ब्बीर कुमार यांनी सर्व मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आणि अमिताभ बच्चन ते अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासाठी गाणी गायली. देशभरात नवरारात्रीत कायम गायले जाणारे ‘मर्द’ चित्रपटातील ‘माँ शेरों वाली’ हे प्रसिद्ध गाणे शब्बीर कुमार यांनी गायले होते
October 26, 2021
अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.
‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने 'आर्ची'ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.
अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.
रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
June 3, 2022
साऊथ इंडस्ट्रीतील सुपरस्टार जेमिनी गणेशन यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९२५ रोजी झाला. जेमिनी गणेशन यांची मुलगी अभिनेत्री रेखा.१९५७ साली त्यांनी 'मिस मेरी' या सिनेमाद्वारे बॉलिवूड डेब्यू केले होते.
त्यांची या सिनेमात मीना कुमारीसोबत जोडी होती आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. त्यांनी 'देवता', 'राज तिलक', 'नजराना' या सिनेमांमध्ये अभिनय केला. जेमिनी गणेशन यांचे २२ मार्च, २००५ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 17, 2018
हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी वगळता बंगाली, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचाही अभ्यास हिराबाई यांनी केला.
हिराबाई या चांगल्या गायिका होत्या. त्यांना गायनकला आणि नृत्यकला अवगत होती. हिराबाई यांच्या प्रतिभेमुळे तत्कालीन अनेक आघाडीच्या नाटककारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. हिराबाई या कविता लिहीत. त्यांच्या कविता तेव्हाच्या आघाडीच्या मराठी साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. दरम्यान त्यांची "माझे आत्मचरित्र" ही लघुकथा प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. त्यांच पाहिलं नाटक "जयद्रथ विडंबन" हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांचं दुसर नाटक "दामिनी" हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झालं.
हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या. सुनिता देशपांडे यांच्या लेखानानुसार तत्कालीन संगीत नाटकसृष्टीवर हिराबाई यांचा मोठा प्रभाव होता. त्या पुढे लिहीतात की कोल्हटकर आणि गडकरी यांनी वेळोवेळी नाटक संगीतबद्ध करताना हिराबाई यांची मदत घेतली. हिराबाई यांचा एवढा प्रभाव वाढला होता की एका नाटककाराने त्यांच्या जीवनाला समोर ठेऊन नाटक लिहीले आणि नायिकेचे पात्र उभे केले. हिराबाई यांच्या संगीत नाटकातील योगदानाची दखल फारशी घेतली गेली नाही. हिराबाई पेडणेकर यांचे निधन १८ ऑक्टोबर १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
November 2, 2017
श्री संतोष भिवंदे या तरुणाचे बॉडीबिल्डींग मधील स्वप्न ऐन पन्नाशीत लखलखत्या सुवर्णपदकाने झाले हे श्री अनुप दळी यांच्या दिनांक १५ जानेवारी, २०१४च्या दैनिक ‘प्रत्यक्ष’ मधील राष्ट्रगंगेच्या तीरावरील सदरात एका स्पेशल लेखाद्वारे वाचण्यात आले. या नेत्रदीपक यशा बद्दल श्री संतोष भिवंदे यांचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून हार्दिक अभिनंदन आणि भविष्यातील स्वप्नपूर्तीसाठी अनिरुद्ध शुभेच्छा..!!
January 22, 2014
ए आर रहमान हे तामीळ मुदलियार परिवारातील ते आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमान लहानपणापासून आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावत असे. रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी अक्षरश: आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. त्यांचे खरे नाव ए. एस. दिलीप कुमार असे आहे. त्यांचे आई वडील हिंदू होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई त्यांच्या वडिलांचे म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स भाड्याने देत असे. याच काळात एका पीर बाबांच्या संपर्कात रहमान यांचे कुटुंबीय आले. त्यांच्या आई पीरबाबांची सेवा करायच्या. तेही त्यांच्या आईला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. पीरबाबांचे रहमान यांच्यासोबतही घट्ट नाते जुळले होते. दरम्यान रहमान यांना त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. हे नाव आपल्या प्रतिमेला शोभेसे नसल्याचे त्यांना वाटायचे. ते आपल्या आई सोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेले होते. याचदरम्यान रहमान यांनी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी रहमानला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र रहमान यांनी त्यांच्या आईच्या सल्ल्याने अल्लारक्खाो रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.” वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलला. रहमान हे त्यांना एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्लारखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे. रहमान यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो असून या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे.
आधी तमिळ, मग हिंदी असं करता करता रहमानने केव्हाच हॉलिवूडसुद्धा पादाक्रांत केलेय. त्याचे इराणी आणि मँडरिन साऊंडट्रॅक्ससुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. असं म्हणतात, रहमानचं कोणतंही गाणं किमान ४ वेळा तरी ऐकलंच पाहिजे, तरच मगच कुठे ते गाणं समजू लागतं. आणि मगच ते गाणं आवडूसुद्धा लागतं. ए आर रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. 'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाच्या संगीतासाठी ए आर रहमान 89 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहे.यापूर्वी ए आर रहमानला स्लमडॉग मिलिनेअरमधील 'जय हो' गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर रहमान पुन्हा एकदा रहमान ऑस्करवर नाव कोरतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. बेस्ट ओरिजनला स्कोअर आणि बेस्ट ओरिजनल सॉन्ग अशा दोन गटात रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. 'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाचं संगीत आणि त्यातील जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर अॅना बिट्रीझने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2017
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 6, 2017
विजय तेंडुलकर यांचे वडील हे स्वतः लेखक, प्रकाशक आणि हौशी नट होते. विजय तेंडुलकर यांचा जन्म ६ जानेवारी १९२८ रोजी झाला. या कौटुंबिक पार्श्वभूमीतून तेंडुलकरांवर वाङ्मयीन संस्कार होत गेले. दि.बा. मोकाशी, वि.वि. बोकील, अनंत काणेकर, शिवरामपंत वाशीकर यांनी लिहिलेल्या साहित्याच्या वाचनातूनही घडवणूक होत गेली. तेंडुलकरांचे औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. त्या काळात जोमाने चालू असलेल्याभारतीय स्वातंत्र्य चळवळीत ते सहभागी झाले. साहजिकच या कालखंडात विविध विचारसरणींशी त्यांचा जवळून परिचय झाला. पुण्यात आणिमुंबईत त्यांचे वास्तव्य होते. १९६६ नंतर मात्र ते मुंबईतच राहिले व तेथे त्यांनी आपली व्यावसायिक कारकीर्द घडवली. १९५५ पासूनच त्यांनी लेखन सुरू केले. चरितार्थासाठी प्रारंभी त्यांनी पत्रकारितेचा पेशा स्वीकारला. नवभारत, मराठा, लोकसत्ता, नवयुग, वसुधा आदी वृत्तपत्रांतून आणि नियतकालिकांतून त्यांनी सदरलेखनाचे आणि संपादनाचे काम केले. १९४८ मध्ये 'आमच्यावर प्रेम कोण करणार' ही त्यांची कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली. १९५१-५२च्या सुमारास भारतीय विद्याभवनाने नव्याने सुरू केलेल्या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने तेंडुलकरांचे नाट्यलेखन सुरू झाले. आकाशवाणीसाठीही त्यांनी नाटके लिहिली. त्यांनी आरंभीच्या काळात निवडलेले नाट्यविषय कौटुंबिक स्वरूपाचे आणि मध्यमवर्गीय जीवनाशी निगडित होते. मा.'विजय तेंडुलकरांनी आपल्या लेखणीने मराठी नाटक रंगभूमीचा चेहरामोहरा बदलून टाकला. नाट्यपरंपरेला छेद देताना विषय, आशय, अविष्कार या संदर्भात त्यांनी अनेक प्रयोग केले.
लेखनदृष्ट्या 'गृहस्थ' हे तेंडुलकरांचे पहिले नाटक. (याचेच "कावळ्यांची शाळा' या नावाने त्यांनी १९६४ साली पुनर्लेखन केले) मात्र 'श्रीमंत' हे त्यांचे रंगभूमीवरील आलेले पहिले नाटक होते. सुरुवातीच्या नाटकांपासूनच माणसाच्या जीवनाचा, त्यांच्या विकारांचा, एकारलेपणाचा वेध घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो. विशिष्ट तत्त्वज्ञानाचा, विचारसरणीचा ठसा नाकारून तेंडुलकर मनस्वीपणे लिहीत गेले. 'शांतता कोर्ट चालू आहे' यासारख्या नाटकातून समाजाला प्रसंगी बंडखोर वाटणाऱ्या विषयांनाही त्यांच्या लेखणीने हात घातला. 'सखाराम बाईंडर' मध्ये हाताळलेला स्फोटक विषय आणि 'घाशीराम कोतवाल' मध्ये हाताळलेला पारंपरिक तंत्राला धक्का देणारा नाट्यबंध त्यांच्या याच प्रयोगशील जाणिवांचा अविभाज्य भाग होता. 'श्रीमंत' या नाटकापासून विजय तेंडुलकर या वादळाची झंझावाती वाटचाल सुरू झाली आणि 'गिधाडे', 'शांतता कोर्ट चालू आहे', 'सखाराम बाईंडर', 'घाशिराम कोतवाल', 'कमला' या नाटकांनी मराठी नाट्यसृष्टी अक्षरशः ढवळून निघाली. 'निशांत', 'आक्रोश', 'अर्धसत्य' या चित्रपटांच्या पटकथा तेंडुलकरांच्या लेखणीतूनच साकारल्या. मराठीतही 'सामना', 'सिंहासन', 'आक्रित', 'उंबरठा' हे त्यांनी लिहिलेले चित्रपट अजरामर ठरले आहेत. 'माणूस नावाचे बेट', 'मधल्या भिंती', 'सरी गं सरी', 'एक हट्टी मुलगी', 'अशी पाखरे येती', 'गिधाडे', 'छिन्न' आदी नाटके रूढ सामाजिक संकेतांना, तसेच नाट्यसंकेतांना हादरा देणारी आणि वादग्रस्त ठरली. मानवी वृत्तीतील कुरूपता, हिंस्रता यांचे भेदक, पण वास्तववादी उग्रकठोर चित्रण असल्याने या नाट्यकृती गाजल्या. त्यावर वाद झडले आणि न्यायालयीन सघर्षही झाला. आशय आणि तंत्रदृष्ट्या असणारी विलक्षण विविधता, हे त्यांचे वैशिष्ट्य ठरले.
राष्ट्रीय पातळीवर समकालीन नाटककारांच्या पंक्तीत तेंडुलकरांनी अव्वल स्थान पटकावलं होतं. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराचे तेंडुलकर पहिले मानकरी होते. १९७० मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, त्याच वर्षी कमलादेवी चट्टोपाध्याय पुरस्कार, १९७७ मध्ये मंथनसाठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, १९८१ मध्ये आक्रोश चित्रपटासाठी फिल्म फेरचा सर्वोत्कृष्ट कथा व पटकथा पुरस्कार; तर १९८३ मध्ये अर्धसत्यसाठी पुन्हा सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्म फेर पुरस्कार त्यांना मिळाला. पद्मभूषण, महाराष्ट्र गौरव, सरस्वती सन्मान, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान, विष्णुदास भावे गौरवपदक, कथा चूडामणी पुरस्कार, पु.ल. देशपांडे बहुरूपी सन्मान, तन्वीर सन्मान आदी इतर पुरस्कारही त्यांना मिळाले. १९९८ मध्ये संगीत नाटक अकादमीची अभ्यासवृत्तीही त्यांना मिळाली होती. १९ मे २००८ रोजी मा.विजय तेंडुलकर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 6, 2018
दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणा-या अभिनेत्री सिल्क स्मिताचा जन्म २ डिसेंबर १९६० रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लुरुमध्ये झाला.
ऐंशीच्या दशकात दाक्षिणात्य सिनेमांमध्ये सिल्क स्मिता यांची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरु शकलेले नाहीत. बालपणीचे नाव विजयलक्ष्मी. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे केवळ चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले. बालपणापासूनच सिने इंडस्ट्रीची ओढ असलेल्या सिल्क स्मिता यांनी सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. शूटिंगदरम्यान सिल्क स्मिता अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमांमधील झगमगाट पाहून त्याही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होत्या.
सिल्क स्मिता यांना १९७८ मध्ये 'बेदी' या कानडी सिनेमात काम करण्याची पहिल्यांदा संधी मिळाली. तिला मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात त्यांनी स्मिताचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका प्रचंड गाजली. सोबतच, त्यांनी मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने त्यांना सिल्क स्मिता हे नाव मिळाले. १९८३ मध्ये त्यांनी 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये त्यांनी जवळपास २०० सिनेमांमध्ये काम केले. सिल्क यांची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती.तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी ३ शिफ्टमध्ये काम करत होत्या. दक्षिणेचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून त्यांनी १० वर्षांमध्ये जवळपास ५०० सिनेमांमध्ये काम केले.
सिल्क यांच्या यशाची जादू बॉलिवूड मध्ये सुध्दा चालली होती. त्यांनी 'जीत हमारी' सिनेमातून बॉलिवूड मध्ये पदार्पण केले.त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही',विजय पथ' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.
सिनेमां मधून काम केल्यानंतर स्मिता यांनी निर्मितीत हात आजमावला. मात्र पहिल्या दोन सिनेमांमध्ये त्यांना दोन कोटींचा तोटा झाला. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला.ती मानसिकरित्या खचून गेली होती. २०११ मध्ये आलेला 'द डर्टी पिक्चर' बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट ठरला होता. या सिनेमामुळे विद्या बालनचे करिअर यशोशिखरावर पोहोचले.या सिनेमाच्या यशामागे एक नाव दडलेले आहे, ते म्हणजे अभिनेत्री सिल्क स्मिता. दक्षिणेची प्रसिद्ध अभिनेत्री सिल्क स्मिताच्या खासगी आयुष्यावर हा सिनेमा आधारित होता. सिल्क स्मिता यांचे २३ सप्टेंबर १९९६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 15, 2019
सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ मा.राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.
बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला मा.राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मा.राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते. रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि मा.राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. मा.राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 29, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti