वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
डार्विनने मांडलेला उत्क्रांतीचा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे परंतू आपल्या पुराणातून हजारो वर्षांपुर्वी सांगितलेली आणि हिंदू जनमानसाचा अतिव विश्वास असणारी दशावताराची कहाणी डार्विनच्या तत्वाशी आश्चर्यकारकरीत्या मिळती-जुळती आहे. पुराण आणि आधुनिक विज्ञान यातील श्रेष्ठ कोण, या वादात न पडता आपणं दोघांमधल्या साम्याचा आस्वाद घेऊ..
January 7, 2015
पळी पंचपात्राला देवपूजेत आणि संध्येत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
पळी ही तांब्याची अथवा पितळेची असते आणि तिच्या एका बाजूला छोटी वाटी व दुसर्या बाजूला नागफणी असते. नागफणी हे मांगल्याचे प्रतीक असून संध्या करताना जे आचमन केले जाते ते या वाटीतील जलाने करतात.
पळी हा शब्द कालमापक पळे यापासून आला आहे. घड्याळाचा शोध लावण्यापूर्वी कालमापनासाठी घटीकापात्र वापरत असत त्यालाच पंचपात्र ही संज्ञा आहे. पंच याचा अर्थ मोठे असून मोठ्या तोंडाचे तांब्याचे वा पितळ्याचे भांडे म्हणजे पंचपात्र होय. हे उभट गोलाकार असून त्याचे कडेला छोटे काठ असतात.
March 18, 2016
विदर्भातील कापूस पट्ट्यात सध्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा उद्रेक सुरू आहे.कापूस उत्पादक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची बातमी नाही, असा एकही दिवस जात नाही. सरकारच्या सगळ्या कथित प्रयत्नानंतरही आत्महत्येचे प्रमाण कमी झालेले नाही, उलट ते वाढतच चाललेले दिसते.
November 20, 2005
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे,
सनसिटी रस्ता, आनंदनगर,
सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
May 3, 2017
महाभारत सर्व भारतीयांच्या मनात आदर व विशेषतः हिंदू धर्मीयांच्या भाव भावनांचे प्रतीक. महाभारत किंवा त्यातील विविध पात्रे माहीत नाहीत अशी व्यक्ती सापडणे हे अत्यंत दुर्मिळ. मानवी जिवनातील भावभावनांचे प्रतिबींब आपणास यात पहायला मिळते. माणसाच्या विनाशास कारणीभूत ठरणारे काम, क्रोध, लोभ,मोह,मद, मत्सर हे षड्रिपू जर कुठे एकत्रीत पहायचे असतील तर तुम्ही फक्त महाभारत अभ्यासा तुम्हाला ते पावलोपावली दिसून येतील. हा झाला यातील एक नकारात्मक भाग तर जिवन कसे जगावे याचे तत्त्वज्ञान हे सुध्दा आपणास महाभारत शिकवते. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर त्यांच्या प्रिय अर्जुनास जी भगवत गीता सांगितली ती एक अलौकिक असा ज्ञानकोश आहे. जी पुढे संत ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्र्वरी रुपात सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत समजावून सांगितली.
अशा या व्यासमुनी यांच्या खंडकाव्याचे अध्ययन करताना मनात काही प्रश्न निर्माण होतात ज्याची उत्तरे मिळत नाहीत. महाभारतातील स्त्री पात्रांचा अभ्यास करत असताना बहूतांशी त्यांच्यावर अन्याय झाला असे वाटते व महाभारतात शेवटी जे महायुद्ध होऊन अनेक राजे, राजपुत्र,शुरवीर सेनापती व लक्षावधी सैन्य यांचा वध झाला त्या सर्वांस शेवटी स्त्रीलाच जबाबदार धरले गेले. यातून पौराणिक काळापासून असलेली पुरुष सत्ताक पध्दती व एकंदरच समाजात स्त्रीचे नगण्य स्थान व तीला तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती दिसून येते. महाभारता मधील स्त्री पात्रांचा विचार करता प्रामुख्याने खालील स्त्री पात्रांचा विचार करणे आवश्यक वाटते.
सत्यवती, अंबा, अबीका, अंबालीका, कुंती माद्री, गांधारी, द्रौपदी व ऊत्तरा.
सत्यवती
महाभारताचा विचार करता त्याची सुरुवात कोठून करावी असा एक प्रश्न निर्माण होतो. पण सर्वसाधारणपणे राजा शंतनु व सत्यवती यांचे पासून. सत्यवतीचे मुळ नाव मत्स्यगंधा. मत्स्यगंधा हिचे जन्माचे बाबतीत पुराणांमध्ये असे सांगितले आहे की ब्रह्मदेवाने शाप दिला व आद्रीका नामक अप्सरेला माशाचा जन्म मिळाला वसुद्वारा स्थापीत स्त्री गर्भ त्या माशाच्या पोटात होता. एका कोळ्यास तो मासा मिळाला. त्याने तो मासा कापल्यावर त्याचे पोटातून जी बालीका मिळाली तिच्या सर्वांगास माशाचा वास येत असल्याने तिला मत्स्यगंधा असे नाव मिळाले. पुढे ती वयात आल्यावर एकदा पराशर मुनी तिचेवर भाळले व त्यांचे तपसामर्थ्याने त्यांनी माशाच्या वासाची दुर्गंधी दूर केली व तिला अदभुत अशा सुगंधाचे वरदान दिले. त्यामुळे तिचे नाव योजनगंधा असे झाले. तिला सत्यवती म्हणूनही ओळखले जाते.पराशर मुनींनी तिचेशी संबंधाची ईच्छा व्यक्त केली त्यावेळी तिने ती अविवाहित असलेने असमर्थता व्यक्त केली. त्यावर त्यांनी प्रसुतीनंतर सुध्दा तु कुमारी रहाशील असे सांगितले. त्यांनी आपल्या तपोबळावर आसपास धुके निर्माण कले ज्या योगे त्यांचा प्रणय कोणी पाहणे शक्य होणार नाही अशी व्यवस्था केली. पुढे मत्स्यगंधेने एका दिव्य बालकाला जन्म दिला जे जन्मताच मोठे झाले व वेदमहर्षी व्यास म्हणून प्रसिध्द झाले. पुढे एकदा राजा शंतनु शिकारीसाठी जंगलात आले असता ते सत्यवतीवर मोहीत होऊन लग्न करणेची ईच्छा व्यक्त केली. त्यावर सत्यवतीचे पालक वडिलांनी सत्यवतीचे पोटी होणारी संतान ही हस्तीनापूरची सम्राट होणार असेल तर लग्नास संमती मिळेल असे सांगितले. पण शंतनूस गंगापुत्र देवव्रत ऊर्फ भिष्म हा पहिला पुत्र व राज्याचा ऊत्तराधिकारी होता त्यामुळे शंतनू निराष झाला. पण पित्यासाठी भिष्म यांने विवाह न करण्याची प्रतिज्ञा केली व सत्यवती व शंतनू यांचा विवाह झाला. महायोध्दा भिष्म यांनी विवाह न केल्याने राजपदावर अधिकार नसल्याने पुढे अनेक समस्या निर्माण होऊन महाभारत घडले. यामधे भिष्माने विवाह न करण्यामागे सत्यवतीची राजकीय महत्वाकांक्षा आड आली व स्वताचे मुलासच राजपद मिळावे म्हणून तिने सर्वगुण संपन्न भिष्म यांचा अधिकार हिराऊन घेतला असा तिला दोष दिला जातो. तसेच विवाह होणेपुर्वीच पराशर मुनींपासून पुत्र जन्माला घातला त्यामुळे तिचे चारित्र्यावर प्रश्र्न ऊभे केले जातात. वास्तविक पराशर मुनींना जर नकार दिला तर त्यांचे तपसामर्थ्याने शाप मिळण्याची भिती होती हे कोणीच विचारात घेत नाही. तसेच आपल्या पोटी जन्म घेणाऱ्या मुलांची मातेस काळजी वाटणे म्हणून आपल्या मुलाला राजपदाची मागणी समर्थनीय ठरु शकते. पण याला स्त्रीमत्सर असे रुप दिले जाते. व शेवटी महाभारत युध्द होण्यासाठी अनेक व्यक्ती पैकी तिला एक महत्त्वाची व्यक्ती मानले जाते.
अंबा, अंबीका व अंबालीका
सत्यवतीला चित्रांगद व विचित्रविर्य असे दोन पुत्र झाले. चित्रांगद गंधर्वाबरोबर युध्दात मारला गेल्यावर भिष्म विचित्रवीर्य यास हस्तीनापुरच्या गादीवर बसवतो. काशीराजाच्या तिन कन्या अंबा,अंबीका, व अंबालीका यांचे स्वयंरातून भिष्म सर्वांचा पराभव करून तिन्ही कन्यांचे विचित्रविर्य बरोबर लग्न करून देण्यासाठी पळवून आणतो. पण अंबाने भिष्म यास मी तनमनधनाने राजा शाल्व यास वरले असल्याने अन्य कुणाशी विवाह करु शकत नाही असे सांगितले. त्यामुळे भिष्म तिला राज शाल्व याचेकडे पाठवून देतो व अंबीका व अंबालीका याचा विवाह विचित्रवीर्य याचेबरोबर लाऊन देतो. भिष्माने अंबेचे हरण करुन पळवून नेले असल्याने शाल्व अंबेचा स्विकार करत नाही व ती परत भिष्माकडे येऊन त्याला तिच्या बरोबर विवाह करणेची विनंती करते. पण लग्न न करण्याची प्रतिज्ञा घेतली असल्याने भिष्म तिचे बरोबर लग्न करण्यास असमर्थता व्यक्त करतो. व पुढे अंबेला आपले जिवन संपवणे भाग पडते. आता यात काही दोष नसताना अंबेचे जिवन उध्वस्त होते पण यात भिष्माला दोशी धरले जात नाही. विचित्रवीर्यच्या अकाली मृत्यूमुळे वंश वृध्दी साठी सत्यवती व्यासमुनींना बोलावून नियोग द्वारे संतान प्राप्तीसाठी अंबिका व अंबालीका यांना बाध्य केले जाते. येथे त्यांच्या ईच्छा आकांक्षा यांना काहीच महत्त्व नाही. कुरुवंशाला वारस देणे एवढेच त्यांचे कार्य. त्यांचेवर अन्याय झाला असे कुणाला वाटत सुध्दा नाही.
कुंती
यादव कुळातील शुरसेन याची कन्या काशीराज याला दत्तक दिल्यावर तिचे कुंती असे नामकरण झाले. हस्तिनापूरचा राजा पंडू यांचेशी विवाह होवून ती हस्तीनापुरची राणी बनते. कुंती चे सर्व आयुष्य म्हणजे एक शोकांतिका आहे. लग्नापुर्वी दुर्वास मुनींनी दिलेल्या मंत्रशक्तीने ती कोणत्याही देवतेचे स्मरण करून पुत्ररत्न प्राप्त करु शकेल असे वरदान लाभते. कुमारी असताना ऊत्सुकतेपोटी सुर्य देवाचे स्मरण करून ती मंत्र म्हणते व कर्ण यांचा जन्म होतो पण ती कुमारी असल्याने ती मुलाला जवळ ठेऊ शकत नाही व त्यामुळे त्या बालकाला एका पेटीत ठेवून पाण्यात सोडून देते. एका सारथ्यास ती पेटी मिळते व तो त्यातील बालकाचे पालन करतो. राजा पंडुच्या हातून एका ऋषी पती-पत्नी यांना शिकारीचे वेळी बाण लागला असतो त्यामुळे त्याला मिळालेल्या शापामुळे तो आपल्या दोन्ही पत्नीशी प्रणय करु शकणार नसतो त्यामुळे तो राज्य धतराष्ट्र या बंधूकडे सोपवून जंगलात निघून जातो. जंगलात गेल्यानंतर कुंती राजा पंडू यास तिला असलेल्या वरदानाची माहिती देऊन त्याद्वारे आपणास पुत्ररत्न होईल असे सांगते. व त्याप्रमाणे मंत्रशक्तीने धर्म, भीम व अर्जून यांचा जन्म होतो. कुंती आपली सवत माद्री हिला सुध्दा मंत्र शक्ती देते ज्या योगे ती नकूल व सहदेव यांना जन्म देते. पण राजा पंडूस स्त्री मोह आवरत नाही व माद्रीसोबत प्रणय करताच त्याचा मृत्यू होतो. कुंती पाची मुलांना घेऊन पुन्हा हस्तीनापूरला परत येते. येथे राजप्रासादात सुध्दा तिच्या वाट्याला हाल अपेष्टाच येतात. एक तर वैधव्य जीवन व पाच मुलांबरोबर तिला ही त्रास होतो. पुढे पांडवांचे बरोबर वनवासात जिणे तिच्या नशिबी येते. स्वताचा प्रथम पुत्र समोर येऊन सुध्दा ती त्याला समाजासमोर पुत्र म्हणून प्रेम देऊ शकत नाही. शेवटी युध्दात आपल्याच दोन वीरपुत्रात युद्ध होत असताना हतबलपणे पहाण्याशिवाय तिला काही पर्याय उपलब्ध नसल्याने एका मुलाचे हातून दुसऱ्याचा मृत्यू पहाण्यासारखी दुर्दैवी घटना तिच्या नशिबी येते. एकूणच तिचै आयुष्य हे सुखापेक्षा दुःखद घटनांनीच जास्त भरलेले होते असेच दिसून येते.
माद्री
मद्र देशाची राजकन्या व हस्तीनापूरचा राजा पंडू याची द्वितीय पत्नी, नकूल सहदेव यांची माता एवढीच तिची ओळख. संपूर्ण महाभारतात याशिवाय तिला फारसे महत्त्व दिल्याचे आढळून येत नाही. कुंती व पाडूपुत्र याचेवरील अन्याय यामधे तिने तिचे आयुष्य कसे जगले असेल याची साधी चर्चाही कोणी फारशी करत नाही. तर तिच्यावर अन्याय झालाय असे वाटण्याचा प्रश्नच नाही. एकूणच तिचे महाभारतातील स्थान काय हाच प्रश्न मनात येतो.
गांधारी
गांधारी सारख्या एका संपन्न देशाची राजकन्या आणी हस्तीनापूरचा सम्राट धृतराष्ट्र याची पत्नी. तिच्या इतकी दुर्दैवी स्त्री संपूर्ण महाभारतच काय अन्य कोणत्याही पौराणिक काव्य अथवा इतिहासात सापडतणार नाही. निव्वळ एक राजकीय सोय व राजकारणासाठी तिचा धृतराष्ट्र सारख्या अंध व्यक्ती बरोबर विवाह लावून दिला जातो. तिच्या त्यागाची महती लोकांना पटवून देणे साठी तिला संपूर्ण आयुष्य दृष्टी असून सुध्दा डोळ्यांवर पट्टी बांधून एका अंध व्यक्ती प्रमाणे कंठावे लागले. नुसते तिच्या त्यागाचे गोडवे गाऊन तिच्यावर केलेल्या अन्यायाचे परिमार्जन होईल काय? एखाद्या दृष्टी असलेल्या व्यक्तीने संपूर्ण आयुष्य हे डोळ्यांवर पट्टी बांधून आंधळ्या सारखं जगणं हे किती कष्टप्रद असू शकते हे ज्याच्या वाट्याला असे जगणे येईल तीच व्यक्ती जाणू शकते. इतिहासात तरी असे दुसरे उदाहरण सापडणार नाही. पोटी शंभर पुत्र व त्या सर्वांचे महायुध्दात निधन व शेवटी निपुत्रिक म्हणून मृत्यू यापेक्षा अजून दुर्दैव ते काय असू शकते. कुंतीला फक्त एक पुत्र युध्दात गमवावा लागला होता हे येथे आवर्जून लक्षात घेतले पाहिजे. येथे कौरव वाईट व पांडव हे चांगले हा विषय नाही तर एका स्त्रीचे द्रृष्टीने सर्व गोष्टी विचारात घेत आहोत. म्हणूनच महाभारतातील अन्याय झालेले पण ज्यांची फारशी दखल न घेतलेल पात्र असेच तिचे वर्णन करावे लागेल.
द्रौपदी
महाभारतातील एक सर्वात महत्त्वाचे व संपूर्ण महाभारत ज्या एका पात्रा भोवती फिरत रहाते किंवा जिच्या मुळेच महाभारत घडले असे सर्रास लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सुशिक्षित, अशिक्षित व ज्याने कधीच महाभारत वाचले नसेल अशा सर्व प्रकारच्या लोकांकडून म्हणले जाते असे एक प्रमुख पात्र. आपण कल्पना करा की जर महाभारतातील द्रौपदी हे पात्रच काढून टाकले तर महाभारतात काय शिल्लक राहील. द्रौपदीच्या आयुष्यात घडलेल्या अनेक अलौकिक घटनांप्रमाणेच तिचा जन्म सुध्दा अशीच अलौकीक घटना आहे. यज्ञातून ती ऊत्पन्न झाली म्हणून तिला याज्ञसेनी या नावे सुध्दा आळखले जाते. पांचाल नरेश द्रुपद याची कन्या म्हणून तिला पांचाली तसेच राजा द्रुपद याची कन्या म्हणून द्रौपदी या नावाने सुध्दा संबोधले जाते. पांचाल नरेश द्रुपद याने यज्ञातून तिला जन्म दिला तोच मुळी कुरु कुळाचा नाश करणे या एकमेव उद्देशाने. गुरू द्रोण यांचे शिष्यांनी राजा द्रुपद यांचा पराभव करून पांचाल देशाचे दोन तुकडे केले याची सल त्याच्या मनात असलेने कुरुंचा विनाश या एकमेव उद्देशाने द्रौपदीची निर्मीती. म्हणजे तिचा जन्मच एका वाईट उद्देशाने झाला. आता कोणत्याही निर्मीतीचा उद्देशच मुळात वाईट असेल तर निर्माण झालेली वस्तू सुध्दा वाईट ठणारच. व त्यामुळेच पुढे द्रौपदीचे आयुष्यात अनेक दुर्दैवी घडत गेल्या हेच तर रचनाकारांना यातून सुचवीत करायचे नसेल ना ? अजून एक अतर्क्य म्हणजे द्रौपदीस बालपण नाही. ती उपजताच पुर्ण वाढ झालेली तरुण मुलीचे रुपात जन्मास आली. या अतार्कीक घटनेचा संबंध ती एकाच वेळी पाच पुरुषांची पत्नी झाली या दुसऱ्या अतार्कीक घटनेशी आपण लाऊ शकतो. अन्यथा एका वेळी पाच पुरुषांची पत्नी हे बुध्दीला न पटणारे आहे. अर्जुनाने तिला स्वयंवरात जिंकून आणल्या नंतर माता कुंतीच्या आज्ञे प्रमाणे तिला पाची पाडवांशी विवाह करावा लागतो. भले ती आज्ञा कुंतीने गैरसमजुतीने दिली असली तरी त्याच्या ज्या काही वेदना असतील त्यातरी या द्रौपदीलाच भोगाव्या लागल्या ही वस्तुस्थिती आहे. येथे रचनाकार एका स्त्रीवर तर अन्याय करतातच पण त्या अन्यायाचे कारण सुध्दा दुसरी स्त्रीच कशी राहील याची काळजी घेताना दिसतात. व कदाचीत यातूनच एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची वैरी असते अशी म्हण प्रचलित झाली असावी. आता एका वेळी पाच पुरुषांची पत्नी असणं हे कोणाही स्त्रीला किती अपमानास्पद असू शकते याचा येथे कोणी विचारच करत नाही. आता अजून एक घटना म्हणजे युधीष्ठीर व द्रौपदी एकांतात असताना चुकीने अर्जुनाने तेथे प्रवेश करणे व त्यांचे प्रायश्र्चीत्त म्हणून त्याला त्रिदंडी संन्यास घ्यावा लागणे. कोणीही पती-पत्नी एकांतात असताना तेथे अन्य पुरुषाचे अचानक येणे ही स्त्रीसाठी किती लज्जास्पद बाब आहे हे तीच जाणू शकते. पुन्हा अर्जुनाने संन्यास घेणे ही शिक्षा सुध्दा द्रौपदीने ठरवलेल्या नियमानुसार होते. येथेही नकळत बोट द्रौपदीकडे दाखवले आहे.आता महाभारतातील सर्वात महत्त्वाचा व ज्या मुळे पुढे महायुद्ध घडले तो वस्त्रहरणाचा प्रसंग. द्यूतगृहामधे सर्व काही हरल्यानंतर युधिष्ठिर त्याच्यावतीने द्रौपदीस तेथे पणास लावतो. यातून काय सुचीत होते युधिष्ठिराने सोने,नाणे, जडजवाहीर, स्वत:चे राज्य याचे बरोबर द्रौपदीस पण एक निर्जीव वस्तू समजले काय. आणी पुढचा प्रश्न एखाद्या पुरुषाला इतका अधिकार असतो का की तो आपल्या पत्नीला द्युतामधे पणाला लावू शकेल. युधिष्ठिर तीही खेळी हरतो व नंतर रजस्वला अवस्थेतील द्रौपदीला अपमानास्पद अवस्थेत सभेमध्ये आणले जाते. दुष्यासन तिला भर सभेमधे निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न करतो. श्रीकृष्ण कृपेने तिचे लज्जारक्षण होते. मला एका प्रश्र्नाने कायम अचंबित केले की तेथे एकापेक्षा एक धुरंधर उपस्थित असताना कोणीही साधा विरोध केला नाही. त्यावेळची समाजव्यवस्था इतक्या वाईट स्तराला गेली होती काय की भर सभेत हा प्रसंग घडत असताना कोणीही प्राण पणाला लावून विरोध केला नाही. स्त्रीला एवढीही किंमत नव्हती की तिच्या साठी कोणीतरी जीव धोक्यात घालावा. का जे घडतंय त्यात काही चुकीचे आहे असं कुणाला वाटल नाही. पुढे विनाशकारी असे महायुद्ध घडले व ज्यात मोठा नरसंहार होऊन लाखो स्त्रियांना वैधव्य आले व त्या सर्वांस कारणीभूत द्रौपदीसच धरले गेले.
मी अशा अगदी मोजक्या स्त्री व्यक्तीरेखांचा येथे विचार केलाय. संपूर्ण महाभारतात या वितीरिक्त अभिमन्यू पत्नी ऊत्तरा, कर्णपत्नी वृशाली अशा कित्येक व्यक्तीरेखा असतील ज्याचा कधी कुठे फारसा उल्लेखही कोणी केला नसेल तर त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा काय विचार होणार. पण कोठेतरी त्यावेळची समाज व्यवस्था व एकूणच स्त्रीयांकडे पहायचा द्रृष्टीकोन याबाबत मनात प्रश्र्नचिन्ह निर्माण करतो एवढे निश्चित.
-- सुरेश काळे
मो.९८६०३०७७५२
सातारा.
३१ जुलै २०१८
टीप:- हा लेख हा महाभारतकालीन समाज व्यवस्था व त्यावेळची स्त्रियांकडे पहाण्याची मानसीकता या दृष्टीकोनातून लिहीला आहे. कोणाच्या धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही.
August 14, 2018
कोरोना रोगामुळे आलेल्या आरोग्य आणीबाणीमुळे जगातील वेगवेगळ्या समाजांमध्ये रोग आणि भीतीही शिरकाव करते आहे. ही भीती अनेकदा आजार आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूपेक्षाही भयंकर असते आणि हीच भीती माणसाच्या हातून चुका घडवून आणते आणि सोबतच कोण आपले आणि कोण परके हे पण शिकवून देते.
April 22, 2024
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेल्या वणी गावानजीक सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीचे निवासस्थान आहे. या गडाला म्हणजे डोंगराला सात शिखरे असल्यामुळे त्याला सप्तशृंग अथवा वणीचा डोंगर म्हणतात. राम-रावण युद्धात लक्ष्मण बेशुद्ध पडला होता, तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी हनुमान संजीवनी वृक्षाने बहरलेला द्रोणागिरी पर्वत उचलून आणीत असता त्यातला एक शिलाखंड जिथे पडला तोच हा सप्तशृंगीचा डोंगर आहे, अशी आख्यायिका सांगितली जाते.
June 6, 2025
आयुष्य मर्म किंवा तत्त्व, त्याचा अर्थ कधी कधी खाच खळगे व कठीण परिस्थितीला सामोरे गेल्यावर उलगडत जातो. नेमकं जीवनातील महत्त्व आणि त्याचा शोध म्हणजे “७२ मैल-एक प्रवास” हा सिनेमा आहे.
August 19, 2013
प्रास्ताविक : मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. शेषराव मोरे हे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांची बहुतेक पुस्तकें मी वाचलेली आहेत. बावीसएक वर्षांपूर्वी मी बडोदा येथें वास्तव्यास असतांना मोरे तिथे भाषणासाठी आले होते, व कांहीं तास त्यांच्याबरोबर घालवण्याचा योग मला मिळाला होता. त्या वेळी घेतलेली त्यांची कांहीं पुस्तकें माझ्या संग्रहात मानाच्या स्थानीं आहेत. मला व्यक्तिश: शेषराव मोरे यांच्याबद्दल आदर आहे.
शेषराव मोरे यांचा प्रस्तुतचा लेख उत्तम आहे, माहितीपूर्ण आहे, विचारांना चालना देणारा आहे. त्यांचा मूळ मुद्दा मान्य करण्यासारखा आहे. परंतु, त्यातील कांहीं डीटेल्सबद्दल, कांहीं भिन्न माहिती उपलब्ध असल्यामुळे, व / किंवा भिन्न मत असल्यामुळे, मी माझा प्रस्तुत लेख लिहायला उद्युक्त झालो.
भाग – (१) –(अ)
‘आर्य’ भारतात बाहेरून आले कां ? -
मोरे म्हणतात की आर्य भारतात बाहेरून आले.
• पहिलें म्हणजे, ‘आर्य’ नांवाचा कुठलाच जनसमूह कधीच नव्हता. पुरातन वाङ्मयात ‘आर्य’ हें अभिधान सुसंस्कृत व्यक्तीला लावण्यात येत असे. रामायणातील सीता रामाला ‘आर्य’ किंवा ‘आर्यपुत्र’ म्हणते ; आणि मंदोदरीही रावणास अशा प्रकारेंच संबोधित करते.
• चाणक्याचा उल्लेखही ‘आर्य चाणक्य’ असा केला जातो.
• तथागत गौतम बुद्धही त्याच्या अनुयायांना उद्देशून ‘अरिय’ (म्हणजे, आर्य) हें विशेषण लावतो, व त्याच्या धर्माबद्दल, त्याच्या मार्गाबद्दल सांगतांना, ‘ अरिय धम्म’, ‘अरिय मग्ग’ अशे शब्द वापरतो.
(इथें बुद्धाचा एकेरी उल्लेख केवळ लेखनसोयीसाठीच केलेला आहे).
• जैन परंपरेतही, जैन कुणाला म्हणावे याबद्दल महत्वाची चर्चा दिसून येते. उदा. क्षेत्रार्य, जात्यार्य, कुलार्य, कर्मार्य, शिल्पार्य, भाषार्य, ज्ञानार्य, दर्शनार्य, चारित्र्यार्य, असे शब्द त्यांनी वापरले आहेत.
(दोन्हींचा संदर्भ : ‘संस्कृत आणि प्राकृत भाषा’ , लेखक : डॉ.माधव मुरलीधर देशपांडे ) .
जैनांच्या प्रार्थनेच्या ५ ‘नमोकार’ मंत्रांपैकी एक आहे – ‘णमो आयरियाणं ’. याचें संस्कृत होईल, ‘नमो आर्यानम्’. (‘नमो आचार्यानम्’ असाही अर्थ दिला जातो ). त्याआधीचे मंत्र ‘णमो अरिहंताणं’, ‘णमो सिद्धाणं’ असे आहेत. म्हणजेच, अमुक प्रकारच्या व्यक्तीला नमन, असे ते मंत्र आहेत ( अर्हंत, सिद्ध ). त्यामुळे, हें स्पष्ट आहे की, येथें ‘आर्य’ म्हणजे एखादा ‘वंश’ असा अर्थ खचितच नाहीं ; तर आर्य म्हणजे अमुक गुण असलेली व्यक्ती (जसें की, सुसंस्कृत, ज्ञानी), असाच अर्थ अभिप्रेत आहे.
• १९ व्या शतकातील युरोपीय इंडोलॉजिस्टनी ‘आर्य’ हा वंश होता व त्या वंशाच्या टोळ्या दक्षिण_रशिया / मध्य_आशिया या भागातून भारतात आल्या, असा सिद्धांत (चुकीचा) मांडला. (अखेरीस, ‘गुलाम’ असलेल्या हिंदुस्थानात पुरातन, प्रगत, असें जें जें असेल तें बाहेरूनच आलेलें असणार, अशी त्यांची मनोवृत्तीच होती.)
‘आर्य’ व भारत यांच्यातील संबंधाविषयी, जगात दोन सिद्धांत आहेत. एक म्हणजे, १८व्या-१९ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला सिद्धांत, म्हणजेच, ‘आर्यांचे भारताबाहेरून आगमन’ ( व, २०व्या शतकात, त्या सिद्दांतात झालेलें addition , की ‘त्यांनी सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थलांचा, आक्रमण करून विध्वंस केला’) . पण हा सिद्धांत आतां कालबाह्य झालेला आहे. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांमध्ये उत्खनन केल्यानंतर तेथें आक्रमणाच्या कांहीं खुणा सापडल्या नाहींत. म्हणून मग, ज्या विद्वानांना ‘आर्य बाहेरून भारतात आले’ हा सिद्धांत मान्य होता, त्यांनी गेल्या कांहीं दशकांमध्ये असा सिद्धांत मांडला की, आर्यांचें आगमन भारतात बाहेरूनच झालें, पण येथें आल्यावर , त्यांचे स्थानिक संस्कृतीशी peaceful integration झाले. हाही सिद्धांत challenge केला गेलेला आहे. पहिलें म्हणजे, सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या कांहीं स्थळांमध्ये (लोथल वगैरे) यज्ञकुंडें सापडल्यानें , ही संस्कृती व वैदिक संस्कृती एकच आहेत, असें मत पुढें आलें आहे. तसेंच , या संस्कृतीचा विस्तारही, (जो आधी केवळ सिंधुनदीजवळील स्थानांमध्येंच आहे, असें वाटत होतें, तो), पूर्वेस गंगा-खोरें व बिहारपर्यंत सापडल्यामुळे, व या संस्कृतीची भारतात शेकडो, किंबहुना हजारच्या वर स्थळें सापडल्यामुळे तर, आर्य हे मूळचे भारतातीलच होते, असें मत आतां मांडलें जाऊं लागलें आहे.
[ टीप : अर्थात, त्या काळाच्या भारताची व्याप्ती म्हणजे, दक्षिण-आशिया भाग (म्हणजेच, ‘ब्रिटिश इंडिया’) अधिक आजचा अफगाणिस्तान, अशी होती. म्हणून, आपण आतां प्रस्तुत लेखात जेव्हां ‘भारत’ म्हणूं, तेव्हां वरील व्याप्ती अभिप्रेत असेल ] .
• श्रीकांत तलगेरी त्यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकांमध्ये, ( ‘The Aryan Invasion Theory ..’ ; आणि ‘The Rigveda & The Avesta ..’), ऋग्वेदाच्या आधारानें दाखवून देतात की वैदिक संस्कृतीचा उगम हा, गंगा-सरस्वती खोर्यात झाला, (यमुना तेव्हां सरस्वतीची उपनदी होती) , व तेथून ते पश्चिमेकडे पसरले. संजीव सान्याल, त्यांच्या ‘Land of Seven Rivers’ या पुस्तकात , पीटर अंडरहिल् यांच्या, genetics शी संबंधित रिसर्चची माहिती देऊन सांगतात की, ही संस्कृती मूळची भारतातीलच आहे. सान्याल यांचें स्वत:चेंही तेंच मत आहे.
• इतरत्र ही माहितीही आलेली आहे की, विविध उत्खननांमध्ये मिळालेल्या पुरातन कालातील हाडांचा जेनेटिक अभ्यास केल्यावर असें आढळून आलें की, त्यांत ‘आर्य’ आणि ‘द्रविड’असे भिन्न वंशगट नव्हतेच, व सर्व हाडें एकाच वंशगटाची होती.
• या सर्वांवरून दिसून येईल की
(१) ‘आर्यां’चें तथाकथित, भारताबाहेरून भारतात आगमन ; तसेंच
(२) आर्य-द्रविड भिन्न वंश ;
या दोन्ही गोष्टी निकालात निघालेल्या आहेत.
• विंध्याच्या दक्षिणेला असलेल्या भूभागांचा ‘द्रविड’ असा उल्लेख होत असला, तरी तें वंशाचें द्योतक नसून, भूभागाचें द्योतक आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. उदा. पंच-‘द्रविडां’मध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो. राजतरंगिणीमध्ये खालील ‘द्रविड’ वर्णलेले आहेत : गुर्जर, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, व द्रविड (म्हणजे, तमीळनाडु आणि केरळ) .
मराठी भाषेत जरी दाक्षिणात्य भाषांपासून कांहीं शब्द आलेले आहेत, तरी (वांशिक दृष्टीचा प्रश्नच उठत नाहीं, पण, ) भाषिक दृष्टीनेंही महाराष्ट्रीय लोक स्वत:चा समावेश ‘द्रविडां’मध्ये करतील काय ? उत्तर उघड आहे.
संस्कृत ही देवतांची (deities) भाषा ? ; लोकसमूहांच्या विविध भाषा : द्वविड भाषाकुल -
वेदकाळीं , किंवा प्राग्-वैदिक काळीही, या भाषेला ‘संस्कृत’ हें नामानिधान नव्हतें. तिला ‘छांदस्’ किंवा ‘देववाणी’ किंवा ‘दैवी वाक्’ म्हणत. (हल्लीच्या काळच्या संशोधकांनी व लेखकांनी, हिचें संस्कृतहून भिन्नत्व दाखवण्यासाठी, हिला Proto-Sanskrit किंवा आर्ष-संस्कृत असें नांव दिलेलें आहे). पण हें ध्यानात घ्यावें लागेल की, त्या काळात आणि त्या संदर्भात, ‘देव’ म्हणजे ‘Deity’ किंवा ‘ईश्वर’ असा अर्थ नसून ‘देव’ हें एक जनसमूहाचें , एका टोळीचें (Clan) नांव होतें . [ तसें नसतें तर, अवेस्तामध्ये, ‘देव’ म्हणजे ‘Demon’ किंवा ‘चोर’ असा अर्थ झाला नसता] .
• त्या काळी अन्य भाषाही होत्याच. रोमिला थापर, Egbert Richter-Ushanas, व अन्य लेखक सांगतात की, त्या काळीं ‘मृध्र वाक्’ किंवा ‘आसुरी वाक्’, ही भाषा, असुर, द्स्यू वगैरेंची भाषा होती. ‘त्या व इतर सर्व भाषांना द्रविड-भाषाकुल म्हटलें आहे’, असें मोरे म्हणतात. पण , तें पूर्णपणें बरोबर नाहीं. उदा. त्या काळात ‘Astro-Asiatic’ (आदिवासी, मुंडा) गटाच्या भाषाही होत्या.आणि, त्या भाषेतील शब्दही आर्ष-संस्कृतमध्ये आलेले आहेत, खासकरून शेतीविषयक शब्द. उदा. ‘लाङ्गल’ (म्हणजे नांगर) हा शब्द मुंडा भाषेतून आलेला आहे.
• ऋग्वेदात असुर हा शब्द अनेकदा आलेला आहेच, पण अनेक संशोधक ‘असुर’ या शब्दाचा, पुरातन इराण, असीरिया इत्यादींशी जोडतात, आणि तें योग्यच वाटतें. ( उदा. पारशांचे दैवत ‘अहुर मज़्द’, यातील अहुर म्हणजे असुर. असीरियन्समध्ये तर राजांच्या नांवात असुर शब्द आहे, जसें ‘असुरबनीपाल’ ). त्यामुळे, ‘आसुरी वाक्’ म्हणजे ‘द्रविड भाषाकुल’ हें प्रतिपादन योग्य दिसत नाहीं.
• ‘संस्कृत’ व ‘प्राकृत’ (भाषा) हे शब्द , नंतरच्या काळातील पाणिनी, कात्यायन व पतंजलीला परिचित नाहींत. ते ‘संस्कृत’चा केवळ ‘भाषा’ असाच उल्लेख करतात. वैदिक संस्कृतला पाणिनी ‘छांदस्’ असें म्हणतो. ( या गोष्टीचा पुढेही उल्लेख केलेला आहे. पण यातून जाणून घेण्याची मुख्य गोष्ट ही की, ‘संस्कृत’ हें या भाषेचें नामाभिधान, नंतरच्या काळातील आहे ) . पतंजलि, अयोग्य उच्चार असलेल्या शब्दांना / भाषेला, ‘अपशब्द’ , ‘म्लेच्छशब्द’ म्हणतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कांहीं लोकांचे भाषिक उच्चार व्यवस्थित / स्पष्ट / परिपूर्ण नव्हते. असे लोक म्हणजे समाजातील कांहीं थरांमधील लोक ; तसेंच, असे लोक ज्यांची बोलीभाषा भिन्न होती.
( पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 25, 2016
योगानन्दकरी रिपुक्षयकरी धर्मैकनिष्ठाकरीचन्द्रार्कानलभासमानलहरी त्रैलोक्यरक्षाकरी ।
सर्वैश्वर्यकरी तप:फलकरी काशीपुराधीश्वरी
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥३॥
आई अन्नपूर्णेच्या कृपेने साधकाला कोणकोणते लाभ होतात, ते सांगण्याच्या हेतूने आचार्यश्री त्याच विशेषणांचा रूपात आईचे वर्णन करीत आहेत.
योगानन्दकरी- आई जगदंबा साधकांना योगाचा आनंद प्रदान करते. कर्म, भक्ती, ज्ञान हे विविध योग शेवटी शरीरात राहूनच करावे लागतात. ते शरीर अन्नपूर्णेच्या कृपेने चालते. पर्यायाने या सर्व योगांचा आनंद तीच प्रदान करते. रिपुक्षयकरी- रिपू अर्थात शत्रूंचा नाश करणारी. शास्त्रात आळसालाच शरीरातील सगळ्यात मोठा शत्रू म्हटले आहे. अन्न भक्षणातून उत्साह येतो. आळस निघून जातो. पर्यायाने या महाशत्रूचा ती विनाश करते. धर्मैकनिष्ठाकरी- धर्मावर साधकाची अविचल एक निष्ठा निर्माण करणारी.
चन्द्रार्कानलभासमानलहरी- चंद्र, अर्क म्हणजे सूर्य, अनल म्हणजे अग्नी, त्यांची भा म्हणजे तेज. त्याच्या समान जिच्या तेजो मंडळातील लहरी आहेत अशी.
त्रैलोक्यरक्षाकरी- स्वर्ग मृत्यु आणि पाताळ या तीनही लोकांचे रक्षण करणारी.
सर्वैश्वर्यकरी- साधकांना सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्रदान करणारी.
तप:फलकरी - त्यांच्या तपाचे फळ प्रदान करणारी. काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.
भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी- हे सकल कृपेचा आधार असणाऱ्या माते अन्नपूर्ण! मला ज्ञान भक्ती वैराग्य रूपी भिक्षा प्रदान कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
February 29, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti