श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचा जन्म १ जानेवारी १६६२ रोजी झाला. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे. बाणकोट खाडीच्या उत्तरेस असणार्या श्रीवर्धन या गावच्या या भट घराण्याकडे पिढीजात श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर या गावांची देशमुखी होती. महादजी विसाजी भट यांच्यापासून भट घराण्याची माहिती मिळते. पेशव्यांच्या एका हकीकतीमध्ये महादजी विसाजींचे पुत्र परशुराम महादजी आणि नातू विश्वनाथ उर्फ विसाजी परशुराम हे शिवाजी महाराजांच्या चाकरीत असल्याचा उल्लेख आढळतो.
"वाका श्रीमंत कैलासवासी सिवाजी छत्रपती माहाराज त्यांचे जवल श्रीमंत कैलासवासी परशरामपंत उपनाव भट कसबे श्रीवर्धन तो॥ म॥र प्रां॥ (तालुके मजकूर प्रांत) दंडाराजपुरी येथील देशमुख हे चाकरीस राहीले. तो प्रकार सदरी लिहीला आहे. त्यांचे चिरंजीव कैलासवासी विसाजीपंत यांस दोन हजारी फौजेची सरदारी सांगितली". या विश्वनाथ परशुरामांना कृष्णाजी रुद्राजी जानोजी बाळाजी आणि विठ्ठल असे पाच पुत्र होते. त्यापैकीच बाळाजी विश्वनाथ हे पुढे आपल्या कर्तृत्वाने स्वराज्याच्या पेशवेपदी विराजमान झाले. राजाराम महाराजांच्या काळात कोकणात आंग्र्यांची सत्ता उदयाला येत होती आणि श्रीवर्धनचे हे देशमुख आंग्र्यांना सामिल आहेत असा जंजिरेकर सिद्दींना संशय होता.
अशातच एका वर्षी मीठाचे उत्पन्न कमी झाल्याने जंजिरेकरांना ठरलेल्या जकातीचा भरणा करणे बाळाजीपंतांना शक्य झाले नाही. या जकातीच्या पुर्ततेसाठी बाळाजीपंतांचे स्नेही संभाजीपंत मोकाशी जामिन राहीले. अखेरीस बाळाजीपंत ही देशमुखी सोडून जाण्याच्या विचारात असतानाच सिद्दींनी जामिन राहिलेल्या संभाजीपंतांना जंजिर्या वरून पोत्यात बांधून समुद्रात फेकून दिले. हबशांच्या या कारस्थानांमूळे बाळाजीपंतांना श्रीवर्धन सोडून जाणे भाग पडले.
बाळाजीपंत गेले ते थेट चिपळूणला, येथेच त्यांची प्रथम ब्रह्मेंद्रस्वामी धावडशीकरांशी भेट झाली असावी आणि स्वामींनीच त्यांना देशावर जाण्याचा सल्ला दिला असावा. यानंतर काही बखरी आणि हकीकतींतील त्रोटक उल्लेखांनुसार बाळाजीपंत वेळासला येऊन आपले तीन आत्तेबंधू हरी महादेव, बाळजी महादेव आणि रामाजी महादेव भानू यांच्यासोबत देशावर आले. मध्ये जंजिरेकरांच्या हुकूमावरून अंजनवेलच्या किल्लेदारानी या बाळाजींना पकडून कैदेत डांबले पण भानू बंधूंनी त्यांची सुटका करून मग ते चौघेही सासवडला अंबाजीपंत पुरंदरे यांच्याकडे येऊन पोहोचले.
