एकूण व्यक्तिमत्त्वाच्या घडणीतच महत्त्वाची ठरली. 'घरोघरी हीच बोंब', 'कार्टी श्रीदेवी', या नाटकांबरोबरच, 'विच्छा माझी पुरी करा' सारखे अप्रतिम नाटय, इथून सुरुवात होऊन, सोंगाडया, एकटा जीव सदाशिव, हे गाजलेले चित्रपट दादा कोंडके यांच्यासाठी त्यांनी दिले. व्यावसायिक रंगभूमी आणि चित्रपट यामधे एक प्रतिष्ठित विनोद रूजविण्याचा सबनीसांनी केलेला प्रयत्न बराचसा यशस्वी झाला. ते हसविण्यासाठी कधीच स्वस्त झाले नाहीत. त्यांच्या अनेक कथांना राज्य सरकारचे वाङ्मय पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार राम गणेश गडकरी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 'गेला माधव कुणीकडे' सारखे तब्बल १० वर्षे मराठी रंगभूमीवर हाऊस फुल्ल जाणारे, 'कलावैभव' संस्थेला यश देणारे नाटक, 'अशी ही बनवाबनवी', 'गंमत जंमत' सारखे चित्रपट त्यांची ही खासियत अधोरेखित करतात. 'घरोघरी हीच बोंब' ’निळावंत’, 'नाटक' नावाचेचे नाटक तसेच 'सौजन्याची ऐशी तैशी', 'विच्छा माझी पुरी करा', 'गेला माधव कुणीकडे', अशी एकापाठोपाठ एक यशस्वी नाटकांची मालिका श्री. सबनीस यांच्या श्रेयनामावलीमध्ये आहे. 'सबनिशी' हा त्यांचा विनोदी लेखसंग्रह, 'थापडया', 'पखाल', हे विनोदी कथासंग्रह, तर 'माझेश्वरी' हे ब-यावाईट अनुभवांचे संकलन प्रसिध्द झाले आहे.
मराठी लोककलांच्या क्षेत्रात सबनीस लीलया वावरले. त्यांनी ’विच्छा माझी पुरी करा’ लिहीले तेव्हा तमाशा, वग आदि प्रकारांना पांढरपेषांच्या कलांत वा मनोरंजनात स्थान नव्हते. दादा कोंडके हे नावही 'विच्छा' मुळे घरा घरात पोहचले. राजा, परधानजी, कलावंतीण आणि शिपाई ही पात्रे शहरातही चमकू लागली. मुंबईतील रंगभवन आणि राणीच्या बागेतील रंगमंचावरून 'विच्छा'ने सरळ दादरच्या शिवाजी मंदिर, गिरगावच्या साहित्य संघ इ. नाटयगृहांमधे धडक मारली. कित्येकदा विच्छाच्या प्रयोगात वसंत सबनीस दादांबरोबर बतावणीला उभे राहिले होते. पु. लं. समवेत त्यांनी 'तुका म्हणे' मधेही काम केले होते. वग नाटय लेखनात सबनीसांची लेखणी विशेष खुलली.
'छपरी पलंगाचा वग', म्हणजेच 'विच्छा' हे नाटक, त्यांची १८ नाटके व एकांकिका प्रसिध्द झाल्या, विप्छा माजी पुरी करा, कार्टी श देवी, घरोघरी हीच बोंब, निळावंती, म्हैस येता माझ्या घरा, सौजन्याची ऐशी तैशी, मेजर चंद्रकांत, अप्पाजींची सेक्रेटरी, हे ही दिवस जातील, प्रेक्षकांनी क्षमा करावी, घरमालक, यम हरला यम जिंकला. त्यांचे एकूण १२ कथा संग्रह प्रसिध्द झाले, बोका झाला संन्यासी, पसंद अपनी अपनी, गुदगुल्या, विनोद द्वादशी, परसूच्या पशुकथा, थापाड्या, खांदेपालट, पानदान, गारुड, पंगत, परवाळ, आलपड. त्यांची दोन पुस्तके, पहिलं `माझेश्वरी' दुसरं `सबनीशी`.
जयवंत दळवींच्या निवडक ठणठणपाळचे संपादन ही त्यांनी केलं. त्यांच्या दोन विनोदी नाटयकृतींना १९६३ व १९७२ सालचे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते काही काळ किशोर मासिकाचे संपादक होते. अनुभवापलिकडचे विनोद करण्याची त्यांच्यात जबरदस्त ताकद होती. वसंत सबनीस यांना पैशापेक्षा लेखन अधिक प्रिय होते. `खणखणपूरचा राजा' या वगनाट्यापासूनच दादा कोंडके, वसंत सबनीसांची जोडी जमली. आणि 'सोंगाडया' रूपेरी पडदयावर आला.
'एकटा जीव सदाशीव' सुध्दा वसंतरावांनी दादांसाठी लिहीला. मात्र नंतर द्वयर्थी संवादांच्या आग्रहामुळे दादांसाठी त्यांनी लिहीणेही नाकारले. सचिन बरोबर त्यांचे 'नवरी मिळे नव-याला', 'गंमत जंमत', 'एकापेक्षा एक', 'अशी ही बनवाबनवी', 'बाळाचे बाप ब्रह्मचारी', असे एकाहून एक धम्माल विनोदी आणि सुपरहिट चित्रपट पडदयावर आले. मा.वसंत सबनीस यांचे १५ ऑक्टोबर २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
विच्छा माझी पुरी करा नाटक
https://www.youtube.com/watch?v=08xqwTnglME
December 6, 2017
त्याने १९७५ला पर्थ येथे वेस्ट इंडिज विरुद्ध १६०.६ किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकला होता. हा त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान चेंडू होता.
August 16, 2021
आज १ नोव्हेंबर.. शरद तळवलकर यांची जयंती. शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला.
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता.
नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला.
पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.
अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते.
शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 1, 2016
मुलांचे एक वेगळे विश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते हे काही माहीतच नव्हते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हतेच.
February 5, 2022
कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची पुण्यतिथी
बहिणाबाईंचा जन्म २४ ऑगस्ट १८८० रोजी झाला.
बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते, त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या; तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. ज्यात त्यांचे सारे आयुष्य गेले, ते शेतकाम आणि घरकाम करता करता उत्स्फूर्तपणे त्या ओव्या रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे एक आप्त ह्यांनी जमेल तेव्हा त्या वेळोवेळी तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. लिहिता न येणाऱ्या बहिणाबाई अहिराणीत आपल्या कविता रचत व त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी त्या कागदावर लिहून ठेवत. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईंचे पुत्र. बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर बहिणाबाईंचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव व त्यांचे मावसबंधू श्री. पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईंची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हे हस्तलिखित सोपानदेवांच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे ह्यांना दाखविल्या. अत्रे उद्गारले, "अहो हे तर बावनकशी सोनं आहे! हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे!’,आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे ह्यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली आणि ‘धरत्रीच्या आरशामधी सरग’ (स्वर्ग) पाहणाऱ्या ह्या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. ह्या काव्यसंग्रहात बहिणाबाईंच्या फक्त ३५ कविता आहेत; परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता, केवळ सहजधर्म म्हणून रचिलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखनिविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झालेली आहे. बहिणाबाईंच्या कविता वऱ्हाडी-खानदेशीत, त्यांच्या मातृबोलीत, रचिलेल्या आहेत.त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार; शेतीची साधने, कापणी, मळणी इ. कृषिजीवनातील विविध प्रसंग; अक्षय्य तृतीया, पोळा, पाडवा इ. सणसोहळे; काही परिचित व्यक्ती, असे आहेत. या साऱ्यांबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती असे त्यांच्या काव्यातून दिसून येते.
‘असा राजा शेतकरी, चालला रे आलवानी (अनवाणी) देखा त्याच्या पायाखाले, काटे गेले वाकीसनी.
तल्लख स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखांकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण आणि जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान ही त्यांच्या कवित्वाची वैशिष्ट्ये होत. ‘आला सास, गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगनं-मरनं एका सासाचं अंतर!’ किंवा ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ अशा किमान शब्दात अर्थाची कमाल गाठणारे शब्द, ‘अरे संसार संसार - जसा तवा चुल्यावर आधी हाताले चटके - तव्हा मीयते (मिळते) भाकर’ किंवा ‘देव कुठे देव कुठे - आभायाच्या आरपार देव कुठे देव कुठे - तुझ्या बुबुयामझार’. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्त्वज्ञान त्या साध्या, सोप्या, आणि कमी शब्दांत सहजपणे सांगून गेल्या आहेत. मा.बहिणाबाई चौधरी यांचे ३ डिसेंबर १९५१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकीपीडीया
December 3, 2016
मार्क झुकरबर्गचे वडिल इलियट हे व्यवसायाने डेन्टिस्ट तर आई मानसपोचारतज्ञ आहेत. त्यांचा जन्म १४ मे १९८४ रोजी झाला. वयाच्या १२ व्या वर्षापासुनच मार्कला कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग मध्ये रस निर्माण झाला होता. मुलाची कॉम्प्युटर मधली आवड बघुन मार्कच्या वडिलांनी त्याच्यासाठी खासगी शिक्षकाची नियुक्ती केली. लहानपणी केवळ मजा म्हणुन मार्कने अनेक कॉम्प्युटर गेम्स तयार केले होते. लहान वयातच त्याने अटारी बेसिक वापरायला सुरवात केली. त्याने घरात एकमेकांना संदेश देण्यासाठी एक प्रोग्रॅम विकसित केला. याचा उपयोग त्याच्या वडिलांच्या दवाखान्यात रुग्णांना त्यांचा नंबर आला आहे हे सुचित करण्यासाठी केला गेला. या नेटवर्कला ‘झुकनेट’ असं नाव दिले गेलं. नवनवीन प्रोग्रॅम लिहणं हा तर झुकरबर्गसाठी छंदच झाला होता. मार्कने हार्वर्ड विदयापीठात कॉम्प्युटर सायन्स आणि टेक्नॉलॉजी या शाखेत प्रवेश घेवुन आपल्या माहाविदयालयीन जीवनाला सुरवात केली. या काळात मार्कने गंमत म्हणुन ‘फेसमस’ हा प्रोग्रॅम तयार केला. यात पोस्ट केलेल्या फोटोंवर विदयार्थ्यांनी आपलं मत मांडायचं होतं. पण हा प्रोग्रॅम काही दिवसातच बंद पडला. परवानागी शिवाय फोटो वापरल्याबद्द्ल झुकरबर्गवर टिकाही झाली अणि त्याला माफीही मागावी लागली. परंतु हाच प्रयत्न झुकरबर्गला फेसबुकच्या निर्मितीसाठी प्रेरणादायी ठरला. मार्क शिकत असलेल्या अॅसकॅडमीत विदयार्थ्यांची माहिती आणि फोटोज संकलित केलेली डिरेक्टरी असायची त्याला फेसबुक असे म्हटलं जायचे यावरुनच साईटला ‘फेसबुक’ असं नाव दिलं गेलं असं म्हटलं जाते. मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुक चालू करण्याआधी 'फेसबुक'ची संपूर्ण योजना आपली मैत्रीण प्रिशिलाला(जी नंतर पत्नी झाली.) समजावून सांगितली. प्रिशिलाने देखील मार्क झुकरबर्गला सगळ्या कामात मदत करण्याचे आश्वासन दिले. झुकरबर्गने 'फेसबुक'साठी शिक्षण सोडले.
'फेसबुक' सुरु झाल्यानंतर पहिला युजर म्हणून प्रिशिलाने रजिस्ट्रेशन केले. वेबच्या दुनियेत क्रांती घडवणाऱ्या झुकरबर्गचे यश त्याच्या वयाच्या मानाने कितीतरी मोठे आहे, यशाची एकेक पायरी चढत असताना मोठया उद्योगसमुहांकडुन येणाऱ्या ऑफर्स डावलून फेसबुक ने आपली यशस्वी घोडदौड सुरु ठेवली. मला अणि माझ्या सहकाऱ्यांना केवळ पैसा महत्वाचा नसुन लोकांना जास्तीत जास्त चांगली सेवा देण्याचे उद्दिष्ट्य आहे. “My aim is making world open” असं त्याने एक मुलाखतीत म्हटलं आहे. सध्या जगात १.७१ अब्ज फेसबुकचे युजर्स आहेत. फेसबुकमुळे शाळा-कॉलेज मधले मित्रमैत्रिणी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. मित्राचा मित्र, मैत्रिणीची मैत्रीण, तिची बहिण, तिचा भाऊ, सख्ये, चुलत - निलत अगदी शेजारी राहणारे ताई, माई, दादा सुध्दा ही लिस्ट तर हजारांवर जाऊन पोहचते. ज्यांना रोजच काय पण अनेक वर्षात भेटता आले नाही किंवा ज्यांच्या भेटीची शक्यताही दुरापास्त आहे त्यांना आता आपण रोज भेटतो फेसबुकवर. या सगळ्याच्या सुखदु;खात जरी आपल्याला प्रत्यक्षपणे सामील होता आलं नाही तरी अप्रत्यक्षपणे सामील होण्याची सोय फेसबुक ने उपलब्ध करुन दिली आहे. एरव्ही सामाजिक, राजकीय विषयांवर टिका, टिपण्णी करणं ही पत्रकार आणि नेते मंडळीचीच मक्तेदारी समजली जायची पण फेसबुकमुळे सामान्य माणुस या विषयांवर आपलं मत हिरीरीने मांडू लागला. फेसबुकमुळे प्रत्येकाला हक्काचं व्यासपीठ मिळालं. मार्क झुकरबर्गची लव्हस्टोरी त्याच्यासारखीच 'हटके' आहे. झुकरबर्ग १४ वर्षांपूर्वी पहिल्यादा आपल्या पत्नी प्रिशिला हिला भेटला होता. पहिल्या भेटीतची प्रिशिलावर झुकरबर्गला जीव जडला होता. मार्क झुकरबर्ग आणि प्रिशिला हार्वर्ड युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होते. दोघे २००३ मध्ये एका पार्टीत सहभागी झाले होते. झुकरबर्ग वॉशरूमबाहेर उभा होता. तितक्यात त्याचे लक्ष रांगेत उभ्या असलेल्या एका युवतीकडे गेले. ती युवती म्हणजेच प्रिशिला चान. झुकरबर्ग व प्रिशिलाचे हाय- हॅलो झाले. हळूहळू दोघांत चांगली गट्टी जमली. दोघे दररोज भेटू लागले. मैत्री अन् मैत्रीचे रुपांतर प्रेमात कसे झाले, हे दोघांनीही कळले नाही. झुकरबर्ग व प्रिशिलाने १९ मे २०१२ ला विवाह केला. मार्क आणि प्रसिला यांनी आपल्या मुलीच्या जन्मानंतर त्याच्या नावावर असलेले ९९ टक्के शेअर्स म्हणजेच ४५०० कोटी डॉलर दान केले. आजमितीला मार्क झुकरबर्ग हा जगातला सर्वात कमी वयाचा अब्जाधीश आहे. मार्क झुकरबर्गची संपत्ती ४१.२ अब्ज डॉलर आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
May 14, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti