खरेदी केला सुंदर पक्षी, दाम देवूनी योग्य असे ते ।
नक्षीदार पिंजरा घेवूनी, शोभिवान केले घरातें ।।
प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं ।
पक्षानें मान टाकली, पडला होता तळात मरूनी ।।
क्षणभर मनी खंत वाटली, राग आला स्वकृत्याचा ।
अकारण हौस म्हणूनी, खरेदी केला पक्षी याचा ।।
किती बरे निच मन हे निराशा तयाला धन हानीची ।
पक्षानेतर प्राण गमविला, विषण्णता परि दुय्यम याची ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
November 4, 2016
अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।
जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
राजनीति अन् युद्धनीति ही ।
अवगत झाली सारी तिजला ।।१।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
नजीकच्या त्या देशामधूनी ।
रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
सामान्य जनाला जर्जर करुनी ।
हा हाः कार तो माजविला ।।२।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
परिस्थितीला जाणून घेतां ।
केवळ चौदा वर्षाकरीता ।।
राम वनी तो पाठवी माता ।
तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला
माता आणि राजधुरंदर ।
दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
इतिहास जिने घडविला ।।४।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
रावणवृत्ती महा असूरी ।
नष्ट केली तिनेच खरी ।।
मार्ग निवडले जरी कांटेरी ।
यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
धाडीला नसतां राम वनीं ।
मारीला असता रावण कुणी ?
स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 21, 2017
हे मुरलीधर मनमोहना
वेड लावतोस तूं कुणां कुणां ? //धृ//
तुझ्या भोवती नाचती गौळणी
भान त्यातर गेल्या हरपूनी
थकूनी गेल्या नाच नाचुनी
विसरुनी गेल्या घरदारानां //१//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
रमले सारे गोकूळवासी
पेंद्या, गोंद्या, सख्या, बन्सी
बागडती सारें तव सहवासी
करमत नाही तुजविण त्यांना //२//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
संसार सोडला राधेने
भारुनी गेली तव प्रेमानें
ध्यास घेतला तुझाच तिनें
तुजविण नव्हती दूजी भावना //३//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
मीरेचे तर प्रेम निराळे
विषालाही प्राशन केले
तुजसाठी सर्वस्व अर्पिले
कसा तारशी तुं भक्तांना //४//
वेड लावतोस तूं कुणां कुणां ?
हे मुरलीधर मनमोहना
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
November 23, 2017
प्रवास लोकलचा...
खिडकी जवळचे सीट
दोन सीट च्या मधली उभे राहण्याची जागा
फॅन खालचे सीट
दरवाज्यात उभे राहून हवा खाणे
सामान वर ठेवणारा स्वयंसेवक
गरजूना जागा देणारे दयाळू
कुठे उतरायचे ते सांगणारे गाईड
स्पेशल डब्बा आहे याची जाणीव असणारे आणि करून देणारे
चौथे सीट
मसाज घेत उभे राहण्याची धडपड
हाडे मोडतील ही भीती
मोबाईल, पाकीट मारले जाईल ही भीती
फाटलेले पत्रे आणि बॉम्बची भीती
धक्का-बुक्की, घाम, वास
दारूचा वास आणि धुंदी
गाडीतून पडून मरण्याची भीती
लाटेसारखा येणारा आणि जाणारा गर्दीचा दबाव
दुसऱ्याच्या पायात घातलेला पाय, घवले वळणे
खेटणे, दाबणे, बलात्कार, लाल-पांंढरी थुंकी, रक्त, शु, शी आणि उलटी
ढोलकी, टाळ आणि पत्ते
कोपरापासून तुटलेला की कापलेला हात
गुडघ्यापासून तुटलेला की कापलेला पाय
घुंगरू, डफ आणि नाच
शेम्बडी गोड बाळे आणि त्यांच्या अस्थीपंजर आया
मोबाइल गेम्स, डाउनलोड केलेल्या फिल्म्स, सिरिअल्स
भिकारी, व्यापारी, मवाली, गर्दुल्ले
बहुभाषिक शिव्या आणि भांडणे
चणे, शेंगा, आलेपाक, गोळ्या
चित्रांची पुस्तके, टाचण्या, पिना आणि रबर
खास कंपनीने स्वस्तात दिलेले
तीन सीटांवर निश्चिंत झोपलेली माणसे
दरवाजात मांडी ठोकून बसणारी माणसे
स्थितप्रज्ञ गार्ड आणि ड्रायव्हर
टपावरची माणसे
आणि चाकाखालचीही माणसे
प्रेत आणि नवजात
सुख आणि दुःख
माझे आणि तुझे
मान आणि अपमान
अभिमान आणि दुराभिमान
चांगले आणि वाईट
स्वच्छ आणि घाण
आणि आपले स्टेशन आले की...
एका क्षणात
सगळा खेळ खल्लास...
अगदी थेट आयुष्यासारखा
-- शुभराज बुवा
December 25, 2018
कल्लोळ मनभावनांचा
सावट, निमिष वेदनांचे
अंतरंगात, सावळबाधा
नेत्री उपवन भावफुलांचे ।।
ऋतूगंधली, कुसुमसुमने
गंधाळ सारा प्रीतभारला
उमलता, नित्य शब्दफुले
प्रणयगंधी गुछय फुलांचे ।।
शब्दाशब्दात, भास तुझा
मनी भावनांचे चंद्रचांदणे
ओठी झरते काव्यप्रतिभा
भावनांत थेंब गंगाजलाचे ।।
देहात नांदते, तूं कुमुदिनी
आळविता मीच प्रतिभेला
शृंगारुनी, प्रसवे शब्दगीता
भाग्यच! हेची मम भाळीचे ।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २३.
२३ - १ - २०२२.
February 2, 2022
कपाशीचे ढिग अगणित विखुरले दिसती आकाशीं
मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।।
कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें
दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।।
पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज राखण्या मानवाची
गरिब बिचारा विवस्त्र तो किव करावी वाटे त्याची ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
March 10, 2019
कोरड्या सोपस्काराचे कोरडेच झरे
वैराण वाळवंटातील भगभगीत वारे
नात्यांचे आखीवरेखीव बंध काही
आपुलकीचा आनंद गंध नाही
हास्याच्या कृत्रिम कवायती या
अंतरीचा त्यात उन्माद नाही
भावनांना यांच्या ओल नाही
जिव्हाळ्याचे कुठे बोल नाही
आटलेल्याच मनोनद्या साऱ्या
पात्र कुणाचेच खोल नाही
आपुलकीची ओसरतीही सर नाही
भावनांना कुणाच्याही घर नाही
अहिल्याच्या शिळांना तर आता
कुणा श्रीरामाचा कर नाही
काळजात सल कधी उठत नाही
आतड्यातही यांच्या का तुटत नाही
मनं कशी कुणात गुंततच नाही
नाती जुळलीच जर, तर कळत नाही
देणगी भेटी, दिखाव्याचा महापूर
भावनेचा ओलावा नाही ताकास तूर
कातळात उमलत नाही आज अंकुराचा अंश
सुदाम्याच्या पोह्यांचा झाला केव्हाचा निर्वंश
कोरडा मी, कोरडा तू, कोरडपाषाण सारे
विमनस्क अशा आभाळी विखुरले तारे
नाळ आमची लुप्त झाली होऊनी शततुकडे
पताका प्रगतीची मिरविती मनाचे हे नागडे
नव्या युगाचे श्रीमंत भिकारी आम्ही
भावनांचा बाजार मांडाया सज्ज होतो
रसरशीत कांतीच्या चालत्या बोलत्या
मडद्यांच्या गर्दीत सामावण्या धावतो
(आजच्या व्यवहारी (केवळ व्यावहारिक?) जगामध्ये वावरताना पुष्कळदा एक तटस्थ कोरडेपणा जाणवतो. माणसं सारी चांगलीच असतात - वाईट मुद्दामहून कुणीच वागत नाही. पण आपलं असं कुणीच वाटत नाही. अगदी नात्यातसुद्धा वैर कुणाचंच नसतं पण प्रेमही कुणी करत नाही. एक प्रकारचा भौतिक रोखठोकपणा, कोरडेपणा प्रत्येक व्यवहारातला भावनिक ओलावा-आपुलकी फार झपाट्याने शोषून घेत आहे. काळ जसजसा पुढे जात आहे तसा हा कोरडेपणा फारच प्रकर्षाने जाणवतो. कोरडेपणातच जन्म झालेल्या नवनव्या पिढींना कदाचित तो भासणारही नाही पण ज्यांनी भावनिक ओलावा अनुभवला असेल त्यांना ही रखरखीत माध्यान्हं फारच जड जात असतील.)
- यतीन सामंत
August 28, 2022
ना.धो.महानोर सर भावपूर्ण श्रद्धांजली
गेला अस्तालं सुरयं,काळवंडलं आभाळं
जिवं झाला कासावीसं,झाला काळुख आंधारं
उजेडाची हि लेखनं,कशी रूकली रूसली
आज सरोसती माय,हुंदका फोडून रडली
झाली पोरकी कविता, रानी आंधार आंधारं
कुठं शोधु तुलं आत्ता,कुठं गेलासी सोडूनं
युगां पडलं भगदाडं,झाला युगांत युगांत
वलावल्या पापण्यां त्या,वघळत वघळती
अवकाश मोठा झाला,त्यालं तुहीच गरजं
ये रे आता परतुनी,उजवं सरू मायची कुसं
©गोडाती बबनराव काळे
9405807079
August 4, 2023
काय म्हणू ग तुजला देवकी
भाग्यवान की अभागी
ईश्वर तुझीया उदरी येवूनी
सुख न लाभले तुजलागी //
जन्मोजन्मीचे पुण्यसाचुनी
मात्रत्व लाभे स्त्रिजन्माला
तु तर असता जननी प्रभूची
तुजविण श्रेष्ठ म्हणू कुणाला //
राज वैभवी वरात निघता
कारागृही तुज घेवून गेले
अवताराची चाहूल असूनी
दुःखी सारे जीवन गेले //
कंसाने तव मुले मारीली
निष्ठूर होऊनी स्वार्थापोटी
तु गिळून घेशी दुःखे सारी
आगमन प्रभूचे होण्यासाठी //
ईश्वर येता तव उदरी
भाग्यवान तू ठरलीस
जनकल्याणा त्यागूनी त्याला
सर्व श्रेष्ठपदी गेलीस //
July 20, 2013
संबंध राहो किंवा न राहो,
मनातल्या धाग्यांना कोण तोडणार आहे?
शब्द जरी थांबले ओठांवर,
नजरेतलं बोलणं कोण रोखणार आहे?
तुझं गुपित माझ्या शांत श्वासांत आहे,
जसं चांदणं लपलेलं असतं ढगांत.
रात्रीच्या काळोखाला सांगितलं तरी,
पहाट त्याचा अर्थ उलगडत नाही कधीच.
वाटा वेगळ्या झाल्या तरी,
आठवणींची पाऊलखूण मातीवर राहतेच.
तुझं नाव न उच्चारताही,
मनातली हाक ऐकू येतेच.
काळ सरो, ऋतू बदलो,
कथा नवी उलगडो आयुष्याची,
पण तुझं गुपित माझ्या हृदयात
दीपासारखं अखंड तेवत राहील.
आणि जेव्हा हा श्वासही थांबेल कधीतरी,
माझ्यासोबतच ते गुपितही शांत झोपी जाईल,
या जगाच्या पल्याड,
माझ्या अस्तित्वासह कायमचं चिरंतन शांत होईल.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे
June 13, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti