आपल्या मराठी भाषेवर प्रेम असणे आणि तिच्या समृद्ध असण्याचा अभिमान असणे अगदी साहजिक आहे. सद्ध्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावावरून बरीच उलटसुलट चर्चा ऐकू येते, त्यावर माझे काही विचार ! कोणाच्याही भावना दुखविण्याची जराही इच्छा नाही.
अजय अलार्म वाजल्यावर पटकन उठला. आजचे त्याचे टाईमटेबल फारच बिझी होते. झटपट टूथब्रशवर टूथपेस्ट लावून दात घासले. ग्रीन टी घेताघेता पेपर वाचला. बिस्कीटे संपली होती. दाढी करतांना रेझर बदलायला झाल्याचे लक्षात आले. बॉयलर ऑन केला. टॉयलेट आटोपून बाथरूम मध्ये आंघोळ केली. अनघाने बनविलेले ब्रेड टोस्ट, टोमॅटो सॉस आणि जॅम बरोबर भराभर खाल्ले. टीव्हीवर न्यूज बघत शर्ट पॅन्ट टाय चढवले. मोबाईल फोन आणि चार्जर घेतले. कारच्या किल्ल्या खिशात टाकल्या आणि ‘बाय’ असे पुटपुटत लिफ्टकडे गेला. पार्किंगमधील दिवे घालविले आणि सीट बेल्ट लावून कार स्टार्ट केली. रीवर्स गिअर टाकून रोडवर आला. ट्राफिक जरा जास्तच होता. रेड लाईटला थांबताच मागून एका बसने जोरात हॉर्न दिला. दोन स्कूटर कारच्या पुढे येउन थाबल्या. त्याने कारमधील ऑडीओ मुझिक प्लेयर ऑन केला. …
..
वरील गोष्टीमध्ये तुम्हाला कदाचित काही वेगळेपणा जाणवला नसेल. उलट आता पुढे काय अशी उत्सुकता वाटू लागली असेल. हा आहे आजच्या प्रचलित मराठी भाषेचा एक छोटा नमुना. भाषा हे प्रामुख्याने संपर्काचे माध्यम असते. जी भाषा बहुतेक लोक बोलतात ती भाषा हळूहळू प्रमाण भाषा मानली जाऊ लागते. जेंव्हा घरातील काम करणारी बाई ‘मिस्टर सिक’ आहेत किंवा ‘उद्या माझा ‘ऑफ’ आहे असे बोलू लागते. जेंव्हा बहुतांश लोक एखादी वस्तू ‘मिळाली’ असे न म्हणता ‘भेटली’ असे म्हणू लागतात तेंव्हा प्रमाण भाषा हळूहळू बदलते आहे असे लक्षात येते. आत्ता सुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषेची वेगवेगळी रूपे ऐकू येतात.
मराठी भाषेचे रूप काळानुसार सुद्धा बदलत गेले आहे. ज्ञानेश्वरांच्या वेळची मराठी, शिवाजी महाराजांच्या वेळची मराठी, २०व्या शतकाच्या सुरुवातीची मराठी आणि सध्याच्या वापरातील मराठी. भाषा तीच पण शब्द रूपे अगदी वेगळी. संस्कृत ही मराठीची जननी असल्याने स्वाभाविकपणे खूप संस्कृत शब्द मराठीत अगदी बेमालूमपणे वसले आहेत. काळानुसार मराठी भाषेने कित्येक हिंदी, बंगाली, उर्दू, फारसी, कन्नड शब्द आपल्यात सामावून घेतले आहेत.
फारसी भाषेतून तर शेकडो शब्द मराठीने इतके सामावून घेतले आहेत की आता ते शब्द मुळचे मराठी नाहीत यावर विश्वास बसत नाही. वरील ‘बेमालूम’ हा शब्द त्यातलाच एक आहे. हकीकत, गुजराण, शाई, बाग, दुकान, पेशवा, अत्तर, किल्ला, पलंग, नोकरी, पगडी, शाबास, कामगार – अक्षरशः फारसीतून आलेले शेकडो शब्द. कितीही सांगितले तरी कमीच पडतील. कदाचित बऱ्याच लोकांना हे शब्द मूळ मराठी नाहीत यावर विश्वास बसणार नाही. थोड्या अतिशयोक्तीने असेही म्हणता येईल की जर आज सर्व फारसी शब्द मराठीतून काढून टाकले तर मराठीतून बोलणे फार अवघड होईल. आणि हीच परिस्थिती इंग्रजी शब्दांच्या बद्दल आहे असे दिसते.
ह्याच प्रकारे, गेल्या दीड दोनशे वर्षात इंग्रजी शब्द मराठीत प्रचलीत होत गेले. इतके की काही शब्द इंग्रजीमधून आले आहेत यावर विश्वासही बसणार नाही. उदा. कप, शर्ट, क्रिकेट, मशीन, कंपनी, मार्केट, विंडो, कोर्ट, राईस प्लेट, अकौंट, बँक, बेडरूम, बस, कॉलेज, बल्ब, वायर इत्यादी. काही इंग्रजी शब्द तर इतके घरेलू झाले आहेत की त्यांचे मराठी प्रतिशब्द लोकांना पटकन आठवत नाहीत.
कारणे अनेक आहेत पण परिणाम स्पष्ट आहे. गेल्या काही दशकात बहुभाषिक भारतात इंग्रजी ही शिक्षणाची प्रमुख भाषा होत गेली. इंग्रजी माध्यमाच्या शाळांची मागणी वाढत गेली आणि वाढतच आहे. शिक्षणाचे प्रमाण खूप वाढल्यामुळे इंग्रजी समजणाऱ्या लोकांचे प्रमाण वाढले. कायदेशीर, व्यावसायिक आणि तांत्रिक शिक्षण पहिल्यापासूनच इंग्रजी माध्यमातून होते. इतर प्रांतातील व देशातील लोकांशी संपर्क वाढल्यामुळे त्यांच्याशी विचारविनिमय आणि संभाषण यासाठी इंग्रजी ही प्रमुख गरज होत गेली, इतकी की त्यामुळे मराठी बोलीभाषेत इंग्रजी शब्दांचा प्रचंड सुळसुळाट अजून वाढला.
कोविडच्या साथीनंतर कितीतरी वैद्यकीय शब्द मराठीत सर्रास वापरात येऊ लागले आहेत. उदा. वेंटीलेटर, बेड, वाक्सीन, बूस्टर डोस, मास्क, इम्म्युनिटी इत्यादी खूप शब्द. मला तर वाटते की नजीकच्या काळात आपल्याकडे मराठीत नसलेली दोन मुळाक्षरे ‘ऍ’ आणि ‘ऑ’ ही सुद्धा मराठीत समाविष्ट करण्यात येतील. त्यामुळे ऍडमिशन आणि ऑटो रिक्षा यासारखे कितीतरी शब्द लिहिणे वा छापणे सुलभ होईल.
असे भाषेतील बदल कोणी मुद्दाम घडवून आणित नाही किंवा दाबूनही ठेऊ शकत नाही. अगदी परक्या भाषेतील मराठीत प्रचलीत होणाऱ्या वापराच्या विरोधात टाहो फोडणाऱ्या लोकांची मुलेसुद्धा इंग्रजी माध्यमातून शिकताना आढळतात. मराठी साहित्य सम्मेलनातूनही इंग्रजी शब्दांच्या वापराविरोधात अशीच भाषणे ऐकावी लागतात. मला तर असे वाटते की आपली मराठी भाषा आणि माणसे मनाने कोती नसल्यामुळेच महाराष्ट्र आज सगळ्यात पुढारलेला प्रांत झाला आहे. मला स्वतःला माझ्या माय मराठीच्या सर्वसमावेशकतेचा आणि लवचिकतेचा अत्यंत अभिमान आहे.
आपण सुरुवातीला सध्याच्या प्रचलित मराठीचा एक छोटा नमुना बघितला. औषधे, आजार, उपचार, खेळ, सिनेमे, आर्थिक व्यवहार, बँका, राजकारण, व्यवसाय, उत्पादने, मासिके, जाहिराती, दुकानांची नावे, शिक्षण आणि काय काय. जवळ जवळ सर्व क्षेत्रात आपल्या मराठीने अक्षरशः हजारो इंग्रजी शब्दांना अगदी सहज रित्या सामावून घेतले आहे.
मराठी भाषेला कोणाची भीती तर नाहीच पण प्रत्यक्षात ती जास्त प्रगल्भ होत आहे. माय मराठीच्या कुटुंबात [ family ] रोज नव्याने येणारी ही इंग्रजी मुले [शब्द] अगदी सहजपणे नांदत आहेत आणि तिला समृद्धही करीत आहेत.
मनुष्याला काहीही शक्य आहे पण सर्व काही नाही.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/