पुरंदरे हे स्वराज्यातील एक मातबर घराणे असल्याने बाळाजीपंतांना प्रथा शंकराजी नारायण सचिवांकडे आणि रामचंद्रपंत अमात्यांकडे मुतालकी केली. पुढे पुढे बाळाजीपंतांची पत वाढत जाऊन आपल्या हुशारीने ते १६९९ ते १७०३ दरम्यान पुणे प्रांताचे सरसुभेदार झाले. १६९५ ते १६९९ दरम्यान औरंगजेबाची छावणी भीमा नदीच्या दक्षिण तीरावर ब्रह्मपुरी येथे असताना बाळाजींचा वावर असावा, आणि याच काळात त्यांनी प्रथम लहानग्या शाहूंना पाहिले असावे. १७०३ मध्ये औरंगजेबाचा सिंहगडाला वेढा पडला असताना किल्ल्यातून बाहेर आलेल्या गृहस्थांत "बालू पंदत" म्हणजे बाळाजीपंत आहेत. यावेळेस त्यांचा उल्लेख मराठी कागदांत 'दिम्मत सेनापती' आढळतो म्हणजे ते धनाजी जाधवरावांच्या पदरी होते. पुढे १७०३ ते १७०७ बाळाजीपंत दौलताबादचे सरसुभेदार होते.. या सार्याह काळात बाळाजीपंतांच्या कामगिरीमूळे त्यांचे मराठमंडळाच्या निरनिराळ्या सरदारांशी नाते जुळले.
मे १७०७ मध्ये शाहूंच्या सुटकेनंतर ताराबाईंनी शाहूंना राज्याधिकार नाकारला असताना बाळाजीपंतांनी शाहूंना ओळखले आणि धनाजी जाधवरावांनाही शाहूराजांची ओळख पटवून दिली आणि ताराबाईंचा विरोध पत्करून शाहूराजांना सातार्याीच्या गादीवर बसवले. पुढे धनाजीरावांच्या मृत्युनंतर त्यांचा पुत्र चंद्रसेन जाधवाच्या उपद्व्यापी धोरणांमूळे शाहू महाराजांनी बाळाजींना १७११ मध्ये होनाजी अनंतांकडे असलेले "सेनाकर्ते" हे पद आणि २५१०२०० रुपयांचा सरंजाम बहाल केला आणि बाळाजींनीही हे पद सार्थ करून दाखवले.
१७१३ मध्ये शाहू महाराजांनी मोगलाईतून चौथाई-सरदेशमुखी आणि घासदाणा हे हक्क वसूल करण्यासाठी बाळाजीपंत आणि चंद्रसेन जाधव या दोघांना पाठवले असता दोघांच्यात तंटा उत्पन्न होऊन चंद्रसेन जाधवाने बाळाजींना पांडवगडाजवळ अडवून धरले. याप्रसंगी बाळाजींचे स्नेही पिलाजी जाधवराव वाघोलीकर यांनी बाळाजीपंतांची सुटका केली. पुढे सरदार निंबाळकरांना शाहू महाराजांनी नगरहून बोलावून घेतले आणि जाधवांचा पुर्ण पराभव होऊन ते ताराबाईच्या पक्षाला उघड उघड जाऊ मिळाले. याच सुमारास कोकणात ताराबाईंमार्फत कान्होजी आंग्रे हे शाहूंच्या विरोधात उतरले आणि त्यांनी पेशव्यांचे राजमाची-लोहगड-विसापूर इत्यादी किल्ले काबिज केले. महाराजांनी आंग्र्यांच्या बंदोबस्तासाठी पेशवे बहिरोपंत पिंगळ्यांना पाठवले असतानाच कान्होजींनी पेशव्यांना अटक केले. अखेरीस शाहू महाराजांच्या आज्ञेवरून बाळाजीपंतांनी कान्होजी आंग्र्यांशी बोलणी करून त्यांच्याकडून बहिरोपंतांची सुटका केलीच, पण किल्लेही परत मिळवले आणि मुख्य म्हणजे कान्होजींसारखा दर्याबहाद्दर ताराबाईंचा पक्ष सोडून कायमचा शाहू महाराजांना सामिल झाला. या मोहीमेपूर्वीच शाहूराजांनी बाळाजीपंतांना पेशवेपद बहाल केले होते.
खुद्द बहिरोपंत कैद झाल्याने शाहू महाराजांना पेशवेपद कोणाला द्यावे हा प्रश्न पडला असताना अंबाजीपंत पुरंदर्यांदनी बाळाजीपंतांचे नाव सुचवले. शंकराजीपंतांनीही "बाळाजीपंत भट यांजकडे फौजेचे वळण आहे, पेशवाई त्यांस द्यावी" असा पुरंदर्यांवना दुजोरा दिला. आणि दि. १७ नोव्हेंबर १७१३, पुण्याजवळील मांजरी या गावी बाळाजीपंतांना पेशवेपदाची वस्त्रे मिळाली. यासोबतच बाळाजीपंतांनी आपल्या आत्तेबंधूंचे आणि अंबाजीपंतांचे उपकार लक्षात घेऊन भानू बंधूंना "फडनिशी" आणि पुरंदर्यांतना "मुतालकी" बहाल केली. यानंतर २८ फेब्रुवारी १७१४ मध्ये आंग्रे आणि पेशवे यांच्यामध्ये सलोखा होऊन आंग्रे स्वराज्यात आले. १७१६ च्या प्रारंभी दमाजी थोरात हिंगणगावकर याने शाहू महाराजांविरुद्ध दंगा मांडल्याने पेशव्यांना रवाना केले. बाळाजीपंत दमाजीला भेटायला गेले असता दम्माजीने 'फितूर दगाबाजी करून' बाळाजीपंतांना परिवारासह अटक केले आणि पैसा-खंडणी द्यावी म्हणून राखेचे तोबरे भरून मांस काढेपर्यंत हाल केले. यानंतर खंडणी ठरवून म्हणून अंबाजीपंत आणि पिलाजी जाधवराव बाहेर पडून खंडणीची तरतूद करून सर्वजण सुटले. यावेळेस कान्होजी आंग्रे कोकणात असल्याने आणि कोल्हापूरकरांनी शाहूंकडील सरदार फोडल्याने अपुर्या सैन्यबळामूळे दमाजीवर मोहीमकरता आली नाही. पण काही महिन्यातच १७१७-१८ च्या दरम्यान बाळाजीपंतांनी हुसेनअली सय्यदाच्या मदतीने थोराताचा संपूर्ण पराभव करून हिंगणगावची गढी जमिनदोस्त केली.
१७१८ पर्यंत बाळाजींचा मुक्काम सासवडला पुरंदर्यांूच्याच वाड्यात होता.पुढे काही काळ ते सुप्याला राहिले.या काळात सावडच्या नव्या वाड्याचे काम सुरु होते. पुन्हा २३ मे१७१९ रोजी पेशवे सासवडच्या नव्या वाड्यात रहायला आले. सेनापती चंद्रसेन जाधवाच्या नंतर बाळाजीपंतांच्या विनंतीवरून खंडेराव दाभाड्यांना 'सेनापती'पद बहाल करण्यात आले. १७१९ मध्ये सय्यदबंधूंनी दिलीच्या फर्रुखसियर बादशहाला पदावरून काढून 'रफिउद्दौरजत' याला नवा बादशहा केले. त्यामूळे बादशहा सय्यदबंधूंच्या ताब्यात आला.
इकडे निजाम चिनक्क्लिचखान उर्फ मीर कमरुद्दीन सिद्दीकीचा प्रचंड जळफळाट झाला. त्यामूळे सय्यदबंधूंनाही बाळाजींची आवश्यकता वाटू लागली. याचाच उपयोग करून बाळाजीपंतांनी नवे राजकारण केले आणि मराठी राज्यासाठी या संधीचा पुरेपुर फायदा उठवला. याचा परिणाम म्हणजे ३ मार्च आणि १५ मार्च १७१९ रोजी चौथाई आणि सरदेशमुखीच्या अधिकृत सनदा पेशव्यांनी बादशहाकरवी मंजूर करून घेतल्या. आता कोणताही मोंगल सुभेदर खंडणी द्यायला नकार देणार नव्हता. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे राजमाता येसुबाई, शाहूराजांचा सावत्र बंधू मदनसिंह आणि इतर राजपरिवाराची सुटका झाली.
सय्यदबंधूंच्या विरोधकांनी बाळाजीपंतांचा काटा काढण्याचे ठरवले, पण नेमक्या ऐनवेळेस बाळाजीपंतांच्या पालखीत बाळाजी महादेव भानू (नाना फडणीसांचे आजोबा) असल्याने ते ठार झाले. बाळाजीपंत राजपरिवारासह मोठ्या धावपळीने ४ जुलै १७१९ रोजी सातार्यातला पोहोचले. १७१९ च्या पावसाळ्यानंतर कोल्हापूरकर संभाजीच्या कारवायांना रोखण्यासाठी बाळाजीपंत बेळगाव-डिग्रज या भागत गेले आणि मार्च १७२० मध्ये कोल्हापूरकरांवर निर्णायक विजय मिळवून पंत पुन्हा सासवडला परतले. श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे २ एप्रिल १७२० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 1, 2018
भा.रा.तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल.
December 8, 2016
आज ७ नोव्हेंबर..आज मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या *सुनीता देशपांडे यांची पुण्यतिथी*
जन्म :- ३ जुलै १९२५
पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. मा.पु. ल. देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न १२ जून १९४६ रोजी झाले. करारी व्यक्तिमत्त्वाच्या व शिस्तीच्या भोक्त्या सुनीताबाई या पुलंची मूक सावली म्हणूनच केवळ वावरल्या नाहीत तर पुलंच्या जडणघडणीतही त्यांचा अत्यंत क्रियाशील वाटा होता. पुलंचे व्यक्तिमत्त्व साहित्य, एकपात्री प्रयोग, चित्रपट, नाटक, संगीत या क्षेत्रांत तळपत असताना सुनीताबाई प्रकाशझोतात फारशा नव्हत्या. खरे तर सुनीताबाईंनी पुलंबरोबर अनेक नाटक आणि चित्रपटांतूनही भूमिका केल्या होत्या. ‘वंदे मातरम्’ या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटात त्यांनी नायिकेची भूमिका केली. ‘बटाटय़ाची चाळ’, ‘वाऱ्यावरची वरात’ या पुलंच्या प्रयोगातही त्यांनी भूमिका केल्या होत्या. असे असूनही कलावंत म्हणून त्यांची फारशी दखल घेतली गेली नव्हती. नंतर या दोघांनी बा. भ. बोरकर, आरती प्रभू, बा. सी. मर्ढेकर आदी कवींच्या काव्यांचा मागोवा घेणारे जाहीर कार्यक्रम सुरू केले तेव्हा सुनीताबाईंची खऱ्या अर्थाने सर्वसामान्य रसिकांना ओळख झाली. कविता हा त्यांचा जीव की प्राण होता. मराठीतील अनेक कवींच्या अनेक कविता त्यांना तोंडपाठ होत्या. या काव्यप्रेमातूनच जाहीर काव्यवाचनाचा हा कार्यक्रम साकारला होता.
१९९० मध्ये ‘आहे मनोहर तरी’ हे आपल्या व पुलंच्या सहजीवनाचा मागोवा घेणारे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि त्याने साहित्य वर्तुळात तसेच पुलंच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडवून दिली. लेखिका म्हणून हे त्यांचे पहिले पुस्तक तडाखेबंद खपले व गुजराथी आणि इंग्रजीत अनुवादित झाले तरी त्याला पुलंसारख्या दिग्गज लेखकाच्या नावाचेच वलय होते. त्यानंतर मात्र ‘मण्यांची माळ’, ‘मनातलं अवकाश’ आणि ‘सोयरे सकळ’ या त्यांच्या पुस्तकांनी त्यांची साहित्यिक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण झाली होती.. ‘प्रिय जी. ए.’ हे त्यांचे प्रकाशित झालेले शेवटचे पुस्तक. त्यांचे अत्यंत आवडते लेखक असलेल्या जी. ए. कुलकर्णीना त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पत्रांचा हा संग्रह म्हणजे मराठी साहित्यातील एक अत्यंत वेगळे असे दालन ठरले आहे. पुलंच्या ठायी असलेल्या कलंदर वृत्तीला गोंजारत त्यांच्या सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणाऱ्या सुनीताबाईंनी त्यांच्या दातृत्वासही सामाजिक जोड दिली. सुनीताबाईंच्या व्यक्तिमत्त्वातच सामाजिक सहवेदना असलेला एक कलावंत दडला होता. त्यामुळे लोकांची दु:खे एका कलावंताच्या नजरेने टिपल्यामुळेच त्यांच्या पुढाकाराने पु. ल. देशपांडे फाऊंडेशनची संकल्पना पुढे आली आणि विविध क्षेत्रांत महत्त्वाचे काम करणाऱ्या अनेक संस्थांना या फाऊंडेशनच्या माध्यमातून एक कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या देणग्या मिळू शकल्या. अनिल अवचट यांचे मुक्तांगण, पाल्र्याचा लोकमान्य सेवा संघ, मराठी विज्ञान परिषद, ग्रामायन यासारख्या अनेक संस्थांना पुल - सुनीताबाईंनी अक्षरश: लाखो रुपयांच्या देणग्या दिल्या. त्या प्रत्येकवेळी त्याची वाच्यता होणार नाही, याची खबरदारीही त्यांनी घेतली. त्यासाठी या दाम्पत्याने साधी राहणी पसंत केली. मा. सुनीता देशपांडे यांचे ७ नोव्हेंबर २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
November 7, 2016
त्यांनी अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे. हेरंब जोगळेकर यांनी सुंदर मी होणार या नाटकाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. यात गायक कलाकाराची भूमिका साकारली होती.
June 13, 2022
काव्यातून जनजागृती करून राष्ट्रवादाचे स्फुल्लिंग चेतविणा-या मैथिलीशरण गुप्त यांना महात्मा गांधीजींनी राष्ट्रकवी म्हणून गौरविले होते. ३ ऑगस्ट हा त्यांचा जन्म दिवस ‘कवि दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
September 27, 2019
दादासाहेब तोरणे यांनी 'श्री पुंडलिक'ची निर्मिती केली तेव्हा त्यांचे वय होते अवघे बावीस वर्षाचे.
तोरणे कुटुंबिय मूळचे मालवण नजिकच्या कट्टा गावचे. त्या शेजारच्याच सुकळवाड या छोट्याशा गावात १३ एप्रिल १८९० रोजी दादासाहेबांचा जन्म झाला. ते तीन वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. कट्टा गावात त्यांच्या कुटुंबियांची थोडीफार जमीन आणि राहते घर होते. घरच्या गरिबीमुळे त्यांच्या शाळेची फी भरणे घरच्यांना शक्य नव्हते. म्हणून लहान वयातच दादासाहेबांनी नशीब काढायला मुंबईचा रस्ता धरला. तेथून ते अच्युत कामत यांच्यासोबत कराचीला गेले आणि त्यांनी एका इलेक्ट्रिशनच्या दुकानात नोकरी पत्करली. तेथे सहा महिने उमेदवारी करून ते मुंबईला आले आणि त्यांना ग्रीव्हज कॉटन या प्रसिध्द कंपनीत नोकरी मिळाली. तेथे बढती मिळाल्यानंतर कंपनीने त्यांची बदली कराचीला केली.
काही दिवसातच दादासाहेबांनी बाबूराव पै यांना सोबत घेऊन 'फेमस फिक्चर्स' ही पहिली चित्रपटवितरण संस्था स्थापन केली. 'पाठारे प्रभू ऍमेच्युअर ड्रॅमॅटिक क्लब' या मुंबईतील काही नाट्यरसिक हौशी मंडळींच्या संस्थेने १९०४ साली ऍडव्होकेट कीर्तिकर यांचे 'श्री पुंडलिक' हे नाटक बसविले. पहिल्याच प्रयोगाला १४ वर्षाचे दादासाहेब तोरणे प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हा प्रयोग पाहून किशोर वयातील दादासाहेब भारून गेले. त्यांनी नाटक मंडळींकडे आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर कीर्तिकरांनी स्वतःची 'श्रीपाद नाटक मंडळी' ही कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या जडणघडणीत तरुण वयातील तोरण्यांनी सक्रीय भाग घेतला आणि आपल्यातील कलागुणांद्वारे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. 'श्री पुंडलिक'चे काही प्रयोग झाल्यानंतर 'श्रीपाद नाटक मंडळी'ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. भारतातील कलारसिकांना १८९६ पासूनच जगाच्या इतर भागातील चलचित्रणाची चाहूल लागली होती. दादासाहेब तोरणे यांच्या डोक्यातही तो विषय दिवसरात्र घोळत होता.
'श्री पुंडलिक' हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला. त्यासाठी ते १९०९ पासून हॉलिवूडशी संपर्कात होते. तेथून त्यांनी चित्रपट तयार करण्याविषयीची तांत्रिक माहिती मिळवली आणि खर्चाचा अंदाजही घेतला. दादासाहेबांच्या आग्रहामुळे त्यांच्याच नाटक मंडळीत सहभागी असलेल्या ऍडव्होकेट नानासाहेब चित्रे यांनी 'बोर्न अँड शेफर्ड' कंपनीच्या मुंबई कार्यालयातून 'विल्यमसन कायनेमॅटोग्राफ' हा मूव्ही कॅमेरा, त्याला लागणारी फिल्म मिळविली. तसेच जॉन्सन नावाचा एक कॅमेरामनही गाठला.
या कॅमेऱ्यात हालचाली टिपता येत असत. परंतु त्यात आवाजाचे रेकॉर्डींग होत नसे. तोपर्यंत आवाजाच्या रेकॉर्डींगचा शोध लागला नव्हता. म्हणून तोरणे, कीर्तिकर आणि कीर्तिकरांचे एक सहकारी नाडकर्णी या तिघांनी मिळून 'श्री पुंडलिक'चे वेगळे संवादविरहित चित्रणसूत्र (शुटींग स्क्रीप्ट) लिहिले. त्यानंतर त्या स्क्रीप्टनुसार आणि दादासाहेवांच्या दिग्दर्शनाखाली कॅमेरामन जॉन्सन आणि टिपणीस यांनी मुंबईच्या गिरगाव भागातील लॅमिंग्टन रोड, त्रिभुवन रोड आणि गिरगाव बॅक रोड या त्यावेळच्या तुरळक वाहतुक असलेल्या परिसरात शुटींग केले. चित्रपटात स्वतः दादासाहेब, टिपणीस आणि जोशी यांनीही भूमिका केल्या होत्या. शुटींग केलेली फिल्म प्रक्रियेसाठी जहाजाने लंडनला पाठविली गेली आणि तिची डेव्हलप केलेली प्रिंट जहाजानेच परत मुंबईला आणली गेली. असा हा मूळ मराठी नाटकावरून वेगळी चित्रणकथा लिहून केलेला पहिला भारतीय चित्रपट 'श्री पुंडलिक', सँडहर्स्ट रोड, गिरगाव येथील 'कॉरोनेशन सिनेमॅटोग्राफ' या नानासाहेब चित्रे आणि पुरुषोत्तम राजाराम टिपणीस अशा मराठी माणसाच्या मालकीच्या सिनेमागृहात १८ मे १९१२ ला रुपेरी पडद्यावर झळकला. हा चित्रपट चांगला दोन आठवडे चालला आणि विशेष म्हणजे 'टाईम्स ऑफ इंडिया'ने त्याची चांगली नोंदही घेतली होती. 'टाईम्स ऑफ इंडिया'चे ते जुने अंक पाहून सुप्रसिध्द सिनेलेखक फिरोझ रंगूनवाला यांनी १९६३ साली या साऱ्या इतिहासाची उजळणी केली होती. मात्र भारत सरकारने तिची दखल घेतली नाही.
'श्री पुंडलिक' चित्रपट निघाला त्या काळात सेन्सॉर बोर्ड अस्तित्वात आले नव्हते. त्यामुळे सेन्सॉरचे सर्टिफिकेट घेण्याचा प्रश्नच नव्हता. कदाचित त्यामुळे भारत सरकारच्या दप्तरी या पहिल्या भारतीय चित्रपटाची नोंद झाली नसावी. रंगूनवाला यांच्यापूर्वी सिनेपत्रकार हनीफ शकूर यांनी १९५३ साली सिनेसाप्ताहिक 'स्क्रीन'साठी खुद्द दादासाहेबांकडूनच एक लेख लिहून घेतला होता. सिनेपत्रकार शशिकांत किणीवर यांनीही 'भारतीय चित्रपटसृष्टीचे आद्य प्रवर्तक दादासाहेब तोरणे' हे पुस्तक जानेवारी २००७ मध्ये प्रसिध्द केले आहे.
'श्री पुंडलिक'च्या निर्मितीनंतर दादासाहेबांनी चित्रपट दिग्दर्शनाशिवाय, प्रक्षेपण, चित्रपट निर्मिती कंपनीचे व्यवस्थापन, तंत्रज्ञान, ध्वनिमुद्रण, वितरण व्यवस्था, नव्या स्टुडिओची पध्दतशीर उभारणी असे बहुविध नवे क्षेत्र पूर्णपणे आत्मसात केले. दरम्यान, १९२७ साली हॉलिवूडमध्ये 'जॅझ सिंगर' या पहिल्या बोलपटाची निर्मिती झाली. त्यापासून स्फूर्ती घेत दादासाहेबांनी ध्वनिमुद्रणासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री पुरविणारी 'मुव्ही कॅमेरा कंपनी' ही स्वतःची कंपनी स्थापन केली आणि हॉलिवूडमधून ऑडिओकेमिक्स हे ध्वनिमुद्रणाचे यंत्र मागवले. त्याचा उपयोग १९३१ साली आर्देशिर इराणी यांच्या 'आलमआरा' या पहिल्या हिंदी तसेच पहिल्या भारतीय बोलपटाच्या निर्मितीसाठी दादासाहेबांच्या तांत्रिक सहाय्याने केला गेला. त्याच वर्षी दादासाहेबांनी 'सरस्वती सिनेटोन' ही स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली आणि पुढच्याच वर्षी त्यांनी भालजी पेंढारकर यांचे दिग्दर्शन आणि नानासाहेब सरपोतदार यांचे संपादन लाभलेला 'शामसुंदर' हा मराठी तसेच हिंदीतील बोलपट काढला.
मराठी 'शामसुंदर' मुंबईच्या 'वेस्ट ऍन्ड' (आताचा 'नाझ') मध्ये सत्तावीस आठवडे चालला. रौप्य महोत्सव साजरा करणारासुध्दा हाच पहिला भारतीय बोलपट! त्यात कृष्णाच्या भूमिकेत बालनट शाहू मोडक आणि राधाच्या भूमिकेत शांता आपटे अशी पात्रयोजना होती. त्याच वर्षी कोल्हापूर येथील 'प्रभात स्टुडिओ'चे 'अयोध्येचा राजा' आणि 'अग्निकंकण' हे दोन्ही बोलपट मराठी व हिंदीतून प्रसारित झाले.
दादासाहेबांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, लोककथेवर आधारित अशा पंचवीस चित्रपटांच्या (मूकपट आणि बोलपट) निर्मितीनंतर १९४२ साली स्वतःची चित्रपट निर्मिती थांबविली. ते पुढेही चित्रपटक्षेत्रात आणखी मोलाचे कार्य करू शकले असते. परंतु त्यांनी ज्याला विश्वासाने आपला स्टुडिओ भाड्याने दिला त्या भाडेकरूने खोट्या कागदपत्रावर स्टुडिओ गहाण ठेऊन पाकिस्तानात पलायन केले. या विश्वासघाताचा धक्का जबरदस्त आणि असह्य होता.
दादासाहेब तोरणे यांचे १९ जानेवारी १९६० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
April 14, 2017
शिल्पाने १९८८ साली 'भ्रष्टाचार' चित्रपटातून बॉलिवूड मध्ये प्रवेश केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती अभिनेते होते. त्यांचा जन्म २० नोव्हेंबर १९६९ रोजी झाला. १९९० मध्ये आलेल्या चित्रपट किशन कन्हैयामध्ये बोल्ड अवतारात दिसली होती. शिल्पाने अभिनेत्री म्हणून मिथून चक्रवर्तीसोबत ९ हून अधिक चित्रपटात काम केले आहे.
यात भ्रष्टाचार, हिटलर, रंगबाज, अपने दम पर, जीवन की शतरंज, स्वर्ग यहां नर्क यहां, त्रिनेत्र आणि पाप की कमाई या चित्रपटांचा समावेश आहे. शिल्पाने बारुद या चित्रपटात शेवटचे काम केले होते. २००० साली शिल्पाने यूके येथील बँकर अपरेश रंजीतसोबत लग्न केले.
शिल्पाने टीव्ही शो एक मुठ्ठी आसमानमध्ये मुख्य भूमिका केली होती. त्यानंतर तिने स्टार प्लसचा शो 'सिलसिला प्यार का' मध्येही काम केले होते.
शिल्पा शिरोडकरने ऑरेंज ट्री या नावाने प्रोडक्शन कंपनी सुरु केली आहे. या बॅनरखाली शिल्पाने 'सौ. शशी देवधर' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली.
शिल्पा शिरोडकर चे चित्रपट हम, दिल ही तो है, आंखें, 'खुदा गवाह', 'गोपी-किशन', हम हैं बेमिसल, बेवफा सनम, 'मृत्युदंड', दंडनायक आणि गजगामिनी या चित्रपटात काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 20, 2018
विजू माने हे मराठी सिनेइंडस्ट्रीतलं जुनं-जाणतं नाव. एक अभ्यासू दिग्दर्शक म्हणून विजूची ओळख आहे. माझी आणि विजूची ओळख साधारणपणे बारा-पंधरा वर्षांपूर्वीची. विजूचा तेव्हा ‘डॉटर’ नावाचा सिनेमा येऊ घातला होता. एकदा वृत्तसंकलनाच्या निमित्ताने ही ओळख झाली आणि दिवसागणिक ती गुणोत्तराने वाढतच गेली.
October 23, 2018
कविता महाजन यांनी ठाणे जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात खुप काम केले होते. आदिवासी समाजजीवनाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. आदिवासी समाज व महिला यांचे प्रश्न त्यांनी सातत्याने मांडले.
September 27, 2021
शिर्डी माझे पंढरपूर, नमन श्री एकदंता, शांताई मंगेशी, गजानन शेगावी आले, स्वामी समर्थ कथामृत्त असे अनेक भक्तिमय अल्बम त्यांनी केले. भक्तिगीते आणि भावगीते असा प्रवास करीत असतानाच त्यांनी जवळपास ९४ हून अधिक चित्रपटांना संगीत दिले.
July 4, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti