वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महागाई म्हणजेच Inflation आपल्या जीवनाचे आता एक अविभाज्य अंग बनले आहे. थोडक्यात महागाईचे भूत आपल्या मानगुटीवर कायमचे बसले आहे किंवा महागाई आपल्या पांचवीला पुजली आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.भारताला स्वातंत्र्य मिळाले व भारत एक विकसनशील देश ( Developing Country) बनला. जगामध्ये विकसनशील देशांमधील महागाई वाढीचे दर विकसित देशांमधील ( Developed Countries) महागाई वाढीच्या दरांपेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात असे आढळून आले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६३ वर्षे झाली. या काळात भारताने पुष्कळ प्रगती केली. आता तर भारत जागतीक आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने घोड दौड करीत आहे. असे असले तरी भारतातील महागाई वाढीचे दर अजूनही विकसनशील राष्ट्रांसारखेच आहेत व अजून कित्येक वर्षे ते तसेच राहतील असा या क्षेत्रातील तज्ञ मंडळींचा अंदाज आहे. २००४ मध्ये भारतात मंदी असल्यामुळे महागाई वाढीचा दर ४ टक्के एवढा खाली आला होता. तर सन २००८ मध्ये जागतिक मंदी असल्यामुळे भारतामधील महागाई वाढीचा दर, पहिल्यांदाच, शून्य तक्याच्या खाली गेला होता. अर्थात ही परिस्थिती फार दिवस टिकली नाही. हे दोन अपवाद वगळता भारतामध्ये महागाई वाढीचा दर वर्षाला ६% ते १२% मध्ये घोटाळतो आहे. अर्थात हे सरकारी आकडे आहेत. पण प्रत्यक्षातला महागाई वाढीचा दर या पेक्षा कितीतरी जास्त असतो असा सगळ्यांचा अनुभव आहे. विशेषतः जीवनावश्यक वस्तू जसे कि अन्न धान्य, डाळी, खाद्यतेले, किराणा भाजीपाला, स्वयापाकासाठी लागणारे इंधन, पेट्रोल, डीझेल, वैद्यकीय सेवा यांचे महागाई वाढीचे दर सरकारी आकड्यान पेक्षा नेहमीच जास्त असतात असे अनेकांचे म्हणणे आहे.
महागाई वाढली कि दोन गोष्टी घडतात. एकीकडे वस्तूंचे भाव वाढतात तर दुसरीकडे रुपयाचे अवमूल्यन होते. आज १०० रुपयांना मिळणाऱ्या वस्तूचा भाव उद्या १२० रुपये होतो. ही झाली भाव वाढ. तर उद्याच्या १०० रुपयांमध्ये आजच्या ८० रुपयांच्याच वस्तू येतील. हे झाले रुपयाचे अवमूल्यन. १९७५ साली पेट्रोलचा दर ५५ पैसे लिटर होता. त्यात १००% वाढ होऊन तो १रुपय १० पैसे लिटर झाला ( हल्लीच्या तरुण पिढीला ही गोष्ट एखाद्या परीकथे सारखी वाटेल). २०१० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५० रुपयांच्या वर गेला आहे. याच दराने २०२० मध्ये पेट्रोलचा भाव लिटरला ५०० रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पूर्वी एक लाख रुपयाला जी किंमत होती ती आज राहिली नाही. पूर्वी लाखोपती किंवा लक्षाधीश मंडळी श्रीमंत वर्गात मोडली जायची. आज ती मंडळी मध्यम किंवा उच्च मध्यम वर्गात मोडली जातात.
महागाई वाढली कि खर्च वाढतात. पूर्वी महागाईची झळ गरिबांना बसायची. पण आता महागाईची झळ मध्यम वर्गीयांबरोबर श्रीमंतांना पण बसू लागली आहे. बर्याच जणांचे आजचे उत्पन्न पुरेसे असल्यामुळे ते आजच्या महागाईला यशस्वीपणे तोंड देऊ शकतात. पण ते उद्याच्या महागाईला तोंड देऊ शकतील का याची त्यांना सुध्धा शंका वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला कसा करायचा हा यक्ष प्रश्न सर्वांपुढेच आहे .
उत्पन्न वाढवणे आणि खर्च कमी करणे हा महागाई शी मुकाबला करण्याचा सर्वात साधा, सरळ आणि प्रभावी उपाय आहे. पण तोच सर्वात जास्त अवघड व कठीण आहे. कारण ज्या प्रमाणात महागाई वाढते त्या प्रमाणात उत्पन्न वाढत नाही असा अनेकांचा अनुभव आहे. तसेच एकदा सुरु केलेला खर्च एकदम कमी करणे शक्य नसते. विशेषतः घेतलेली कर्जे फेडण्यासाठी, मुलाबाळांचे शिक्षण, कुटुंबाचा चरितार्थ चालवणे, कुटुंबाचे स्टेटस मेंटेन करणे, वैद्यकीय सेवा यांसाठी सुरु केलेला खर्च एका रात्रीत कमी करणे शक्य नसते. एखादी जादूची छडी फिरवावी त्याप्रमाणे सरकार महागाई आटोक्यात आणेल या आशेने अनेक जण सरकारकडे बघत आहेत. पण महागाई कमी करणे ही गोष्ट आता सरकारच्या नियंत्रणामध्ये राहिलेली नाही असे वाटते. त्यामुळे महागाई शी मुकाबला करण्यासाठी संपूर्णपणे सरकारवर अवलंबून न राहता वैयक्तिक पातळीवर सुध्धा प्रयत्न करणे आवश्यक झाले आहे. आणि हा मुकाबला अल्प काळासाठी नसून दीर्घ काळासाठी आहे याची जाणीव ठेवावी. मग महागाई शी मुकाबला कसा करायचा? या साठी दुसरा उपाय कुठला?
बचत; बचतीची चाणाक्षपणे केलेली गुंतवणूक ( Smart Investment) आणि त्यावर मिळणारा परतावा ( Returns) या त्रीसुत्रावर महागाई शी मुकाबला करणे शक्य आहे असे मला वाटते. तुम्हाला काय वाटते? तुमचे काय विचार आहेत? तुमच्या दृष्टीने महागाई शी मुकाबला करण्याचा दुसरा कुठला चांगला उपाय आहे कां?
तुमचे विचार जरूर कळवावेत ही नम्र विनंती!
-- उल्हास हरी जोशी
January 26, 2011
अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .
May 3, 2010
आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्यामुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यासही असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.
मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला तिचे नाव स्वराली ठेऊ, तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली असता, गाडीतून उतरून रस्ता ओलांडणे तिला जमत न्हवते. रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले कि येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत न्हवता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात इथे पोहोचेल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.
एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते, इतके कि, सायकल सुद्धा बिल्डिंग च्या आवारात फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेले सुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, या मुळे स्वराली सायकलवरून पडली, किव्वा घरात तिला थोडे हि लागले तरी, जोरजोरात रडते, कारण सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किव्वा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. आपण हि पिढी पंगू तर करत नाही ना? याचा विचार करा.
लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजूक मुले भविष्यात नाऊमेद , किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्ष शक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो, याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते, तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तू सुद्धा काढायला घाबरतात, उंच जागी चढताना आईच्या कडून धीर मिळत नाही तर पडशील, घसरशील, तुला जमणार नाही, उतर कुणालातरी बोलावून करूया, असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया, आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किव्वा वॅन मध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते. आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत याचे नवल वाटते.
पाश्चिमात्य देशात मुले आपल्या सायकल पंक्चर स्वतः दुरुस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते, यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर करून मुले आपली सायकल स्वतः दुरुस्त करतात.
नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किव्वा ड्रेस चे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळ प्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे. लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहेत.
हे सर्व शिकवले नाही तर, नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे,
पडे-झडे माल वाढे, हे खरोखरीच सत्य आहे.
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
June 8, 2017
‘दि ठोट इंडियन सर्कस’ अशा सार्थ शब्दांत ज्या प्रक्रियेचे वर्णन केले जाते, त्या लोकसभा निवडणूक प्रक्रियेस सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित करणे आणि मतमोजणीनंतर नवे सरकार सत्तारूढ होणे, असा साधारण तीन महिन्यांचा हा सोहळा असतो. निवडणूक आयोगाने पंधराव्या लोकसभेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे.
March 15, 2009
जगणे आणि जिवंत असणे या दोन मध्ये फरक आहे. केवळ श्वास घेणे म्हणजे जगणे नव्हे. उदरभरण तर पशु पक्षांचे देखील चालतेच. मात्र त्यासाठी खालील गोष्टी करण्याची माझ्यावर वेळ येऊ नये. ही आचार्यश्रींची मागणी अनेक अर्थाने चिंतनीय आहे.
August 2, 2020
देव-बीव सगळं झूट आहे..थोतांड आहे..'मेडिकल सायन्स' हाच खरा परमेश्वर आहे..गेल्या ५० वर्षांत मेडिकल सायन्स मुळे जेवढे प्राण वाचले असतील,तेवढे देवाने लाखो वर्षात कुणाचे वाचवले नाहीत..मला कीव करावीशी वाटते त्या लोकांची जे 'ऑपरेशन थेटर ' च्या बाहेरही देवाची प्रार्थना आणि स्तोत्र म्हणत बसतात.."-डॉकटर कामेरकरांच्या ह्या वाक्यावर, सभागृहात एकंच हशा उठला..डॉक्टर कामेरकर एका 'मेडिकल कॉन्फरन्स' मध्ये बोलत होते..डॉक्टर कामेरकर शहरातले निष्णात डॉक्टर..त्यांना भेटायला पेशंट्सच्या रांगाच्या रांगा लागत असत..
कॉन्फरन्स संपली आणि डॉक्टर घरी आले..वाटेतच त्यांच्या 'मिसेस' चा मेसेज होता कि "मी आज किटी-पार्टीला जात्ये..मुलं सुद्धा बाहेर गेली आहेत..जेवण डायनिंग टेबलवर काढून ठेवलंय..घरी गेलात कि जेवा"...डॉक्टर घरी आले..हात-पाय तोंड धुवून जेवायला बसले..जेवण आटोपल्यावर लक्षात आलं,कि बरंचसं जेवण उरलंय..आता जेवण फुकट घालवण्यापेक्षा कुणाला तरी दिलेलं बरं..म्हणून उरलं-सुरलेलं सगळं जेवण डॉक्टरांनी एका पिशवीत बांधलं आणि कुणातरी भुकेल्याला ते द्यावं म्हणून आपल्या बिल्डिंगच्या खाली उतरले..लिफ्ट मध्ये असताना, त्यांचंच भाषण त्यांच्या कानात घुमत होतं.."देव-बिव सगळं झूट आहे" -हे वाक्य त्यांच्याच भाषणातलं सगळ्यात आवडतं वाक्य होतं..डॉक्टर कामेरकर हे पक्के नास्तिक..देव अशी कुठलीही गोष्ट,व्यक्ती,शक्ती जगात नाही ह्यावर ठाम..जगात एकंच सत्य..'मेडिकल सायन्स'..बाकी सब झूट है'..
डॉक्टर स्वतःच्याच विचारात बिल्डिंगच्या खाली आले..जरा इकडे-तिकडे बघितल्यावर रस्त्यात थोड्याच अंतरावर कुणीतरी बसलेलं दिसलं..ते त्या दिशेने चालू लागले..जवळ आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं कि एक मध्यम वयाची बाई,आपल्या एका १०-१२ वर्षांच्या मुलाला कवटाळून बसली आहे.
ते पोर त्याच्या आईच्या कुशीत पडून होतं..ती बाई देखील रोगट आणि कित्येक दिवसांची उपाशी वाटत होती..डॉक्टरांनी ती जेवणाची पिशवी, त्या बाईच्या हातात टेकवली..आणि तिथून निघणार, इतक्यात ती बाई,तिच्या मुलाला म्हणाली "बघ बाळा..तुला सांगितलं होतं ना..आज आपल्याला जेवाया मिळेल..देवावर विश्वास ठेव..हे बघ..देव-बाप्पाने आपल्यासाठी जेवण धाडलंय"......हे ऐकल्यावर डॉक्टरांच्या तळ-पायाची आग मस्तकात गेली..ते त्या बाईवर कडाडले, "ओह शट-अप..देव वगैरे सगळं खोटं आहे..हे जेवण तुझ्यासाठी मी घेऊन आलोय..देव नाही..हे जेवण मी फेकूनही देऊ शकलो असतो..पण मी ते खाली उतरून घेऊन आलोय..काय देव देव लावलंयस..नॉन-सेन्स.."
"साहेब..हे जेवण तुम्ही माझ्यासाठी आणलंत ह्यासाठी मी तुमची आभारी आहे..पण साहेब..देव हा माणसातच असतो ना ? आपणच त्याला उगीच चार हात आणि मुकुट चढवून त्याला फोटोत बसवतो..माझ्यासाठी तर प्रत्येक चांगलं कर्म करणारा माणूस,हा देवच आहे..आपण त्याला फक्त चुकीच्या ठिकाणी आणि चुकीच्या पद्धतीने शोधाया जातो एवढंच..माझ्यासाठी तुम्ही 'देव'च आहात साहेब..आज माझ्या लेकराचं तुम्ही पोट भरलंत..तुमचं सगळं चांगलं होईल...हा एका आईचा आशिर्वाद आहे तुम्हाला.."
डॉक्टर कामेरकर, त्या बाईचं बोलणं ऐकून सुन्न झाले..एक रोगट-भुकेलेली बाई त्यांना केवढं मोठं तत्वज्ञान शिकवून गेली होती..आणि ते ह्याच विचारात डांग झाले कि ही गोष्ट आपल्या कधीच डोक्यात कशी काय आली नाही ? चांगली कर्म करणारा प्रत्येक माणूस हा देवच असतो...चांगल्या कर्मातच परमेश्वर आहे..चांगल्या माणसात देव आहे..प्रत्येक 'सत्कृत्यात' देव आहे हे आपल्या कधीच का लक्षात आलं नाही ? आपण 'देवावर विश्वास' ठेवा म्हणतो म्हणजे नक्की काय ? तर आपल्याला चांगली माणसं भेटतील,चांगली परिस्थिती निर्माण होईल ह्यावरच तो विश्वास असतो..डॉक्टरांनी एकदाच त्या बाईकडे वळून बघितलं..आपल्या भुकेल्या लेकराला ती माउली भरवत होती..त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून डॉक्टरांच्या डोळ्यांत पाणी आलं होतं..एक कणखर डॉक्टर त्या दोन अश्रूंत विरघळला होता...डोळे मिटून,ओघळत्या अश्रूंनी,डॉक्टरांचे हात नकळत जोडले गेले होते..
-- स्वरूप पुरुषोत्तम काळे
-- संकलन : अशोक साने
फेसबुक, WhatsApp यासारख्या माध्यमातून दररोज येणारे चांगले लेख तुमच्यासाठी शेअर करतो.. लेखकाचे नाव माहित नाही.
June 12, 2017
पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या या भेटीत भारत आणि नेपाळ दरम्यान सात करारांवर स्वाक्षर्या झाल्या. भारताने पूर्वी आश्वासन दिल्यानुसार, १४ जिल्ह्यांत उद्ध्वस्त झालेल्या ५० हजार घरांच्या पुनर्निर्माणासाठी शंभर दशलक्ष डॉलर्स; आरोग्य, शिक्षण आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रत्येकी ५० दशलक्ष डॉलर्स देण्यात येणार आहेत. भूकंपानंतर भारताने तराई भागात आधीच ८७ किलोमीटरचे नवे रस्ते बांधले होते, आता ५१८ कि. मी. लांब रस्त्यांचे निर्माण भारत करून देणार आहे; तसेच नेपाळला जोडणारे आणखी दोन महामार्ग निर्माण करण्यात येणार आहेत.
March 8, 2016
अमेरिकन डेअरी व्यवसायात झालेले दोन प्रमुख बदल म्हणजे:
- गायींची वाढलेली दुग्ध उत्पादन क्षमता; ज्यायोगे कमी गायींपासून अधिक दूध उत्पादन शक्य झालं आहे.
- डेअरी फार्मस्चा वाढत चाललेला आकार आणि त्याचबरोबर त्यांची घटत जाणारी संख्या.
२००८ साली अमेरिकन शेती व्यवसायामधे डेअरी उद्योगाचा हिस्सा होता १२%. अमेरिकेतल्या एकूण दुधाळ गायींची संख्या होती ९ दशलक्ष आणि प्रत्येक गायीचे वर्षाला सरासरी दुध उत्पादन होते २३,४०० पाउंड. नुसता गेल्या १० वर्षांचा आढावा घेतला तरी १९९९ साली अमेरिकेत सुमारे ९७,००० डेअरी फार्म्स होते तर २००८ साली डेअरी फार्म्सची संख्या घटून ६७,००० झाली होती. थोडक्यात या दहा वर्षात अमेरिकेतले ३०,००० डेअरी फार्म्स बंद झाले. या दहा वर्षात छोट्या (१ते९९गायी असलेले फार्म्स), मध्यम (१०० ते २०० गायी असलेले फार्म्स), मोठ्या-मध्यम (२०० ते ५०० गायी असलेले फार्म्स) आणि मोठ्या (५०० पेक्षा अधिक गायी असलेले फार्म्स) फार्म्सच्या संख्येत झालेले बदल लक्षात घेण्यासारखे आहेत. या दहा वर्षात बंद झालेल्या ३०,००० फार्म्सपैकी २५,००० फार्म्स हे छोटे होते. या काळात मध्यम आकारांच्या फार्म्सची संख्या ४,५०० ने घटली तर मोठ्या-मध्यम फार्म्सची संख्या १,२०० ने घटली परंतु याच कालावधीमधे मोठ्या आकाराच्या फार्म्सची संख्या मात्र ८०० ने वाढली.
२००८ सालच्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतल्या डेअरी फार्म्सवरील गायींची सर्वसाधारण संख्या होती १६३, परंतु देशाच्या विविध भागातील निरनिराळ्या राज्यांमधल्या डेअरी फार्म्सवरील, गायींच्या सर्वसाधारण संख्येतील तफावत नजरेत भरण्यासारखी होती. डेअरीचा पूर्वापार बालेकिल्ला समजला जाणारी राज्ये म्हणजे नॉर्थईस्टमधली न्यूयॉर्क, पेनसिल्व्हेनिया, न्यू हॅम्पशायर, व्हर्मांट, कनेक्टिकट, मॅसेच्यूसेट्स आणि अप्पर मिडवेस्टमधली विस्कॉनसीन, मिनेसोटा, मिशीगन, इंडियाना, ओहायो आणि इलिनॉय. या राज्यांमधले फार्म्स देखील घरगुती आणि छोटेखानी (साधारणपणे ५० किंवा कमी गायी असणारे) परंतु गेली काही दशके, पश्चिमेकडची काही राज्ये मोठ्या जोमाने डेअरी व्यवसायात उतरत आहेत. त्यामुळे भौगोलिक दृष्ट्या देखील डेअरी उद्योगाचे माहेरघर आता पारंपारिक राज्यांकडून सरकून पश्चिमेकडच्या मोठ्या राज्यांमधे स्थिरावू लागले आहे. या पश्चिमेकडल्या राज्यांमधे डेअरी फार्म्स हे इसापाच्या गोष्टीमधल्या बेडकीच्या पोटासारखे वाढतच चालले आहेत. सर्वात मोठे डेअरी फार्म्स असलेली राज्ये आणि त्यातल्या फार्म्सवर असलेल्या गायींची सरासरी संख्या अशी- (कोलोरॅडो – ९१४ गायी, कॅलिफोर्नीया – ९६८ गायी, नेवाडा – १०८० गायी, अॅरिझोना – १५५० गायी आणि न्यू मेक्सिको – २११३ गायी)
पूर्वापार चालत आलेल्या डेअरी प्रधान राज्यांतली परिस्थिती म्हणजे लांबच लांब आणि कडकडीत हिवाळा, मुबलक पाणी, चारा, धान्य आणि छोटे छोटे घरगुती फार्म्स. त्यादृष्टीने पाहिलं तर पश्चिमेकडच्या नव्याने डेअरी प्रधान होत असलेल्या राज्यांमधे ह्याच्यापेक्षा सर्वस्वी भिन्न अशी परिस्थिती. बर्याच ठिकाणी डोंगराळ, रखरखीत, वाळवंटी प्रदेश. पाण्याची कमतरता, भरपूर उन्हाळा. एकंदरीत पहाता दुधाळ गायींच्या दृष्टीने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थिती. परंतु या राज्यांमधल्या या नव्या मोठमोठ्या डेअरी फार्म्सनी, पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन स्वीकारून, भरमसाठ पैसा ओतून, या गायींना आरामदायी होतील असे सुविधापूर्ण अद्ययावत फार्म्स बांधले आहेत. त्यामुळे एका बाजूला नैसर्गिक अनुकुलता आणि घरगुती व्यवसाय तर दुसरीकडे पूर्णपणे व्यावसायिक दृष्टीकोन आणि पैशाच्या जोरावर नैसर्गिक प्रतिकूलतेवर मात करून घडवून आलेले बदल, अशी ही चढाओढ आहे आणि त्यात पश्चिमेकडील राज्ये बाजी मारत आहेत.
१९९२ मधे अमेरिकेतल्या एकूण गायींपैकी केवळ १०% गायी ह्या मोठ्या (१००० किंवा त्याहून अधिक गायी असणारे) फार्मस्वर होत्या. मोठ्या फार्मस्च्या वाढत जाणार्या संख्येमुळे २००२ साली, अमेरिकेतल्या एकूण गायींपैकी २९% गायी या अशा मोठ्या फार्मस्वर गेल्या होत्या; तर केवळ ५ वर्षात त्यांची संख्या आणखी वाढून २००७ साली ३६% गायी या अशा मोठ्या फार्मस्वर होत्या. या आकारमानाने मोठ्या मोठ्या होत जाणार्या डेअरी फार्म्समुळे आज अमेरिकेतल्या एकूण ५७,००० डेअरी फार्म्सपैकी केवळ १६,००० फार्म्स, एकूण दूध उत्पादनातील ८३% दूध उत्पादन करतात. बहुतेक लहान आणि मध्यम आकाराचे फार्मस् अजून तरी कौटुंबिकच आहेत. आणि त्यांचे व्यवस्थापन जरी पिढ्यान पिढ्या घरच्याच मंडळींच्या हातात असले तरी आता त्यांना दूध काढण्यासाठी, जनावरांसाठी, चारा उगवण्यासाठी तसंच फार्मवरची इतर कामे करण्यासाठी अधिकाधिक पगारी किंवा दैनंदिन स्वरुपाची मदत (Hired help) लागू लागली आहे.
-- डॉ. संजीव चौबळ
November 28, 2015
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ मार्चला सिंगापूर दौऱ्यात या देशातील वरिष्ठ नेत्यांशी परस्पर मैत्री संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टीने चर्चा केली. सिंगापूरचे संस्थापक व पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी येथे दाखल झालेल्या मोदींनी इस्रायल, अमेरिका व ऑस्ट्रेलिया या देशांच्या नेत्यांचीही भेट घेऊन परस्पर सहकार्याबाबत चर्चा केली.
April 6, 2015
सध्या सर्वत्र सोशल मेडियाचा धुमाकुळ आहे. त्यातल्या त्यात व्हॉटस एप चा बोलबाला आहे.
सोशल मेडियाने सर्वांना एकत्र आणण्याचे काम उत्तम रित्या केले आहे, म्हणतात सोशल मेडियामुळे जग जवळ आले आहे. हे काही अंशी खरे ही आहे, मात्र चांगल्या फायेदेशीर बाबींचा गैरवापर कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हॉट्सएप आहे.
* या व्हॉट्सएप मुळे लोकांची क्रय शक्ती कमी झाली.
* काम-व्यवसाय सोडून सर्व जण दिवसातील आपला बहूमोल वेळ व्हॉटसएप चाटींग मध्ये खर्ची घालतात.
* लोकांना व्हॉट्सएप चे व्यसन लागले आहे.
* तंबाखू - दारू पेक्षाही हे व्हॉट्सएप चे व्यसन जास्त घातक आहे.
* या व्हॉट्सएप मुळे मनाची बेचैनी वाढली आहे.
* या व्हॉट्सएप मुळे अस्वस्थपणा वाढला आहे.
* एक - दोन तास जरी व्हॉटस एप सुरु नसेल तर मनाची घालमेल व्हायला सुरुवात होते.
* जेवणाच्या ताटावर - शौचालयाच्या कमोड वर - गाडी चालविताना - एका हातात अभ्यासाचे पुस्तक दुसरया हातात व्हॉटसएप वापरणारे महाभाग आपणास सर्वत्र दिसतील.
* कुठेही जा, कोणत्याही दुकानात-ऑफिसमध्ये जा लोक या व्हॉट्सएप वरच दिसतील.
* चार - चौघे एकत्र बसून गप्पा मारण्याचे दिवस दुर्मीळ झाले आहेत, चार- चौघे एकत्र असतील तर चौघांच्या ही हातात व्हॉट्सएप दिसेल.
* त्या व्हॉटसएप मुळे अतिरिक्त काम करायला कंटाळा यायला लागला आहे, जागेवरून उठणे नकोसे वाटायला लागले आहे.
* रात्री उठून सुध्दा बेचैनीमुळे लोक व्हॉट्सएप चेक करतात.
* हा व्हॉट्सएप म्हणजे प्रत्येक आई-बापाच्या जीवाला ताप झाला आहे, मुलं-मुली अभ्यास न करता तासन् तास लपून छपून व्हॉट्सएप वर चाट करत असतात.
* या व्हॉटसएप वर सर्व जातीचे- धर्माचे वेगवेगळे ग्रुप तयार झालेले आहेत, त्या ग्रुप मध्ये जातीयता-कट्टरता वाढविण्याचे छुपे संदेश दिले जातात. अश्लिल चाटिंग चे, होदौस, भडास सारखे ग्रुप तयार झाले आहेत.
* आजीबाईच्या बटव्यासारख्या विविध ग्रुप वर गुळ खा मधुमेह कमी होते असे मेसेज फिरतात. तेथे सर्वजण डॉक्टर झालेले असतात, माझ्या मुलाला खुप जुलाब होत आहेत काय उपाय करु असे प्रश्न असतात.
* रिकाम्या व हौसी लोकांनी विविध ग्रुप बनवून त्यात लोकांना अडकवून ठेवण्याचे काम सुरु आहे.
* परिस्थिती अशी झाली की एका ग्रुप मधून बाहेर पडा - लगेच कोणी तरी दुसरया गूप मध्ये एड करते. समाजात ज्याचे नाव आहे, ज्यांच्या भरपूर ओळखी आहेत, ज्यांचा मोबाईल नंबर सर्वत्र गेला आहे, त्यांना तर व्हॉटसएप चा काहीही फायदा होत नाही, तासाला हजारच्या वर मेसेज येतात. शक्य आहे का हे मेसेज वाचणे ??
* सतत व्हॉट्सएप वापरल्यामुले मेंदू मध्ये बधीरता यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे मेंदूंमध्ये मुंग्या येत आहेत की काय असे जाणवायला लागले आहे. डोके गरगरल्या प्रमाणे वाटणे-डोके जड वाटणे असे व्हायला लागले आहे.
* झोप कमी व्ह्यायला लागली आहे.
* सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे मोबाईल च्या सुक्ष्म लहरीमुळे डोळ्यांना अपरिमित हानी होत आहे, डोळ्यामध्ये आग होणे, डोळे जळजळ करणे, डोळ्यांना कमी दिसने असे प्रकार सर्रास दिसून येत आहेत.
सतत व्हॉट्स्एप वापरल्यामुळे कित्येकांमध्ये एकाकीपणा यायला लागला आहे.
*वरील सर्व मुद्दे सत्य आहेत-यात कोठेही अतिशयोक्ति नाही, मी व्यवसायाने डॉक्टर आहे, माझे कडे मागील ४-५ महिन्यात आलेल्या शेकडो रुग्णांना चौकशी करुन ही सर्व माहीती संकलित केली आहे, तुम्ही स्वता व्हॉटस एप वापरत असाल तर व्हॉतसएप पासून दुर रहा, व्हॉट्सएप चा एक टक्का फायदा आहे तर ९९ टक्के नुकसान आहे*
-- डॉ. पवन लड्डा
लड्डा आयुर्वेदिक चिकित्सालय
लातूर (महाराष्ट्र)
मो. ०९३२६५११६८१
माहीती आवडली असेल तर लेखकांचे नाव न कापता ती इतरांना पाठवून त्यांना व्हॉटसएपच्या भयंकर दुष्परीणामाची माहीती द्या
October 22, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti