वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.
July 1, 2023
आज एका माजी सहकाऱ्याचे लग्न होते म्हणून सुट्टी घेतली होती..... जेवणाची कटकट मिटली म्हणून सौ. हि खुश होती .
निखिल माझ्याच डिपार्टमेंटमध्ये ट्रेनी म्हणून जॉईन झाला होता. तीन वर्षात खूप काही शिकला. काम करता करता पुढे शिकत राहिला आणि मग हळू हळू एक एक जॉब बदलत आता मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर जाऊन बसला होता.
गुरू म्हणून माझे नाव सर्वाना सांगायचा.
अर्थात मी काही शिकवले नव्हते त्याला, पण वेळोवेळो मार्गदर्शन केले होते.आज त्याचेच लग्न होते. तीन वेळा फोन करून आठवण करून दिली म्हणून सपत्नीक जाण्याचे ठरविले.
दादरमधील चांगल्या हॉलमध्ये लग्न होते.आम्ही तिथे पोचलो. तेव्हा सगळी मंडळी फेटे घालूनच वावरत होती. हॉलबाहेर नेहमीप्रमाणे फेरीवाले, दोन चार भिकाऱ्यांची गर्दी दिसत होती .....
मला पाहून स्टेजवर धार्मिक विधीसाठी बसलेल्या निखिलने हात हलविला आणि शेजारच्याला खूण केली. ताबडतोब त्याचा मित्र आमच्या स्वागताला आला. मऊशार कोचावर बसून आम्ही सोहळा पाहत राहिलो .....
त्यांच्या आदरातिथ्य्याने सौ. एकदम खुश झाली होती . मुलीकडची बाजू हि पैसेवाले दिसत होती . सरबत आणि स्नॅक्सचा आस्वाद घेत आम्ही कौतुकाने सर्व निरीक्षण करीत होतो .
लग्न लागले आणि थोड्या वेळाने त्याचा मित्र येऊन म्हणाला "काका रिसेप्शनला वेळ आहे तो पर्यंत जेवून घ्या .
वेगवेगळे स्नॅक्स आणि सतत सरबत पिऊन माझे पोट गच्च झाले होते.
पण फार वेळ बसणे बरे दिसत नाही शिवाय उशीरहि झाला असता म्हणून उठलो आणि खाली आलो .......
"अबब!!!, सौ कौतुकाने उद्गारली.....
कारण तो थाटमाट पाहून थक्क झाली. जवळ जवळ वेगवेगळ्या पदार्थांचे 20 काउंटर मांडून ठेवले होते . स्वच्छ ,चकचकीत ड्रेस घातलेले वेटर इथे तिथे फिरत होते. युनिफॉर्म घातलेल्या सुंदर मुली पाहुण्यांची विचारपूस करीत फिरत होत्या .
पंचपक्वाने म्हणजे काय ते आज कळले मला.... हातात डिश घेऊन मी सगळ्या काउंटर वरून फिरू लागलो.....
तुम्हाला सांगतो राव एकही पदार्थ कधी घरी बनवून खाल्ला नव्हता असे सर्व पदार्थ होते .
सौ. ने हात खेचत म्हटले "आहो जरा दमाने घ्या, मिळते म्हणून सर्व घेऊ नका, मग फेकून द्याल "
मी लक्ष न देता माझी डिश पूर्ण भरून घेतली आणि कोपरा गाठत शांतपणे जेवायला सुरवात केली. थोडे खाल्ल्यानंतर माझे पोट गच्च झाले.......
अधिक काही खाववेना. नाइलाजाने मी ती अर्धी भरलेली डिश फेकून द्यायला गेलो. रिकाम्या डब्याजवळ एक माणूस उभा होता........
माझ्याकडे प्रसन्नपणे हसून पाहत हातातील डिश घेतली आणि म्हणाला
"सर , रागावणार नसाल तर एक सांगू ??
अतिशय सभ्य माणूस दिसत होता म्हणून मी होय म्हटले
" हि तुमची डिश आहे ना ??
" होय, मी परत उत्तरलो .
" हे उरलेले जेवण मी तुम्हाला पार्सल करून देऊ का ?? म्हणजे तुम्ही घरी नेऊन संध्याकाळीहि जेवू शकाल "
मी चकित झालो .थोडा राग हि आला. त्याच रागात बोललो
"आहो थोडे राहिले अन्न ?
काय हरकत आहे .
नाही अंदाज आला.
म्हणून काय घरी न्यायचं" ??
"रागावू नका" तो गोड हसत म्हणाला.
हे मोठ्यांच लग्न आहे. पैश्याची बिलकुल काळजी करू नका असे सांगितले आहे आम्हाला. हजार माणसांच्या जेवणाची ऑर्डर म्हणजे. बाराशे माणसांचे जेवण बनविले आम्ही. कितीतरी अन्न उरणार, मग बाहेर बसलेल्या पंधरावीस भिकाऱ्यांना देऊ .आमची 25 माणसे. पण तरीही अन्न उरणारच. आणि तुम्ही हे वाया घालवलेले अन्न!! त्याचे काय ?? राग मानू नका. पण आज हजार लोकांच्या जेवणासाठी गेले चार दिवस आम्ही मेहनत करतोय, उत्कृष्ट प्रतीची भाजी, मसाले खरेदी केले आज पहाटे चार वाजल्यापासून माझी माणसे तुम्हाला वेळेवर आणि उत्तमप्रतीचे चविष्ट जेवण देण्यासाठी राबतायत..
होय, त्यासाठी आम्ही मागू तेव्हढे पैसे तुम्ही दिलेत हे मान्य आहे. पण सर्व गोष्टी अश्या पैशाने नाही मोजता येत. आज अशी अर्धवट भरलेली डिश डब्यात फेकून दिलेली पाहून जीव तुटतो आमचा .....
म्हणून आम्ही हि शक्कल लढवली, हॉटेल मध्ये कसे तुम्ही डिशमधील अन्न पार्सल द्यायला सांगता".....
का ???
कारण तुम्ही पैसे मोजले असता मग इथे का नाही ?? कारण ते दुसऱ्यांने दिले म्हणून का ??
" आणि हो, यातील काहीही यजमानांना माहित नाही.
हे आम्हीच ठरविले आहे . त्यामुळे तुम्ही यजमानांना दोष देऊ नका. पटले तर तुमचे अन्न आणि अजून त्यात थोडी भर टाकून घरी घेऊन जा नाहीतर डिशमधील अन्न पूर्ण खा ." मला काही सुचेना काय बोलावे. थोडी लाज हि वाटली आणि पटतही होते .
खरेच भारतात काय आज संपूर्ण जगात अन्नासाठी लोक भटकतायत आणि आपण इथे कोरड्या मनाने फेकून देतोय......
इतक्यात सौ .म्हणाली "बरोबर बोलताय भाऊ , ह्यांना काय कळते किती मेहनत असते यामागे . हवे तसे घ्यायचे आणि उरलेले फेकून द्यायचे तेव्हा करण्याला किती वेदना होतात. द्या तुम्ही ते पार्सल आम्हाला. आता रात्रीचे जेवण होईल. मेहनत, इंधन सर्व काही वाचेल. थोड्या वेळाने आम्ही वर वधूला आशीर्वाद देऊन पार्सल घेऊन बाहेर पडलो .......
(आता बोला आहे का तुमची असे वागण्याची मानसिकता..एक तर जेवढी भूक असते त्यापेक्षा कमीच पानात घ्यावे, अजून लागले तर ना नाहीच....पण भुभूक्षीतासारखे भसाभसा पान भरून घेवून दुसऱ्याच्या तोंडचे अन्न वाया घालवण्यासारखा माजोरडेपणा नाही...)
मग एक तर ती भिकारी भोजन पद्धत बंद करून पाने वाढा अन्यथा अन्नावाचून, अन्न पिकवणारा आत्महत्या करतोय.......खाऊन माजावे, टाकून नाही......
-- संकलन : अमित कुलकर्णी
मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.
June 14, 2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1
हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.
आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.
जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.
देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.
या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.
यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.
जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.05.2017
May 26, 2017
आपण ग्रामपंचायतीच्या निवडणुकात 96 कुळी असतो, आमदारकीला मराठा असतो, आणि दंगलीत कट्टर हिंदू असतो...
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात बौद्ध असतो, गल्लीत महार असतो, गावात मागास असतो, शिक्षणात 'कॅटेगरी'वाला असतो.. आणि राजकारणात पँथर असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण घरात सारस्वत असतो, गावात ब्राह्मण असतो, शहरात हिंदू असतो, आणि धर्मांध दंगलींचा मास्टरमाईंड असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण गावात साळी माळी धनगर वंजारी असतो, निवडणुकीत फक्त एक मतदार असतो, आणि दंगलीत दगड उचलणारा माथेफिरू असतो..
मग आपण भारतीय कधी असतो..?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण भारतीय कधी असतो.?
आपण फक्त सैनिक मेल्यावरच् आपण "भारतीय" होतो...
... फक्त दोन मिनिटांसाठी !!
*फ़क्त वाचु नका...!
विचारही करा....!!*
September 28, 2016
समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥
सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥
हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥
माथा मुकुट मणी कानी कुंडले ।
सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।
नागबंद सोंड-दोंद मिराविले ।
विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥
चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।
खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।
सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।
अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥
छत्रे चामरे तुजला मिरविती ।
उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।
ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।
आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥
ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।
ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।
ताल मृदंग वीणा घोर उमटती ।
त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना
॥ जय ० ॥ ७ ॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥
!!गणपती बाप्पा मोरया!!
September 8, 2016
आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते.
June 14, 2023
ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत का जेणेकरून असे केल्याने वाहन उद्योगाची मंदी निघून जाईल.
August 31, 2019
रमाबाईं रानडेचं आजपर्यंत चालू असलेलं महत्त्वाचं काम म्हणजे सेवासदन संस्था. रमाबाई रानडे यांच्या ‘सेवासदन’नेच पहिली नर्स देशाला दिली.
October 2, 2021
लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे.
टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाटय़ाखालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.
औषधी गुणधर्म
कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.
उपयोग
० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
० रक्ताची कमतरता (अॅयनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅयसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.
सावधानता
टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. शारदा महांडुळे
March 14, 2017
आजच्या इतिहासात १४९ वर्षांत पहिल्यांदाच बंद होणार "टाटा समूहाची" कंपनी "टाटा टेलिसर्व्हिसेस"..?
विश्वासाचं दुसरं नाव म्हणून देश ज्या उद्योगसमूहाकडे बघतो, त्या "टाटा" समूहातील एक कंपनी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत असल्याचं समजतं. दूरसंचार क्षेत्रातील " टाटा टेलिसर्व्हिसेस / Tata Teleservices" या कंपनीला अपेक्षित यश मिळत नसल्यानं ती बंद करण्याचा विचार व्यवस्थापन करतंय. तसं झाल्यास, टाटा समूहाच्या १४९ वर्षांच्या इतिहासात, अपयशामुळे बंद करावी लागलेली ही पहिलीच कंपनी ठरेल.
गेली काही वर्षं टाटा टेलिसर्व्हिसेस सातत्याने तोटा सहन करतेय. त्यातच, या कंपनीतील आपली २६ टक्के भागीदारी 'डोकोमो' या जपानी कंपनीनं काढून घेतलीय. दूरसंचार क्षेत्रातील वाढती स्पर्धा पाहता, स्वबळावर बाजारात टिकून राहणं "टाटा टेलिसर्व्हिसेस" साठी खूपच कठीण आहे. अशावेळी वेगवेगळ्या पर्यायांचा ते विचार करताहेत. पण, फारशा सकारात्मक हालचाली दिसत नसल्यानं अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी 'पॅक-अप'चीच तयारी सुरू केल्याचं कळतं.
अर्थात, टाटा टेलिसर्व्हिसेस बंद केल्याचा फटका टाटा सन्सला नक्कीच बसेल. कारण, या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज देणाऱ्या बँका आणि इतर संस्थांनीही आता वसुलीसाठी तगादा लावला आहे. टाटा समूहाची एखादी कंपनी अशा प्रकारे अडचणीत सापडल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. मोबाइल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसनं भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली. पण त्यातही त्यांना अपयशच आलंय. त्यामुळे आता आणखी किती काळ थांबायचं, असा विचार श्रेष्ठींनी सुरू केलाय. टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम ते फेडू शकतात.
चला जाणून घेऊया टाटा टेलिसर्व्हिसेस बद्दल...
** About "Tata Teleservices Ltd"...
Tata Teleservices Limited spearheads the Tata Group’s presence in the telecommunication sector. It is one of India’s leading mobile telecom service providers delivering mobile connectivity and services to consumers across the country. The company has been at the forefront of redefining the telecom experience in India, launching innovative products and services, playing an enabling role in simplifying consumer lives and expanding digital inclusion.
Tata Teleservices Limited, along with Tata Teleservices (Maharashtra) Limited has a wide presence across key geographies, spanning over 19 telecom circles and operations in towns and villages across the country. The company offers integrated telecom solutions to its customers across wireline and wireless networks on GSM, CDMA & 3G platforms.
In 1996, Tata Teleservices Limited was the pioneer of the CDMA technology platform in India. It embarked on a growth path after the acquisition of Hughes Tele.com (India) Limited [renamed Tata Teleservices (Maharashtra) by the Tata Group in 2002. Being a part of the Tata Group, where customer-centricity is a way of life, the company revolutionised mobile voice calling through its philosophy of ‘pay per use’ in 2009. This initiative has been widely hailed as one of the biggest customer centric initiatives by any telecom operator in India.
In November 2010, Tata Teleservices Limited became the first private telecom operator to launch 3G services in India. Over the years, Tata Teleservices Limited has been a key driver of the telecom revolution in the country. Tata Teleservices Limited is one of the most reliable telecom service providers for its integrated voice and data services and is also a key player in mobile data usage segment.
Additionally, TTSL commands significant customer loyalty in the large screen data space with its Tata Photon family of CDMA, 3G and Wi-Fi products. In non-voice services, the company through its wide range of pioneering offerings such as e-Governance, Machine to Machine (M2M) and m-Remittance (m-Rupee) services, has helped in improving citizen services, public safety and governance.
Tata Teleservices Limited is a market leader in the Enterprise space with a wide range of products and services, and numerous innovations across business verticals. It provides next generation Voice, Data and Managed solutions to large and small medium enterprises through its wide optic fiber network, channel partner network, dedicated sales and service teams. Tata Teleservices Limited has won numerous national and global awards.
TTSL was named ‘The Best Emerging Markets Carrier’ by Telecom Asia and received 8 awards at the World HRD Conference, most notably the ‘5th Best Employer in India Award’. The company also received 3 awards at the Telecom Operator Awards 2010 from Telenet; Best Company, CEO of the Year, Best Quality of Service and the Business Standard Award for 'Most Innovative Brand of the Year'. Tata Docomo has also been recognised as the best ‘Utility VAS Service Provider’ and ‘Best Mobile Broadband Service Provider’ by Frost & Sullivan.
"चला जाणून घेऊया टाटा ग्रुप..रतन टाटा..सायरस मिस्त्रीं यांच्या बद्दल....
रतन टाटां प्रमाणेच अत्यंत खासगी आयुष्य जगणाऱ्या सायरस मिस्त्रींना टाटा समूहात हनिमुन पीरिअड मिळालाच नाही. टाटा समूहाची धुरा सांभाळायला लागल्याच्या पहिल्या दिवसापासून त्यांचा परीक्षेचा काळ सुरू झालेला होता. आपल्या मानेवर अपेक्षांचं केवढं मोठं ओझं आहे, हे सायरस मिस्त्रींना माहीत नव्हतं असं नाही. मात्र काळच मोठा कठीण होता. रतन टाटांनी सायरस यांच्या हातात ठिकठिकाणी जखमी झालेल्या पेशंटचा वारसा दिला होता. हा पेशंट त्यांच्या हातात आला तोच ओल्या जखमा घेऊन. त्यामुळे तो धावण्याची शक्यता सोडाच, त्याचं चालणंही मंदावलं होतं. या जखमांवर निव्वळ मलम लावण्यापेक्षा काही ठिकाणी शस्त्रक्रिया करणंच अधिक उपयुक्त असल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यामुळं मिस्त्रींनी कठोर निर्णय घ्यायला सुरूवात केली होती. तसे प्रयत्न त्यांनी गेल्या वर्षभरात जाणीवपूर्वक केले होते.
टाटा समूह नावाचा हा पेशंट बरा होऊन मॅरॅथॉनमध्ये धावू लागल्यानंतरच त्याला शंभर मीटरच्या वेगवान शर्यतीमध्ये उतरवावं लागणार होतं, पण रतन टाटांना मिस्त्रींच्या शस्त्रक्रियाची पद्धत पसंत पडली नाही. शस्त्रक्रियेच्या पर्यायावरच टाटांचा आक्षेप आहे.टाटा समूह १०० हून अधिक कंपन्या चालवतो. या कंपन्या एकूण ७ लाख १८ हजार कोटी रुपयांची (१०८ अब्ज डॉलर) उलाढाल करतात. त्यापैकी सुमारे ३० कंपन्या नोंदणीकृत आहेत. टाटा समूहाचं एकूण बाजारमूल्य ८ लाख ७३ हजार कोटी रुपये (१३० अब्ज डॉलर) आहे.त्यापैकी ७५ टक्के वाटा एकट्या टीसीएस(टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस) या आयटी क्षेत्रातील कंपनीचा आहे.
टाटांच्या एकूण उलाढालीपैकी निम्मी विदेशातून होते. त्यातही टीसीएसचाच वाटा सर्वाधिक आहे. ही एकमेव कंपनी टाटा समूहाला सध्या आर्थिकदृष्ट्या तारून नेताना दिसते. काही प्रमाणात ‘जग्वार लँड रोव्हर’ ही ब्रिटिश कारकंपनीही हातभार लावताना दिसते. टाटा समूहाच्या भात्यातल्या सुमारे दोन डझन कंपन्या प्रमुख मानल्या जातात. त्यातही टाटा स्टील, टाटा मोटर्स,टाटा पॉवर, टाटा टेलिसर्व्हिस, इंडियन हॉटेल्स (ताजची साखळी), टीसीएस या कंपन्या अधिक महत्त्वाच्या.त्यांचा कारभार भारतासह सहा खंडांतील देशांमध्ये चालतो, पण टीसीएस वगळता या बहुतांश कंपन्या प्रचंड तोट्यात आहेत.टाटा समूहाच्या विस्तारवादाला सायरस यांनी हळूहळूमर्यादा घालायला सुरुवात केली होती. ती अपरिहार्यताच होती. सायरस यांनी टाटा स्टील, टाटा मोटर्स, टाटा केमिकल्स या कंपन्यांच्या आफ्रिका खंडातील काही फॅक्टऱ्यांचा कारभार कमी केला.
टाटा केमिकल्सचा युरिया उत्पादनाचा बिझनेसही विकण्यात आला. इंडियन हॉटेल्सचा अमेरिकेतील ओरिएंट एक्स्प्रेस हॉटेल्स विकत घेण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्पही बासनात गुंडाळून ठेवण्यात आला. तोट्यातील कंपन्या विकून कर्जाचं ओझं कमी करण्यावर सायरस यांचा भर होता.रतन टाटासारखंच गाड्यांचं प्रेम सायरस मिस्त्रींनाही आहे रतन टाटांच्या काळात हातपाय पसरवत टाटा समूह ग्लोबल झाला. या धोरणाअंतर्गत टाटा समूहानं ‘कोरस’ ही युरोपमधील स्टील कंपनी ताब्यात घेतली, पण २००८ नंतरजगभर मंदी आली. युरोझोन आर्थिक संकटात सापडला. स्टीलला मागणी कमी झाली. स्टील उद्योगाला चीनच्या स्वस्त स्टीलशी स्पर्धा करावी लागली. अशा असंख्य अडचणीत टाटांची युरोपातील स्टील कंपनी अडकून पडली. मलमपट्टी करूनही ती चालवणं अशक्य झालं नसल्याचं मिस्त्रींचं मत होतं. त्यांनी ही कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेतला. टाटा समूहाच्या प्रमुखपदी आल्यापासून घेतलेला सायरस यांचा हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय होता. एका अर्थानं रतन टाटांचं स्वप्नच त्यांनी विकायला काढलं.या निर्णयामुळं पहिल्यांदा रतन टाटा आणि मिस्त्री यांच्यात वादाची ठिगणी पडल्याचं मानलं जातं. कोरसच्या विकण्यावरून युरोपात राजकीय वाद निर्माण झाला. काही हजार कामगारांच्या नोकरीवर गदा येणार होती.
ब्रिटिशातील राजकीय नेते, कामगार नेते टाटा समूहाच्या विरोधात बोलू लागले होते. टाटा नेहमीच स्वतःच्या प्रतिमेला जपतात. समूहावर कोणीही शिंतोडे उडवू नये याविषयी टाटा सदैव दक्ष असतात. ही दक्षता मिस्त्रींनी दाखवली नसल्याचं रतन टाटांचं मत झालं. कोरस विकत घेतल्यानंतर रतन टाटांनी कामगार कपात न करता ही कंपनी सुरू ठेवली. कंपनीच्या सीईओला निर्णयाचे अधिकार देण्यात आले होते. कोरस ही गळ्यातलं लोढणं असलं तरी ते तसंच वागवलं गेलं. ते काढून टाकण्याचं काम कुणालाही न दुखावता व्हायला हवं होतं, पण कोरसच्या प्रश्नाची हाताळणी रतन टाटांच्या अपेक्षेप्रमाणं झाली नाही असं आता दिसतंय. रतन टाटांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात जगभर तेजी होती. कंपन्या अधिक ग्लोबल करण्याचा, नव्या कंपन्या ताब्यात घेण्याचा, गुंतवणूक वाढण्याचा तो काळ होता. काळानुसार रतन टाटांनी निर्णय घेतले.
आता काळ बदलला आहे. मंदी सतावत आहे. अशा वेळी सुस्ती काढून कंपन्यांना चपळ बनवण्याशिवाय पर्याय नाही. ज्या कंपन्या आधाराविना चालू शकणार नाहीत, त्यांना फाटा देण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाही, असं मिस्त्रींचं मत बनलं. विविध समाजसेवी कार्यावर‘टाटा ट्रस्ट’दरवर्षी किती रक्कम खर्च करते..?रक्कम खर्च होणाऱ्या प्रकल्पांना अंतिम रूप कोण देते..?समाजसेवी कार्यावर ‘टाटा ट्रस्ट’ वर्षांला सुमारे ७५० कोटी रुपये खर्च करते. ‘टाटा सन्स’मधील ६६% मालकी हिच ‘टाटा ट्रस्ट’ची प्रमुख मालमत्ता आहे. ‘टाटा सन्स’कडून ‘टाटा ट्रस्ट’ला मिळणारा लाभांश हेच ‘टाटा ट्रस्ट’चे उत्पन्न आहे. आणि अर्थातच, समूहातील विविध कंपन्यामधून मिळणारा लाभांश हेदेखील ‘टाटा सन्सचे’ही प्रमुख उत्पन्न आहे.
‘टाटा ट्रस्ट’च्या विश्वस्त मंडळाचे सदस्य कोण आहेत..? ‘टाटा ट्रस्ट’कडे अनेक अनुभवसमृद्ध व्यक्ती आहेत. विश्वस्त संस्थेतील एकूण सदस्यांपैकी काही टाटा समूहा सोबत प्रदीर्घ काळापासून कार्यरत आहेत. तर उर्वरित व्यक्ती या टाटा समूहाबाहेरील असून स्वत:च्या क्षमतेवर यशस्वी झालेले प्रतिष्ठित व्यावसायिक आहेत. अशा या टाटा ट्रस्ट चे अधोगतीकडे वाटचाल होऊ नये म्हणून रतन टाटांनी सायरस मिस्री यांची तडकाफडकी या पदावरुन उचल बांगडी करण्याचा निर्णय घेतला गेला.
अर्थात, टाटा टेलिसर्व्हिसेस बंद केल्याचा फटका टाटा सन्सला नक्कीच बसेल. कारण, या कंपनीवर ३४,००० कोटींचं कर्ज आहे. हे कर्ज देणाऱ्या बँका आणि इतर संस्थांनीही आता वसुलीसाठी तगादा लावला आहे. टाटा समूहाची एखादी कंपनी अशा प्रकारे अडचणीत सापडल्याचं हे पहिलंच उदाहरण आहे. मोबाइल बाजारपेठेत चार टक्के हिस्सा असलेल्या टाटा टेलिसर्व्हिसेसनं भारती एअरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्याशी भागीदारीबाबत बोलणी केली. पण त्यातही त्यांना अपयशच आलंय. त्यामुळे आता आणखी किती काळ थांबायचं, असा विचार श्रेष्ठींनी सुरू केलाय. टेलिकॉम स्पेक्ट्रम विकल्यास कर्जातील बरीचशी रक्कम ते फेडू शकतात. पण अजून अंतिम निर्णय झाला नसल्याचं टाटा सन्सच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केलं.
-- गणेश उर्फ अभिजित कदम,
कुडाळ,सिंधूदुर्ग
( I was part of Tata Group, Worked with Tata Communications as Presales Solution Consultant since 2009 Till Dec'2016 )
September 19, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti