वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आसामातील हिंसाचाराचे पडसाद देशाच्या अन्य भागांत उमटल्यानंतर, ईशान्य भारतीयांचे जिवाच्या भीतीने पलायन सुरू झाले. अशातच १९ ऑगस्टला बंगळुरूहून गुवाहाटी एक्स्प्रेसने आसामकडे निघालेल्या नऊ आसामी नागरिकांना, अज्ञात समाजकंटकांनी बेदम मारहाण करून लुटले आणि नंतर धावत्या रेल्वेतून बाहेर फेकले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या मारहाणीत अन्य सात जण गंभीर जखमी झाले. या देशाला गृहमंत्री आहे, ही एक अफवाच ठरल्याने लोकांनी जीव वाचविण्यासाठी माघारी परतण्याची धावपळ सुरू केली होती.
August 22, 2012
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेचाळीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग चौतीस
बाबा सांगतात...
हितकारक, थोडे, गोड, सत्य, आणि प्रसंगोचित संभाषण करावे.
संभाषण कसे असावे तर हितकारक असावे, थोडे कमीच बोलावे, पण सत्य बोलावे, गरज असेल तेव्हा मौन सोडावे.
प.पू.स्वामी स्वरूपानंद म्हणतात त्या प्रमाणे "मित मधु भाषण" असावे.
श्रीकृष्ण बोलतात तसे बोलावे. थोडे गोड, थोडे सत्य ! जिथे जसे आवश्यक असेल तसे. प्रसंगोचित.
कसे बोलावे, याची इतिहासातील काही उदाहरणे लक्षात ठेवण्यासारखी आहेत.
विदुराने सांगितलेली विदुरनीती,
औरंग्याच्या दरबारातील शिवरायांनी दरबाराचा मान कसा राखायचा असतो, याबाबत राजा औरंगजेबाची त्याच्याच दरबारात केलेली कानउघाडणी,
शिवरायांच्या वकीलाने अफजलकडे जाऊन केलेली यशस्वी बोलणी,
रावणाच्या दरबारात जाऊन, सीतामाईना सोडून द्यावे अश्या अर्थाचे अंगदाचे बोलणे,
मुक्ताबाईनी ज्ञानेश्वरांना सांगितलेले ताटीचे अभंग, किंवा चांगदेव पासष्टी,
रामरायांनी वनवासात जाऊ नये याकरीता भरताने केलेली विनवणी आणि त्यावर श्रीरामांनी केलेले खंडन,
युद्ध नको म्हणून सांगायला श्रीकृष्ण कौरवांकडे गेला, ती प्रसिद्ध कृष्णशिष्टाई.
आणि अर्जुनाने युद्ध करावेच यासाठी श्रीकृष्णांनी सांगितलेली गीता
ही सर्व उत्तम संवादाची उदाहरणे आहेत. मुद्दाम सांगण्याचे कारण आता ही उदाहरणे आपल्या शालेय अभ्यासक्रमातून काढून टाकली आहेत. ती मुळातून आपण अभ्यासावी आणि मुलांना शिकवावी.
संवाद शब्दांनी वाढतो. मनात काय आहे, हे सुरांवरून कळते. काय करायला हवे हे देहबोलीतून कळते. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणून समाधान मिळते.
या सर्वांचा आरोग्याशी संबंध काय, असे मनात येणं साहाजिकच आहे.
पुनः एकदा सांगतो, आपल्याला फक्त शारीरिक संतुलन म्हणजे आरोग्य, या संकुचित कोशातून बाहेर यायचे आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचे सामाजिक, मानसिक आणि आध्यात्मिक आरोग्य जपण्यासाठी हे गुण अंगी असावेच लागतात.
आपल्याला काय होतंय, हे जर रूग्णाला सांगताच आले नाही तर, वैद्याला रुग्णाच्या वेदना समजणार तरी कश्या ? जर आपल्याला काय होतंय हे सांगता येत नसेल तर घरी असताना शांतपणे एका कागदावर अथवा वहीत लिहून काढावे. त्यावर तारीख, वेळ लिहावी, शक्य असेल तर त्रास होण्याअगोदर चार पाच दिवस आपण काय काय खाल्ले होते, कुठे फिरलो होतो, त्याचा त्रास झाला होता का, इ. गोष्टी पण लिहून ठेवाव्यात. जर ही सर्व माहिती आपल्याला, वैद्यांना नीट सांगता आली, तर वैद्यांना निदान करणे सोपे होते.
आपल्यालाच नंतर भविष्यात ही आरोग्यवही, (खरंतर अनारोग्यवही) उपयोगी ठरणारी असते.
रुग्णापेक्षा वैद्यांकडे ही संभाषण चातुर्य असले पाहिजे. योग्य प्रश्न विचारून रुग्णाला काय होते आहे, हे त्याच्याच तोंडून वदवून घेणं ही वैद्याची कला आहे.
(म्हणजे रुग्णाला पोपट बनवायचे !! )
विशेषतः पथ्य अपथ्य ठरवताना, रुग्णाचा आधीचा इतिहास समजावून घेणं, वैद्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. ज्या भाषेत वैद्य शिकलेला आहे, त्यापेक्षा रुग्णाची भाषा कोणती आहे, त्याला समजेल अशा भाषेत त्याला त्याचा रोग समजावून सांगता यायला हवा. त्याच्या बरोबर संवाद साधता यायला हवा. आजच्या भाषेत सांगायचे तर रुग्णाचे कौन्सिलिंग म्हणजे संवाद ! बरं हा संवाद साधत असताना आपली देहबोली म्हणजे हावभाव पण महत्त्वाचे असतात.
औषधांपेक्षा शब्द हे जास्ती गुणकारी असतात. कारण औषध फक्त पोटापुरते शरीरापुरते असते. शब्द हे त्यापलीकडील मनापर्यंत पोचतात. स्थूलापेक्षा सूक्ष्म हे जास्ती क्षमतेचे असते.
मनापेक्षा सूक्ष्म आत्मा. त्याच्याशी होणाऱ्या या आत्मसंवादाला शब्दांची पण गरज नसते. तिथे, शब्दावाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले, ही अनुभुति असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
August 30, 2017
नित्यः शुद्धो निष्कल एको जगदीशः
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च ।
विश्वत्राणक्रीडनलोलां शिवपत्नीं
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे ॥ ६॥
निर्गुण निराकार परब्रह्माची मूलशक्ती आदिमाया जगदंबा हीच सर्व कार्यामागे असलेले मूळचैतन्य आहे. हे स्पष्ट करताना आचार्य श्री प्रथम चरणात परब्रह्माचे वर्णन करीत आहेत. त्या परमात्म्या बद्दल ते म्हणतात,
नित्यः - परमात्मा नित्य आहे. अर्थात भूत, वर्तमान व भविष्य काळात तो आहेच आहे. शास्त्रात अशा तत्वालाच नित्य असे म्हणतात. जे काळानुसार निर्माण होते आणि नष्ट होते त्याला अनित्य म्हणतात. याच दृष्टीने सर्व जग अनित्य आहे. एकटा परमात्मा नित्य आहे.
शुद्धो- त्यात कोणत्याही पद्धतीने मायेचा लवलेश नाही. मायेच्या गुणांनी अशुद्धता येते. मायापती त्या गुणांच्या अतीत असतो. त्यामुळे त्याला शुद्ध म्हणतात.
निष्कल - त्यामध्ये कोणत्याही कला अर्थात बदल होत नाही. कमी किंवा अधिक होणे याला कला असे म्हणतात. परमात्मा परिपूर्ण आहे तो कमी किंवा अधिक होत नाही.
एको- एकमेवाद्वितीय. त्याचा सन्मान दुसरा कोणीच नसतो.
जगदीशः - या संपूर्ण विश्वाचा संचालक.
असा जो परमात्मा, तो
साक्षी यस्याः सर्गविधौ संहरणे च - जिच्या निर्मिती, विलयाचा साक्षी असतो अशी.
परमात्मा पुरुष केवळ साक्षी स्वरूपात अधिष्ठान असतो. तो स्वत: काहीच करत नाही. आदिमाया प्रकृतीच सर्व क्रीडा करते. परमात्मा तिच्या त्या क्रीडेचा साक्षी रूपात आस्वाद घेतो. त्याची योगमाया रूप ही आदिशक्ती असणाऱ्या,
विश्वत्राणक्रीडनलोलां- या सर्व विश्वाच्या पालनाची क्रीडा करीत असणाऱ्या,
शिवपत्नीं- शांत स्थाणू अशा स्वरूपातील भगवान शंकरांची पत्नी असणाऱ्या,
गौरीमम्बामम्बुरुहाक्षीमहमीडे - कमलाप्रमाणे नेत्र असणाऱ्या आई जगदंबा गौरीचे मी स्तवन करतो.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 4, 2020
अ पासून अ: पर्यंतचे बारा स्वर आणि क पासून क: पर्यंतचा बारा व्यंजनांचा संच असतो म्हणून देवनागरी वर्णमालेत बाराखडी आहे असं समजतात. अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणिऑ या स्वरांची तसंच कॅ अणि कॉ वगैरे व्यंजनांची सोय करणं आवश्यक होतं. या दोन अक्षरचिन्हांचा समावेश केला की देवनागरीची चौदाखडी होते.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९२४ च्या सुमारास भाषाशुद्धीची चळवळ सुरू केली. त्यात थोडी लिपीशुद्धीही होती. त्यांची तर्कशुध्द विचारसरणी म्हणजे....क ला वेलांटी लावली तर ‘की’ होते आणि ते आपण स्वीकारलं आहे तर अ ला वेलांटी लावून ‘अि’ का स्वीकारू नये? त्यानुसार इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या चिन्हांबद्दल (अक्षरांबद्दल..स्वरांबद्दल..) अि, अी, अु, अू, अे अै ही स्वरचिन्हं स्वीकारावी.
आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. अशारितीनं अ ची बाराखडी जर आपण स्वीकारली तर, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ या स्वरचिन्हांची आवश्यकता राहणार नाही.
हाच विचार मी पुढे नेला आहे. क ला काना लावला तर ‘का’ होतो तसाच अ ला काना लावून ‘आ’ होतो आणि तो आपण स्वीकारला आहे.
क ला ओकार लावला तर ‘को’ होतो, तसाच अ ला ओकार लावला तर ‘ओ’ होतो. हा ही आपण स्वीकारला आहे.
क ला औकार लावला तर ‘कौ’ होतो, तसाच अ ला औकार लावला तर ‘औ’ होतो...तोही आपण स्वीकारला आहे.
क वर अनुस्वार दिला तर ‘कं’ होतो, तसाच अ वर अनुस्वार दिला तर ‘अं’ होतो, तो ही आपण स्वीकारलाच आहे.
क ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘क:’ होतो, तसाच अ ला विसर्ग चिन्ह लावलं तर ‘अ:’ होतो..तोही आपण स्वीकारला आहे.
जर, आ, ओ, औ, अं आणि अ: ही स्वरचिन्हं आपण आधीच स्वीकारली आहेत. तर मग....अि अी अु अू अे अै लाच का स्वीकारू नये?
खरं म्हणजे अै आणि औ हे मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु)
आद्य लिपीकारांना हेच विचार सुचले असते तर इ ई उ ऊ ए ऐ ही अक्षरचिन्हं घडविण्याची गरजच नव्हती.
अिंग्रजीच्या आक्रमणानंतर, अॅ आणि ऑ या स्वरांची सोय करणं आवश्यक होतं. ऑगस्ट, ऑक्टोबर, डॉक्टर, बँक, बॅरिस्टर, अॅक्ट,अॅडव्होकेट वगैरे शब्द मराठीत लिहीतांना अर्धचंद्राच्या सहाय्यानं हे अुच्चार लिहिले यातच मराठी लिपीकारांची प्रतिभा दिसून येते. कौतुकास्पद आहे. नाहीतर हे शब्द आगस्ट, आक्टोबर डाक्टर, आडव्होकेट ब्यांक, ब्यारिस्टर, असे लिहावे लागले असते. पूर्वी ते तसे लिहिलेही गेले आहेत.
हिंदीत हेच शब्द बैंक,अैक्ट असे लिहीतात. गुजराथी बांधव ऑ चा अुच्चार ओ असा करतात. ते बॉम्ब ला बोम्ब आणि हॉलला होल म्हणतात. अेकदा, बँकेत, अेक अिसम, लोकर पाहिजे … असं म्हणत होता. बँकेत पैसे असतात, याला लोकर कशी मिळणार? नंतर लक्षात आलं. त्याला बँकेचा लॉकर हवा होता.
पारंपारिक स्वरमालेत ऋ (र्हस्व आणि दीर्घ) आणि लृ (र्हस्व आणि दीर्घ) हे स्वर समजले आहेत. पण ते स्वरांची व्याख्या पूर्ण करू शकत नाहीत. स्वराचा अुच्चार करतांना, ओठ. दात, टाळू आणि जीभ यांचा अेकमेकांशी स्पर्श व्हावयास नको. नाद केवळ घशातूनच यावयास हवा. स्वरांचा दीर्घ अुच्चार करीत राहता येतो. अऽऽऽऽऽऽ किंवा आऽऽऽऽऽऽ. अीऽऽऽऽऽऽऽ अूऽऽऽऽऽऽऽ.
अै आणि औ हे शुध्द स्वर नाहीत, मिश्र किंवा जोड स्वर आहेत. अै म्हणजे (अ अि) आणि औ म्हणजे (अ अु). अैऽऽऽऽऽऽ आणि औऽऽऽऽऽऽऽऽ.
अॅऽऽऽऽऽऽ आणि ऑऽऽऽऽऽऽऽ. म्हणूनच अॅ आणि ऑ हे स्वर समजले जातात.
तसं व्यंजनांच्या बाबतीत होत नाही. कऽऽऽऽऽ.
ऋ आणि लृ अुच्चारतांनाही तसं होत नाही. यास्तव ही अक्षरचिन्हं, स्वर नाहीत म्हणून त्यांचा स्वरमालेत समावेश करता येत नाही. ऋऽऽऽऽऽऽऽ. लृऽऽऽऽऽऽऽऽ
वरील विवेचनानुसार अ ची चौदाखडी येणेप्रमाणे स्वीकारावी ::
अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं अ:
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, ६ नोव्हेंबर २००९ रोजी अेका अध्यादेशानं, मराठीचे स्वर आणि व्यंजनं स्वीकारली. त्यात पारंपारिक स्वरांबरोबरच अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले पण अ ची बाराखडी मात्र स्वीकारली नाही, ती आता स्वीकारावी असं वाटतं.
पण जनताजनार्दनानं हे स्वर कित्येक वर्ष आधीच स्वीकारले आहेत. १९७६ साली प्रकाशित झालेल्या प्रा. देशपांडे यांच्या अिंग्रजी-मराठी शब्दकोशात, ऑगस्ट, ऑक्टोबर, बँक,बॅरिस्टर हे शब्द असेच छापले आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी, १९३० ते १९३७ या कालखंडात १७ विज्ञाननिष्ठ निबंध आणि २ काव्यं लिहीली आणि हे सर्व साहित्य किर्लोस्कर मासिकानं प्रसिध्द केलं. या सर्व साहित्यात अ ची बाराखडीच वापरली आहे. मीही ही बाराखडीगेल्या ४०-५० वर्षांपासून माझ्या सर्व लिखाणात वापरतो आहे. सावरकरांची ही दोन्ही पुस्तकं माझ्याजवळ आहेत...त्यांचा संदर्भ, मी नेहमी घेतो. ही पुस्तकं, दादरच्या शिवाजी अुद्यानाजवळ असलेल्या सावरकर स्मारकात विक्रीस ठेवलीआहेत.
मराठी विज्ञान परिषद, मुंबअी आणि विज्ञान प्रसार, दिल्ली यांच्या सहकार्यानं, अेप्रिल २०११ मध्ये, ‘मराठीतील विज्ञान विषयक लेखन....कालखंड १८३० ते १९५०’ हा ग्रंथ, दोन खंडात प्रसिध्द केला. या कालखंडात, मराठीतून प्रसिध्द झालेले ९८१ लेख, खूप परिश्रमानं संकलीत करण्यात आले होते. आर्थिक मर्यादा असल्यामुळं, फक्त २० टक्केच लेख निवडावे असं ठरलं. यापैकी वैचारिक लेखांची निवड करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती. तेव्हा माझ्याअसं लक्षात आलं की, सुमारे १९३० ते १९४० या कालखंडात, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि काही अितरही नामवंत लेखकांनी अ ची बाराखडी वापरली आहे. त्या काळी संगणक नव्हते. परंतू त्यांनी सुचविलेली ही बाराखडी आजच्या संगणकयुगात फार अुपयोगी आहे असं वाटतं. पण आता ती कुणीच वापरतांना आढळत नाही. असं का व्हावं कळत नाही.
आता ही अ ची चौदाखडी सर्व मराठी प्रेमीजनांनी हट्टानं वापरावी अशी माझी नम्र सूचना आहे. महाराष्ट्र शासन, वृत्तपत्रं, मासिकं, मराठी जाहिरातदार, मराठी शाळा वगैरेंनी ही चौदाखडी वापरावी. असं करण्यानं होणार आहे... मराठी लिपीसमृध्दी.
डोळ्यांना आणि मेंदूला, या बाराखडीची सवय, लवकरच होते. आपणही हीच अक्षरचिन्हं वापरावीत.
ही अक्षरचिन्हं वापरून तयार झालेले काही शब्द ......
अिंद्र, अिन्द्र, अिंदिरा, अिन्दिरा, अितक्यात, अितीहास, अिच्छा ....अिंडिया.
मुंबअी, आअी, अीश्वर, अीशस्तवन, अीशान्य, अीर्षा, अीशान, अीशा ....
अुत्तर, अुपकार, अुपवन, अुकळणं, अुचापत्या, अुंच, अुंट, ....
अून, अूब, अूर, अूस ....
अेक, अेकवीस, अेकाअेकी, अेकादशी, अेकूण, अेकवीरा .....
अैरावत, अैतिहासिक, अैवज, अैवजी, अैहिक ....
हे शब्द वाचतांना काही अडचण आली? लिहीतांनाही कठीण वाटणार नाही.
-- गजानन वामनाचार्य
December 22, 2018
रंगांच्या रेणूमध्ये उर्जेचा प्रवेश होतो. ही उर्जा हाताळण्याची शक्ती त्यामध्ये असावी लागते. अन्यथा ही उर्जा रंगाच्या रेणूंमधील रासायनिक बंधने तोडायला कारणीभूत ठरते आणि असे बंधने तुटलेले रंगाचे रेणू प्रकाश शोषून घेऊ शकत नाहीत. त्यामुळे ते रंग फिके होत जातात.
April 6, 2023
सत्व गुणाला मनुष्य देहातला अत्यंत उत्तम गुण म्हणून समर्थांनी वर्णिले आहे. समाजाचे व्यवहार अविरथ चालले आहेत याचे मूळ कारण समाजात सत्व गुणी माणसे आहेत.प्रतेक माणसात सत्व ,रज आणि तमो गुण असतात. परंतु ज्यात सत्व गुणाचे प्राबल्य असते तो माणूस समाजासाठी मोठा आधार असतो.वैयक्तिक स्वार्था पेक्षा परोपकार ,सेवाभाव , करुणा ,प्रेम,समाधान ,निस्पृह व्यवहार ज्याच्या ठाई असतात तो सत्व गुणी असे समर्थ म्हणतात .समर्थांनी या समासात सत्व गुणी माणसांचे वर्णन केले आहे.
भगवान श्रीकृष्ण जरी अर्जुनास युद्धाला तयार हो म्हणून जरी युद्धभूमी वर सांगत असले तरी त्यांना कुणी तमो गुणी म्हणणार नाही याचे कारण जो सन्मार्ग दाखवतो,अज्ञानी लोकांना ज्ञान देतो तो सत्व गुणी असतो.ज्या ज्ञान दानात स्वार्थ नसतो तर समाजाचेच हित असते त्या ज्ञान दानाला सत्व गुणी म्हणावे लागेल.
देशाच्या रक्षणासाठी रणात युद्ध करणारा योद्धा सुद्धा सत्व गुणीच म्हणावा लागेल. स्वतःचे दुखः पचवून जो निदकांवर सुद्धा उपकार करतो, जो इंद्रिय दमन करतो,ईश्वराच्या अस्तित्वावर ज्याचा विश्वास आहे,जो संत आणि विद्वान यांना शरण जातो,ज्यास लोकांना शहाणे करण्याची सवय असते.जो सतत ज्ञानोपासना करण्यासाठी प्रयत्न करतो,दुस-याला दुःख झालेले ज्यास सहन होत नाही आणि त्याचे दुखः निवारण करण्यासाठी जो सतत प्रयत्नशील असतो तो सत्व गुणी.
दानधर्म करावा,रुग्णांची सेवा करावी ,विहिरी खोदून लोकांच्या पाण्याची सोय करावी.समाजाच्या कल्याणासाठी उत्सव साजरे करावे.मंदिरे बांधावी,संतांची सेवा करावी अशी सत्व गुणी माणसास आवड असते.
लांड्या लबाड्या ज्यास आवडत नाहीत , समाजाची फसवणूक होणार नाही यासाठी जो सगज असतो तो सत्व गुणी असतो.म्हणून प्रामाणिक व्यापारी,प्रामाणिक पोलिस,सैनिक,आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी यांना सत्व गुणीच म्हणावे लागेल.मी पहिल्या लेखात सांगितल्या प्रमाणे समर्थ परामानस शास्त्रात पारंगत होते.समाज कसा असावा याचे ज्ञान त्याच मूळे समर्थ देऊ शकले.
दासबोधाची व्याप्ती प्रचंड आहे.त्यावर भाष्य करण्याची माझी कुवत नाही परंतु मला समर्थ मनापासून आवडतात.जगात वाचण्या सारखे पुष्कळ आहे.परंतु जे ज्ञान सहज उपलब्ध आहे तो दासबोध,ज्ञानेश्वरी , गाथा,आणि एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत अथवा आनंद लहरी सोडून आपण इतर सगळे वाचतो पण ज्यात खरे " विज्ञान " आहे ते ज्ञान मात्र आपण अभ्यासत नाही.संतांचे ग्रंथ एकदा तरी मनापासून वाचावे खूप फरक पडतो.
॥श्रीराम॥
मागां बोलिला तमोगुण | जो दुःखदायक दारुण |
आतां ऐका सत्वगुण | परम दुल्लभ ||१||
जो भजनाचा आधार | जो योगियांची थार |
जो निरसी संसार | दुःखमूळ जो ||२||
जेणें होये उत्तम गती | मार्ग फुटे भगवंतीं |
जेणें पाविजे मुक्ती | सायोज्यता ते ||३||
जो भक्तांचा कोंवसा | जो भवार्णवींचा भर्वसा |
मोक्षलक्ष्मीची दशा | तो सत्वगुण ||४||
जो परमार्थाचें मंडण | जो महंतांचें भूषण |
रजतमाचें निर्शन | जयाचेनि ||५||
जो परम सुखकारी | जो आनंदाची लहरी |
देऊनियां निवारी- | जन्ममृत्य ||६||
जो अज्ञानाचा सेवट | जो पुण्याचें मूळपीठ |
जयाचेनि सांपडे वाट | परलोकाची ||७||
ऐसा हा सत्वगुण | देहीं उमटतां आपण |
तये क्रियेचें लक्षण | ऐसें असे ||८||
ईश्वरीं प्रेमा अधिक | प्रपंच संपादणे लोकिक |
सदा सन्निध विवेक | तो सत्वगुण ||९||
संसारदुःख विसरवी | भक्तिमार्ग विमळ दावी |
भजनक्रिया उपजवी | तो सत्वगुण ||१०||
परमार्थाची आवडी | उठे भावार्थाची गोडी |
परोपकारीं तांतडी | तो सत्वगुण ||११||
स्नानसंध्या पुण्यसीळ | अभ्यांतरींचा निर्मळ |
शरीर वस्त्रें सोज्वळ | तो सत्वगुण ||१२||
येजन आणी याजन | आधेन आणी अध्यापन |
स्वयें करी दानपुण्य | तो सत्वगुण ||१३||
निरूपणाची आवडी | जया हरिकथेची गोडी |
क्रिया पालटे रोकडी | तो सत्वगुण ||१४||
अश्वदानें गजदानें | गोदानें भूमिदानें |
नाना रत्नांचीं दानें | करी तो सत्वगुण ||१५||
धनदान वस्त्रदान | अन्नदान उदकदान |
करी ब्राह्मणसंतर्पण | तो सत्वगुण ||१६||
कार्तिकस्नानें माघस्नानें | व्रतें उद्यापनें दानें |
निःकाम तीर्थें उपोषणे | तो सत्वगुण ||१७||
सहस्रभोजनें लक्षभोजनें | विविध प्रकारींचीं दानें |
निष्काम करी सत्वगुण | कामना रजोगुण ||१८||
तीर्थीं अर्पी जो अग्रारें | बांधे वापी सरोवरें |
बांधे देवाळयें सिखरें | तो सत्वगुण ||१९||
देवद्वारीं पडशाळा | पाईरीया दीपमाळा |
वृंदावनें पार पिंपळा | बांधे तो सत्वगुण ||२०||
लावीं वनें उपवनें | पुष्प वाटिका जीवनें |
निववी तापस्यांचीं मनें | तो सत्वगुण ||२१||
संध्यामठ आणी भूयेरीं | पाईरीया नदीतीरीं |
भांडारगृहें देवद्वारीं | बांधें, तो सत्वगुण ||२२||
नाना देवांचीं जे स्थानें | तेथें नंदादीप घालणें |
वाहे आळंकार भूषणें | तो सत्वगुण ||२३||
जेंगट मृदांग टाळ | दमामे नगारे काहळ |
नाना वाद्यांचे कल्लोळ | सुस्वरादिक ||२४||
नाना सामग्री सुंदर | देवाळईं घाली नर |
हरिभजनीं जो तत्पर | तो सत्वगुण ||२५||
छेत्रें आणी सुखासनें | दिंड्या पताका निशाणें |
वाहे चामरें सूर्यापानें | तो सत्वगुण ||२६||
वृंदावनें तुळसीवने | रंगमाळा समार्जनें |
ऐसी प्रीति घेतली मनें | तो सत्वगुण ||२७||
सुंदरें नाना उपकर्णें | मंडप चांदवे आसनें |
देवाळईं समर्पणें | तो सत्वगुण ||२८||
देवाकारणें खाद्य | नाना प्रकारीं नैवेद्य |
अपूर्व फळें अर्पी सद्य | तो सत्वगुण ||२९||
ऐसी भक्तीची आवडी | नीच दास्यत्वाची गोडी |
स्वयें देवद्वार झाडी | तो सत्वगुण ||३०||
तिथी पर्व मोहोत्साव | तेथें ज्याचा अंतर्भाव |
कायावाचामनें सर्व | अर्पी, तो सत्वगुण ||३१||
हरिकथेसी तत्पर | गंधें माळा आणी धुशर |
घेऊन उभीं निरंतर | तो सत्वगुण ||३२||
नर अथवा नारी | येथानुशक्ति सामग्री |
घेऊन उभीं देवद्वारीं | तो सत्वगुण ||३३||
महत्कृत्य सांडून मागें | देवास ये लागवेगें |
भक्ति निकट अंतरंगें | तो सत्वगुण ||३४||
थोरपण सांडून दुरी | नीच कृत्य आंगीकारी |
तिष्ठत उभी देवद्वारीं | तो सत्वगुण ||३५||
देवालागीं उपोषण | वर्जी तांबोल भोजन |
नित्य नेम जप ध्यान | करी, तो सत्वगुण ||३६||
शब्द कठीण न बोले | अतिनेमेंसी चाले |
योगी जेणें तोषविले | तो सत्वगुण ||३७||
सांडूनियां अभिमान | निष्काम करी कीर्तन |
श्वेद रोमांच स्फुरण | तो सत्वगुण ||३८||
अंतरीं देवाचें ध्यान | तेणें निडारले नयन |
पडे देहाचें विस्मरण | तो सत्वगुण ||३९||
हरिकथेची अति प्रीति | सर्वथा नये विकृती |
आदिक प्रेमा आदिअंतीं | तो सत्वगुण ||४०||
मुखीं नाम हातीं टाळी | नाचत बोले ब्रीदावळी |
घेऊन लावी पायधुळी | तो सत्वगुण ||४१||
देहाभिमान गळे | विषईं वैराग्य प्रबळे |
मिथ्या माया ऐसें कळे | तो सत्वगुण ||४२||
कांहीं करावा उपाये | संसारीं गुंतोन काये |
उकलवी ऐसें हृदये | तो सत्वगुण ||४३||
संसारासी त्रासे मन | कांहीं करावें भजन |
ऐसें मनीं उठे ज्ञान | तो सत्वगुण ||४४||
असतां आपुले आश्रमीं | अत्यादरें नित्यनेमी |
सदा प्रीती लागे रामीं | तो सत्वगुण ||४५||
सकळांचा आला वीट | परमार्थीं जो निकट |
आघातीं उपजे धारिष्ट | तो सत्वगुण ||४६||
सर्वकाळ उदासीन | नाना भोगीं विटे मन |
आठवे भगवद्भजन | तो सत्वगुण ||४७||
पदार्थीं न बैसे चित्त | मनीं आठवे भगवंत |
ऐसा दृढ भावार्थ | तो सत्वगुण ||४८||
लोक बोलती विकारी | तरी आदिक प्रेमा धरी |
निश्चय बाणे अंतरीं | तो सत्वगुण ||४९||
अंतरीं स्फूर्ती स्फुरे | सस्वरूपीं तर्क भरे |
नष्ट संदेह निवारे | तो सत्वगुण ||५०||
शरीर लावावें कारणीं | साक्षेप उठे अंतःकर्णी |
सत्वगुणाची करणी | ऐसी असे ||५१||
शांति क्ष्मा आणि दया | निश्चय उपजे जया |
सत्वगुण जाणावा तया | अंतरीं आला ||५२||
आले आतीत अभ्यागत | जाऊं नेदी जो भुकिस्त |
येथानशक्ती दान देत | तो सत्वगुण ||५३||
तडितापडी दैन्यवाणें | आलें आश्रमाचेनि गुणें |
तयालागीं स्थळ देणें | तो सत्वगुण ||५४||
आश्रमीं अन्नाची आपदा | परी विमुख नव्हे कदा |
शक्तिनुसार दे सर्वदा | तो सत्वगुण ||५५||
जेणें जिंकिली रसना | तृप्त जयाची वासना |
जयास नाहीं कामना | तो सत्वगुण ||५६||
होणार तैसें होत जात | प्रपंचीं जाला आघात |
डळमळिना ज्याचें चित्त | तो सत्वगुण ||५७||
येका भगवंताकारणें | सर्व सुख सोडिलें जेणें |
केलें देहाचें सांडणें | तो सत्वगुण ||५८||
विषईं धांवे वासना | परी तो कदा डळमळिना |
ज्याचें धारिष्ट चळेना | तो सत्वगुण ||५९||
देह आपदेनें पीडला | क्षुधे तृषेनें वोसावला |
तरी निश्चयो राहिला | तो सत्वगुण ||६०||
श्रवण आणी मनन | निजध्यासें समाधान |
शुद्ध जालें आत्मज्ञान | तो सत्वगुण ||६१||
जयास अहंकार नसे | नैराशता विलसे |
जयापासीं कृपा वसे | तो सत्वगुण ||६२||
सकळांसीं नम्र बोले | मर्यादा धरून चाले |
सर्व जन तोषविले | तो सत्वगुण ||६३||
सकळ जनासीं आर्जव | नाहीं विरोधास ठाव |
परोपकारीं वेची जीव | तो सत्वगुण ||६४||
आपकार्याहून जीवीं | परकार्यसिद्धी करावी |
मरोन कीर्ती उरवावी | तो सत्वगुण ||६५||
पराव्याचे दोषगुण | दृष्टीस देखे आपण |
समुद्रा ऐसी साठवण | तो सत्वगुण ||६६||
नीच उत्तर साहाणें | प्रत्योत्तर न देणें |
आला क्रोध सावरणें | तो सत्वगुण ||६७||
अन्यायेंवीण गांजिती | नानापरी पीडा करिती |
तितुकेंहि साठवी चित्तीं | तो सत्वगुण ||६८||
शरीरें घीस साहाणें | दुर्जनासीं मिळोन जाणें |
निंदकास उपकार करणें | हा सत्वगुण ||६९||
मन भलतीकडे धावें | तें विवेकें आवरावें |
इंद्रियें दमन करावें | तो सत्वगुण ||७०||
सत्क्रिया आचरावी | असत्क्रिया त्यागावी |
वाट भक्तीची धरावी | तो सत्वगुण ||७१||
जया आवडे प्रातःस्नान | आवडे पुराणश्रवण |
नाना मंत्रीं देवतार्चन | करी, तो सत्वगुण ||७२||
पर्वकाळीं अतिसादर | वसंतपूजेस तत्पर |
जयंत्याची प्रीती थोर | तो सत्वगुण ||७३||
विदेसिं मेलें मरणें | तयास संस्कार देणें |
अथवा सादर होणें | तो सत्वगुण ||७४||
कोणी येकास मारी | तयास जाऊन वारी |
जीव बंधनमुक्त करी | तो सत्वगुण ||७५||
लिंगें लाखोलीं अभिशेष | नामस्मरणीं विस्वास |
देवदर्शनीं अवकाश | तो सत्वगुण ||७६||
संत देखोनि धावें | परमसुखें हेलावे |
नमस्कारी सर्वभावें | तो सत्वगुण ||७७||
संतकृपा होय जयास | तेणें उद्धरिला वंश |
तो ईश्वराचा अंश | सत्वगुणें ||७८||
सन्मार्ग दाखवी जना | जो लावी हरिभजना |
ज्ञान सिकवी अज्ञाना | तो सत्वगुण ||७९||
आवडे पुण्य संस्कार | प्रदक्षणा नमस्कार |
जया राहे पाठांतर | तो सत्वगुण ||८०||
भक्तीचा हव्यास भारी | ग्रंथसामग्री जो करी |
धातुमूर्ति नानापरी | पूजी, तो सत्वगुण ||८१||
झळफळित उपकर्णें | माळा गवाळी आसनें |
पवित्रे सोज्वळें वसनें | तो सत्वगुण ||८२||
परपीडेचें वाहे दुःख | परसंतोषाचें सुख |
वैराग्य देखोन हरिख | मानी,तो सत्वगुण ||८३||
परभूषणें भूषण | परदूषणें दूषण |
परदुःखें सिणे जाण | तो सत्वगुण ||८४||
आतां असों हें बहुत | देवीं धर्मीं ज्यांचें चित्त |
भजे कामनारहित | तो सत्वगुण ||८५||
ऐसा हा सत्वगुण सात्विक | संसारसागरीं तारक |
येणें उपजे विवेक | ज्ञानमार्गाचा ||८६||
सत्वगुणें भगवद्भक्ती | सत्वगुणें ज्ञानप्राप्ती |
सत्वगुणें सायोज्यमुक्ती | पाविजेते ||८७||
ऐसी सत्वगुणाची स्थिती | स्वल्प बोलिलें येथामती |
सावध होऊन श्रोतीं | पुढें अवधान द्यावें ||८८||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*सत्वगुणलक्षणनाम समास सातवा || २.७ ||
॥श्रीराम॥
लेखनसीमा ...... संपूर्ण
--चिंतामणी कारखानीस
March 25, 2016
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 11, 2018
कोन बनेगा करोडपती मध्ये प्रत्येकाला मान देणारा, न्याय देणारा, समजून घेणारा,खोटं खोटं न हसणारा, गंभीर होणारा अभिताभ. एकेक नायक एक एक पिढीवर राज्य करत असतो, अनेकांच्या मनावर राज्य करत असतो.
March 25, 2025
आपल्या ऐतिहासिक वारशाचं परदेशींना कौतुक, अप्रूप आहे, पण आपल्या देशी राज्यकर्त्याना आणि नागरीकांनाही नाही, याचं दु:ख बाप्टीस्टांप्रमाणे मलाही आहे.. खरंतर मुंबईतली ही अशाप्रकारची एकमेंव वस्ती नाही. उपनगरातील वांद्रे पश्चिम, अंधेरीतल्या आंबोली परिसरात अशाच प्रकारच्या वस्ती आहेत, पण पुनर्विकासाच्या नांवाखाली त्याही उध्वस्त होत चालल्या आहे. म्हातारपाखाडी अजून बऱ्यापैकी शिल्लक आहे.
January 24, 2018
एकेकाळी जीवन किती सोपे होते आणि त्याचे प्रतिबिंब ज्यात पडायचे ते चित्रपटही किती हृदयस्पर्शी होते याचे उदाहरण म्हणजे “खुशबू” .कोठलाही संदेश नाही, भाष्याचा आव नाही तरीही हा ” भावपाशांचा दस्तावेज ” मनाचा एक कोपरा व्यापून राहतोच.
November 7, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti