medi planners
May 11, 2026
Norway
May 11, 2026
पालखीचा सोहळा । नामाचा गजर ।
पुणे झाले घर । पांडुरंगा ॥
टाळांचा तो नाद । मृदुंगाची साथ ।
हरिनामे वाट । उजळली ॥
दिंडीचा तो मेळा । प्रेमाचा सोहळा ।
भेदाभेद गेला । नामघोषे ॥
सेवा करी जन । मानिती नारायण ।
वारीचे कारण । प्रेम एक ॥
इंद्रायणी भाव । चंद्रभागा ठाव ।
विठ्ठलाचा गाव । अंतरी ॥
दोन दिवसांचा । लाभला हा योग ।
भक्तीचा संयोग । सर्वांसी ॥
धन्य पुण्यभूमी । वारकऱ्यांची माऊली ।
चरणधूळी झाली । भाग्यवंत ॥
विठ्ठल विठ्ठल म्हणे । ओलावली वाचा ।
पुण्यनगरी साचा । पंढरीचा ॥
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 16, 2026
असं म्हणतात ना...
आपली शांतता समजून घेणारं एखादं मन भेटलं,
तर दुःखाला शब्दांची गरजच उरत नाही.
काही नाती अशी असतात,
जिथे नजरा बोलतात,
आणि मनाच्या खोल कप्प्यात दडलेले हुंदके
न बोलताही ऐकू येतात.
तो विचारत नाही,
"काय झालं?"
तो फक्त जवळ असतो...
आणि त्याच्या त्या निःशब्द सहवासात
मन हळूहळू हलकं होत जातं.
अश्रूंना स्पष्टीकरण द्यावं लागत नाही,
हसऱ्या चेहऱ्यामागची वेदना लपवावी लागत नाही,
कारण त्याला आपल्या शांततेत दडलेलं
प्रत्येक वादळ ओळखता येतं.
जगाला भावना समजण्यासाठी
शब्दांची गरज भासते,
पण प्रेमाला
फक्त समजूत पुरेशी असते.
आणि जेव्हा मन थकून जातं,
डोळे नकळत ओले होतात,
तेव्हा तो अलगद हात हातात घेत म्हणतो,
"काळजी करू नकोस...
मी आहे ना...
तुझ्या प्रत्येक शांततेसोबत,
तुझ्या प्रत्येक वादळासोबत."
त्या चार शब्दांतच
साऱ्या वेदनांना आधार मिळतो,
आणि दुःखही
हळूच शांत होतं.
कारण...
काही नाती शब्दांनी जपली जात नाहीत,
ती जपली जातात
समजुतीने,
विश्वासाने,
आणि न बोलताही एकमेकांना
पूर्णपणे ऐकण्याच्या अद्भुत क्षमतेने.
ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
मो:- 9011841212
July 15, 2026
[dflip id="138030"][/dflip]
April 27, 2026
Kishor PDF New Post
May 11, 2026
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
June 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti