राम कथेवर आधारलेल्या भासांचा दोन नाटकांपैकी एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक म्हणजे अभिषेक. किष्किंधे मध्ये श्रीराम सुग्रीव भेटीपासून श्रीरामांच्या राज्याभिषेकापर्यंतचा कथाभाग या नाटकात साकारलेला आहे. रावणाने सीतेचे हरण केल्यानंतर तिला शोधत भगवान राम सुग्रीवा पर्यंत पोहोचले आहेत. त्यांची मैत्री झाल्यानंतर त्याआधारे सुग्रीव वालीला आव्हान देतो. या दोघांच्या युद्धात श्रीराम वालीला मारतात. मला का मारले? असे विचारल्यावर लहान भावावर आणि त्याच्या पत्नीवर केलेल्या अत्याचाराचे कारण त्याला दिले जाते. आपला पुत्र अंगद रामांच्या हाती सोपवून वाली मरतो.
दुसऱ्या अंकात कळते की सीतेला शोधायला गेलेल्या बाकी सर्व चमू परत आल्या. फक्त दक्षिणेची येणे आहे. तेवढ्यात हनुमंताने लंकेत प्रवेश केल्याची बातमी येते. अशोक वाटिकेतील प्रवेशामध्ये हनुमान देवी सीतेला श्रीरामांची वार्ता सांगतात. आपण आलो हे रावणाला समजावे म्हणून त्रिकूट वनाचा नाश करतात.
तिसर्या अंकात हनुमंतांचा पराक्रम वर्णन केला असून रावणाचे सैन्य, पाच सेनापती, अक्षय कुमार हा मुलगा कसा मारला? याचे वर्णन आहे. इंद्रजित हनुमंतांना पकडून रावणा पर्यंत नेतो. बिभीषण रावणाचा संवाद होतो. रावण त्याला हाकलून देतो , इथपर्यंतचा भाग आला आहे.
चौथ्या अंकात बिभीषण आणि रामचंद्रांची भेट, रामाचे समुद्रावर दिव्यास्त्र प्रयोग करणे हे प्रसंग येतात. वरुणाच्या सांगण्यावरून समुद्र मध्येच कोरडा होतो आणि सैन्य लंकेत पोहोचते असे वेगळेच वर्णन भासांनी केले आहे. सैन्य सुवेल पर्वतावर मुक्काम करत असताना दोन वानर अधिक सापडतात. ते रावणाचे हेर आहेत हे कळल्यावर रामचंद्र त्यांना परत पाठवतात.
पाचव्या अंकात कंचुकीयाच्या संवादावरून कुंभकर्ण मारला गेला हे कळते. रावण सीतेकडे जाऊन तिला घाबरवण्याचा प्रयत्न करतो. पण तेवढ्यात इंद्रजित मारल्याची बातमी येते. रावण युद्धाला जातो.
सहाव्या अंकात राम रावण युद्ध, रावण वध, बिभीषणाचा राज्याभिषेक, सीता अग्निपरीक्षा या प्रमुख घटना असून शेवटी देवता गंधर्व प्रगट होतात भगवान राम हे प्रत्यक्ष नारायण आहेत असे सांगत त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली जाते.
लंकेमध्येच देवतांच्या द्वारे श्रीरामांवर होणारी ही पुष्पवृष्टी हाच जणू काही त्यांचा राज्याभिषेक आहे असे म्हणत अभिषेक हे शीर्षक सार्थ होते.
याप्रसंगी भरत, शत्रुघ्न लंकेत उपस्थित आहेत. दशरथ देखील अभिषेकाला आले आहेत. असे रामायणात नसलेले प्रसंग भासांनी वर्णिले आहेत.
श्रीरामांच्या विविध गुणांना वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर ठेवणारे वैशिष्ट्यपूर्ण नाटक म्हणून अभिषेक प्रसिद्ध आहे.
कु. रोशनी प्रेमलाल बल्ले
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बी.ए. अंतिम वर्ष
दि. ०२.०३.२०२२