वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतीय पातळीवर १०८ शक्तिपीठांपैकी प्रमुख मानल्या जाणाऱ्या शक्तीपिठात महाराष्ट्रातील तुळजापुर, कोल्हापुर, माहूर, यांचा समावेश होतो. महाराष्ट्रात साडेतीन पीठे असल्याचे मानले जाते, हि साडेतीन शक्ती पिठाची संकल्पना ओंकाराचे साडेतीन मात्रांवर आधारित आहे, या साडेतीन शक्ती पीठांचा परिचय आपण पुढे पाहणार आहोत.
महाराष्ट्रातील पहिले शक्तिपीठ - श्री तुळजाभवानी तुळजापूर
तुळजाभवानी माता ही राज्याचे पहिले शक्तिपीठ असून, उस्मानाबाद जिल्ह्यात उस्मानाबाद पासुन २२ किमी अंतरा वर तुळजापूर मध्ये हे मंदिर आहे, सोलापूर शहरा पासुन हे ठिकाण ४४ किमी अंतरावर आहे.
तुळजाभवानी स्थान बालाघाट डोंगर रांगामध्ये वसलेले आहे. तुळजाभवानी मंदिर तुळजापूर गावातील पूर्णतः खोलगट भागात आहे. मंदिरा कडे जाण्यास शहाजीराजे महाद्वार व राजमाता जिजाऊ महाद्वार अशी दोन भव्य महाद्वारे आहेत. खाली उतरून जाण्यास सुंदर घडीव अशा पायऱ्या असून, या पायऱ्यांचे तीन टप्पे आहेत. मंदिरात जाताना डावीकडे तीर्थकुंडे आहेत. पहिला टप्पा संपताच एकशेआठ झऱ्यांचे उगमस्थान असणारे कल्लोळतीर्थ,. दुसरा टप्पा संपल्यावर उजवीकडे गोमुख तीर्थकुंड आहे. तिसरा टप्पा संपल्यावर आपण मुख्य मंदिराच्या प्रांगणात पोहोचतो. येथे उजवीकडे तुळजाभवानीचा नगारखाना आहे. त्यानंतर अवघ्या काही पायऱ्या उतरल्यानंतर देवीचे होमकुंड आहे. होमकुंडाचे मंदिर पुरातन असुन होमकुंड सुमारे दहा फूट लांब – रुंद असून, साधारण सात फूट खोल आहे. होमकुंडावर उजव्या बाजूस गणेशमूर्ती आहे. होमकुंडाच्या पायाशी भैरवाची मूर्ती आहे.
त्यापुढे मुख्य हेमाडपंती बांधणीचे दगडी मुख्य मंदिर आहे. मंदिराचा मुख्य दरवाजा पितळी असून मंडपास सोळा दगडी खांब आहेत , देवीच्या मुख्य गाभाऱ्याबाहेर सभामंडपात बाजूला देवीचे शेजघर आहे. शेजघरा मध्ये देवीचा चांदीचा पलंग आहे. गर्भगृहात तुळजाभवानी मातेची गंडकी पाषाणाची पूर्वाभिमूख महिषासुर मर्दिनी रूपातील मूर्ती चांदीच्या सिंहासनावर विराजमान आहे. या स्थाना विषयी काही कथा प्रचलित आहेत
प्राचीनकाळी कृतयुगात येथील वनात कर्दम ऋषी पत्नी अनुभूती सह या ठिकाणी राहत होते. कर्दम ऋषींचे मृत्यू समयी अनुभूती गरोदर होती त्यामुळे तिने सह गमन केले नाही पुढे प्रसूती झाल्यानंतर तिने तपश्च्रर्या सुरु केली. तिची तपश्च्रर्या सुरु असताना कुकुटनावाचा राक्षस या परिसरात आला. तपश्च्रर्य मध्ये मग्न अनुभूती त्याला दिसली तिला पाहून त्याची कामवासना अनावर झाली व त्याने तिला स्पर्श केला या स्पर्शाने तिची तपश्च्रर्या भंग पावली समोर कामातुर झालेला राक्षस पाहून तिने देवीचा धावा सुरु केला तीने आपल्या रक्षणासाठी भावभक्तीने केलेला धावा ऐकून त्वरित श्रीदुर्गा पार्वती भवानी माता धावून आली व राक्षसाचा वध केला.व तिला वर दिला व या ठिकाणी भक्त रक्षणा साठी वास केला हाकेला त्वरित धावून आली म्हणून हिचे नाव त्वरिता देवी, पुढे त्वरिताचे तुरजा झाले आणि काळाचे ओघात याचे मराठीत अपभ्रंश रूप म्हणजे तुळजा देवी असे झाले.
प्रभु रामचंद्र वनवासात असताना रावणाने सीतेचे हरण केले, प्रभू रामचंद्र तिचा शोध घेऊ लागले तेव्हा पार्वतीने त्यांची सत्व परीक्षा घेण्याचे ठरविले, व ती सीतेच्या रुपात त्यांचे समोर गेली, रामचंद्रांनी पार्वती मातेला ओळखले व तू का आलीस आई असे विचारले. तेव्हा पार्वतीने तुकाई नाव मिळाले व तिने येथे वास केला. पुढे तुकाई चे तुळजा झाले अशी हि एक लोककथा प्रचलित आहे.
छत्रपति शिवाजी महाराजांनी या आपल्या कुलदेवतेला अर्पण केलेल्या पुतळीमाळेतील प्रत्येक पुतळीच्या मागे राजे शिवाजी अशी अक्षरे कोरलेली आहेत.
देवीच्या सिंहासनाच्या उत्तर बाजूस देवीचे न्हाणी गृह आहे.
मंदिराचे सभोवतालीचे ओवर्या मध्ये जेजुरीचा खंडोबा व इतर देवतांची स्थाने आहेत. तुळजापूर गावात विविध देवी मंदिरे आहेत.
मंदिरात आश्विन शुद्ध प्रतिपदेस घटस्थापना देवीच्या सिंहाच्या सभामंडपामध्ये होते. त्या ठिकाणी ईशान्य दिशेला धान्याची पेरणी करण्यात येते. तेथे नंदादीप असतो. घटस्थापना ते महानवमी या कालावधीत घटाची पूजा होते. देवीस दररोज दोन रोज सकाळ व संध्याकाळ अशी दोन वेळ पंचामृत अभिषेक पूजा केली जाते या पूजा कायमस्वरूपी असतात.
नवरात्रातही त्याच पद्धतीने पूजा चालू असतात. नवरात्रात प्रतिपदा ते अष्टमी कालावधीत रात्री छबिना निघतो. नवमीला घटोत्थापन आणि दशमीला देवीचे पहाटे सीमोल्लंघन होते.
माहिती संकलन : निखिल आघाडे
October 4, 2016
भगवान गणेशाचे हे स्तोत्र जगद्गुरु शंकराचार्यांनी ज्या वृत्तात रचले त्या नावानेच ते विख्यात झाले आहे. या स्तोत्राचे वृत्त आहे भुजंगप्रयात. भुजंग अर्थात सर्प. तो जात असताना ज्या प्रकारच्या वळणांचा उपयोग करतो तशी वळण घेत जाणारी ही शब्दावली. त्यामुळेच या वृत्ताला भुजंग प्रयात असे म्हणतात.
January 13, 2020
बर्याच जणांनास्पाॅन्डेलायटीस,व्हर्टिगो म्हणजे मानेतील दोष, पाठदुखी स्लीप डिस्क म्हणजे कंबर दूखी असे त्रास असतात. ह्यासाठी एक सोपा घरगुती उपाय सांगतो.
ह्यासाठी लागणारी सामुग्री - दोन सारख्या आकाराच्या काचेच्या रिकाम्या बाटल्या, चटई
१. प्रथम चटई वर उशी न घेता पाठ टेकून झोपावे.
२. ह्या स्थितीत मानेखाली व कंबरेखाली गॅप पडते.
३. एक बाटली मानेखालील गॅप मध्ये आडवी ठेवावी.
४. नंतर दोन्ही पाय जवळ घेऊन कंबर उचलावी. माकड हाडाजवळ दुसरी बाटली आडवी सरकवावी.
५. आता एक एक पाय सरळ करावा. दोन्ही पाय एकदम सरळ करू नयेत. हे महत्वाचे आहे.
६. पाय सरळ केले की डोके जमिनीला टेकवावे. ह्यामुळे पाठीच्या कण्याला ताण येतो. अशा स्थितीत अर्धा मिनिट राहावे..
७. उठताना एकेक पाय जवळ घेऊन कंबर उचलून कंबरे खालील बाटली प्रथम काढावी व नंतर मानेखालची बाटली काढावी. व कुशीवर वळून उठून बसावे.
हा प्रयोग करताना कधीही घाई करू नये शांतपणेच करावा. असे रोज एकदा करावे.
अरविंद जोशी B.Sc.
व्हीडीओ साठी क्लिक करा
https://youtu.be/Xju7asFx6IU
July 12, 2017
समर्थांनी दासबोधात सत्व गुण , रजो गुण , आणि तमोगुणांचे वर्णन केले आहे.हे तीनही गुण असलेली माणसे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.सर्व प्रथम आपण तमोगुण पाहू.
समर्थांचा दासबोध वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते कि त्यांनी केलेले भाष्य हे त्रिकाळ बाधित सत्य आहे हे नंतरच्या काळात सिद्ध झालेले आहे. समर्थ ज्या काळात वावरत होते त्या काळात शहरे विकसित झाली नव्हती.आज जो लोकसंखेचा भस्मासुर उभा राहिलेला आहे तो नव्हता. सर्व सामान्य लोकांच्या गरज त्याकाळात खूप कमी होत्या .तरी सुद्धा स्त्री भ्रूण हत्या. अप्पल पोटेपणा, श्रीमंतीचा हव्यास ,दुस-यांना त्रास देण्याची मानसिकता.आपले तेच खरे करण्याची वृत्ती ,.स्वतःच्या माता- पित्याला सुद्धा मारण्याची मानसिकता, स्वार्था साठी दुस-याचा प्राण घेणे , सतत भांडणे लावून आपण त्याची मजा पाहत राहणे,किडामुंगी श्वापद याची हत्या करण्याची आवड ,सदैव मस्तवाल आणि उद्धट वागणे, फळझाडे ,वृक्ष यांची कत्तल करणे ,ज्यास निष्ठुर पणाच आवडतो,भक्ती मार्ग आणि ईश्वारोपासना न करणे इत्यादी अनेक कु कर्माची यादी समर्थांनी या दशक २ समास ६ मध्ये दिलेली आहे.तमोगुण सर्वथा टाळावा आणि तो अत्यंत प्रयत्न पूर्वक टाळावा हे समर्थांनी दासबोधात सांगितले आहे. तो हा समास......वाचा तमोगुण लक्षण ....
समास सहावा : तमोगुणलक्षण* || २.६ ||
॥श्रीराम॥
आतां ऐका तमोगुण | तोहि सांगिजेल ||१||
संसारीं दुःखसंमंध | प्राप्त होतां उठे खेद |
कां अद्भुत आला क्रोध | तो तमोगुण ||२||
शरीरीं क्रोध भरतां | नोळखे माता पिता |
बंधु बहिण कांता | ताडी तो तमोगुण ||३||
दुसऱ्याचा प्राण घ्यावा | आपला आपण स्वयें
द्यावा | विसरवी जीवभावा | तो तमोगुण ||४||
भरलें क्रोधाचें काविरें | पिश्याच्यापरी वावरे |
नाना उपायें नावरे | तो तमोगुण ||५||
आपला आपण शस्त्रपात | पराचा करी घात |
ऐसा समय वर्तत | तो तमोगुण ||६||
डोळां युध्यचि पाहावें | रण पडिलें तेथें
जावें | ऐसें घेतलें जीवें | तो तमोगुण ||७||
अखंड भ्रांती पडे | केला निश्चय विघडे |
अत्यंत निद्रा आवडे | तो तमोगुण ||८||
क्षुधा जयाची वाड | नेणे कडु अथवा गोड |
अत्यंत जो कां मूढ | तो तमोगुण ||९||
प्रीतिपात्र गेलें मरणें | तयालागीं जीव देणें |
स्वयें आत्महत्या करणें | तो तमोगुण ||१०||
किडा मुंगी आणी स्वापद | यांचा करूं आवडे
वध | अत्यंत जो कृपामंद | तो तमोगुण ||११||
स्त्रीहत्या बाळहत्या | द्रव्यालागीं ब्रह्महत्या |
करूं आवडे गोहत्या | तो तमोगुण ||१२||
विसाळाचेनि नेटें | वीष घ्यावेंसें वाटे |
परवध मनीं उठे | तो तमोगुण ||१३||
अंतरीं धरूनि कपट | पराचें करी तळपट |
सदा मस्त सदा उद्धट | तो तमोगुण ||१४||
कळह व्हावा ऐसें वाटे | झोंबी घ्यावी ऐसें
उठे | अन्तरी द्वेष प्रगटे | तो तमोगुण ||१५||
युध्य देखावें ऐकावें | स्वयें युध्यचि करावें |
मारावें कीं मरावें | तो तमोगुण ||१६||
मत्सरें भक्ति मोडावी | देवाळयें विघडावीं |
फळतीं झाडें तोडावीं | तो तमोगुण ||१७||
सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती |
पापभय नाहीं चित्ती | तो तमोगुण ||१८||
ब्रह्मवृत्तीचा उछेद | जीवमात्रास देणें खेद |
करूं आवडे अप्रमाद | तो तमोगुण ||१९||
आग्नप्रळये शस्त्रप्रळये | भूतप्रळये वीषप्रळये |
मत्सरें करीं जीवक्षये | तो तमोगुण ||२०||
परपीडेचा संतोष | निष्ठुरपणाचा हव्यास |
संसाराचा नये त्रास | तो तमोगुण ||२१||
भांडण लाऊन द्यावें | स्वयें कौतुक पाहावें |
कुबुद्धि घेतली जीवें | तो तमोगुण ||२२||
प्राप्त जालियां संपत्ती | जीवांस करी यातायाती |
कळवळा नये चित्तीं | तो तमोगुण ||२३||
नावडे भक्ति नावडे भाव | नावडे तीर्थ नावडे देव |
वेदशास्त्र नलगे सर्व | तो तमोगुण ||२४||
स्नानसंध्या नेम नसे | स्वधर्मीं भ्रष्टला दिसे |
अकर्तव्य करीतसे | तो तमोगुण ||२५||
जेष्ठ बंधु बाप माये | त्यांचीं वचनें न साहे |
सीघ्रकोपी निघोन जाये | तो तमोगुण ||२६||
उगेंचि खावें उगेंचि असावें | स्तब्ध होऊन बैसावें |
कांहींच स्मरेना स्वभावें | तो तमोगुण ||२७||
चेटकविद्येचा अभ्यास | शस्त्रविद्येचा हव्यास |
मल्लविद्या व्हावी ज्यास | तो तमोगुण ||२८||
केले गळाचे नवस | राडिबेडीचे सायास |
काष्ठयंत्र छेदी जिव्हेस | तो तमोगुण ||२९||
मस्तकीं भदें जाळावें | पोतें आंग हुरपळावें |
स्वयें शस्त्र टोचून घ्यावें | तो तमोगुण ||३०||
देवास सिर वाहावें | कां तें आंग समर्पावें |
पडणीवरून घालून घ्यावे | तो तमोगुण ||३१||
निग्रह करून धरणें | कां तें टांगून घेणें |
देवद्वारीं जीव देणें | तो तमोगुण ||३२||
निराहार उपोषण | पंचाग्नी धूम्रपान |
आपणास घ्यावें पुरून | तो तमोगुण ||३३||
सकाम जें का अनुष्ठान | कां तें वायोनिरोधन |
अथवा राहावें पडोन | तो तमोगुण ||३४||
नखें केश वाढवावे | हस्तचि वर्ते करावे |
अथवा वाक्शून्य व्हावें | तो तमोगुण ||३५||
नाना निग्रहें पिडावें | देहदुःखें चर्फडावें |
क्रोधें देवास फोडावें | तो तमोगुण ||३६||
देवाची जो निंदा करी | तो आशाबद्धि अघोरी |
जो संतसंग न धरी | तो तमोगुण ||३७||
ऐसा हा तमोगुण | सांगतां तो असाधारण |
परी त्यागार्थ निरूपण | कांहीं येक ||३८||
ऐसें वर्ते तो तमोगुण | परी हा पतनास
कारण | मोक्षप्राप्तीचें लक्षण | नव्हे येणें ||३९||
केल्या कर्माचें फळ | प्राप्त होईल सकळ |
जन्म दुःखाचें मूळ | तुटेना कीं ||४०||
व्हावया जन्माचें खंडण | पाहिजे तो सत्वगुण |
तेंचि असे निरुपण | पुढिले समासीं ||४१||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
*तमोगुणलक्षणनाम समास सहावा || २.६ ||
-- चिंतामणी कारखानीस
March 5, 2016
‘परम महासंगण’चे जनक म्हणून अवघ्या जगाला परिचित असलेल्या विजय भटकरांनी आयुर्वेदात विषद केलेले गो-पीयूषाचे महत्त्व समजून घेऊन त्यावर संशोधन केले आणि या जुन्या प्रभावी औषधाला नव्या स्वरूपात सादर करीत ‘इम्यूरिच’नामक कॅप्सूल तयार केली. स्वाईन फ्लूवर ही अतिशय प्रभावी आणि कुठलेही ‘साईड इफेक्ट’ नसलेली कॅप्सूल आहे.
भारतात उठलेले किंवा उठवल्या गेलेले स्वाईन फ्लू नावाचे वादळ आता शांत होत आहे.
August 23, 2009
मुद्रा शास्त्रात आरोग्यासाठी वेगवेगळ्या मुद्रा सांगितल्या आहेत. त्यातील अपान मुद्रा फार महत्वाची आहे. हाताच्या अंगठ्याचे टोक आणि मधले बोट व अनामिका ह्यांची टोके एकत्र जोडली की अपान मुद्रा तयार होते. ही मुद्रा कोणत्याही वेळी व कितीही वेळ केली तरी चालते. दोन्ही हातांनी किंवा न जमल्यास एका हाताने केली तरी चालते. सध्याचे जीवन बघता असे दिसते की: पुरेसा व्यायाम नाही, वाहनांच्या सुविधेमुळे शरीराची हालचाल कमी होते, आहार शांतपणे मन लावून घेतला जात नाही, आहार गरजेपेक्षा जास्त घेतला जातो, भूक लागल्यावर घेण्याऐवजी वेळ झाली म्हणून भूक नसताना देखील घेतला जातो, चमचमीत पदार्थ चवीसाठी भूक नसताना खाल्ले जातात. अशा प्रकारच्या स्वैर वर्तनाने आपल्या शरीरात टॉक्सिन्सची भरपूर साठवणूक होते आणि आपले आरोग्य बिघडते.
अपान मुद्रा केल्याने शरीरातील कोणत्याही प्रकारच्या मलाचे, विजातीय द्रव्याचे निचरा होण्याची क्रिया सहज वाढते व शरीर शुद्ध होऊ लागते म्हणजेच निरोगी होण्याला मदत होते.
१. ही मुद्रा केल्याने शौच क्रिया सुधारायला मदत होते.
२. छाती कफाने भरल्यावर ही मुद्रा केल्याने कफ पातळ होऊन खाली जात असल्याची जाणीव होऊन छाती मोकळी होते.
३. अपचनामुळे जळजळ होत असल्यास ह्या मुद्रेने फायदा होतो.
४. कुठल्याही प्रकारची सूज उतरवायला मदत होते.
५. लाघवी साफ होण्यास मदत होते.
६. ही मुद्रा केल्याने गुडघ्यावरील सूज कमी होऊन गुडघे दुखायचे थांबतात असा बरेच जणांचा अनुभव आहे.
७. ही मुद्रा केल्याने हाय बी पी वाल्यांना फायदा झाला आहे.
८. एका गृहस्थांचा डावा पाय वर पासून खाल पर्यंत सुजला होता. मी त्यांना अपान मुद्रा करायला सांगितली. एक महिन्यानंतर त्यांनी येऊन पाय दाखवला. पायाची सूज पूर्णपणे उतरून दोन्ही पाय एकसारखे दिसत होते.
९. डास चावल्यावर तेथे आग होते. ती आग ही मुद्रा केल्याने थांबते असा माझा अनुभव आहे.
१०. एका गरोदर बाईंना आठव्या महिना संपल्यावर ही मुद्रा करण्यास सांगितले त्या बाईंची डिलिव्हरी नॉर्मल झाली. त्यामुळे त्या बाई खुश होत्या.
११. एका बाईनी ही मुद्रा केल्याने पित्ताचा त्रास गेल्याचे सांगितले.
१२. सोलापूरच्या एका बाईंनी फोन करून सांगितले की त्यांच्या पतीराजांचे क्रीयेटीनीन अठवड्यातून दोनदा डायलेसिस करूनसुध्दा गेले सहा महीने ११च रहात होत. तुमच्या पुस्तकांत दिल्या प्रमाणे मी गेले एक महीना त्यांना जास्तीत जास्त अपान मुद्रा करायला लावली. ह्यामुळे त्याचे क्रीयेटीनीन एक महीन्यात ४ वर आले. तुम्हाला धन्यवाद.
ही मुद्रा केल्याने शरीरशुद्धी होत असल्याने कॅन्सर सारखे आजार न होण्यास मदत होऊ शकेल असे मला वाटते.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
हा लेख वाचून काही शंका असल्यास जरूर फोन करावा.
April 26, 2017
आई जगदंबे च्या परमपूज्यत्वाचे वर्णन करतांना आचार्य श्री येथे तिच्या त्रिदेव पूज्यत्वाचा उल्लेख करीत आहेत.
February 4, 2020
दत्तगुरूंची हि आवडीची भाजी म्हणून हिचा उल्लेख गुरुचरित्रात देखील आढळते.तसेच गुरुचरित्र वाचनाचे उद्यापन करतात तेव्हा घेवड्याच्या भाजीचा नैवेद्य केला जातो.अशी हि भाजी ब-याच जणांना आवडत असली तरी फारशी खाल्ली जात नाही त्यामुळे थोडी उपेक्षितच म्हणावी लागेल.
हि भाजी फार चविष्ट लागते.तशी चवीला तुरट गोड व थंड असून हि शरीरात वात दोष वाढविते व कफ व पित्त दोष कमी करते.
चला हिचे औषधी उपयोग पाहूयात:
१)घसा बसणे कोरडा खोकला ह्यात घेवड्याच्या शेंगांचा रस मध व ज्येष्ठमध घालून प्यायला द्यावा.
२)घेवड्याच्या शेंगांचे सूप करून सर्दी,घसादुखणे अशा तक्रारींमध्ये मिरपुड घालून प्यावा फायदा होतो.
३)आजारपणातुन उठल्यावर तोंडाला रुची नसल्यास घेवड्याची भाजी फुल्क्यांसह खावी.
४)पायदुखणे,गुडघे दुखी,पाय मुरगळणे ह्यात घेवड्याचा पाला व सुंठ एकत्र वाटून गरम करून लेप लावावा.
घेवडा अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगते व गॅसेसचा त्रास होतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
November 28, 2016
भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.
असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
April 1, 2017
मूल्ये नजरेला स्वच्छ करतात आणि एकाग्रता बहाल करतात. त्यामुळे पुढची वाट सुस्पष्ट दिसू लागते. स्व-जाणिवा जागृत झाल्या की आयुष्य अधिक खरं आणि कृतार्थ वाटायला लागतं. विकसित केलेली मूल्यव्यवस्था म्हणजे होकायंत्र! रस्ता हरपल्यावर आपल्याला दिशादर्शन करण्याचे आणि त्याद्वारे योग्य मार्गावर आणण्याचे कार्य आपली जीवनमूल्ये करीत असतात.
March 10, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti