महान कथक गुरू, उत्कृष्ट गायक, निष्णात तबला, सरोद, व्हायोलिन वादक आणि उत्तम दर्जाचे चित्रकार असणाऱ्या पं. बिरजू महाराज यांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पं बिरजू महाराज यांचे वडील म्हणजे लखनौच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील अच्छन महाराज. त्याचे नाव खरे नाव ब्रिजमोहन मिश्रा. बिरजू हे त्यांचे लहानपणचे नाव.
आज आपण त्यांना आजही पंडित बिरजू महाराज म्हणून ओळखतो. पं.बिरजू महाराज यांना नृत्य वारसा हक्कानेच मिळाले होते. त्याशिवाय लय-तालाची नैसर्गिक देणगीही होती. बालपणातच त्यांनी आपल्या वडीलांकडून नृत्याचे धडे घ्यायला सुरवात केली. मात्र हे शिक्षण त्यांना फार काळ लाभले नाही. पं.बिरजू महाराज वयाच्या दहाव्या वर्षीच अच्छन महाराजांचे निधन झाले. पुढचे शिक्षण बिरजू महाराज यांनी त्यांचे काका पंडित लच्छू महाराज आणि पंडित शंभू महाराज यांच्याकडे घेतले. लच्छू महाराज लास्यांगात मुरलेले तर शंभू महाराजांचा अभिनयात हातखंडा. बिरजू महाराज यांनी हे सगळे टीपकागदाप्रमाणे आत्मसात केले. थोर गुरूंकडून मिळालेली विद्या, असामान्य प्रतिभा आणि अंत:प्रेरणा या त्रयींवर पुढे महाराजजींनी कथक नृत्यात नवनवीन प्रयोग केले. त्यांचे पूर्वज दरबारात नृत्य करत होते. ते नृत्य आता रंगमंचावर आले आहे याचे भान ठेवून बिरजू महाराज यांनी ते अधिकाधिक लोकाभिमुख केले. महाराजजींचं बालपण अतिशय हालाखीत गेले.त्यांचे काका श्री लच्छू महाराज मुंबईत नृत्य गुरू म्हणून आणि हिंदी चित्रपटसृष्टीत नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते.त्यांनी आपल्या या पुतण्याला मुंबईला येण्याचा प्रस्ताव दिला.खूप मोठी संधी बिरजू महाराज यांच्याकडे चालून आली होती पण त्यांच्या आईने त्यांना अडवले. “चित्रपटसृष्टीत नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं मिळेल पण घराण्याचं काम अर्धवट राहील. घराण्याचा वारसा पुढे नेणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे!” असे सांगून आईंनी महाराजजींना जणू त्यांच्या जीवितकार्याची जाणीव करून दिली. बिरजू महाराज यांनीही आपल्या आईची आज्ञा शिरसावंद्य मानली. पुढे काही तुरळक सिनेमांचा अपवाद वगळता महाराजजी आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले.
लहान वयात बिरजू महाराज यांची उत्तम नर्तक म्हणून ख्याती होतीच पण या वयातच उत्तम गुरू म्हणूनही त्यांचा लौकीक होऊ लागला.त्यांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली.’फाग-लीला’, ’मालती-माधव’, ’कुमार संभव’ ही काही नावे. या नृत्यनाट्यांमधे त्यांनी स्वत: प्रमुख भूमिकाही साकारल्या. त्यांनी ’रोमिओ-ज्युलिएट’ या महान नाटककार शेक्सपियरच्या अजरामर कलाकृतीवर सर्वांगसुंदर असे नृत्य-नाट्य सादर केले. संपूर्ण देशभरात आणि विदेशात बिरजू महाराज यांच्या नृत्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. बिरजू महाराज यांचे नृत्य पहाणे हा एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या सहज-सुंदर रेषा, अप्रतिम पवित्रे, जणू एक जिवंत चित्रशिल्पच! मोराच्या गतीत जेव्हा बिरजू महाराज मोराची चाल करतात तेव्हा खरोखरच लखलखीत पिसाऱ्याचा, डौलदार मानेचा मोर आपल्यासमोर नाचतोय असे वाटते. त्यांचं भावांगही तितकंच सहज सुंदर. एखाद्या कुशल चित्रकाराने कॅनव्हासवर विविध रंगछटा लीलया साकाराव्यात त्याच सहजतेने त्यांच्या चेहेऱ्यावर भाव जिवंत होतात. सौंदर्यरसाच्या या उधळणीत रसिकमन चिंब भिजून जाते. बिरजू महाराज यांची प्रतिभा केवळ नृत्यापुरती सीमित नाही. ते एक उत्तम कवी आणि चित्रकार आहेत. तबला, पखावज वाजवण्यात ते वाकबगार आहेत. नृत्यासाठीही त्यांनी अनेक पद्यरचना केल्या आहेत. नवनवीन टुकडे, तोडे, तिहाया यांची निर्मिती तर अविरत चाललेली असते. खूप कमी कलावंत उत्तम शिक्षकही असतात.
मध्ये पुण्यातील कार्यक्रमात बिंदादीन महाराज यांच्या ठुमरींसह मराठी गाणेही गाऊन त्यांनी रसिकांना जिंकून घेतले होते. ’कथक केंद्र (दिल्ली)’ ते स्वत:ची संस्था ’कलाश्रम’ या प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम शिष्य तयार केले. बाल, प्रौढ अश्या प्रत्येकाला शिकवण्याची महाराजजींची खास हातोटी आहे. बिरजू महाराज यांना ऐकताना आपण प्राचीन मंदिरातील कथकापुढे बसलो आहोत असे वाटते. बिरजू महाराज यांना अनेक मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. देशाचा सर्वोच्च पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करून भारत सरकारने त्यांचा गौरव केला आहे. बनारस आणि खैरागड या विद्यापिठांनी त्यांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.याशिवाय कालिदास सन्मान, ’नृत्य चुडामणी’, आंध्र रत्न, सोविएत लँड नेहरू पुरस्कार असे विविध पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ अनंत वझे
February 4, 2019
दिग्दर्शक-निर्माते रमेश सिप्पी यांनी आत्तापर्यंत बॉलिवूडला अनेक सिनेमे दिले, मात्र शोले सिनेमाने त्यांनी जी प्रसिद्ध मिळवून दिली,ती इतर सिनेमांमुळे त्यांना मिळाली नाही. एकच सिनेमा त्यांच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला.या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित करत त्यांचे नाव इतिहासातील महान दिग्दर्शकांमध्ये नोंदवले गेले. त्यांचा जन्म २३ जानेवारी १९४७ पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये झाला.
रमेश सिप्पी यांचे वडील जी.पी.सिप्पी प्रख्यात निर्माते होते. वयाच्या नवव्या वर्षी रमेश सिप्पी यांनी पहिल्यांदा कॅमे-यासमोर काम केले होते. १९५३ मध्ये वडिलांच्या 'शहंशाह' या सिनेमात रमेश यांनी बालकलाकाराच्या रुपात काम केले होते.रमेश यांनी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.या दोन्ही क्षेत्रात त्यांना यश प्राप्त झाले. १९७१ मध्ये 'अंदाज' या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यांनी सात वर्षे सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. "अंदाज', "सीता और गीता', "ब्रह्मचारी' वगैरे चित्रपटांनी सुरवात करणाऱ्या रमेश सिप्पी यांनी अल्पावधीतच चित्रसृष्टीत भक्कम स्थान निर्माण केले. "शोले'ने त्यांचे नाव इतिहासात लिहिले गेले. त्यानंतर आलेला "शान' जरी कोसळला असला, तरी डिंपल कापडियाचे पुनरागमन असलेला "सागर' चांगला चालला.
"शक्ती'मध्ये त्यांनी दिलीपकुमार, अमिताभ बच्चनला प्रथमच एकत्र आणले. चित्रसृष्टीत असे वेगवेगळे प्रयोग करणाऱ्या या दिग्दर्शकाने "बुनियाद' या मालिकेद्वारे टीव्हीवरही प्रयोग केला आणि तो तुफान यशस्वी ठरला. "शोले'प्रमाणेच या मालिकेतील मास्टरजी, लाजोजी वगैरे पात्रे घराघरांत पोचली. रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून दिलेले अंदाज, सीता और गीता, शोले, शान, शक्ति,सागर, जमीन, भ्रष्टाचार, जमाना दीवाना, असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले. रमेश सिप्पी यांनी दूरचित्रवाणी मालिका'बुनियाद'चेही दिग्दर्शन केले होते. ती टीव्ही मालिका पण खूप गाजली होती.
रमेश सिप्पी यांनी निर्माता म्हणून ब्रह्मचारी, कुछ ना कहो, ब्लफमास्टर, टॅक्सी नंबर 9211, चांदनी चौक टू चाइना, नौटंकी साला, सोनाली केबल या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी अभिनेत्री किरण जुनेजा यांच्याशी विवाह केला. अभिनेत्री किरण जुनेजा रमेश सिप्पी यांच्या दुस-या पत्नी आहेत. रमेश सिप्पी यांना दोन मुले असून रोहन सिप्पी हे मुलाचे तर शीना सिप्पी हे मुलीचे नाव आहे. शीनाचे लग्न शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूरसोबत झाले आहे. रोहन प्रसिद्ध दिग्दर्शक असून आपल्या वडिलांचा वारसा सांभाळत आहे. रमेश सिप्पी हे राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या (एनएफडीसी) अध्यक्षपदी राहिले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 24, 2018
सुमारे तीन दशके आपली रोमँटिक गाणी देणारे हिंदी चित्रपट गीतकार लालजी पांडेय उर्फ अंजान यांचा जन्म २८ ऑक्टोबर १९३० वाराणसी येथे झाला. अंजान गंगेकाठच्या वाराणसीतच लहानाचे मोठे झाले. गंगेच्या घाटावर फिरताना त्यांच्या काव्यप्रतिभेला एक आगळी खोली लाभली. त्यातूनच पुढे आला एक प्रतिभावंत गीतकार. आपल्या अद्वितीय गीतरचनांमुळे त्यांनी रसिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
September 13, 2017
चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.
हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.
"रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.
संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- मंदार जोशी /विकिपिडीया
January 25, 2017
आत्म निर्भर हा शब्द कोव्हीड साथीने आपल्यात रुजवला.पण ही संकल्पना ४०वर्षांपूर्वीच यांनी विशाखापट्टणम जिल्ह्यातील ५०हून अधिक खेडी आत्मनिर्भर करुन ही कल्पना वास्तवात येऊ शकते याचा भक्कम पुरावा दिला होता. अमेरिकेत संशोधन किंवा नोकरीची संधी सोडून मायभूमीत परतून देशसेवा करण्याचा पर्याय निवडल्याबाबत त्यांनी जराही खंत नव्हती. कारण त्यांचे ध्येय पक्के होते. दृष्टी ठाम होती, त्यामुळेच ते असामान्य होते.
June 9, 2022
मोरेश्वर वासुदेव उर्फ बंडोपंत सोलापूरकर यांचा जन्म १८ एप्रिल १९३३ रोजी झाला.
बँड संस्कृती रुजवण्यात महत्त्वाची भूमिका असलेलं अनुभवी व्यक्तिमत्त्व म्हणून बंडोपंत सोलापूरकर यांची ख्याती होती. त्यांनी बँडची संस्कृती नुसती रुजवलीच नाही, तर तिला प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याचे महत्त्व अधोरेखित केले. वयाच्या सातव्या वर्षांपासून त्यांनी त्यांचे मोठे बंधू अण्णासाहेब सोलापूरकर यांच्याकडे क्लॅरोनेट वादनाचे प्राथमिक आणि पंडित नागेश खळीकर यांच्याकडे गायकी अंगाने वादनाचे धडे गिरवले. उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या मार्गदर्शनाखाली लयकारी आणि मिंड यांतील बारकाव्यांचा अभ्यास केला. या दिग्गजांकडे मिळालेल्या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी क्लॅरोनेटसारख्या पाश्चात्त्य वाद्याला आपलेसे करीत ते जनमानसात पोहोचवले. परंपरावादी पुण्यात पाश्चात्त्य वाद्यांविषयी उत्सुकता निर्माण करण्याची महत्त्वाची कामगिरी त्यांनी यानिमित्तानं केली. पाश्चात्त्य वाद्यातून भारतीय स्वर काढण्याचे कौशल्य त्यांना साध्य झाले होते. एकल वादनाच्या मैफलीतून त्यांनी प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवलीच होती. कुंदगोळ आणि पुण्याच्या सवाई गंधर्व महोत्सवासारख्या मोठ्या संगीत महोत्सवांमध्ये त्यांनी सातत्यानं वादन केले.
प्रभात फिल्म कंपनीच्या संगीत विभागात काम करताना ‘माणूस’सारख्या चित्रपटातही क्लॅरोनेट वाजवले होते. तसेच राम कदम, कल्याणजी आनंदजी, रवींद्र जैन, वसंत देसाई आदी संगीतकारांसह काम केले. ‘गुळाचा गणपती’, ‘बाळा जो जो रे’, ‘माहेरची साडी’, ‘राम लखन’ आदी अनेक चित्रपटांसाठीही वादन केले. एकल वादनातून मोठी लोकप्रियता मिळत असतानाही त्यांनी बँडकडे दुर्लक्ष केले नाही. उलट, या दोन्हीत योग्य तो समन्वय राखत त्यांनी दोन्ही गोष्टी जनमानसात पोहोचवल्या.
प्रभात बँडने अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. सोलापूरकर कुटुंबीयांनी स्थापन केलेल्या या बँडपथकाने मिरवणुकीमध्ये ब्रास असलेल्या वाद्यांवर मराठी गीतांचे वादन ही प्रथा सुरू केली. क्लॅरोनेटवादक म्हणून ख्याती असलेले बंडोपंत सोलापूरकर हे सॅक्सोफोन, ट्रम्पेट अशा ब्रासच्या वाद्यवादनासह अनेक वर्षे गणपती मंडळाच्या मिरवणुकीच्या अग्रभागी असायचे. त्यांच्या कष्टांमुळे बँडसंस्कृतीला प्रतिष्ठा मिळाली. बँडबरोबर राहात त्यांनी लग्नसमारंभ, गणेशोत्सवातही उत्साहाने वादन केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सव मिरवणुकीत त्यांचे वादन हा आकर्षणाचा विषय असे. एखाद्या गायकाला महोत्सवांत सातत्याने गाण्याची संधी मिळते; पण बंडोपंतानी गाणगापूर आणि कुंदगोळच्या महोत्सवात ५० वर्षांपेक्षा जास्त काळ विनाखंड वादन करून अलिखित विक्रमच नोंदवला. त्यांच्या या संगीतसेवेसाठी अनेक मानसन्मान त्यांना प्राप्त झाले. या पुरस्कारांबरोबरच त्यांना रसिकांच्या प्रेमाची दादही मिळाली.
बंडोपंत सोलापूरकर यांचे २३ जानेवारी २०१३ रोजी निधन झाले.
January 23, 2022
ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि ज्येष्ठ अभिनेत्री दीपा श्रीराम यांचा तन्वीर हा एकुलता एक मुलगा. एका दुर्दैवी अपघातामध्ये त्याचे निधन झाले. तन्वीर याच्या वाढदिवशी त्याच्या स्मृतिप्रीत्यर्थ रंगभूमीच्या संदर्भात अखिल भारतीय स्तरावर महनीय कार्य करणाऱ्या रंगकर्मीला तन्वीर सन्मान प्रदान केला जातो.
या वर्षीचा तन्वीर सन्मान ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’सारख्या नाटकांचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश आळेकर हे भारतीय रंगभूमीवरील एक महत्त्वाचे नाव! त्यांचा जन्म ३० जानेवारी १९४९ रोजी झाला.
आळेकरांचे नाव नाटककार म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार यांच्या जोडीने घेतले जाते. आळेकरांचा जन्म दिल्लीत झाला. त्यांची आई म्हणजे न.वि. गाडगीळ यांची कन्या. आळेकरांचे शिक्षण पुण्यात झाले. त्याचे मामा काकासाहेब गाडगीळ.
शाळकरी वयात शांतता! कोर्ट चालू आहे’चा प्रयोग आळेकरांनी पाहिला आणि ते भारावून गेले. एका नाट्यप्रयोगाचा इतका खोल परिणाम होऊ शकतो, हे त्यांना नवीनच होतं. आळेकरांनी नाटकांबद्दल गांभीर्याने विचार करायला सुरुवात केली, आणि ते पुढील जीवनात खरोखरच नाटककार झाले.
फर्ग्युसनच्या गणेशोत्सवातील बबन प्रभू यांच्या दिनूच्या सासूबाई राधाबाई’ या गंमत-नाटकात दिनू ही भूमिका आळेकरांनी केली असली तरी, सतीश आळेकरांची दिग्दर्शक व अभिनेता म्हणून खरी कारकीर्द तेंडुलकरांच्या नाटकांपासून सुरू झाली. ’ओळख’, ‘काळोख’ या तेंडुलकरांच्या एकांकिकांत त्यांनी अभिनय केला होता. पुढे भालबा केळकरांनी स्थापन केलेल्या प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोशिएशनमध्ये आळेकर दाखल झाले आणि घाशीराम कोतवालचे सहदिग्दर्शन त्यांनी केले. ‘मेमेरी’ ही पहिली एकांकिका आळेकरांनी ‘पीडीए’च्या शशिकांत कुलकर्णी यांना वाचून दाखविली. त्यांनी ती ‘सत्यकथे’ला पाठली. संपादक राम पटवर्धन यांनी ती प्रसिद्ध केली. ‘झुलता पूल’ एकांकिकेबाबत त्यांनी आळेकरांना सुधारणा सुचविल्या. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर पटवर्धन यांनी ही एकांकिका सत्यकथेमध्ये प्रसिद्ध केली होती.
‘घाशीराम कोतवाल ‘ या नाटकासाठी डॉ. जब्बार पटेल यांच्या बरोबर साहाय्यक दिग्दर्शक म्हणून सतीश आळेकरांनी आपली नाट्यव्यवसायातील कारकीर्दीची खर्याा अर्थाने सुरुवात केली. थिएटर या नाट्यसंस्थेच्या स्थापनेत त्यांनी पुढाकार घेतला. ‘थिएटर अॅ्कॅडमी’चे ते संस्थापक सदस्य आहेत. याच संस्थेने रंगमंचावर आणलेल्या ‘मिकीमाऊस आणि मेमसाब’, ‘महापूर’, ‘महानिर्वाण’, ‘बेगम बर्वे’ या नाटकांचे आळेकर हे लेखक होते. १९७२ पासून नाट्यलेखन करताना त्यांनी ब्लॅक कॉमेडीचा आणि संगीत नाटकांचा आधार घेतला. त्यांची ‘महापूर’, ‘महानिर्वाण’ आदी नाटके आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आणि त्या नाटकांचा विविध भाषांमध्ये अनुवादही झाला.
आळेकर यांनी ‘जैत रे जैत’ चित्रपटाची पटकथा, ‘देखो मगर प्यार से’ ही दूरदर्शन मालिका, ‘कथा दोन गणपतरावांची’ या चित्रपटाचे संवादही लिहिले आहेत. जागतिक पातळीवरील महत्त्वाच्या नाटकांमध्ये या नाटकांचा समावेश केला जातो. या दोन्ही नाटकांवर मराठी आणि इंग्रजीमध्ये स्वतंत्र समीक्षाग्रंथांचीही निर्मिती झाली आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपर्याहतील विद्यार्थ्यांना नाट्यप्रशिक्षित करण्याचे महत्त्वाचे काम ललित कला केंद्राच्या संचालकपदाच्या माध्यमातून केले. मा. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या रंगभूमीवरील महत्त्वाच्या व्यक्तींशी ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांचा संवाद सतीश आळेकर यांच्यामुळेच घडू शकला.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नाटक अनुवाद प्रकल्पासाठी त्यांनी काम केले आहे. प्ले-राइट्स डेव्हलपमेन्ट स्कीम आणि रीजनल थिएटर ग्रुप डेव्हलपमेन्ट या प्रकल्पांसाठी त्यांना फोर्ड फाउंडेशनची शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, जर्मनी आदी अनेक देशांत त्यांनी रंगभूमीविषयक अध्यापन, कार्यशाळा आणि संशोधन प्रकल्पांवर काम केले आहे. पुण्याच्या ललित कला केंद्राचे ते दीर्घकाळ संचालकही होते. संगीत नाटक अकादमी, पद्मश्री असे अनेक महत्त्वाचे सन्मान लाभलेल्या सतीश आळेकर यांनी परदेशी विद्यापीठांमध्ये अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे.
सतीश आळेकर यांचा भारत सरकारने २०१२ साली पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यांना साहिर लुधियानवी फाउंडेशनचा बलराज साहनी पुरस्कार,द फर्ग्युसोनियन्स या संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार, सवरेत्कर्ष चॅरिटेबल ट्रस्टतर्फे स्वरसन्मान पुरस्कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
नाटककार म्हणून त्यांची प्रतिमा असली तरीही त्यांनी `व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटात अत्यंत संस्मरणीय भूमिका केली
आहे.संगीत नाटक अकादमीने त्यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला आहे. अतुल पेठे यांनी ‘नाटककार सतीश आळेकर’ ही फिल्म निर्माण केली आहे.
सतीश आळेकर यांनी लिहिलेली नाटके
अतिरेकी, एक दिवस मठाकडे, दुसरा सामना, बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर, मिकी आणि मेमसाहेब, शनिवार-रविवार.
एकांकिका
आधारित, आळशी अत्तरवाल्याची गोष्ट, कर्मचारी, जज्जव, झुलता पूल, दार कोणी उघडत नाही, नशीबवान बाईचे दोन, बसस्टॉप, भिंत, भजन, मेमरी, यमूचे रहस्य, वळण, सामना, सुपारी.
सतीश आळेकर यांची वेबसाईट.
http://satishalekar.com/
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 4, 2017
कादंबरीकार होण्याच्या आधी गुलशन नंदा दिल्लीतील बल्लीमारान भागात एका चश्माच्या दुकानात काम करत होते. गुलशन नंदा यांना एकदा बसने प्रवास करत असताना एकाने लिखाण करण्यास सांगितले व ते यशव्वी कादंबरीकार आणि हिंदी पटकथा झाले. साठच्या दशकात गुलशन नंदा हे लेखक पॉकेट बुक्सच्या पहिल्या पिढीतले तळपणारे तारे होते.
गुलशन नंदा यांच्या कादंबर्यांकनी विक्रीची नवनवीन विक्रम प्रस्थापित करतांनाच बॉलीवुडला कटी पतंग, दाग, अजनबी, नया जमाना, झील के उस पार, शर्मिली, खिलौना, आदींसारखे जवळपास २५ सुपरहिट चित्रपटही दिलेत.
गुलशन नंदा यांच्या हिंदी कादंबर्यावर जितके हिंदी चित्रपट निघाले तितके हिंदी चित्रपट इतर कोणत्याही हिंदी लेखकाच्या कादंबऱ्यांवर निघाले नसतील.
गुलशन नंदा यांचे निधन १६ नोव्हेंबर १९८५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले.
April 14, 2022
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. त्याकाळी अभिनेत्री सोज्वळ भूमिका साकारायला प्राधान्य देत होत्या,मात्र नादिरा यांनी बोल्ड आणि नकारात्मक भूमिका साकारणे पसंत केले. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. नादिरा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, भारत भूषण, राज कपूर, प्रदीप कुमार या सर्व दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. 'आन' या सिनेमात नादिरा दिलीप कुमार यांच्याबरोबर झळकल्या. तर 'पॉकेटमार'मध्ये त्यांचे हीरो होते देव आनंद. राज कपूर यांच्या 'श्री 420' मध्ये नादिरा यांनी माया हे वेगळ्या धाटणीचे पात्र साकारले होते. अशोक कुमार यांच्यासह नगमा, शम्मी कपूर यांच्यासह सिपहसालर, प्रदीप कुमार यांच्यासह 'पुलिस' आणि भारत भूषणसह 'ग्यारह हजार लडकियां' या सिनेमांत नादिरा यांनी काम केले. 1954 साली नादिरा यांनी गायक-अभिनेता तलत महमूदसह 'डाक बाबू' आणि 'वारिस' या दोन सिनेमांत काम केले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमांत नादिरा यांनी तलत महमूदसह गाणीसुद्धा गायली. तब्बल तीस वर्षे नादिरा यांनी सिनेसृष्टीत काम केले. नादिरा यांनी इस्माइल मर्चंट यांच्या 'काटन मॅरी' (1999) या हॉलिवूड सिनेमातसुद्धा अभिनय केला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 10, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti