आपल्या हुकमी अभियनाच्या जोरावर हिंदी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवणारे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांचे आज ६ जानेवारी २०१७ रोजी निधन झाले.
त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९५० रोजी हरियाणातील अंबाला येथे झाला.
घाशीराम कोतवाल चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आक्रोश हा ओम पुरी यांचा पहिला गाजलेला चित्रपट होता. भारत सरकारने त्यांच्या चित्रपटसृष्टीतील योगदानाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले होते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाच्या १९७३ बॅचचे ते विद्यार्थी होते. अभिनयाबरोबरच त्यांचा भारदस्त आवाज व संवादफेक कौशल्य अप्रतिम होते. अर्धसत्य चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. ओम पुरी यांनी हॉलीवूडमध्येही आपली छाप सोडली होती. अनेक इंग्रजी चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. मा.ओम पुरी यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या होत्या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / लोकसत्ता
January 6, 2017
आपल्या अभिनयाने आणि प्रभावी दिग्दर्शनाने मराठी सिनेनाट्य सृष्टीत आगळी छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक विनय आपटे यांचा जन्म १७ जून १९५१ रोजी झाला.
अभिनय, दिग्दर्शन आणि नेपथ्य यांची चांगली जाणकारी असलेले रंगकर्मी म्हणून प्रसिद्ध असलेले विनय आपटे गेली चाळीस वर्ष मराठी रंगभूमीवर कार्यरत होते. विद्यार्थीदशेत विद्यार्थी संघटनांसाठी काम करता करता ते रंगभूमीवर आले. विजय बोंद्रे यांनी त्यांना रंगभूमीवर आणले. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी ‘मेन विदाऊट शॉडो’ हे नाटक केले. या नाटकासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले. त्यानंतर त्यांनी लागोपाठ तीन वर्षे राज्य नाट्य स्पर्धेत दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळवून हॅटट्रिक केली. ‘थिएटर ऑफ अॅ्व्हेलिबिलटी’ आणि नंतर ‘बहिष्कृत’ या एकांकिकामध्ये समुहाचा नेपथ्य म्हणून वापर करून त्यांनी आगळा प्रयोग केला. नाट्यदिग्दर्शक आणि निर्माता म्हणूनदेखील प्रसिद्ध होते.
विनय आपटे यांची कारकीर्द मुंबई दूरदर्शनवर निर्माता म्हणून सुरू झाली. मुंबईत दूरदर्शनची सुरुवात झाल्यानंतर त्यांनी अनेक वर्ष नाटक विभाग सांभाळला. दूरदर्शनसाठी त्यांनी ‘गजरा’सारख्या अनेक कार्यक्रमांचीही निर्मिती केली. नाटके, युववाणी अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांची निर्मिती त्यांनी केली होती. छबिलदासच्या प्रायोगिक नाटकांतूनही सुरुवातीला त्यांनी अभिनय केला होता. भारदस्त आवाजाची देणगी लाभलेल्या आपटे यांनी विविध माहितीपट, जाहिराती यांनाही आपला आवाज दिला होता. तसेच अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. महेश मांजरेकर, श्रीरंग गोडबोले, सुनील बर्वे, सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुकन्या कुलकर्णी यांना व्यावसायिक नाटकांत व दूरदर्शन मालिकांमध्ये आपटे यांनी प्रथम संधी दिली होती.
‘मी नथुराम बोलतोय’ या बहुचर्चित आणि गाजलेल्या नाटकाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. विजय तेंडुलकर यांच्या ‘मित्राची गोष्ट’ ‘अॅणन्टीगनी’ या प्रायोगिक नाटकांतूनही त्यांनी अभिनय केला होता. त्यांच्या ‘एका लग्नाची गोष्ट’मधील त्यांची बाबाची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘दुर्वा’ या मालिकेत ते काम केले होते. तसेच त्यांनी ‘गांधी’, ‘सत्याग्रह’, ‘चांदनी बार’, ‘धमाल’, ‘आंदोलन’ यासारख्या हिंदी चित्रपटात व काही हिंदी मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.
‘दुसरा सामना’, ‘वन रूम किचन’, ‘चंद्र जिथे उगवत नाही’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रानभूल’, ‘कबड्डी कबड्डी’, ‘डॅडी आय लव्ह यू’ ही त्यांनी काम केलेली काही गाजलेली नाटके होती, तर ‘कुसुम मनोहर लेले’, ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ सारख्या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनी केले. ‘रानभूल’ या नाटकात त्यांनी फिरत्या रंगमंचाचा वापर केला होता. नाटककार प्र. ल. मयेकर यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी जमली होती. ‘गणरंग’ ही व्यावसायिक नाटकांची निर्मिती करणारी संस्थाही स्थापन केली होती. अखिल मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. गंगाराम गवाणकर यांच्या ‘करायचं ते दणक्यात’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले होते. विनय आपटे यांचे ७ डिसेंबर रोजी २०१३ निधन झाले. आपल्या समुहा तर्फे विनय आपटे यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
त्यांची गाजलेली नाटके
रानभूल, डॅडी आय लव्ह यू, तुमचा मुलगा करतो काय?, कबड्डी कबड्डी, शुभ बोल तो नाऱ्या, अफलातून.
गाजलेले चित्रपट
एक चालीस की लास्ट लोकल, सत्याग्रह, आरक्षण, राजनीती, जोगवा.
June 17, 2019
जेष्ठ व्हायोलिन वादक पं.डी.के.दातार यांचा जन्म १४ ऑक्टोबर १९३२ रोजी झाला. पं. डी.के.दातार यांची व्हायोलिनची वादनशैली गायकी अंगाची म्हणजे गायनाशी नातं आणि इमान राखणारी आहे. खरेतर पंडितजींचे घराणे गायकाचे. त्यांचे वडील केशवराव आणि गायनाचार्य विष्णु दिगंबर पलुस्कर हे गुरुबंधु. त्यामुळे पंडितजींकडे गायनाचा वारसा परंपरेने आलाच होता. मात्र पंडितजी अवघे सहा वर्षांचे असतानाच केशवरावांचे निधन झाले.
परिणामी, त्यांच्याकडून गाण्याची संथा मिळालीच नाही. तरीही वडीलबंधु नारायणराव आणि मामा दत्तात्रय विष्णू पलुस्कर यांनी पंडितजींवर लहानपणी गाण्याचे उत्तम संस्कार केले. या संस्कारांमुळेच पंडितजींनी लहानपणी गाण्यात उत्तम तयारी दाखवलीही. पण त्यांचे भाह्याच काही वेगळेच होते. ते गाण्यात रमलेले असतानाच एक दिवस नारायणरावांनी त्यांच्या हातात व्हायोलिन दिले. गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानून पंडितजींनी व्हायोलिन शिकायला सुरूवात केली.
१९४३ मध्ये ते देवधर मास्तरांच्या 'स्कूल ऑफ इंडियन म्युझिक' मध्ये दाखल झाले. तिथे पंडित विघ्नेश्वरशास्त्री यांच्यासारखे व्हायोलिनवर कमालीचं प्रभुत्व असलेले गुरू त्यांना लाभले. विघ्नेश्वरशास्त्रींनी आपली सारी कला या प्रज्ञावंत शिष्याच्या झोळीत टाकली. मात्र पं. दातार यांनीही मिळालेले दान अंधपणाने स्वीकारले नाही. आपल्या प्रतिभेने त्यांनी ते अधिक झळझळीत केले. वास्तविक पं. दातार व्हायोलिन शिकत होते, तेव्हा श्रीधर पार्सेकर, गजाननबुवा जोशी यांनी व्हायोलिन वादनात चांगलेच नाव कमावले होते. परंतु तो पर्यंत व्हायोलिन हे फक्त वाद्याच्या अंगानेच वाजवले जायचे. परंतु डी. के. दातार गायन शिकलेले असल्यामुळे त्यांनी ते गायकीच्या अंगाने वाजवायला सुरुवात केली. त्यामुळेच त्यांचे व्हायोलिनवादन ऐकताना आपण गायनाची एखादी मेहफील ऐकत आहोत, असाच भास होतो.
पं. डी. के. दातार यांच्या आधी १०० वर्षांची व्हायोलिन वादनाची परंपरा असलेल्या कर्नाटक संगीतात गायकी अंगाने व्हायोलिन वाजवण्याची पद्धत होती. परंतु हिंदुस्थानी संगीतात ती रुजली नव्हती. ती रुजवण्याचे मोठे काम पं. दातार यांनी केले. पं. डी.के.दातार यांनी निघ्नेश्वर शास्त्री पंडितांकडे व्हायोलिन वादनाचे धडे गिरविले. पं. दातार यांनी डी. व्ही. पलुस्कर यांना अनेक कार्यक्रमांमधून संगतही केली. पं. दातार यांना पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमीचा सन्मानही मिळाला आहे. संगीत रिसर्च अकादमी आणि कुमार गंधर्व फाऊण्डेशन यांनीही पं. दातार यांचा गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 6, 2017
त्याच्या कादंबऱ्यांवर युद्धपट निघाले, ते गाजलेही. त्यातलाच एक गाजलेला चित्रपट म्हणजे ‘व्हेअर ईगल्स डेअर’. ब्रायन हट्टन या दिग्दर्शकाने रीचर्ड बर्टन आणि क्लिंट इस्टवूड या जोडगोळीला घेऊन बनवलेला हा एक हिट चित्रपट.
February 2, 2022
मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ नाटककार अनंत विष्णू म्हणजेच बाबुराव गोखले यांचा जन्म १५ सप्टेंबर १९१६ रोजी झाला.
बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!
नव्या पिढीला बाबूराव गोखले यांची नाटके परिचित नाहीत, पण किमान डझनभर नाटकांनी त्यांनी रसिकांना हसविले. त्यात ‘करायला गेलो एक’ हा एक मास्टरपीसच. ‘अन् झालं भलतच’, ‘रात्र थोडी सोंग फार’, ‘नाटक झाले जन्माचे’, ‘पतंगावरी जीवन माझे’, ‘पाप कुणाचे शाप कुणाला’, ‘ते तसे तर मी अशी’, ‘झालं गेलं गंगेला मिळालं’, ‘खुनाला वाचा फुटली’, ‘संसार पाहावा मोडून’, ‘थांबा-थांबा घोळ आहे’, ‘पुत्रवती भव’, ‘पेल्यातील वादळ…’ त्यातली ही काही नाटके. जी नावापासूनच ‘नाट्य’मय ठरलेली. आता ‘करायला गेलो एक’ हे नाटक १९५५ च्या सुमारास रंगभूमीवर पुण्याच्या ‘श्रीस्टार’तर्फे आणलेलं. याच्या लेखनासोबतच दिग्दर्शन आणि भूमिकाही बाबूरावांनी केलेली.
पहिल्या प्रयोगात शरद तळवलकर, शीला गुप्ते, राजा गोसावी, प्रभाकर मुजुमदार, इंदिरा चिटणीस, इंदू मुजुमदार यांच्या भूमिका होत्या. यातल्या हीरोची म्हणजे हरिभाऊ हर्षेची मध्यवर्ती भूमिका भाऊ बिवलकर यांनी केलेली. ‘नटसम्राट’ नाटकातील विठोबा, ‘भावबंधन’ मध्ये महेश्वपरी, ‘लग्नाची बेडी’तला अवधूत या भूमिका भाऊंनी केलेल्या. पुढे काही प्रयोगांत शरद तळवलकर यांनी पत्रकार शंखनाद व हरिभाऊच्या भूमिका केल्या.
फिल्मस्टार राजा गोसावी यांनीही हरिभाऊची भूमिका केली होती. रवींद्र स्टार्स, श्री स्टार्स या संस्थांतर्फे त्यांनी स्वत:ची व इतर नाटककारांची नाटके रंगभूमीवर आणली. त्यांचा 'वारा फोफावला' हा कवितासंग्रह, 'करायला गेलो एक', ' संसार पाहावा मोडून', 'अन् झालं भलतंच', 'नवरा म्हणून नये आपला', 'रात्र थोडी सोंगे फार' इत्यादी नाटके प्रसिद्ध आहेत.
बाबुराव गोखले यांचे २८ जुलै १९८१ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 15, 2017
इंग्लिश अभिनेता तसेच दिग्दर्शक व संगितकार मा.चार्ली चॅप्लिन यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ लंडन येथे झाला.
पहील्या महायुद्धाच्या अगोदरच्या काळात जगभरातल्या सर्वात प्रसिद्ध सिनेतारकांपैकी एक आणि मुकपटांमध्ये विनोदी अभिनय करणारा कलाकार म्हणजे चार्ली चॅप्लिन. अभिनयासोबतच मुकपटांचे लेखन ही त्याची विशेष ख्याती होती. तो मुकपट करणारा अतिशय प्रख्यात तसेच रचनात्मक अभिनेता होता. चार्ली चॅप्लिन यांनी आपल्या करियरची सुरुवात वयाच्या ९ व्या वर्षी केली. शाळेत शिकता शिकता वडिलांच्या ओळखीनं चार्ली एका नृत्यपथकात दाखल झाला. या पथकातून फिरता फिरता, त्याचं शाळेकडे दुर्लक्ष होऊ नये याकडे त्याच्या आईचं लक्ष असायचं. पण आईच्या मानसिक आजारामुळे आणि एकूण परिस्थितीमुळे त्यानं १३ व्या वर्षीच शाळा सोडली. पोट भरण्यासाठी अनेक छोटी मोठी कामं केली, पण ही कामं करत असताना त्यानं आत्मविश्वास जराही ढळू दिला नव्हता, जो त्याच्या आईनं सतत त्याच्या मनावर बिबंवला. त्याच्यातला कलाकार तिनं जोपासला. त्या वेळच्या परिस्थितीबद्दल चार्ली यांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटलंय, ‘‘मला त्या परिस्थितीचे चटके फार कमी वेळा जाणवले, कारण आम्ही त्या परिस्थितीतून सतत वाटचाल करत होतो आणि लहान असल्यामुळे हा त्रास मी सहजच विसरून जायचो.’’ छोटी-मोठी कामं करतानासुद्धा तो कधीही आपल्या ध्येयापासून ढळला नाही. अभिनेता होण्याचं ध्येय कायम त्यानं आपल्या उराशी बाळगलं. त्यासाठी तो स्वत:चे बूट पॉलिश करायचा, कपडे साफ ठेवायचा, नाटक कंपन्यांना नित्य नेमाने संपर्क करत राहायचा.
जेव्हा जेव्हा चार्लीच्या आईचं सादरीकरण असायचं, त्या रात्री त्याला भाडय़ाच्या घरात ठेवण्यापेक्षा ती त्याला स्वत:बरोबर नाटय़गृहात आणायची. स्वत: उपाशी राहून या मुलांना खायला द्यायची. त्याचा परिणाम तिच्या प्रकृतीवर व्हायला लागला होता. चार्लीनं यशस्वी अभिनेता व्हावं ही तिची तीव्र इच्छा होती. या इच्छेपुढे त्यानं स्वत:समोर पर्यायही ठेवला नव्हता.
स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. पडद्यावरच्या मस्तमौला चार्लीचं आगळंवेगळं रूप होतं, ‘एक टाइट कोट, बॅगी पॅन्ट, छोटी हॅट आणि मोठे शूज, आणि हो, चेहऱ्यावरची त्याची ती छोटीशी मिशी.’ त्याने त्याचं हे रूप समजून उमजूनच ठरवलं होतं. त्याला त्याचं बाह्य़रूप संपूर्णपणे विरोधाभासी हवं होतं. ती छोटीशी मिशी त्याच्या व्यक्तिमत्त्वाला, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव न लपवता वयातला मोठेपणा, परिपक्वता देऊ शकेल हा त्याचा अंदाज होता आणि त्याचं हे बाह्य़रूप त्याची ओळखच ठरलं. या व्यक्तिरेखेबद्दल त्याचं म्हणणं होतं, ‘‘ज्या क्षणी मी तो पोशाख केला, मेकअप केला, त्या क्षणी मी ते व्यक्तिमत्त्व अनुभवू लागायचो. मी त्याला ओळखायचो आणि रंगमंचावर असेपर्यंत तो माझ्यात भिनलेला असायचा.’’
आयुष्याचं सार त्यानं पडद्यावर अनेक तऱ्हेनं जगापुढे मांडलं. खिल्ली उडवण्यासाठी दु:ख हे कारण असतं. खिल्ली उडवणे म्हणजे प्रतिकार करणे. निसर्गाच्या शक्तीपुढे स्वत:च्या हतबलतेतही आपण हसत राहिलं पाहिजे. प्रतिकूलतेचा हसत हसत सामना केला पाहिजे, नाही तर मानसिकरीत्या खचून जाल. म्हणूनच त्याच्या आयुष्याच्या जवळचा चित्रपट ‘द किड्’ याचं ओपिनग टायटल होतं, ‘‘अ पिक्चर विथ अ स्माइल अँड परहॅप्स अ टिअर.’’
आईचं स्वप्न हेच आयुष्याचं अंतिम ध्येय मानत अंगच्या निर्वविाद कलागुणांनी जगभरच्या प्रेक्षकांवर राज्य केलं. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसावर तो गारुड करू शकला. भाषेच्या बंधनाविना पडद्यावरून तो कुठल्याही प्रेक्षकाशी संवाद साधू शकला. त्यासाठी त्यानं वापरलेली साधनं होती, भरपूर हासू आणि थोडेसे आसू! मा.चार्ली चॅप्लिनने त्याच्या चित्रपटांमधून आपल्याला गडाबडा लोळायला लावून हसवलं, पण त्याचबरोबर त्यानं डोळ्यात टचकन् पाणी आणून रडवलंही. विचार करायला लावलं. जागतिक पटलावर एक महानायक म्हणून वावरला! स्वत:तल्या आत्मविश्वासामुळे अनेक वैशिष्टय़पूर्ण युक्त्या तो पडद्यावर साकारू शकला. १९१५ मध्ये विश्व युद्धाच्या काळात कठीण परीस्थितीतही त्याने लोकांना हसवण्याचे मौल्यवान कार्य केले. २५ वर्षानंतर महामंदी आणि हिटलरच्या काळात देखिल त्याने लोकांना हसवण्याचे आपले कार्य थांबवले नाही. तो निरंतर लोकांना हसवत राहिला. लोकांना ज्याकाळात मनोरंजनाची आणि हास्याची अधिक गरज होती. त्याकाळात चार्ली चॅप्लिनने लोकांसाठीची उत्तम भुमिका बजावली. ह़ॉलिवुड मध्ये चार्ली चॅप्लिन यांचे बोलते चित्रपट द ग्रेट डिक्टेटर (१९४०),लाइमलाइट आणि मोसिओर वरडॉक्स हे चित्रपट आले होते. चार्ली चॅप्लिन यांचा “दिस इज माई सॉग” हा चित्रपट वेगवेगळ्या भाषेत प्रदर्शित करण्यात आला. त्यात ‘अ काऊंटेस फ्रम हांगकांग’ हा प्रथम श्रेणीतला होता. हा शेवटचा चित्रपट. १९७२ मध्ये अकादमी पुरस्कार प्राप्त झाला. १९६४ मध्ये चार्ली चॅप्लिन यांनी त्यांचे आत्मचरीत्र प्रदर्शित केले. मार्टिन सिएफफ यांनी २००८ मध्ये “चॅप्लिन अ लाइफ” हे पुस्तक लिहिले. मा.चार्ली चॅप्लिन यांचे २५ डिसेंबर १९७७ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
चार्ली चॅप्लिन चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=1ZW820852ws
https://youtu.be/ZNyttSbCUCU
https://youtu.be/WZVp5v-cNak
https://youtu.be/OUh7UTUZIXc
https://youtu.be/-GYhvdRNKzg
April 17, 2017
सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले. शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली.
‘जैत रे जैत’, ‘चौकट राजा’, ‘विहीर’, ‘हापूस’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. ‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. विजय तेंडुलकरांनी मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले म्हणून सुलभाताई लिहित्या झाल्या. त्यांचा रंगभूमीशी संबंध आला तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या. आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरूवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.
रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. ७३ हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. हिंदीत ‘भूमिका’, ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’, ‘गमन’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’, ‘विजेता’, ‘भीगी पलके’, ‘इजाजत’, ‘विरासत’ 'आदमी खिलौना है', 'गुलाम-ए-मुस्तफा' हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘कोंडुरा’ या हिंदी तसेच तेलुगू चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट गाजला होता. 'चौकट राजा', 'जैत रे जैत', सारख्या मराठी चित्रपटांमधून त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांनी अनेक हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘केहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी अशीच एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या मा.सुलभा देशपांडे यांचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली. अनेक कलावंत त्यांनी घडविले होते.
१९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमीच्या सेवेचा गौरव करण्यात आला. ‘इंग्लिश विंग्लिश’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. सुलभा देशपांडे यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
June 5, 2017
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
April 19, 2022
मुंबईतील विल्सन महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण घेतले. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९३७ रोजी झाला. डॉ. रानडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण पं. गजाननराव जोशी, पं. लक्ष्मणराव बोडस आणि प्रा. बी. आर. देवधर यांच्याकडून घेतले. संगीतशास्त्राचे गाढे विद्वान, अशी ख्याती असलेल्या डॉ. रानडे यांनी भारतीय लोकसंगीत आणि पाश्चिीमात्य शास्त्रीय संगीताचा सखोल अभ्यास केला होता. मुंबई विद्यापीठाच्या संगीत केंद्राचे पहिले संचालक असलेल्या डॉ. रानडे यांनी अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन स्टडीज आणि नॅशनल कौन्सिल फॉर परफॉर्मिंग आर्टस् या संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण पदे भूषविली होती. डॉ. रानडे यांनी तब्बल १६ वर्षे या पदाची धुरा वाहिली. त्यांना फुलंब्रीकर पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. बडोदा येथील महाराज सयाजीराव विद्यापीठातील टागोर अध्यासनावर त्यांची नेमणूक करण्यात आली होती. त्यांना १९९० मध्ये व्यावसायिक रंगभूमीवरील सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. डॉ. रानडे यांनी अनेक विद्यार्थ्यांना शास्त्रीय संगीत आणि "व्हॉईस कल्चर'चे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिले होते. संगीताचे सौंदर्यशास्त्र, लोकसंगीत शास्त्र, ऑन म्युझिक अँड म्युझिशियन्स, स्टेज म्युझिक इन महाराष्ट्र, महाराष्ट्र आर्ट म्युझिक यासारख्या संगीताचं महत्त्व सांगणारी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली.
संगीत क्षेत्रातील विविध प्रवाहांबाबत डॉ. रानडे यांनी सदोदित स्वागतशील भूमिका घेतली होती. त्यांना याच वर्षी संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. डॉ. अशोक रानडे यांचे ३० जुलै २०११ रोजी निधन झाले.
डॉ. अशोक रानडे यांनी तब्बल चार दशकांच्या संशोधन-व्यासंगातून ‘पाश्चात्त्य संगीतसंज्ञा कोश’ या कोशाचे काम जवळजवळ पूर्णत्वास नेले होते. मात्र, तो प्रसिद्ध होण्याआधीच त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यानंतर त्यांचे शिष्य संगीतज्ञ चैतन्य कुंटे यांनी या कोशाचे संपादन पूर्ण केले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 25, 2018
मुंबईतील बालनाट्यनिर्मिती करणाऱ्या ’वंदना थिएटर्स’च्या त्या संचालिका होत्या. त्यांनी बालरंगभूमीसाठी लिहिलेली रॉबिनहूड, टिमटिम टिंबू बमबम बगडम, बजरबट्टू इत्यादी बालनाट्ये गाजली. त्यांच्या रॉबिनहूड या नाटकातून शिवाजी साटम, विलास गुर्जर, मेधा जांबोटकर, विजय गोखले, विनय येडेकर अशा अनेक कलाकारांनी रंगभूमीवर पर्दापण केले.
वंदना विटणकर यांनी प्रेमगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते अशी ७०० हून अधिक गाणी व सुमारे १५०० कविता लिहिल्या आहेत. अरूण पौडवाल, अनिल मोहिले, सुधीर फडके, श्रीकांत ठाकरे, श्रीनिवास खळे अशा संगीतकारांनी त्यांच्या गीतांना चाली दिल्या असून सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, शोभा गुर्टू, जयवंत कुलकर्णी, सुरेश वाडकर, मोहम्मद रफी, हेमंतकुमार, आशा भोसले अशा नामवंत गायकांनी गायली आहेत. मा.वंदना विटणकर यांचा पहिला विवाह चित्रकार चंद्रकांत विटणकर यांच्याशी झाला होता. मा.चंद्रकांत विटणकरांच्या निधनानंतर १९८६ साली त्यांनी किशोर पनवेलकर यांच्याशी पुनर्विवाह केला होता. मा. वंदना विटणकर यांचे ३१ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
वंदना विटणकर यांची लोकप्रिय गीते
खेळ कुणाला दैवाचा कळला
नाते जुळले मनाशी
मी प्रेम नगरचा राजा
परिकथेतील राजकुमारा
राणी तुझ्या नजरेने नजरबंदी केली गं
आज तुजसाठी या पावलांना
अधिर याद तुझी जाळीतसे रे दिलवरा
हा रुसवा सोड सखे
हे मना आज कोणी
अगं पोरी संबाल दर्याला
तुझे सर्वरंगी रूप
शोधिसी मानवा राऊळी मंदिरी
खेळ तुझा न्यारा
वंदना विटणकर यांची गाणी.
https://www.youtube.com/playlist?list=PLaCDrs1IYilKCKh6uyiYOpD8YNSoGomFo
December 31, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti