भास लिखित अविमारक चा नायक काशिराजाची राणी सुदर्शना हिला अग्नीपासून झालेला पुत्र. चण्डभार्गव नावाच्या ऋषींच्या शापामुळे त्याचे पिता सौवीरराज यांना चांडालत्व आले . ते गुप्त वेषात राहात आहेत. सौवीरराज यांच्या मुलाचे नाव तेथे विष्णुसेन आहे. अवि रूपधारी राक्षसाचा वध केल्याने लोक त्याला अविमारक (अवी म्हणजे बोकड. बोकडाचे रूप घेतलेल्या असुराचा मारक या अर्थाने) म्हणू लागले. अविमारक मुळात अग्निपुत्र असल्यामुळे त्याने बालपणी अद्भुत पराक्रम केले.
पहिल्या अंकात, एक दिवस कुन्तिभोजाची मुलगी कुरंगी उद्यानातून परत येताना एका पिसाळलेल्या हत्तीने धुमाकूळ घातला होता. कुरंगी घाबरली. योगायोगाने अविमारक तेथे आला. त्याने पराक्रमाने हत्तीला ताब्यात आणल्याचे बघून कुरंगीचे त्याच्यावर प्रेम जडले. तोही तिच्यावर लुब्ध झाला. राजानेही त्याचा शोध घेतला. तेव्हा त्याला कळले की तो चांडाल आहे.
त्याचवेळी काशिराजाने आपल्या मुलाचा कुरंगीशी विवाह निश्चित करण्यासंबंधी प्रस्ताव पाठवला. कुन्तिभोज काळजीत पडला कारण यापूर्वीच सौवीरराजाने आपल्या मुलासाठी कुरंगीला मागणी घातली होती. परंतु आता सौवीरराजाचा शोध लागत नव्हता. असे असताना काशिराजाला काही उत्तर कळवणे कुन्तिभोजाला योग्य वाटले नाही.
दुसऱ्या अंकात कुरंगी आणि अविमारक हे प्रेमात पडले आहेत. त्यामुळे त्या दोघांचीही मनःस्थिती अधीर झाली आहे. दासी तिची अविमारकाशी भेट घडवण्याचे ठरवतात. त्याचे घर शोधतात. दासी नलिनिका अविमारकाला गुप्तपणे कन्यापुरात येण्याचे निमंत्रण देते. अविमारकाला आनंद होतो. तिसऱ्या अंकात धात्री आणि नलिनिका अविमारकाच्या गुप्तप्रवेशाची सगळी तयारी करतात. चोराचे रूप घेऊन अविमारक तिच्या कन्यापुरात प्रवेश करतो व तिच्या बरोबर राहू लागतो.
चौथ्या अंकाला सुरुवात होते तेव्हा कुरंगी आणि अविमारक एकत्र राहत आहेत ह्याला एक वर्ष झालेले आहे. योगायोगाने ही गोष्ट राजाच्या कानावर जाते. पकडले जाण्याच्या भीतीने अविमारक तेथून निसटतो. परंतु कुरंगीचा विरह त्याला असह्य होऊ लागतो व तो आत्महत्या करण्याचे ठरवतो. पाण्यात बुडून, अग्नीत प्रवेश करून आणि उंच डोंगरकड्यावरून उडी मारून आत्महत्या करण्याचे तो प्रयत्न करतो; परंतु त्याचे हे सर्व प्रयत्न फसतात. तेव्हा तिथे एक विद्याधर प्रगट होतो व त्याला एक अद्भुत अंगठी देतो. ती अंगठी घातल्यावर अविमारक अदृश्य होऊ शकतो. अंगठीचा वापर करून तो पुन्हा कुरंगीच्या कन्यापुरात जाण्याचे ठरवतो.
पाचव्या अंकात अविमारकाच्या विरहाग्नीत जळणारी कुरंगी देखील स्वतःच्या गळ्यात फास अडकवून आत्महत्या करायला सज्ज होते. अंगठीच्या मदतीने अविमारक तिथे पोहोचतो.ह्यावेळी त्याच्या बरोबर विदूषकही असतो.
सहाव्या अंकात कुन्तिभोज राजा ठरवतो की आता सौवीरराजा व त्याचा पुत्र विष्णुसेन यांचा ठावठिकाणा लागत नाही तर काशिराजाचा मुलगा जयवर्मा ह्याच्याशी कुरंगीचा विवाह निश्चित करतो. तो दूत पाठवून जयवर्माला बोलावूनही घेतो. जयवर्माच्या पित्याने म्हणजे काशिराजाने यज्ञाची दीक्षा घेतलेली असल्याने तो येत नाही. जयवर्माबरोबर त्याची आई सुदर्शना येते. विवाहाचा दिवस निश्चित होतो. तेव्हाच सौवीरराजा तिथे येतो आणि अविमारक नाहीसा झाल्याने खिन्न असल्याचे सांगतो. त्याच्या तोंडून अविमारकाच्या पराक्रमाच्या हकिकती ऐकून कुन्तिभोजाची खात्री पटते की त्या दिवशी हत्तीला ताब्यात आणणारा हा अविमारकच आहे.तो अविमारकाला शोधण्याचा आदेश देतो. पण त्याचा शोध लागत नाही.
विवाहाच्या ऐन प्रसंगी नारदमुनी उपस्थित होतात. ते सौवीरराजा व कुन्तिभोजाला सांगतात की, अविमारक कुन्तिभोजाच्या अंतःपुरात असून त्याने व कुरंगीने गांधर्व विवाह केला आहे. नारदमुनी अविमारकाच्या जन्माची कथाही स्पष्ट करतात. हे सगळे समजल्यावर सर्वजण संतुष्ट होतात. लोकप्रसिद्ध कथानक, संवादाला योग्य अशी लहान वाक्ये, सोपी भाषा या वैशिष्ट्यांमुळे अविमारक नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे.
कु. हर्षदा त्र्यंबक लोहे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी बी.ए. द्वितीय वर्ष
दि. १६.०३.२०२२