वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कष्ट हीच तर ती शक्ती आहे. जी माणसाला खऱ्याच्या कसोटीवर पारखते. व्यास क्रिएशन्स द्वारा प्रकाशित “चैत्र पालवी” या नियतकालिकाच्या “सावरकर परिवार विशेषांक” मध्ये प्रा. गजानन नेरकर यांनी लिहिलेला लेख.
July 9, 2022
श्री दामाजी पंत, महान विठ्ठल भक्त
होवून गेला एक संत, मंगळवेढे गावी ।। १।।
जेथे असे प्रभूभक्ति, तेथे वसे दया, क्षमा, शांति
दुरितांसाठी मन कळवळती, त्यांचे हृदयीं ।। २।।
विचार गरीबांचे मनी, सेवा दीनांची करूनी
भाव विठ्ठला चरणी, अर्पिले असे ।। ३।।
नाम घेतां विठ्ठलाचे, काम करीता जनांचे
आनंदी भाव तयांचे, मनीं येई ।। ४।।
दामाजीची कथा ऐकूनी, भान जाई हरपूनी
प्रभू येई सेवक बनूनी, भक्तासाठीं ।।५।।
दामाजीपंत मामलेदार, मोठा त्यांचा अधिकार
म्हणून ते जिम्मेदार सरकारात ।।६।।
धान्याची भरती कोठारे, ठेवूनी त्यावरी पहारे
अधिकार दामाजीस सारे, धान्याच्या वाटपाचे ।।७।।
राज्यात परिस्थिती दुष्काळीं, पडूं लागले भूकबळीं
दु:खी जनता सगळी, हा: हा कार माजला ।।८।।
समोर धान्यांच्या राशी, बाहेर लोक मरती उपाशी
सहन न होई दामाजीसी, बघूनी हे सारे ।।९।।
राजानें हुकूम देऊन, धान्य ठेवले सांठवून
न वापरावे सामान्य जन, त्या धान्यासी ।। १०।।
धान्याचे साठे बहूत, करूनी लोकांसी वंचित
दु:खी त्यासी बघत, हर्ष होई राजासी ।।११।।
लोकांसी बघूनी भूके, दामाजीस होई दु:खे
कसे हे संत देखे, शांत राहूनी ।।१२।।
विठ्ठल नाम मनीं, कोठारे दिली उघडूनी
भूकेल्यास दाना-पाणी, देई दामाजीपंत ।।१३।।
लोकांस आनंदी बघूनी भान जाय हरपूनी
नाचू लागला तल्लीन होऊन, विठ्ठलाचे भजन करीं ।।१४।।
सारे कोठार लुटविले, प्रत्येक जीवा प्रभू संबोधले
त्यांच्या आनंदी एकरूप झाले, दामाजीपंत ।।१५।।
दुसऱ्याच्या आनंदाचे भाव, स्वत:चे मनी घेई ठाव
तेथेची जाणावा देव, हेच असती सत्य ।।१६।।
भुकलेले व्याकूळ जीव, मिळता धान्यराशी ठेव
उचंबळून येती आनंदी भाव, नाचू लागली सारी ।।१७।।
दामाजीस न राही भान, तल्लीन होती नाच नाचून
विठ्ठल नामाचा गजर करून, तादात्म्य झाले प्रभूशी ।।१८।।
बातमी कळली राजाला, क्रोध मनी आला
अटक करण्या हुकूम दिला, दामाजी पंतासी ।।१९।।
प्रभूची लीला न्यारी, ज्याचे तो तारण करी
कुणी न त्यासी मारी, सांभाळ करी भक्ताचा ।।२०।।
काटा रूते भक्तचरणी, येई पाणी प्रभू नयनीं
नाते घ्यावे समजोनी, प्रभू भक्ताचे ।।२१।।
भक्त असता संकटी, धावून येती पाठी
सुटका करती जगत्जेठी, पाठीराखा बनून ।।२२।।
विश्वाचा अधिनायक, भक्तासाठी बने सेवक
हेच भक्तीचे गूढ एक, समजोनी घ्यावे ।।२३।।
समजण्या हे सारे, उघडावी मनाची द्वारे
वाहू द्या भक्तीचे वारे, अंतर्मनी तुमच्या ।।२४।।
सेवक होवूनी जगत्जेठीं, घेवूनी घोंगडी पाठी
हातीं घेती काठी, राज दरबारी आला ।। २५।।
मज म्हणती विठू सेवक, दामाजीचा मी हस्तक
धान्यराशी विकूनी ठीक, आणली असे ती रक्कम ।।२६।।
उलटी करूनी घोंगडी, मोहरांची रास पाडी
थक्क करूनी सोडी, राजाला ।।२७।।
चकीत झाला राजा, विस्मयीत होई प्रजा
कसा देवू मी सजा, दामाजी पंतासी ।।२८।।
दामाजीचा आदर करी, जाणूनी विठ्ठल त्याचे उरी
लोळण घेतले चरणा वरी, दामाजी पंताच्या ।।२९।।
करमणूकीची आहे कथा, समजण्या वाटते कठीणता
पाहीजे मनोभावाची उच्चता, कळण्यास हे तत्त्वज्ञान ।।३०।।
दामाजीची कहाणी, दान धर्माचे प्रतीक म्हणोनी
दुरीतांचे दु:ख, जाणोनी ग्रहण करावी सर्वांनी ।।३१।।
डॉ. भगवान नागापूरकर
१६-१५११८३
January 16, 2018
ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली. सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले.
November 27, 2022
आयुर्वेदातील हळद हे एक महत्त्वाचा घटक आहे. हळदीला आयुर्वेदामध्ये ” हरिद्रा ” म्हणतात. हळदीला आर्थिक, धार्मिक, औषधी व सामाजिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.
October 7, 2021
सर्वांच्याच आवडीची हि भाजी सुकीभाजी म्हणूनका,भरली भेंडी म्हणा,आमटी,तळलेले भेंडी,भरली भेंडी,आपण गोव्यात करतो ते भेंडीचे खतखते हे सर्वच प्रकार अगदी रूचकर लागतात ह्या भाजीचे.
जसा हिचा उपयोग आपण स्वयंपाकात करतो तसाच उपयोग घरगुती उपचारात देखील करू शकतो.
ह्या भेंडीचे तीन हात उंच झाड असते व त्याला हि फळे लागतात. भेंडी चवीला तुरट,आंबट,गोड अशा मिश्र चवीची असतात व उष्ण असतात.त्यामुळे हि वात व पित्त दोष कमी करतात व कफ वाढवितात.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)शरीराची आग होत असल्यास तीन भेंडी ३ ग्लास पाण्यात उकळून ३/४ ग्लास उरवावा व त्यात २ चमचे खडीसाखर व १/४ चमचा सैंधव घालून हे पाणी जेवणा सोबत थोडे थोडे प्यावे.
२)अति चालून हातपायांची आग होणे व ते दुखणे ह्यात २०० ग्राम भेंडी फोडुन १/२ लिटर पाण्यात भिजत घाला व दोन तासांनी सदर पाण्यात कपडा भिजवा व दुखणी-या भागांवर गुंडाळा.
३)चेह-याची त्वचा रूक्ष झाली असल्यास दोन कोवळ्या भेंड्याबारीक वाटा व त्याचा लेप चेह-यांवर लावा व १५ मिनीटांनी तो लेप कोमट पाण्याने धुवा.
४)गळवे पिकण्यासाठी भेंडी व हळद एकत्र वाटून पोटीस बांधावा.
५)सांधेदुखी व सांध्यामधून करकर आवाज येत असल्यास २ भेंडी कापून २ तप पाण्यात उकळावी व ते पाणी दररोज प्यावे.
अतिमात्रेत भेंडी खाल्ल्यास पुष्कळ जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 13, 2016
एमपीएससी (MPSC) म्हणजे काय?
एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.
लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते -
- राज्यसेवा परीक्षा
- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा
- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा
- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा
- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा
- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा
- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
- विक्रीकर निरीक्षक परीक्षा
- साहाय्यक परीक्षा
- लिपिक-टंकलेखक परीक्षा
राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-
- उपजिल्हाधिकारी (गट अ)
- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)
- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)
- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)
- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ
- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)
- तहसीलदार (गट अ)
- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)
- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)
- कक्ष अधिकारी (गट ब)
- गटविकास अधिकारी (गट ब)
- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)
- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)
- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)
- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)
- नायब तहसीलदार (गट ब)
महसूल सेवा
उपजिल्हाधिकारी :-
हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश मिळू शकतो.
नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप
पुढीलप्रमाणे आहे-
- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.
- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.
- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.
तहसीलदार :-
या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -
- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.
- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.
- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.
नायब तहसीलदार :-
महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.
- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.
- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.
महाराष्ट्र पोलीस सेवा :-
राज्यसेवेतील निवडीचे सर्वोच्च पद पोलीस उपअधीक्षक किंवा उपविभागीय पोलीस अधिकारी आहे. उपअधीक्षकांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-
- गंभीर स्वरूपाच्या अपराधांचा तपास करणे.
- अधीनस्थ पोलीस कर्मचाऱ्यांवर नियंत्रण व त्यांच्या तालमी इ.ची जबाबदारी डीवायएसपीवर असते. यासाठी ते वर्षांतून एकदा सर्व पोलीस ठाणी व चौक्यांची तपासणी करतात.
- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच काही बाबतीत परवाने देण्याचे अधिकार डीवायएसपीला असतात.
महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा :-
शासनाचे विविध विभाग, महामंडळे येथील लेखाविषयक व वित्तीय जबाबदारीचे काम करण्यासाठी प्रशिक्षित अधिकारी उपलब्ध करून देता यावेत या उद्देशाने केंद्र सरकारच्या धर्तीवर १९६५ मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेची स्थापना करण्यात आली. १९६२ साली स्थापन करण्यात आलेल्या लेखा व कोषागार संचालनालयाचे संचालक लेखा विभागाचे प्रमुख असतात. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची या पदावर नेमणूक करण्यात येते.
राज्यसेवा परीक्षेतून वित्त व लेखा सेवा गट अ व ब या पदांसाठी निवड होते व या उमेदवारांची नेमणूक अनुक्रमे कोषागार अधिकारी/ साहाय्यक संचालक व अतिरिक्त कोषागार अधिकारी/ उपमुख्य लेखाधिकारी या पदांवर करण्यात येते. वित्त व लेखा सेवा अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत -
- या सेवेतील अधिकाऱ्यांना शासनाच्या विविध विभागांमध्ये लेखाविषयक व लेखा परीक्षणविषयक बाबी सांभाळण्यासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात येते.
- शासकीय रकमांचे वित्तीय विनियोजन करणे व याबाबत गरप्रकार होऊ न देणे ही या सेवेतील अधिकाऱ्यांची जबाबदारी असते.
- कार्यालयातील/विभागातील वित्तीय व्यवस्थापन तसेच वेतन भत्ते, रजा व आस्थापनाविषयक कामे या अधिकाऱ्यांना हाताळावी लागतात.
विक्रीकर (व्हॅट) विभाग :-
विक्रीकर (व्हॅट) हा राज्य शासनाच्या महसुलातील सर्वात जास्त वाटा असणारा कर म्हणून आहे. विक्रीकर विभाग हा अर्थमंत्रालयाच्या अधीनस्थ कार्यरत आहे. मुंबई विक्रीकर कायद्यान्वये विभागीय आयुक्त, महाराष्ट्र राज्य हे खात्यातील सर्वोच्च पद आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विक्रीकर निरीक्षक पदासाठी वेगळी परीक्षा आयोजित करून साहाय्यक विक्रीकर आयुक्त पदासाठी निवड करण्यात येते.
साहाय्यक विक्रीकर आयुक्ताच्या जबाबदाऱ्या- व्यापाऱ्यांची नोंदणी करणे, नोंदणीकृत व्यापाऱ्यांना सल्ला, मार्गदर्शन करणे, कराची वसुली इ. बाबींची निर्धारणा शाखेसंबंधीची कामे.
विक्रीकर निरीक्षकाच्या जबाबदाऱ्या - प्रत्यक्ष करवसुली व त्याचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी विक्रीकर निरीक्षकाची असते. नोटीस व समन्स बजावणे व याबाबतची कार्यवाही तसेच डीफॉल्टर्सचा पाठपुरावा करणे या बाबीही विक्रीकर
निरीक्षकाच्या कार्यकक्षेत येतात.
मोटार वाहन विभाग :-
हा विभाग गृहमंत्रालयाच्या अधीन असतो. राज्यसेवा परीक्षेतून साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट-ब या पदासाठी निवड करण्यात येते. साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत -
शिकाऊ व पक्के ड्रायिव्हग लायसेन्स तसेच आंतरराष्ट्रीय वाहन चालक परवाना साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याकडून दिला जातो. वाहनांची नोंदणी, हस्तांतरण तसेच दुसऱ्या राज्यात/प्रदेशात गेल्यास त्याचे 'ना हरकत प्रमाणपत्र' देणे या बाबी साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेत येतात. परवाने व नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण व दुय्यम प्रती देण्याबाबतची कार्यवाही साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून होते.
राज्य उत्पादन शुल्क विभाग :-
उत्पादन शुल्क हा राज्यसूचीतील विषय असून राज्य महसुलामध्ये याचा मोठा वाटा असतो.
राज्यसेवा परीक्षेद्वारे उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदावर नियुक्तीसाठी निवड करण्यात येते. प्रत्येक जिल्ह्य़ासाठी एक राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक राज्य शासनाकडून नेमण्यात येतात.
राज्य उत्पादन शुल्क उपअधीक्षक :-
या पदाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत-
मद्यार्क व अमली पदार्थाची तस्करी रोखणे व त्यासाठी वेगवेगळ्या उद्योग, व्यवसायांची तपासणी करणे हे या विभागातील अधिकाऱ्यांचे महत्त्वाचे काम आहे. मद्य, मद्यार्क, अमली पदार्थ, औषधी द्रव्ये इ. बाबतच्या महसुलाची वसुली हे अधिकारी करतात. अमली पदार्थविषयक गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारीसुद्धा या अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
आयोगाकडून साहाय्यक व लिपिक संवर्गासाठी स्वतंत्रपणे परीक्षा घेतल्या जातात. राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून कक्ष अधिकारी पदावर निवड होते.
कक्ष अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरूप :-
कार्यासनात येणारे टपाल व धारिकांवर विहित वेळेत कार्यवाही पूर्ण करण्याची जबाबदारी कक्ष अधिकाऱ्यांवर असते. प्रत्यक्षात ही कार्यवाही साहाय्यकांकडून सुरू होत असली
October 26, 2016
विश्वाच्या कल्याणासाठी पोलिओ जगताचा अनभिषिक्त सम्राट होण्याच्या आकांक्षेने महायुद्धात उतरलेला हा योद्धा कोण असेल बरे ! त्याची आयुधे आहेत सूक्ष्मदर्शकयंत्र , परीक्षा नळ्या , चंचुपात्र आणि युद्धभूमी आहे प्रयोगशाळा , तर शत्रू आहे पोलिओ .
August 21, 2024
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!
आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.
खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?
शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन
December 22, 2016
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये नीता पांढरीपांडे यांनी लिहिलेला हा लेख
तुकोबांच्या संपूर्ण प्रपंच विज्ञानाची बैठक त्यांच्या अतिशय खडतर अशा परिस्थितीतूनच निर्माण झालेली आहे. त्यांचा संसार हा इतर सर्वसामान्य जनांसारखा निश्चितच नव्हता. आपल्या संसाराबद्दल आणि त्यातील आपल्या भूमिकेबद्दल तुकारामांनी अनेक अभंगांतून आपले मत स्पष्टपणे मांडलेले आपल्याला दिसते.
तुकारामांनी आपल्या आयुष्यातील खडतर अनुभव आणि अवती - भवती दिसणारे, दुःखाकष्टात राहणारे लोक, विविध यातना सहन करीत जगणाऱ्या लोकांना बघून ते दुःखी होत आपल्या मनातील हे शल्य त्यांनी आपल्या अभंगांतून व्यक्त केले -
आता मी न पडो सायासी ।
संसार दुःखाचिया पाशी ।
आणिक दुःखे सांगों मी किती ।
सकळ संसाराची स्थिती ।
आतां न मज साहवे सर्वथा ।
संसार गंधींची ही वार्ता ।
झालो वेडा असोनि जाणता ।
पावे अनंता तुका म्हणे ।। (४०७८)
(सार्थ तुकारामाची गाथा)
तुकारामांचे संवेदनशील मन तडफडत असायचे. त्याची तीव्रता आपल्याला त्यांच्या शब्दांशब्दांतून जाणवल्याशिवाय राहत नाही.
१६२९ -३० च्या सुमारास दुष्काळ पडला आणि तुकारामांच्या जीवनांतील आनंद, सुख हळूहळू नष्ट होत गेले तेव्हा त्यांनी संसाराचा त्याग न करता त्यांतील आसक्ती काढून घेतली. तुकाराम म्हणतात -
बरे जाले देवा निघाले दिवाळी ।
बरी चा दुष्काळे पीडा केली ।
अनुतापे तुझे राहिले चिंतन |
जाला हा वमन संवसार ।
बरे जाले देवा बाईल कर्कशा ।
बरी हे दुर्दशा जनामध्ये |
बरे जाले जगी पावलो अपमान ।
बरे गेले धन ढोरे गुरे ।
बरे जाले नाहीं धरिली लोकलाज ।
बरा आलो तुज शरण देवा ।। ( ३ ९ ४१ )
मुगल सैन्याकडून झालेला विध्वंस, दुष्काळ अन् त्या पाठोपाठ आलेल्या साथी इतक्या झपाट्याने फैलावत होत्या की खेडीच्या खेडी बेचिराख झाली. अशा स्थितीत संवेदनाशील व्यक्तिच्या मनात 'जाला हा वमन संवसार' असे विचार येणे क्रमप्राप्तच आहे.
संसारातील सर्व सुखे रसिकतेने भोगलेल्या तुकोबांना नंतर दारिद्र्याच्या दुःखाचा व उदासीनतेचा मोठा विलक्षण अनुभव आला. त्यामुळे त्यांचे आंतर जीवन ढवळून निघाले. संसार दुःखाच्या तीव्र तापाने त्यांच्या अंतःकरणाची भूमी भाजून निघाली.
तुकोबांची जीवनपद्धती आघातांनी , संकटांनी बदलून गेली होती. तरीही जीवनापासून ते पळून गेले नाहीत. प्रपंच सुख, संसारसुख त्यांनी भोगले होते. पण ते सर्व सामान्य राहिले नाहीत. जीवनात अडकून न पडता त्यातून त्यांनी बाहेर येण्याचा मार्ग शोधला.
आपल्या स्वानुभवाने ते सांगतात की, व्यवहारात हिशोब चुकला तर मेळ बसेपर्यंत माणूस त्याचा पाठलाग करतो. त्याचप्रमाणे आपले हित होण्यासाठी चित्ताला जागे करा. मातीत पुरून ठेवलेल्या धनाच्या ठिकाणी कृपणाचे मन गुंतलेले असते . माणसाने आपले मन नाशवंत विषयांवर न गुंतवता हरी चरणी गुंतविण्याचा प्रयत्न करावा.
संसार ही परमार्थाची पहिली पायरी आहे हे समजून माणसाने संसार करावा. त्यामुळे त्याची सामान्यांतून असामान्याकडे वाटचाल सुरू होते. आपण संसाराच्या मोहात अडकून पडल्याची कबुली देऊन ते म्हणतात मलाही ईश्वराचा विसर पडला होता -
पडिला नामाचा विसर | वाढविला संवसार ।
अशी कबुली तुकोबा देऊन टाकतात.
एका पाठोपाठ एक अशी संकटांची माळ तुकोबांच्या मागे लागल्यामुळे त्यांची साधना अधिक दृढ होत गेली. संकटांनी घेरलेली माणसे एक तर अगतिक होतात किंवा वासनांच्या आहारी जातात. पण तुकारामांनी मात्र संकटांना न घाबरता, संसाराकडे पाठ न वळवता आपले लक्ष ईश्वराकडे वळविले. आपल्या पत्नी व मुलांकडे त्यांचे लक्ष असे. आपली विहित कर्मे पूर्ण करावी हाच त्यांचा आग्रह असे. प्रपंच हे जीवनाचे सर्वस्व निश्चितच नाहीये. परमार्थ संपादन करण्याचे ते केवळ एक साधन आहे. अहंकार, त्याग मोह, मद, मत्सर, परोपकार, क्षमा, शांति अशा सर्व गुणांवर प्रपंचात राहूनच मनुष्य विषय प्राप्त करू शकतो
जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचार वेंच करी ।
उत्तमचि गती तो एक पावेल । उत्तम भोगील जीव खाणी ।।
परउपकारी नेणे परनिंदा । परस्त्रिया सदा बहिणी माया ।
भूतदया गाई पशुंचे पालन । तान्हेल्या जीवन वनामाजी ।
शांतिरूपे नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे ।
तुका म्हणे हेंचि आश्रमाचे फळ । परमपद बळ वैराग्याचे ।। (२०८५)
प्रपंचात तारतम्य बाळगून आत्मविकासाच्या पायऱ्या माणसाने चढायला हव्या. ईश्वर भक्तिसाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही.
ज्या संसारात व समाजात तुकाराम वावरले, काही काळ का होईना त्यांनी ते लौकिक सुख अनुभवले होते. त्यात ते रमले होते. परंतु काळाने घातलेल्या घावामुळे ते सावरले. हे सुख किती क्षणभंगूर आहे याची जाणीव प्रत्यक्ष अनुभवल्यानंतर ते उदासीन झाले. त्यांची संसारातील एकरुपता, प्रत्यक्ष अनुभूतीतील सखोलता वेगळीच होती. जो अनुभव त्यांनी घेतला तो जगासमोर मांडायचा ही ठाम भूमिका त्यामागे आहे असे दिसते.
तुकाराम म्हणतात गृहस्थाश्रम हे दुःखाचे मूळ कारण नाही. दुःखाचे मूळ कारण म्हणजे संसार संसार ही खरं म्हणजे परमार्थाची पहिली पायरी आहे. हाच मार्ग माणसाला परमार्थाकडे नेतो. परमार्थ प्राप्तीसाठी घर संसार सोडून वनात जाण्याची आवश्यकता नाही -
नामसंकीर्तन साधन पै सोपे ।
जळतील पापें जन्मांतरींचीं ।
न लगती सायास जावे वनांतरा ।
सुखे येतो घरा नारायण । तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनि ।
शहाणा तो धणी घेतो येथे ।। ( १६९८ )
संसार आणि त्यातील लौकिक सांभाळणे हे अत्यंत अवघड आहे. या अनुभवातून तुकाराम देखील पोळून निघाले होते. मनुष्य प्रवृत्ति अशी आहे की ती दोन्हीकडून बोलत असते. कोणत्याही एका मार्गाने ती तुम्हाला जावू देत नाही. एखादा माणूस व्यवस्थित संसार करीत असेल तर त्यास लोक म्हणतात की सदा सर्वकाळ हा माणूस संसारात मग्न असतो. देवाचे करण्याकडे काही याचे लक्ष नाही. व्यवस्थित पूजापाठ, सत्संग करणाऱ्या माणसालाही लोक बोल लावतात. संसारात लक्ष नाहीये, नपुंसक असणार म्हणायलाही कमी करत नाहीत. हे सांगताना तुकाराम म्हणतात
ऐसा हा लौकिक कदा राखवेना ।
पतित पावना देवराया ।
संसार करिता म्हणती ही दोषी ।
टाकिता आळसी पोट पोसा ।
आचार करिता म्हणती हा पसारा ।
न करिता नरा निंदिताती ।
संतसंग करिता म्हणती हा उपदेशी ।
येरा अभाग्यासी ज्ञान नाही ।
लग्न करूं जाता म्हणती हा मातला |
न करितां जाला नपुंसक ।
निपुत्रिका म्हणती पहा हा चांडाळ ।
पातकाचे मूळ पोरवडा |
लोक जैसा ओक धरिता धरवेना ।
अभक्ता जिरेना संतसंग ।। ( १२४ )
आजच्या काळातच नव्हे तर तुकारामांच्या काळात देखील लग्न झालेल्या मुलींना वेगळा संसार थाटायची इच्छा असायची. कुटुंबातील बंधने, बांधिलकी त्यांना नकोशी वाटायची वेगळे राहिल्यामुळे मिळणारे स्वातंत्र्य, अधिकार आणि हवा असलेला मोकळेपणा मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. यासाठी स्त्री आपल्या पतिकडे घरातल्यांच्या तक्रारी करते.
कधी त्याला लाडीगोडीने तर कधी हावभावाने संभ्रमाने जिंकायचा प्रयत्न करते. कधी कधी तर ती त्याच्यापासून दूर राहून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करते. तिच्या या वागण्यामुळे नवरा तिच्या कह्यात जातो. हा प्रातिनिधिक स्वरुपाचा मानवी स्वभाव दर्शविताना तुकोबा म्हणतात.
भ्रतारासी भार्या बोले गुजगोष्टी ।
मज ऐसी कष्टी नाही दुजी ।
अखंड तुमचे धंद्यावरी मन ।
माझे तो हेळण करिती सर्व ।
जोडितसा तुम्ही खाती येर चोर ।
माझीं तंव पोरे हळहळती ।
तुमची ल्याली माझे डाईं हो पेटली ।
सदा दुष्ट बोली सोसवेना ।
दुष्टवृत्ति नंदुली सदा द्वेष करी ।
नांदों मी संसारी कोण्या सुखें ।
जावा दीर कांहीं धड ही न बोले ।
नांदो कोणाखालें कैंसी आता ।
माझ्या अंगसंगे तुम्हांसी विश्रांती ।
मग धडगति नाही तुमची ।
टाकते ठमकते जीव मुठी धरूनि ।
परि तुम्ही अजूनि न धरा लाज ।
वेगळे निघतां संसार करीन ।
नाहीं तरी प्राण देते आता ।
तुका म्हणे झाला कामाचा अंकित ।
सांगे मनोगत तैसा वर्ते ।। ( ३२१२ )
संसारातील नाजूक जागा स्पष्ट करण्यामागील अनुभवाचे बोल सांगताना तुकोबा वाचकांसमोर हे सांगण्याचा प्रयत्न करतात की स्त्री मोह, वासनेपुढे माणसाचा विवेक विचार कसा निष्प्रभ होतो. संसारातील हा अनुभव घेतल्याशिवाय केवळ कल्पनेने या गोष्टी लिहिणे अशक्य वाटते. माणूस संसारात प्रेमाच्या, मायेच्या, स्वार्थाच्या आहारी अधिकाधिक गुंतत जातो. पण तरीही त्याला प्रपंचातील फोलपणा, विफलता लक्षात येत नाही. माणूस आत्मकेंद्रित झालेला असतो. आपल्या पलीकडचा विचार करणे तो विसरून जातो .
तुकोबा एवढेच सांगून थांबत नाहीत . स्त्रीच्या आहारी जावून पुरुष किती हतबल होतो ही गोष्ट स्पष्ट करताना , वासनाधीन होऊन तो बायकोला आश्वस्त करीत म्हणतो-
कामाचा अंकित कांतेते प्रार्थीत ।
तू कां हो दुश्चित निरंतर माझी मायबापे बंधु हो बहिण।
तूज करिती सीण त्यागीन मी ।
त्यांचे जरी तोंड पाहेन मागुता ।
तरी मज हत्या घडो तुझी ।
सकाळी उठोन वेगळा निघेन।
वाटतों तुझी आण निश्चयेंसी।
वेगळे निघता घडीन दोरे चुडा ।
तूं तब माझा जोडा जन्माचा की ।
ताईत सााळी गळांची दुल्लडी ।
बाजुबंद जोडी हातसर ।
वेणीचे जे नग सर्वही करीन ।
नको धरू सीण मनी कांहीं ।
नेसावया साडी सेलारी चुनडी ।
अंगींची काचोळी जाळिया फुले ।
तुका म्हणे केला रांडेने गाढव ।
मनासवें धाव घेतलीसे || ( ३२१३ )
स्वार्थाने अंध झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीचा विरोध करून विभक्त होण्याच्या पत्नीच्या विचाराशी सहमत होणाऱ्या माणसाचे वर्णन करून ते जनतेला सावधतेचा इशारा देतात . आयुष्यात अनेक ठिकाणी ठेचकाळणाऱ्या संसाराच्या वणव्यात देहाची अभिलाषा धरणाऱ्या अज्ञान माणसांना ते वेळीच सावरण्यास सांगतात .
अशा प्रकारच्या कुटुंब कथांतून प्रपंचातील आसक्ती , मोह यावर तुकोबा उपहासात्मक टीका करताना दिसतात .
अनादि काळापासून मानवामध्ये वासनापूर्तीची इच्छा आहे . वासना त्याग केल्यानंतरच तो जीवनाचे रहस्य जाणू शकेल . परंतु आजची स्थिती उलटी झाली आहे . लोक वाईट गोष्टी करतात अन् त्याचे समर्थनही करतात . वरून हे आमच्या कर्माचे फळ आहे , आम्ही काय करू शकतो म्हणून मोकळे . हा युक्तिवाद अत्यंत घातक आहे . कर्माच्या फळामुळे भोग उत्पन्न झाले तरीही त्यावर आसक्ती ठेवू नये ही गोष्ट लोकांना पटविण्याचा तुकारामांनी प्रयत्न केला-
माकडे मुठीसी धरिले फुटाणे ।
गुंतले ते नेणे हात तेथें ।
काय तो तयाचा लेखावा अन्याय |
हित नेणें काय आपुले तें ।
शुके नळिकेशीं गोविचळे पाय |
विसरोनि जाय पक्ष दोन्ही ।
तुका म्हणे एक ऐसे पशु जीव ।
न चलें उपाव तेथे कांहीं ।। ( १०४ )
संसाराचा मोह कैफ आणतो . माणसे बेभान होऊन जातात . त्यांतून बाहेर पडणे देखील अशक्य होऊन जाते . माणसाचे मन क्षुद्र असू नये . कमजोर मनाची माणसे हतबल होतात , लंपट होतात . माणसाने प्रपंच जरूर करावा पण वासनेच्या आहारी जाऊ नये . देह क्षुद्र नाही , पण देह पूजाही नसावी . माणसाची बुद्धी कुशाग्र असावी . सूक्ष्म निरीक्षण , अवलोकन असावे . विचार सर्वंकष असावे . जीवनातील प्रपंचातील गोडी जरूर चाखावी परंतु गुळाभोवती घुटमळणाऱ्या मुंगळ्याची लोचट वृत्ती असू नये.
मोहाच्या दुष्ट चक्रांतून बाहेर पडणे कठिण होऊन बसते . अर्थात अभ्यासपूर्वक या चक्रांतून प्रयत्नांनी बाहेर पडणें शक्य असते , असे तुकोबा सांगतात .
सांसारिक गोष्टींकडे माणसाचे मन त्वरेने धाव घेते . संसाराविषयीचे संकल्प सतत त्याच्या मनात असतात . ईश्वराचे नाव घेताना त्याला कष्ट होतात पण संसाराच्या इतर सर्व गोष्टीत मात्र तो रममाण असतो -
संसाराचे धावें वेठी ।
आवडी पोटी केवढी ।
हागो जातां दगड सांची ।
अंतरींही ( हे ) संकल्प |
लाज तेवढी नारायणी ।
वांकडी वाडी पोरांपे ।
तुका म्हणे बेशरमा ।
श्रमावरी पडिभरू ।।
( २७५३ )
संसाराच्या वणव्यात देहाची अभिलाषा धरणारी भोवतालची माणसे अज्ञानी आहेत हे जाणून तुकाराम त्यांना सांगतात - कोणत्याही प्रकारे परस्त्री , परद्रव्याचा प्रयत्न करू नका . अति तृष्णा वाढल्याने माणसाला कधीही सुख प्राप्त होऊ शकत नाही . ईश्वरावर विश्वास ठेवून संसार करा . मग तोच तुमचा योगक्षेम चालवितो . त्यात काही तूट होऊ देत नाही . कर्ता - करविता देव आहे यावर विश्वास ठेवा -
इतुले करी भलत्यापरी । परद्रव्य पर नारी ।
सांडुनी अभिलाष अंतरी । वर्ते वेव्हारी सुखरूप ।।
न करी दंभाचा सायास । शांति राहे बहुवस ।।
जिव्हे सेवी सुगंधरस । न करी आळस रामनामी ।।
जनमित्र होई सकळांचा । अशुभ न बोलावी वाचा ।।
संग न धरावा दुर्जनाचा । करी संतांचा सायास ।।
( ४११४ )
तुकाराम महाराज म्हणतात माणसाला स्वार्थ अन् परमार्थ देहोंचा समन्वय साधता आला पाहिजे . माणसाच्या जीवनाचा प्रवास हा तिमिराकडून प्रकाशाकडे , जीवात्म्याकडून शिवात्म्याकडे , स्वार्थापासून परमार्थाकडे व्हायला हवा .
माणसाने अद्वैत बुद्धीचा अंगीकार करून वसुधैव कुटुम्बकम बुद्धीने गृहस्थाश्रमाचे पालन केले पाहिजे . गीतेत म्हटल्याप्रमाणे निष्काम कर्मयोगाचा मार्ग अंगिकार केला तर जीवनमुक्तता प्राप्त होऊ शकते . कर्तव्याचे पालन करताना आपोआप सारासार विचार , सदविवेक , नैतिकता सर्वांचा समावेश होतो . तेव्हा यश - अपयशाची चिंता करत बसू नये . यथाशक्ति सर्वांना मदत करावी . सर्वांना आपले मानावे . हाच खरा गृहस्थधर्म आहे जी व्यक्ति या धर्माचे पालन करते त्याला निश्चितच गृहसौख्य प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो .
संसारी माणसाने षडरिपूंवर विजय प्राप्त करणे गरजेचे आहे . दया , क्षमा , शांती हे त्याचे अलंकार असायला हवेत . असत्य बोलणे , खोटेपणाने लोकांस फसविणाऱ्या भोंदू , बैरागी , दांभिक गुरूंपासून सावध राहाण्याचा इशारा ते देतात . मद्यपान , वेश्यागमन करणाऱ्या लोकांची व खोटेपणाने परमार्थाची दुकाने मांडणाऱ्या लोकांची तुकोबा भर्त्सना करतात . संसारी लोकांना मध्य मार्ग दाखवून ते सांगतात की , माणसाने संसारातून निवृत्त होऊ नये . सुख भोगावे पण ' परमार्थासी सोडू नये प्रपंच बळे । ' तुकोबांनी हा उपदेश स्वतः आचरिला होता . प्रत्यक्षानुभूतीतून व संसाराच्या अग्निदिव्यातून तावून सुलाखून निघाल्यामुळे त्यांचा उपदेश जास्त सार्थ वाटतो -
अनुभवा आले अंगा । ते या जगा देतसे ।।
नव्हती ( हाततुके ) आहाततुके बोल |
मूळ ओल अंतरीची । उतरूनी दिले कशीं ।
शुद्धरशीं सरतें । तुका म्हणे दुसरे नाहीं ।
ऐसी ग्वाही गुजरली ।।
( २०६७ )
तुकोबांच्या सांसारिक एकरूपतेतील व प्रत्यक्षानुभूतीतील सखोलता , उत्कटता इतरांच्यापेक्षा खूप वेगळी आहे असे स्पष्ट दिसून येते.
संसार करताना माणसे त्यांत गुरफटून जातात . अलिप्तपणे संसार करणे अधिकांश लोकांना शक्य होत नाही . मायेच्या मोहांतून म्हातारपण आल्यानंतरही त्याला बाहेर पडता येत नाही हे सांगताना तुकोबा म्हणतात-
परिसें गे सुनबाई । नको वेंचूं दूध दहीं ।।
आवा चालिली पंढरपुरा । वेसीपासुनि आली घरा ।।
ऐकें गोष्टी सादर बाळे । करीं जतन फुटके पाळें ।।
माझे हातींचा कलवडू । मजवांचूनि नको फोडूं ।।
वळवटक्षिरींचें लिंपन । नको फोडूं मजवांचून।
उखळ मुसळ जातें । माझे मन गुंतले तेथें ।।
भिक्षुक आल्या घरा । सांग गेली पंढरपुरा ।।
सून म्हणे बहुत निके । तुम्ही यात्रेसि जावें सुखें ।।
सासूबाई स्वहित सोडा । सर्व मागील आशा सोडा ।।
सूनमुखींचे वचन कार्नी । ऐकोनि सासू विवंची मनी ।।
संसार हा क्षणिक , नाशवंत आहे याची कल्पना असूनही मानवी मनाची ओढ सुटत नाही . अनंत ईश्वराला विसरून तो विनाशी संसाराच्या मोहांत अधिकाधिक गुरफटत जातो अन् शेवटपर्यंत त्यापासून मुक्त होऊ शकत नाही .
तुकारामांनी संसाराचा जीवन कलह बघितला होता . धगधगत्या आगीत ते स्वतः होरपळून निघाले होते . त्यामुळे मनातील दाह लोकांसमोर मांडताना ज्वालेची प्रखरता त्यांच्या शब्दांना लाभलेली दिसते . संसार हा विलक्षण दुःखानी भरलेला आहे . नियतीसारख्या बलाढ्य शक्तीसमोर माणूस अतिशय दुबळा ठरतो .
तुकोबांनी ' याचि देही याचि डोळा ' संसाराची दाहकता अनुभवली होती . या घटनेचा त्यांच्या आयुष्यावर फार खोलवर परिणाम झाला होता . सुखदुःखाची झळ सोसून ते त्यातून तावून सुलाखून निघाले . त्यांच्या वाटेला आलेल्या उग्र कठोर संसाराला ते सामोरे गेले . म्हणूनच संसारात अडकून पडलेल्या , अगतिक झालेल्या लोकांना तुकाराम म्हणतात-
सुख नाही कोठे आलिया संसारी ।
वाया हावभरी होऊ नका ||
दुःख बांदवडी आहे हा संसार ।
सुखाचा विचार नाही कोठे ।।
चवदा कल्पेवरी आयुष्य जयाला ।
परी तो राहिला ताटीतळी ( खाली ) ।।
तुका म्हणे वगी जाय सुटोनिया ।
धरूनि हृदयामाजी हरि ।। ( १७२४ )
तुकोबा म्हणतात माणसाने आपली विहित कर्म निष्ठेने करायला हवी . संसार करताना वाईट वागून समाजाला भार स्वरूप होऊ नये . प्रपंचात विवेक असणे अत्यंत गरजेचे असते . परस्त्रीला आईप्रमाणे मानावे . दुसऱ्याची निंदा करू नये . खरे बोलण्यासाठी माणसाला पदरचे काहीही खर्चावे लागत नाही . हे सांगताना तुकोबा म्हणतात -
परकिया नारी माउली समान ।
मानिलिया धन काय वेचे ।।
न करितां परनिंदा परद्रव्य अभिलाष ।
काय तुमचे वेचें सांगा ।।
खरे बोलता कोण लागती सायास ।
काय वेचे यास ऐसे सांगा ।।
तुका म्हणे देव जोडे याजसाठी ।
आणिक ते आटी न लगे काही ।। ( ३८ )
संसार करता करता , कुटुंबाची देखभाल करताना आपणाला अत्यंत शीण आला आहे , ही गोष्ट ते विठ्ठलाजवळ कबूल करताना तुकोबा म्हणतात-
संसारतापें तापलो मी देवा ।
करिता या सेवा कुटुंबाची ।।
म्हणऊनि तुझे आठविले पाय ।
ये वो माझे माय पांडुरगा ।। ( ६६ )
संसारात रमणारे तुकाराम आपण वैराग्याकडे कसे वळलो हे सांगताना संतांना म्हणतात-
ऐका वचन हे संत ।
मी तो आगळा पतित ।।
बहु पीडिलो संसारे ।
मोडी पुसे ( पिसें ) पिटीं ढोरें ।।
न पडता पुरें ।
या विचारें राहिलों ।। (३९४० )
आणि
बरें जालें देवा निघाले दिवाळे ।
बरी या दुष्काळे पीडा केली ।
अनुतापें तुझे राहिले चिंतन ।
झाला हा वमन संवसार ।
हे सांगताना आपल्या संसाराचे अलिप्तपणे वर्णन तुकोबांनी केलेले दिसून येते .
प्रपंचसुखासाठी तुकोबांनी सांगितलेली गृहस्थाश्रमाची कर्तव्ये कौटुंबिक व्यवस्थापनाचा एक आदर्श वस्तुपाठ आहे असे म्हटले तर ते चुकीचे होणार नाही . त्यांच्या व्यक्तिमत्त्वात समाजोन्मुखता , परखडपणा , निधडेपणा , स्पष्टवक्तेपणा आहे व त्यांच्या जीवनानुभावाने त्याची वीण घट्ट केली आहे . म्हणूनच त्यांचे उपदेश हे आजही संसारी लोकांसाठी अतिशय मोलाचे ठरतात . संसारात गुरफटून घेणार असोत किंवा स्वार्थासाठी आपल्या आईवडिलांचा त्याग करून त्यांना वृद्धाश्रमात पाठविणारी मुले असोत सर्वांचे डोळे उघडण्याचे महत्त्वाचे कार्य तुकोबांनी केलेले आहे .
- नीता पांढरीपांडे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
October 4, 2022
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
August 21, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti