नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार वसंत शांताराम देसाई यांचा जन्म २७ डिसेंबर १९०४ रोजी झाला. वसंत देसाई हे नाटककार, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून प्रसिद्ध होते. १९६० साली बडोद्यात भरलेल्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास या नाटकासाठी पदे लिहिली. वसंत शांताराम देसाई हे मराठी रंगभूमीचा चालताबोलता कोश समजले जात.
विधिलिखित हे त्यांचे पहिले आणि अमृतसिद्धी हे दुसरे नाटक. ही दोन्ही नाटके त्यांनी बालगंधर्वांची मध्यवर्ती भूमिका डोळ्यासमोर धरून लिहिली. मखमलीचा पडदा, नट-नाटक आणि नाटककार, किर्लोस्कर आणि देवल, खाडिलकरांची नाट्यसृष्टी, बालगंधर्व-व्यक्ती व कला, रागरंग, विश्रब्ध शारदा- २ खंड, संगीत विभाग, विधिलिखित, अमृतसिद्धी अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. गीतकार वसंत शांताराम देसाई १९२५ साली हिराबाईंचे गाणे ऐकण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्या कार्यक्रमानिमित्ताने बाहेर गेल्या होत्या. काही वेळाने त्या घरी आल्या. त्यानंतर त्यांना गायला कसे सांगावे या विचारात असताना ‘पुन्हा गाते’ असे त्याच म्हणाल्या.
तानपुरा घेतला व दोन तास गाणे ऐकविले. याच देसाईंनी ‘उपवनी गात कोकिळा’, ‘सखे मी मुरारी वनी पाहिला’ आणि ‘धन्य जन्म जाहला’ ही पदे हिराबाईंना लिहून दिली. त्यातल्या उपवनी गात.. या भावपदाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. १९३७ मध्ये ओडियन कंपनीने ही ध्वनिमुद्रिका बाजारात आणली.
शब्द वसंत शांताराम देसाई यांचे व मास्तर दिनकरांची मदत घेऊन चालही त्यांनीच केली. हे भावगीत इतके लोकप्रिय झाले की महाराष्ट्रातील प्रत्येक गायक हे गीत गाऊ लागला. स्वत: गायिकेने आपल्या जलशांतून नाटय़पदासह काही पदे गायला सुरुवात केल्यावर ‘उपवनी गात कोकिळा’ या गाण्याची हमखास फर्माईश होई. त्या काळात हिराबाईंनी हे गीत गायले नाही असा एकही कार्यक्रम नसेल. पंडित भीमसेन जोशी सांगायचे, ‘वधुपरीक्षेला आलेल्या मुलीला गाण्याचा आग्रह झाला की ती ‘उपवनी गात कोकिळा’ हे गीत गायची व त्यामुळे मुलगी पसंत व्हायची!’ वसंत शांताराम देसाई यांचे २३ जून १९९४ रोजी रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
तमिळ चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आणि तमिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचा जन्म १७ जानेवारी १९१७ रोजी झाला. मरुदुर गोपालन रामचंद्रन, ऊर्फ एम.जी. रामचंद्रन किंवा एमजीआर, यांनी अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली. १९७७ ते १९८७ या काळात यांनी तमिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळली. हे सलग तीन मुदतींसाठी मुख्यमंत्री होते. तरुणपणी एम.जी. रामचंद्रन आणि त्यांचा भाऊ एम.जी. चक्रपाणी हे दोघे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी नाटकमंडळ्यांमधून कामे करत असत. याच काळात ते गांधींच्या प्रभावामुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात सामील झाले. १९३६ साली सती लीलावती नावाच्या तमिळ चित्रपटात मिळालेल्या एका साहाय्यक भूमिकेद्वारे चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश झाला. १९४० च्या दशकात त्यांना चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका मिळू लागल्या. पुढील तीन दशके तमिळ चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा दबदबा राहिला. दाक्षिणात्य लोक अभिनेत्यांच्या मागे आणि अभिनेत्रीच्या मागे मोठय़ा प्रमाणात असतात. एम.जी.आर. यांनी याच पद्धतीने अधिराज्य गाजवले होते.
तमिळ चित्रपटांतील हीरोनंतर राजकारणातील तामिळनाडूचे हीरो झाले. तीच गोष्ट एम.जी.आर. यांची. तामिळी चित्रपटांतील शिवाजी गणेशन आणि एम. जी. आर. यांचा काळ होता. चित्रपटसृष्टी गाजवून एम. जी. आर डी.एम.के पक्षाचे ते सदस्य झाले. त्यावेळी आणि त्यावेळचे डी.एम.के.चे नेते अण्णा दुराई हे असे तामिळनाडूचे त्या काळातील सर्वश्रेष्ठ आणि सर्वप्रिय नेते होते. पक्षांतर्गत उतरंडीत झपाट्याने वाटचाल करत ते अल्पावधीतच पक्षाच्या सर्वोच्च वर्तुळात गणले जाऊ लागले. अण्णा दुराईंनी १९६७ साली डी.एम.के.च्या हातात म्हणजे एका प्रादेशिक पक्षाच्या हातातून सत्ता मिळवली आणि तामिळनाडूच्या जनतेवर डी. एम. के.ने अधिराज्य गाजवले. अण्णा दुराई असेपर्यंत द्रमुक अखंड होता. १९७२ साली द्रमुक सोडून त्यांनी स्वतःचा अण्णा द्रविड मुन्नेट्र कळघम पक्ष स्थापला. चित्रपटांतील नायक म्हणून लाभलेल्या प्रचंड लोकप्रियतेचा वापर करून त्यांना राजकारणासाठीही मोठा जनाधार गोळा करता आला. १९७७ साली ते पहिल्यांदा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. भारतात कोणाही चित्रपट-अभिनेत्याने एखाद्या राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळवण्याची ही पहिलीच घटना होती. १९८७ साली निधन होईपर्यंत ते मुख्यमंत्रिपदावर होते. एम.जी. रामचंद्रन यांना मरणोत्तर भारतरत्नध पुरस्काराने गौरवण्यात आले होते. जयललिता यांनी एम. जी. रामचंद्रन यांचे बोट धरून राजकारणात प्रवेश केला खरा आणि चित्रपटसृष्टीतल्या राज्यसभेत जाणा-या त्या पहिल्या खासदार होत्या. १९८२ ते ८६ या काळात एम. जी. आर. असताना त्यांनीच त्यांना राज्यसभेत पाठवले आणि १९९१ साली थेट मुख्यमंत्रीपदी त्या आल्या.
एम. जी. रामचंद्रन यांच्या मृत्यूनंतर १९९१ साली जयललिता मुख्यमंत्री झाल्या. एम.जी. रामचंद्रन यांचे २४ डिसेंबर १९८७ रोजी निधन झाले. एम. जी. आर. यांच्या मृत्यूनंतर जी अंत्ययात्रा निघाली तशी अंत्ययात्रा जगाच्या पाठीवर अजून तरी कुठे निघालेली नाही, असे दाखले त्या काळी दिले जात असत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणून १९७० मध्ये 'घर घर की कहानी' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला. त्यांचा जन्म ६ सप्टेबर १९४९ रोजी झाला. खून भरी मांग, खेल खेल में, खट्टा मीठा, खुबसूरत यांसह जवळपास ४० सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला. त्यानंतर दिग्दर्शक म्हणून त्यांनी 'खुदगर्ज' या सिनेमाद्वारे आपली सेकंड इनिंग सुरु केली.
'काला बाजार', 'किशन कन्हैया', 'करण अर्जुन', 'कहो ना प्यार है', 'कोई मिल गया', 'क्रिश' या सिनेमांचे यशस्वी दिग्दर्शन केले. हृतिकला त्यांनी 'कहो ना प्यार है' या सिनेमाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत लाँच केले. या सिनेमाने हृतिकला एका रात्रीत सुपरस्टार बनवले. रोशन यांच्या तीन पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
आपले मुल साडे तीन वर्षाचे झाले की आता माँटेसरीत घालणार असे म्हणतो, माँटेसरी हे नाव एका महान व्यक्तीचे आहे हे खूप कमी जणाना माहित असेल.
शाळा प्रवेशाच्या आधीच्या या शिक्षणाची पद्धती शोधून तिची मांडणी करणाऱ्या व त्याचेही 'विज्ञान बनवणाऱ्या बालमानस-तज्ज्ञ मारीया माँटेसरी. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १८७० रोजी झाला.
माँटेसरी यांचे कार्य इतके महान आहे की लहान मुलांच्या शाळेला आता जगभर सर्वत्र 'माँटेसरी' असेच म्हटले जाते.
माँटेसरी यांचा इटलीत शेअरवेल या गावात झाला. वडिलांच्या वारंवार वेगवेगळ्या शहरांमध्ये बदल्या होत राहिल्याने मारीयाचे शिक्षणसुद्धा वेगवेगळया शहरांत होत राहिले. कधी फ्लॉरेन्स तर कधी रोम अशी त्यांची भटकंती चालू होती. त्यांना गणिताची विशेष गोडी व गतीही होती. त्यामुळे सुरुवातीला मा.मारीयानी इंजिनियर होण्याचे ठरवले. पण पुढे त्यांना वनस्पतीशास्त्रात गोडी वाटू लागली. नंतर त्यांना वैद्यकशास्त्राचे आकर्षण वाटले व त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.
मतिमंद मुलांच्या मानसशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी संशोधन करतानाच त्यांचे तिथल्याच एका वैज्ञानिकाबरोबर प्रेमसंबंध जुळले व विवाहबाह्य संबंधांतूनच त्यांना मुलगा झाला. पण त्याला सोबत ठेवणे अशक्य होते. त्यातच त्यांच्या प्रियकरानेही दगा दिला. या साऱ्याचा बालमनावर कसा व किती परिणाम होतो, हे मारीयांनी स्वत:च्या घरातच पाहिले व त्यातूनच बालकांसाठी शिक्षणपद्धती कशी असावी, याचे संशोधन त्यांनी सुरू केले. बालमानसशास्त्र व त्यांचे शिक्षण, विशेषत: बौद्धिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांसाठी विशेष शिक्षण पद्धती याविषयात माँटेसरी विविध विद्यापीठे व संस्था यामध्ये भाषणे देऊ लागल्या. विसावे शतक सुरू होत असताना त्यांच्या नावाचा दबदबा निर्माण झाला होता.
शिशुशिक्षणाची त्या पुरस्कर्ती होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन तंत्र व उद्योग शोधून काढली. मुलांचे खेळ व छंद यांवर त्यांचे मानसशास्त्र अवलंबून होते. अभ्यासाने मुलांना शीण न येता त्यांचा मानसिक विकास साधला जातो. असे त्यांचे म्हणणे होते. बालमनावर चांगले संस्कार करण्यासाठी त्यांना शिकवताना काय पद्धती अवलंबावी व कोणती पथ्ये पाळावीत, याबद्दल माँटेसरींनी काही सूत्रे तयार केली. आजही ती वापरली जात आहेत. माँटेसरी शिक्षण पद्धतीच्या शिक्षण-प्रशिक्षणाचा पहिला वर्ग माँटेसरींनी १९०९ साली उघडला. माँटेसरीची शिक्षणविषयक कल्पना वस्तुनिष्ठतेवर उभारली होती. तीमध्ये जीवनशक्तीचा आविष्कार हे प्रमुख तत्त्व होते. पहिल्या जागतिक महायुद्धांनंतर माँटेसरीं यांनी स्थापन केलेली इटलीतील संस्था बंद पडली. नंतर माँटेसरी अमेरिकेत गेल्या. त्यांनी न्यूयॉर्क येथे माँटेसरी शिक्षक–प्रशिक्षण महाविद्यालय स्थापन केले व ते एलिनार पार्कहर्स्ट यांच्यावर सोपविले.
शाळेत जाण्याचे वय होण्यापूर्वी बालकांना केवळ आपल्या वयोगटातील मुलांमध्ये मिसळता यावे व त्यांना सामुहिक सहजीवनाचा सराव व्हावा, म्हणून माँटेसरींनी अनेक खेळ, गीते, नृत्य प्रकार तयार केले. तीच बालगीते आजही वापरली जात आहेत. मा.माँटेसरी १९४० मध्ये भारतातही आल्या होत्या. त्यांनी मद्रासमध्ये चर्चासत्रे घेतली होती.
उतरत्या वयातही झपाटल्यासारख्या त्या जगभर फिरत राहिल्या. नोबेल शांतता पुरस्कारासाठी तीन वेळा त्यांचे नामांकन झाले. मात्र अखेरपर्यंत त्यांना ते मिळाले नाहीच. मा.माँटेसरी यांची काही उल्लेखनीय पुस्तके पुढीलप्रमाणे (१) द माइंड, (२) द डिस्कव्हरी ऑफ द चाइल्ड, (३) माँटेसरी मेथड (१९१२) (४) डॉ. माँटेसरीज ओन हँडबुक (१९१४) (५) द अँडव्हान्स्ड माँटेसरी मेथड (१९१७). मा.माँटेसरी यांचे ६ मे १९५२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सुगम संगीत काय किंवा चित्रपट संगीत काय, इथे सर्जनशीलता जरुरीची नसते, असे म्हणणारे बरेच “महाभाग” भेटतात!! वास्तविक, सामान्य रसिक (हा शब्दच चुकीचा आहे ,जर रसिक असेल तर सामान्य कसा?) ज्या संगीताशी मनापासून गुंतलेले असतात, ते संगीत सामान्य कसे काय ठरू शकते? त्यातून, स्वरांच्या अलौकिक दुनियेत जरी शब्द “परका” असला तरी ते “कैवल्यात्मक” संगीत जरा बाजूला ठेवले तर, दुसऱ्या कुठल्याही सांगीत आविष्कारात, शब्दांशिवाय पर्याय नाही. तेंव्हा शास्त्रोक्त संगीत वगळता (अर्थात रागदारी संगीतात देखील, शब्दांना महत्व देऊन, गायकी सादर करणारे कलाकार आहेत!!) अन्य कुठल्याही संगीतात, शब्दांचे महत्व नेहमीच महत्वाचे ठरतात.
आता, सर्जनशीलता हा शब्द जरा फसवा आहे, विशेषत: सुगम संगीतातील सर्जनशीलता, कधीही, सहज जाताजाता,ऐकून समजण्यासारखी नाही. खरतर, हे तत्व सगळ्याचा कलांच्या बाबतीत लागू पडते!! आपल्याला “सर्जनशीलता” हा शब्द ऐकायला/वाचायला आवडतो परंतु याचा नेमका अर्थ जाणून घेण्याची “तोशीस” करीत नाही. इथे या शब्दाची “फोड”करण्याचा उद्देश नाही परंतु, सुगम संगीतातील सर्जनशीलता, हा संशोधनाचा विषय मात्र नक्की आहे, जर सुगम संगीत हे, संगीत म्हणून मान्य केले तर!!
इथे वेगवेगळ्या पातळीवर सर्जनशीलता वावरत असते, म्हणजे चालीचा मुखडा, वाद्यवृंद, कवीचे शब्द तसेच अखेरीस आपल्या समोर येणारे गायन!! या सगळ्या सांगीतिक क्रियेत, संगीतकाराची भूमिका, नि:संशय महत्वाची!! हल्ली, जरा काही वेगळे ऐकायला मिळाले, की आपण, लगेच “सर्जनशीलता” हा शब्द वापरतो आणि या शब्दाची “किंमत” कमी करतो!! हिंदी चित्रपट संगीतात, असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले, ज्यांना, खऱ्या अर्थाने, सर्जनशील संगीतकार, ही उपाधी लावणे योग्य ठरेल आणि या नामावळीत, “सज्जाद हुसेन” हे नाव अग्रभागी नक्कीच राहील!! किती लोकांना, या संगीतकाराचे नाव माहित असेल, शंका आहे!!
हा माणूस, केवळ “अफाट” या शब्दानेच वर्णन करावा लागेल. प्रत्येक वाद्य, सुप्रसिद्ध करताना, त्या वाद्याबरोबर, त्या वादकाचे नाव कायमचे जोडले जाते, जसे, संतूर-शिवकुमार शर्मा, शहनाई-उस्ताद बिस्मिल्ला खान इत्यादी…… मेंडोलीन वाद्य, भारतीय संगीतात रूढ करणारे वादक, म्हणून सज्जाद हुसेनचे नाव घेणे, क्रमप्राप्तच आहे. वास्तविक हे मूळचे भारतीय वाद्य नव्हे, पण तरीही भारतीय शास्त्रीय संगीतात, या माणसाने, या वाद्याची प्रतिस्थापना केली, असे म्हटले तर ते अजिबात चुकीचे ठरू नये. दुर्दैवाने, या माणसाची प्रसिद्धी, अति विक्षिप्त, लहरी आणि अत्यंत तापट म्हणून झाली आणि त्यावरून, नेहमीच शेलक्या शब्दात संभावना केली गेली. माणूस, अतिशय तापट, नक्कीच होता परंतु संगीतातील जाणकारी, भल्याभल्यांना चकित करणारी होती.
सुगम संगीतात, नेहमी असे म्हटले जाते, गाण्याचा “मुखडा” बनविण्यात खरे कौशल्य असते!! तो एकदा जमला, की पुढे सगळे “बांधकाम” असते. या वाक्याच्या निमित्ताने, आपण, सज्जाद हुसेन यांच्या काही गाण्यांची उदाहरणे बघूया.
सुमारे ७० वर्षांच्या दीर्घ आयुष्यात केवळ १४ चित्रपट, संख्येच्या दृष्टीने, ही आकडेवारी क्रियाशील सर्जनशीलतेचे उदाहरण ठरत नाही!! परंतु, त्यामागे, चित्रपट क्षेत्रातील राजकारण, व्यक्तीचा स्वभाव इत्यादी गोष्टी अंतर्भूत आहेत. नूरजहानच्या आवाजातील “बदनाम मुहोब्बत कौन करे” हे गाणे बघूया. बागेश्री रागाच्या सावलीत तरळणारी चाल असली तरी, “बदनाम” हा शब्द जसा उच्चारला आहे,तो ऐकण्यासारखा आहे. (पुढे, सी. रामचंद्र यांनी, “मलमली तारुण्य माझे” मधील “मलमली” शब्दामागे हाच विचार केला आहे. अर्थात, हे त्यांनीच सांगितलेले आहे) कुठलेही गाणे, “आपण गाऊ शकतो” असा जर विश्वास ऐकणाऱ्याला झाला, तर ते गाणे प्रसिध्द होऊ शकते!! इथे सुरवातीला असेच वाटते, पण जसे गाणे पुढे सरकते, तशी, चालीतील अंतर्गत “ताण” कुठेच कमी होत नाही आणि स्वरपट्टी मर्यादित तारतेचीच आहे. त्यामुळे, ऐकणारा, आपली उत्कंठा ताणून धरतो!!
“भूल जा ऐ दिल” हे लताबाईंनी गायलेले गाणे बघूया. हे सुद्धा, बागेश्री रागाचीच “छाया” घेऊन वावरते. गाण्याचे चलन, द्रुत गतीत आहे पण, चाल बांधताना, शब्दांच्या मध्ये आणि शब्दांची शेवटी, चमकदार हरकती असल्याने, चाल अवघड होते तसेच काही ठिकाणी, शब्द निश्चित स्वरांवर न संपविता, त्या दिशेने लय जात आहे, असे नुसते दर्शविले आहे!! हा जो सांगीतिक अनपेक्षितपणा आहे, हेच या संगीतकाराच्या सांगीतिक क्रियेचे व्यवच्छेदक लक्षण मानावे लागेल.
“ये हवा ये रात ये चांदनी” हे गाणे बघूया. आरंभी धीम्या लयीतले आहे असा भास होतो. वास्तविक संथ लयीत गाणे नसून, कवितेच्या शब्दांची लांबी दिर्श असल्याने, त्याच्या बरोबर जाणारी अशी सुरावट असल्याने, तसा भास होतो. भैरवी रागीणीच्या छायेत वावरत असताना, आपल्या पहिल्या मात्रेस “उठाव” न देणारा ७ मात्रांचा रूपक ताल, यामुळे हे गाणे फारच सुंदर झाले आहे.
“रुस्तम सोहराब” चित्रपटातील “ऐ दिलरुबा” ऐकताना, असे जाणवते, हा संगीतकार आता अत्यंत वेगळ्या शैलीने गाणी बनवत आहे. कारण एकाच वेळी भारतीय व अरब भूमीची संगीतसंपदा जागवणारी वाटते. आवाजाचे विशिष्ट कंपयुक्त लगाव, आधारभूत घेतलेली स्वरचौकट आणि ओळीच्या मध्येच अनपेक्षितपणे वरच्या स्वरांत लय बदलणे, यामुळे सगळे गाणे अत्यंत उठावदार आणि परिणामकारक होते.
“जाते हो तो जाओ”, “तुम्हे दिल दिया”,’दिल मी समा गये सजन” ही आणि अशीच बरीचशी गाणी, “चाल” या दृष्टीकोनातून ऐकावी, म्हणजे या संगीतकाराच्या व्यामिश्रतेचे परिमाण समजून घेत येईल.
वास्तविक इतक्या अफलातून प्रतिभेचा धनी असून देखील, केवळ १४ चित्रपट, यात रसिकांचा तोटा झाला, हे निश्चित. त्यांच्या रचनांचा प्रभाव इतर संगीतकारांवर बराच होता, इतका की बरीचशी गाणी, या चालीच्याच सावलीत वावरतात किंवा त्यांचा प्रभाव टाळू शकत नाहीत. काही उदाहरणे बघूया.
१] ये हवा ये रात ये चांदनी – तुझे क्या सुनाऊ मैं दिलरुबा (मदन मोहन)
२] आज प्रीत ने तोड दे बंधन – जीवन मे पिया तेरा साथ रहे (वसंत देसाई)
३] कोई प्रेम देके संदेसा – प्रीतम तेरी दुनिया में (मदन मोहन)
४] खयालो में तुम हो – (“आह” चित्रपटात Accordion चा तुकडा शंकर/जयकिशन यांनी वापरला)
अशा सगळ्या संगीतचौर्यामुळे, सज्जाद अधिक तापट झाले, त्यातून, ही गाणी सगळी अमाप प्रसिध्द झाली आणि आपल्या “मूळ” चाली असून, आपल्याला काहीच श्रेय मिळत नाही, यामुळे मनात सतत खंत बाळगली!!
वास्तविक, हा संगीतकार मेंडोलीन वादक, मेंडोलीनवर सतारीचे सूर काढू शकणारा असामान्य ताकदीचा कलाकार. या वाद्याला प्रतिष्ठा लाभावी, यासाठी त्यांनी अमाप धडपड केली. अगदी, संगीत मैफिलीत देखील ते, फक्त रागदारी संगीतच सादर करीत. अशाच एका मैफिलीत, एका श्रोत्याने, ” ये क्या क्लासिकल बजा रहे हैं आप, कुछ लाईट म्युझिक हो जाय” अशी फर्माईश झाल्यावर, सज्जादनी समोरच्या दिव्याकडे बोट दाखवले आणि उठून नाराजीने चालू पडले!! अशा स्वभावावर काय औषध?
हाच प्रकार, हिंदी चित्रपट संगीताच्या बाबतीत घडला. संगदिल चित्रपटाची गाणी बनविणे चालू होते आणि तेंव्हा तिथे चित्रपटाचा नायक, दिलीप कुमार आले आणि त्याने काही सूचना केल्या!! झाले, ठिणगी पडली!! सज्जादने तिथल्या तिथे, “तुझ्या चेहऱ्याला ना आरोह, ना अवरोह आणि तू मला संगीताचे धडे देतोस?” आता, असे ऐकविल्यावर पुढे काय घडणार!!
कारणे अनेक देता येतील, त्यांच्या दोषांवर पांघरून घालता येईल परंतु अशा विक्षिप्त स्वभावाने, त्यांनी चित्रपट क्षेत्रात बरेच शत्रू निर्माण केले!! जेंव्हा आजूबाजूला मित्रांपेक्षा शत्रू अधिक झाले, म्हणजे त्या क्षेत्रातून बाहेर पडण्यावाचून वेगळे काय घडणार!!
- अनिल गोविलकर
१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.
अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली.
शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बांगलादेशी पार्श्वगायिका रूना लैला यांचा जन्म १७ नोव्हेंबर १९५२ रोजी सिलहट बांगलादेश येथे झाला. भूपिंदर आणि रुना लैला यांनी गायलेलं घरोंदा या चित्रपटातील दो दीवाने शहर में हे गाणं व दमादम मस्त क़लन्दर हे खूपच लोकप्रिय झाले होते. रूना लैला यांनी जयदेव, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत प्यारेलाल व भप्पी लाहिरी यांच्या बरोबर काम केले आहे.
त्यांची काही बंगाली 'साधेर लाऊ बनाईलो मोरे', 'शिल्पी आमी, तोमादेरी गान शोनाबो' ही पण लोकप्रिय आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शरद पवार ६१ वर्षाचे झाले तेव्हा त्यांचा एकसष्टीचा वाढदिवस त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या उपस्थितीत साजरा केला होता. त्यावेळी भाषण करताना वाजपेयींनी पवार यांच्या अनेक गुणांचे वर्णन केले होते आणि शेवटचे वाक्य ते असे म्हणाले की, ‘सबसे बडी और महत्त्वपूर्ण बात यह है की, अनेक गुणों से मंडित पवारसाब ‘प्रतिभा’संपन्न भी है।’
शांताराम राजाराम वणकुद्रे उर्फ व्ही. शांताराम हे भारतीय चित्रपट सृष्टीतलं सुवर्णाक्षरांनी लिहिलं गेलेलं नाव. शांताराम बापू या नावानं सुद्धा ते ओळखले जात. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता अशा तिन्ही क्षेत्रांत त्यांनी आपला खोल ठसा उमटवला.
रयतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी झाला.
महाराष्ट्रातील करवीर तथा कोल्हापूर संस्थानचे प्रागतिक अधिपती आणि थोर समाजसुधारक. प्राथमिक शिक्षण, जातिभेद-निवारण, अस्पृश्यता-निवारण इ. सुधारणांचे पुरस्कर्ते. त्यांचा जन्म कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यात जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव. चौथ्या शिवाजींच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले. सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थिदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, राज्यशास्त्र इ. विषयांचा अभ्यास केला. त्यांना २ एप्रिल १८९४ रोजी राज्याधिकार प्राप्त झाला. तत्पूर्वी बडोद्याच्या गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येबरोबर त्यांचा विवाह झाला. त्यांना राजाराम व शिवाजी हे दोन मुलगे आणि राधाबाई (आक्कासाहेब) व आऊबाई या दोन कन्या झाल्या. त्यांनी प्रशासन-यंत्रणेनची पुनर्ररचना करून भास्करराव जाधव, दाजीराव विचारे, आ.ब.लठ्ठे यांसारख्या बहुजन समाजातील कर्तबगार व गुणी व्यक्तींना अधिकारावर नेमण्यास सुरुवात केली. १८९७-९८ साली प्रथम दुष्काळ व नंतर प्लेग अशी संकटे कोसळली. तरुण शाहूंनी धैर्याने त्यांवर मात केली. १९०२ साली सातव्या एडवर्डच्या राज्यारोहणानिमित्त त्यांनी युरोपचा दौरा केला. तेथील भौतिक प्रगतीचा मोठा प्रभाव त्यांच्यावर पडला; त्यामुळे त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले. कोल्हापुरात वेदोक्त प्रकरणाचा स्फोट झाला. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गाने शाहूंचे क्षत्रियत्व नाकारून त्यांना शूद्र म्हटले आणि त्यांना वेदमंत्राचा अधिकार नाकारला. यातून वेदोक्ताच्या संघर्षाचे पडसाद सर्व महाराष्ट्रभर उमटले. लो. टिळकांनी ब्रह्मवर्गाची बाजू घेतल्याने प्रकरण इरेस पडले. शाहूंनी वेदोक्ताचा अधिकार नाकारणाऱ्या राजोपाध्यांची व शंकराचार्यांची वतने जप्त केली. ब्रह्मवर्गाने हे प्रकरण व्हाइसरॉयपर्यंत नेले; पण शेवटी शाहूंचीच सरशी झाली. कोल्हापुरातील ब्रह्मवर्गास त्यांच्याशी समेट करावा लागला, पण महाराष्ट्रातील ब्रह्मवर्ग शेवटपर्यंत त्यांच्या विरोधातच राहिला. कुलकर्णी-वतन बरखास्ती, सत्यशोधक जलशांना शाहूंचा पाठिंबा या बाबींमुळे तर हा विरोध वाढतच गेला.
वेदोक्त प्रकरणातील अनुभवावरून, भिक्षुकशाहीच्या जाळ्यातून मुक्त झाल्याशिवाय उच्चवर्णियांची धार्मिक व सामाजिक मक्तेदारी नष्ट होणार नाही, अशी शाहूंची धारणा झाली होती. परिणामी ते म. फुल्यांच्या सत्यशोधक विचारसरणीकडे आकृष्ट झाले. त्यांनी उघडपणे त्यांचे अनुयायीत्व स्वीकारले नसले, तरी सत्यशोधक तत्त्वांना त्यांचा पाठिंबा होता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे महाराष्ट्रात सत्यशोधक समाजाचे पुनरुज्जीवन झाले. पारंपरिक भिक्षुकशाहीच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात ब्राह्मणेतर पुरोहितांची निर्मिती करण्यासाठी ‘श्री शिवाजी वैदिक स्कूल' ची स्थापना केली आणि मराठ्यांसाठी स्वतंत्र ‘क्षात्रजगद्गुरू' पद निर्माण करून त्यावर सदाशिवराव पाटील या उच्चविद्याविभूषित तरुणास नेमले. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांत हा एक अभिनव प्रयोग होता.
शाहूंनी आर्यसमाज व थिऑसॉफिकल सोसायटी या संस्थांनाही आश्रय दिला. वेदांवरील श्रद्धा व जातिभेदाला विरोध, या आर्यसमाजाच्या तत्त्वांमुळे त्यांनी स्वत:ला ‘आर्यसमाजी' म्हणून घोषित केले; तथापि त्याच्या ते आहारी गेले नाहीत. अर्यसमाजाच्या गुरुकुलाची स्थापना झाली. पुढे राजाराम कॉलेज आर्यसमाजाकडे चालविण्यासाठी दिले गेले.
बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्यांचे दारिद्र, अज्ञान व अंधश्रद्धा नष्ट होणार नाहीत, हे जाणून शाहूंनी शिक्षणाच्या, विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या प्रसारावर भर दिला. त्यानुसार त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अमलात आणला. प्रत्येक खेड्यात प्राथमिक शाळा सुरू केली. प्राथमिक शिक्षणावर या संस्थानात होणारा खर्च मोठा होता.
खेड्यापाड्यांतील मुलांना उच्चशिक्षणाची सुविधा मिळावी, म्हणून शाहूंनी कोल्हापुरात मराठा, जैन, लिंगायत, मुस्लीम, सुतार, नाभिक, महार, चांभार-ढोर इ. जातिजमातींसाठी वसतिगृहे स्थापन केली. शिवाय नासिक, पुणे, नगर, नागपूर इ. अन्य ठिकाणी त्यांच्या प्रेरणेने व साहाय्याने अनेक वसतिगृहे सुरू झाली. त्यांच्या या उपक्रमामुळे महाराष्ट्रातील अनेक पिढ्या शिकून तयार झाल्या. मागासलेल्या जातींत शिक्षणाबद्दल फारशी आस्था नसल्याने व त्याचे कारण शिक्षण घेऊनही सरकारी नोकरी लाभण्याची शक्यता नसल्याने शाहूंनी २६ जुलै १९०२ रोजी कोल्हापूर संस्थानातील ५०% शासकीय नोकऱ्या मागासलेल्या वर्गासाठी राखीव ठेवल्याचा जाहीरनामा काढला. राखीव जागांचे धोरण अमलात आणणारे शाहू हे हिंदुस्थानातील पहिले राज्यकर्ते ठरले. अस्पृश्यतेचे उच्चाटन हे शाहूंनी आपले जीवितकर्तव्य मानले. संस्थानातील शाळा, पाणवठे, विहिरी, दवाखाने, कचेऱ्या इ. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळण्यास त्यांनी कायद्याने प्रतिबंध केला. त्यासाठी अनेक वटहुकूम जारी केले. त्यांनी अस्पृश्यांना सरकारी नोकरीत घेतले. समाजातील तलाठ्यासारख्या प्रतिष्ठेच्या जागा दिल्या. त्यांच्यापैकी अनेकांना माहूत, हूलस्वार, पोलीस, स्वत:चे मोटारचालक म्हणून नेमले. महार-वतन खालसा करून महारांची वेठबिगारीतून आणि गुन्हेगार मानल्या गेलेल्या जातींची ‘हजेरी' पद्धतीतून मुक्तता केली. फासेपारधी, कोरवी, माकडवाले यांसारख्या भटक्या व विमुक्त जातींना जवळ करून त्यांचे जीवन स्थिर केले. त्यांना आपले रक्षक म्हणून नेमले. खेड्यापाड्यांतील बलुतेदारांनाही त्यांच्या बलुतेपद्धतीतून मुक्त करून त्यांना समाजातील सर्व उद्योगधंदे खुले केले. जोगिणी व देवदासी प्रथेस प्रतिबंध करणार कायदा जारी केला. याच सुमारास शाहूंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी भेट झाली. बाबासाहेबांच्या मूकनायक या वृत्तपत्रास व पुढे त्यांच्या इंग्लंडमधील उच्चशिक्षणास त्यांनी अर्थसाहाय्य केले. माणगाव व नागपूर येथील अस्पृश्यता निवारण परिषदांत बाबासाहेबांबरोबर सहभागी होऊन अस्पृश्यांना त्यांचा ‘खरा पुढारी' मिळाल्याबद्दल त्यांनी त्यांचा गौरव केला. अस्पृश्यतेबरोबरच जातिभेदाशी शाहूंनी अखेरपर्यंत संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातिभेदावर रामबाण उपाय वाटून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. स्वत: पुढाकार घेऊन अनेक आंतरजातीय (धनगर-मराठा) विवाह घडवून आणले. तसेच बालविवाहास प्रतिबंध करून नोंदणी विवाहाचा कायदा जारी केला. घटस्फोटास व विधवापुनर्विवाहास कायदेशीर मान्यता दिली. कुटुंबात होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळांपासून स्त्रीला संरक्षण देणारा कायदाही त्यांनी मंजूर केला. मागासलेल्या वर्गांतील मुलींना व स्त्रियांना मोफत शिक्षणाची सुविधा निर्माण केली. सामाजिक सुधारणांबरोबरच शाहूंनी शेतीस व उद्योगधंद्यांस प्रोत्साहन दिले. अनेक कृषी व औद्योगिक प्रदर्शने भरविली. पन्हाळ्यावर चहा, कॉफी, रबर यांच्या लागवडींचे प्रयोग केले. कृषी उत्पादनासाठी शाहूपुरी, जयसिंगपूर यांसारख्या बाजारपेठा वसविल्या. त्यामुळे कोल्हापूर ही गुळाची बाजारपेठ म्हणून देशात प्रसिद्ध पावली. शाहूंनी कोल्हापुरात कारखानदारीचा पाया रचला. ‘शाहू मिल' ची स्थापना करून आधुनिक वस्त्रोद्योगास त्यांनी चालना दिली. शाहूंनी बांधलेले राधानगरीचे धरण कृषी क्षेत्रात संस्थानचा कायापालट करणार उपक्रम ठरला. संस्थानी मुलखातील हे सर्वांत मोठे धरण बांधून त्यांनी आपले संस्थान सुजलाम्-सुफलाम् करून टाकले. शाहूंनी ‘सहकारी संस्थांचा कायदा' करून सहकारी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
शाहूंनी संगीत, नाट्य, चित्रकला, मल्लविद्या आदी कलांना राजाश्रय देऊन महाराष्ट्रात कलेच्या क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केली. अल्दियाखॉं, हैदरबक्षखॉं, भूर्जीखॉं, सुरश्री केसरबाई, गानचंद्रिका अंजनीबाई मालपेकर अशा अनेक गायक-गायिकांनी शाहूंच्या आश्रयाने अखिल भारतीय कीर्ती संपादन केली. त्यांनी अनेक नाटक कंपन्यांना व गुणी कलावंतांना आश्रय दिला. बालगंधर्व व संगीतसूर्य केशवराव भोसले हे थोर कलावंत शहूंनीच महाराष्ट्राला दिले. संगीत व नाट्यकलेच्या जोपासनेसाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य पॅलेस थिएटर (केशवराव भोसले नाट्यगृह) बांधले. त्याच्या शेजारीच खुल्या नाट्यगृहाचीही सोय केली. शाहूंच्या दरबारात आबालाल रहिमानसारखा महान चित्रकार कलावंत होऊन गेला. बाबूराव पेंटर, दत्तोबा दळवी प्रभृती चित्रकारांना त्यांचे प्रोत्साहन मिळाले. मल्लविद्येच्या प्रांतात शाहूंनी संस्थानासह सर्व देशांतील मल्लांना उदार आश्रय दिला. रोमच्या आखाड्याच्या धर्तीवर कोल्हापुरात कुस्तीचे मैदान बांधले. त्यांच्या कारकीर्दीत कोल्हापूर ही ‘मल्लविद्येची पंढरी' बनली. खुद्द शाहू हे मल्लांचे मल्ल म्हणून प्रसिद्ध होते. यांशिवाय त्यांनी कोल्हापुरात साठमारी हा हत्तीचा खेळ सुरू केला. शिकार तर त्यांचा आवडीचा छंद होता. पट्टीचा शिकारी म्हणून त्यांचा लौकिक होता.
शाहूंच्या सामाजिक कार्याचा गौरव म्हणून कानपूर येथे कुर्मी क्षत्रिय सभेने त्यांना ‘राजर्षी' पदवी बहाल केली (१९१९). त्यांच्या कार्यामुळे दलित-पतितांचा उद्धारक, रयतेचा राजा म्हणून त्यांची प्रतिमा जनसामान्यात निर्माण झाली. या राजाने अज्ञानी बहुजन समाजाला जागृत करण्याचे व्रत अखेरपर्यंत सांभाळले. अखेरच्या दिवसांत द्वितीय चिरंजीव शिवाजी यांच्या अपघाती निधनाने ते खचून गेले.
शाहू महाराज यांचे ६ मे १९२२ रोजी निधन झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराज कोल्हापूरच्या गादीवर आले.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Copyright © 2025 | Marathisrushti