एक वेगळीच गम्मत ! – एक अनुभव

आपले प्रत्यक्ष वय किती हे आपलेच मन ठरविते, असे वाचनात आले होते. पण याची देही त्याचा प्रत्यय येण्याचा योग २००६ साली आला. माझा शेवटचा जॉब चीनमध्ये होता. नोव्हेंबर २००५ मध्ये, एक मोठ्या जबाबदारीचे काम करून भारतात परतलो आणि पूर्णवेळ कामातून निवृत्त झालो. एकदम कसे मोकळे मोकळे वाटत होते. सुदैवाने मन आणि शरीर पूर्णपणे तंदुरुस्त होते. सहाजिकच विचारांना पंख फुटू लागले. माझी पत्नी [मीना] पण निवृत्त झाली होती. दोघांनी ठरविले की काहीतरी एकदम हटके करायचे.



आपले प्रत्यक्ष वय किती हे आपलेच मन ठरविते, असे वाचनात आले होते. पण याची देही त्याचा प्रत्यय येण्याचा योग २००६ साली आला. माझा शेवटचा जॉब चीनमध्ये होता. नोव्हेंबर २००५ मध्ये, एक मोठ्या जबाबदारीचे काम करून भारतात परतलो आणि पूर्णवेळ कामातून निवृत्त झालो. एकदम कसे मोकळे मोकळे वाटत होते. सुदैवाने मन आणि शरीर पूर्णपणे तंदुरुस्त होते. सहाजिकच विचारांना पंख फुटू लागले. माझी पत्नी [मीना] पण निवृत्त झाली होती. दोघांनी ठरविले की काहीतरी एकदम हटके करायचे.

मनात आले की पुन्हा एकदा विद्यार्थीदशेचा स्वच्छंद आनंद घेऊया. चीनमध्ये असतांना कळून चुकले होते की चीनी भाषा सर्व भाषांमध्ये शिकण्यास अत्यंत अवघड आहे आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव पण घेतला होता. चीनी भाषेला बाहेरचे लोक ‘मंडारिन’ आणि चीनमध्ये ‘हानयू’ असे म्हणतात. आमच्या चीनमधील मुक्कामात मीना बऱ्यापैकी चीनी बोलण्यास शिकली होती. मला मात्र त्या भाषेचा फारसा गंध नव्हता. आम्हा दोघांनाही चीनमधील वास्तव्यादरम्यान, चीनी लोकांचे फक्त चांगले अनुभव आले होते. काहीतरी वेगळे करण्याचे ठरले असल्याने चीनी भाषाच शिकायचे ठरले. इंटरनेटवरून पुरेशी माहिती काढली. आणि मग काय, शान्घाई जवळील सुच्यो [Suzhou, चीनमध्ये उच्चार खूप वेगळे असतात, त्याबद्दल पुन्हा केंव्हा तरी बघूया] या गावातील विद्यापीठाकडे प्रवेश अर्ज पाठविले आणि त्यांच्याकडून सत्वर आमंत्रण पत्रे पण आली. पाच महिन्यांचे नवीन सत्र १ मार्चला सुरु होणार होते.

संपूर्ण शारीरिक आरोग्य तपासण्या, विमानाचे तिकीट, व्हीसाची आणि सामानाची तयारी असे सोपस्कार संपविले. एक बॅग घरगुती सामान आणि एक पेटी [bag] वैयक्तिक सामान. वर्षभरात सुच्योला एकतर अति थंडी असते नाहीतर अति गरमी. आमच्या वास्तव्यादरम्यान थंडी अपेक्षित असल्याने बॅग जास्तीकरून थंडीच्या कपड्यांनी भरली होती. मुंबईहून एअर इंडियाच्या विमानाने, कॉलेज सुरु होण्याच्या आधी चार दिवस आमची जोडी सुच्योच्या हॉटेलमध्ये पोहोचली. अजून थंडी भरपूर होती.

आम्हाला सुच्यो विद्यापीठाच्या वसतीगृहाच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावयाची अजिबात इच्छा नव्हती. म्हणून, लगेच दोन दिवसात, एक सुंदर दोन बेडरूमचे सर्व सुविधा उपकरणे असलेले घर भाड्याने घेतले आणि त्यात रहायला गेलो सुध्दा. आपल्याकडे बऱ्याच लोकांना १३ हा आकडा अशुभ वाटतो तर चीनमधील लोकांना ४. आमचा असल्या गोष्टीवर अजिबात विश्वास नसल्याने चौथ्या मजल्यावरील चौथे घर विनासायास मिळाले आणि घर मालकही खूष झाला. जवळच्या एका मोठ्या स्टोअर्समधून रोज लागणाऱ्या लहानसहान वस्तूंनी घर आणि खाद्य पदार्थांनी शीतकपाट [fridge] भरून ३३ वर्षांनी मस्तपैकी पुन्हा एकदा नवीन संसार थाटला. घरमालकाने सर्व फर्निचर आणि स्वयंपाकगृहातील सामान पुरविले असल्याने, बस्तान बसविण्यास अजिबात वेळ लागला नाही. लगतच्या सोमवारी विद्यापीठाच्या परदेशी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या खास विभागात प्रवेश घेण्यासाठी गेलो. सगळ्यात मोठी अडचण जाणवली ती भाषेची. जवळजवळ कोणालाच इंग्रजी भाषेचा गंध नव्हता. मीनाला थोडेफार चीनी बोलता येत असल्याने, आमच्याकडील आमंत्रण पत्रे दाखविल्यावर आमचे काम झाले. आमच्या पूर्व तयारीचा विचार करून, मला पहिलीत आणि मीनाला चौथीत प्रवेश देण्यात आला. दुसऱ्या दिवशी पोलीस चौकशी झाली आणि आमच्या शिक्षणासाठीच्या व्हीसावर अंतिम शिक्कामोर्तब झाले.

आम्ही सोडून, दोनही वर्गातील सर्व मुले वयाने अगदी तरुण होती. बहुतेक सर्व विद्यार्थी युरोप, अमेरिका, जपान अथवा कोरिया मधून आलेले. सुरुवातीला शिक्षकांसह सर्वांनाच आमच्या भारतीय चेहऱ्यामुळे आणि वयामुळे, आमच्याबद्दल खूप कुतूहल वाटे. रोज चार तास वर्ग भरायचा. मंडारिन ऐकायचे, बोलण्याचे आणि लिहिण्याचे तास वेगवेगळे असत.

माझ्या वर्गाला छ्येन आणि हुआंग या शिक्षिका [चीनी भाषेमध्ये लावश] होत्या. हुआंग लावश फार शिस्तप्रिय आणि कडक होत्या. त्यामानाने छ्येन लावश खूप प्रेमळ होत्या. सुरुवातीला माझ्या मानाने कोरियन व जपानी मुले जास्त पटकन शिकत असत. वर्गामध्ये खूपच थंडी असायची. मी त्यातल्या त्यात खोली गरम करायच्या उपकरणा [air conditioner] जवळील बाक पकडले होते. तेथील हवामानामुळे बहुतेक सर्व अशा उपकरणामध्ये हवा थंड अथवा गरम करण्याची सोय असते.

आमचा दिनक्रम असा असे. सकाळी नाश्ता करून आमची जोडी बसने विद्यापीठात जात असे. पायात स्निकर्स, पायावर जीन्स, अंगावर गरम कोट, कानावर टोपी, पाठीवर दप्तर असे. बसमध्ये कंडक्टर नसतो. स्वतःच फक्त पुढील दाराने चढायचे. चालकाशेजारी लावलेल्या एका पेटीत नाणे टाकायचे आणि आत जाऊन बसायचे. जवळपास कुठेही गेल्यास एकच दर – 1 युआन. तिकीट नाही. चालक तुम्ही नाणे बसमधील पेटीत टाकलेले बघत असतो. उतरायचे फक्त मागील दाराने. सर्व नागरिक ही शिस्त विनातक्रार व्यवस्थित पळतांना दिसायचे.

वर्ग संपल्यावर पुन्हा बसने घरी यायचे, जेवायचे आणि मग गृहपाठ. हाताला नीट वळण लागण्यासाठी कित्ता पण असे. संध्याकाळी जवळपास मस्त चक्कर मारत छोटीमोठी खरेदी करून घरी यायचे. वाटले तर डीव्हीडीवर एखादा सिनेमा पाहायचा. कुठलीही डीव्हीडी फक्त ३५ रुपयांना मिळत असल्याने ती पण चैन होती. मग लवकर जेवून, थोडे वाचन करून झोपायला मोकळे. सारे काही चिंतामुक्त, निवांत आणि उत्साहपूर्ण.

दर आठवड्याच्या शेवटी आम्ही मिळेल ती बस घेवून दूरवर चक्कर मारायचो. आसपासचा परिसर अक्षरशः पिंजून काढला. त्यामुळे लोक भेटायचे. तेथील लोकांच्या संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची ओळख व्हायची. तेथील लोकांनाही भारताबद्दल खूप कुतूहल असायचे. चीनी लोकांमध्ये भारतीय लोक हुशार, त्यांना इंग्रजी येते आणि भारतीय बायका सुंदर असा एक समज आहे. कदाचित आयटीमधील प्रभाव आणि हिंदी सिनेमा यांचा परिणाम असावा. भारताबद्दल वाईट भावना कुठेही जरासुद्धा आढळली नाही. रस्यात भेटणारे आईवडील त्यांच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आमच्याशी इंग्रजी बोलण्यासाठी पुढे ढकलीत असत. कधीकधी वर्गमित्रांबरोबर पार्ट्या पण केल्या. खूप नवीन ओळखी झाल्या.

दिवस कसे स्वप्नवत जात होते. तरुणाई बरोबर तरुणांसारखे स्वछंदपणे राहून आम्हीही तरुण झालो. आमच्या अभ्यासू आणि शिस्तशीर स्वभावामुळे सर्व शिक्षक आमच्यावर जरा जास्तच खूष असत. निबंधस्पर्धेत दोघांनीही आपापल्या वर्गात बक्षिसे मिळविली. मीनाने भाषणस्पर्धेतपण बाजी मारली. शेवटच्या परीक्षेत दोघेही आपआपल्या वर्गात सर्वोत्तम विद्यार्थी ठरलो. आणि साडेचार महिन्यांनी ताजेतवाने होऊन, चीनला टाटा करून घरी परतलो.

अजून एक गम्मत आहे. त्यावेळी कुठल्याही १५ दिवसांच्या परदेश प्रवासासाठी साधारणपणे दोघांना मिळून तीन-चार लाख रुपये तरी खर्च येत असे. कुणाचा विश्वास बसणार नाही पण संपूर्ण पाच महिन्यांमध्ये, आम्हाला दोघाना मिळून, काही काटकसर न करता, घरापासून परत घरापर्यंत, इथले आणि तिथले सर्व खर्च आणि फी मिळून फक्त साडेचार लाख रुपये खर्च आला.
त्या पाच महिन्यात आम्ही जितके शिकलो, तितकीच मजा पण केली. आजही त्या आठवणींनी मन उल्हसित होते. चीनी भाषेच्या गमती आणि खुब्या पुन्हा कधीतरी सांगेन.

मंजील हमें मिल जायेगी भटकते भटकते ही सही, गुमराह है वो जो घरसे निकलेही नहीं.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author