माझं तिच्यावरती प्रेम आहे..
तिचंही माझ्यावर प्रेम आहे..
तिला व्यक्त व्हायला वेळ नाही..
हेही एक अव्यक्त सत्य आहे..।।..१
सर्वांचीच मनांतरे जपण्याचा..
तिचाच निष्पाप स्वभाव आहे..
मला ती नेहमीच गृहीत धरते..
मीही सारे सारे जाणून आहे..।।..२
मुलं,सुना,नातवंड, सासुसासरे..
शेजारी पाजारी , नातेवाईक..
सर्वांनाच नेहमी ती जीव लावते..
निरपेक्ष सर्वांसाठी जगते आहे..।।..३
धावपळीत सरतो सारा दिवस..
थकून निपचित निजूनी जाते..
अशी श्रमिका भोळी भाबडी..
तिजवर माझे नितांत प्रेम आहे..।।..४
आनंद देण्यातच , सुख असतं..
तिच्या नजरेतुन मौन ओसंडतं..
म्हणते ,आपलं नातं युगांयुगांचं..
असेच मैत्रप्रेम मी जगतो आहे..।।..५
कधीही कसलंच मागणं नाही..
इथं आपलं तसं काहीही नसतं..
सत्य तिला कळून चूकलं आहे..
निर्मोही जगणं तिला जमलं आहे..।।..६
हे निर्व्याज निर्हेतुक प्रेम लाभणं..
हेच एक , भाळीचं संचित आहे..
सुख म्हणजे दुसरं असतं काय ?..
हे मी समजून उमजून जगतो आहे..।।..७
©️ वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
(गुढीपाडवा. शके १९४३)
रचना क्र. ५६ / १३ - ४ - २०२१
May 27, 2021
निरपेक्ष, निस्वार्थी जीवन
मुलमंत्र परमानंदी सुखाचा
जे घडते, ती प्रभुची ईच्छा
करू नये, संताप जीवाचा
स्वेच्छेने, जगु द्यावे सकला
जगणे अधिकार प्रत्येकाचा
अटकाव, बंधनांचा नसावा
हाच विवेकी मार्ग शांततेचा
मन:शांती! केवळ तडजोड
नसावा संघर्ष वादविवादाचा
सूत्र, मौनं सर्वार्थ साधनम
मुलमंत्र! हाची धागा सुखाचा
सर्वांशी सदा सुखानंदी रहावे
मनी रुजावा मुलमंत्र सुखाचा
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ४७.
१४ - २ - २०२२.
March 2, 2022
मनी घोंगावते मोहोळ स्मृतींचे
जेंव्हापासूनी मज कळु लागले
मनहृदयी! ती सारीच ऋतुचक्रे
आज सारे सारे, आठवू लागले।।
वात्सल्य,प्रीत,मैत्र, सखेसोयरे
पुन्हा, या जीवा खुणावू लागले
क्षण सारे सारे, हृदयी कोरलेले
गुज अंतरी, आजला उकललेले।।
सुख, दुःख, आंनद, जिव्हाळा
भोग सारेच, जे प्राक्तनी लाभले
बंद पापण्यातुनी, सारे तरळलेले
अव्यक्त मनीचे, आज सांडलेले।।
रुजले, फुलले, गंधाळले जीवन
असाध्य, ते सारे दैवयोगे लाभले
खेळलो, बागडलो, मोठे झालो
वाटते, व्हावे ऋणातूनी मोकळे।।
-- वि ग सातपुते(भावकवी)
9766544909
रचना क्र ४२.
१० - २ - २०२२
February 26, 2022
मारल्या मोठ्या मोठ्या बाता
मतदार राजा भुलला भुलला
भारतिय जनता पक्ष म्हणाला "मै यु करूंगा,त्यू करूंगा"
ओढली साऱ्याच पक्षांनी याचीच री...
फरक थोड्या दोन-चार शब्दांचा
"भुतो न भविष्यती"
ऐसा काहीसा चमत्कार झाला
वाघावर स्वार व्हायला कमळ राजी झाला
"काय तुझ्या मनात,सांग माझ्या कानात"
गुज-गोष्टीचा डाव नाहीच रंगला
फिफ्टी -फिफ्टीचा मामला नाही कुणास रुचला
एकमेकांवर कुरघोडी करतांना कर्तव्याची भाषा विसरला
"अशी ही बनवाबनवी"
टेलीफिल्म बनवू लागला
नेत्यांचे पक्ष,पक्षांचं राजकारण,त्यातला मतदार पिंजऱ्यातला पक्षी झाला
हसावं की रडावं हेच त्याला कळेना
भरवशाचा आहे कोण?ह्याचं उत्तर सापडेना
हक्कासाठी फडफड चाले दिन रात
केविलवाणा दाता बुडतोय कर्जात
"मतदानाचा हक्क बजावणे"
"जणू लष्कराच्या भाकऱ्या भाजणे"
असला पोरखेळ नको रे बाबा
थेरं तुमचे पुरे झाले
"घर का ना घाटका"
असे वागवून राजकारणी मुढांनो
लोकशाहीचे वस्त्रहरण थोपवण्या
निश्चित जन्मणार द्वारकेचा द्वारकाधिश रे
-- सौ. माणिक शुरजोशी
नाशिक
November 19, 2019
दारु, बिडी-सिगार, अफू,
गांजा, त्यांचा राजा गर्द !
लत लागतां, कित्येक संसार,
त्याने केले सारे बरबाद ।।१।।
अजगराच्या विळख्याहूनी,
महाभयंकर सत्य
एक नव्हे, अनेक सारे,
नष्ट होतील त्यांत ।।२।।
होत आहे उध्वस्त आमची,
तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये,
गुंतली जी सगळी ।।३।।
जाणूनी घ्या त्या शत्रुला,
छुपा रुस्तूम तो
प्रवेश एकदा शरिरीं मिळतां,
कायमचा तो राहतो ।।४।।
सहज काढून टाकीन त्याला,
नका करुं वल्गना
घेऊन जाईल प्राण तुमचे,
हीच त्याची गर्जना ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
June 2, 2016
"तुझ्याच स्वप्नात रंगले मी"
साजणा, तुझीच स्वप्ने पाहत होते
तुझ्या स्वप्न-प्रेमात मी दंग होते
अवचित नयन उघडता नवल घडले,
साक्षात तुझ्या मिठीत मी उभी होते.
अजुनी अर्धोन्मीलित नेत्र माझे
त्या आवडत्या धुंदीत विसावलेत
ही तुझी मिठी, हा तुझा स्पर्श,
अजुनी मला स्वप्नवत भासताहेत.
नको करूस आग्रह डोळे उघडण्याचा
असेच मला तुला पाहू दे
तुझ्या हाताची कव माझ्या कटीभोवती,
अशीच आयुष्यभर राहू दे.
..मधु दारसेवाड..
May 22, 2022
December 1, 2021
सुरेश भटांची "एवढे दे पांडुरंगा.." ही कविता अगदी मन लावून वाचा..
मनात कुठेतरी जाणवेल की, दान तर उदात्त असतेच पण 'मागणं' देखील किती उदात्त असू शकते..!!
माझिया गीतात वेडे
दु:ख संतांचे भिनावे;
वाळल्या वेलीस माझ्या
अमॄताचे फूल यावे !
आशयांच्या अंबरांनी
टंच माझा शब्द व्हावा;
कोरडा माझा उमाळा
रोज माधुर्यात न्हावा !
स्पंदने ज्ञानेश्वराची
माझिया वक्षांत व्हावी;
इंद्रियांवाचून मीही
इंद्रिये भोगून घ्यावी !
एकनाथाने मलाही
बैसवावे पंगतीला;
नामयाहाती बनावे
हे जिणे गोपाळकाला !
माझियासाठी जगाचे
रोज जाते घर्घरावे;
मात्र मी सोशीन जे जे
ते जनाईचे असावे !
मी तुक्याच्या लोचनांनी
गांजल्यासाठी रडावे;
चोख वेव्हारात मझ्या
मी मला वाटून द्यावे !
ह्याविना काही नको रे
एवढे दे पांडुरंगा !
ह्याचसाठी मांडीला हा
मी तुझ्या दारात दंगा !
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा..!!
-गणेश साळुंखे
9321811091
July 15, 2016
एके दिवशी प्रात:काळी, क्षीरपात्र घेवून हाती
धेनूचे ते दूध आणावया, गेलो गोठ्यावरती
बघूनी तो अवाढव्य गोठा, चकित झालो
गाई वासरातील प्रेम देखूनी, मनी आनंदलो
गवळ्यांची धावपळ, चालली गोठ्यामध्ये त्या
चारा, कडबा गवताच्या, गंजी तेथे होत्या
अधूनी-मधूनी कुणीतरी, झाडती कचरा
शेण मातीचा होई तेथे, सतत पसारा
उग्र दर्प दरवळत होता, त्या परिसरी
कोंदटलेले वातावरण उबग आणि उरी
विषण्ण मनाने सहन करित, उभा ठाकलो
क्षीर पात्रातील दुग्धांमृत बघूनी, एकदम गहिंवरलो.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 22, 2020
भटकतो आहे कवि विचारांच्या सागरांत
वाहात चालला आहे व्यवहारी जगांत
आधार नाही त्याला पैशाच्या शक्तीचा
कुचकामी ठरत आहे प्रयत्न त्याचा जगण्याचा
अर्धपोटी राहात असतो भाकरीच्या अभावी
लिहीत चालला आहे काव्यरचना प्रभावी
उदासपणे बघतो आहे " हाऊस फूलची " पाटी
लिहीली होती नाट्यगीते त्यानेच सर्वासाठी
टाळ्यांचा तो कडकडाट बाहेर ऐकू येई
उपाशी होते त्याचे पोट खिन्नतेने निघून जाई
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
June 16, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti