वाचकांसाठी व्यवस्थापनाचे कोडे

रमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.



रमेश सकाळी ऑफिसच्या रस्त्यावर होता. ऑफिसला पोचायला त्याला साधारण ४५ मिनिटे लागत असत. बेशिस्त वाहतुकीला तोंड देतादेता ऑफिसला पोचेपर्यंत त्याला निवांतपणे विचार करायला हाच वेळ मिळत असे. एका मोठ्या खूप व्यवसायात [बिझिनेसमध्ये] असलेल्या कंपनीच्या एका व्यवसायाचा तो प्रमुख अधिकारी होता. आज त्याला जरा जास्तच आनंदी आणि समाधानी वाटत होते, कारण काल तो जबाबदार असलेल्या व्यवसायाच्या कामगिरीचे महिन्याचे निकाल बाहेर आले होते. आणि महत्वाचे म्हणजे गेल्या सात वर्षात त्याच्या व्यवसायात प्रथमच इतके चांगले निकाल दिसून आले होते.

तसे पाहिले तर त्याच्या दृष्टीने हा प्रकार काही नवीन नव्हता. आधी त्याच कंपनीच्या अजून एका व्यवसायामध्ये [बिझिनेसमध्ये] पूर्णपणे चमत्कार घडवून आणल्यावर, त्याची बदली दोन वर्षांपूर्वी सध्याच्या बिझिनेसमध्ये करण्यात आली होती. त्याचा व्यवसाय मोटार व्यवसायातील खास असे सुट्टे भाग उत्पादन करणारा होता. भारतात उदारीकरणाचे वारे वाहू लागण्यापूर्वी, हा व्यवसाय अतीशय उत्तम फायदा कमावणारा म्हणून ओळखला जात होता.

बाहेरील व्यावसायिक वातावरणातील प्रचंड बदल, वाढलेली स्पर्धा, ग्राहकांच्या वाढलेल्या अपेक्षा आणि सतत वाढणारे अंतर्गत खर्च ह्या कारणांमुळे गेली काही वर्षे मुख्य कंपनीच्या अनेक व्यवसायांपैकी, तो सध्या कार्यरत असलेला व्यवसाय गेली काही वर्षे सतत वाढणाऱ्या तोट्याला सामोरा जात होता.

त्याची या व्यवसायावर नेमणूक व्हायच्या आधी, काहीतरी चुकीचे घडते आहे हे मान्य करेपर्यंत सुरुवातीचा काही काळ माहितीची लपवालपवी करण्यात गेला होता. वेगवेगळी कारणे सांगून झालेल्या तोट्याचे स्पष्टीकरण तेव्हाच्या व्यवस्थापनाकडून दिले जात होते. त्यानंतर काही काळ आकड्यांशी खेळून जरा चांगले निकाल दाखवण्यात आले. परंतु जेव्हा पाणी अगदी नाकाशी आले आणि खराब निकालाबद्दल कुठलेही स्पष्टीकरण देणे अशक्य झाले, तेव्हा मुख्य कचेरीतील [ head office ] वरिष्ठ व्यवस्थापकानी वैयक्तिक लक्ष घालून काही कृती सुरु केल्या. उदा. –

दर महिन्या ऐवजी दर आठवडयाला कंपनीचे निकाल मुख्यालयाला कळवण्याचे बंधन आले. प्रत्येक महिन्याला व्यवस्थापकीय संचालकाबरोबर प्रगतीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणे सुरु केले. बऱ्याच वेळा कंपनीचा CEO ह्या कंपनीला भेट देऊ लागला. साधारण चार वर्षांपूर्वी ह्या व्यवसायाच्या प्रमुखाची बदली करून त्याच्या जागी जरा तरुण व्यवस्थापक नेमण्यात आला होता. वरिष्ठ मॅनेजर्ससाठी कल्पकता आणि टीम उभारणी ह्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. १०० टक्के वितरणाची पूर्तता आणि निर्दोष क्वालिटी साठी घोषणा करण्यात आल्या आणि जागोजागी बॅनर फडकविण्यात आले. सुधारणा घडवून आणण्यासाठी कर्मचाऱ्याच्या सूचनांच्या योजनेची घोषणा करण्यात आली.

एवढ्या साऱ्या कृती करूनसुद्धा, पुढील वर्षी बाहेरील बाजारात चढाव असूनसुद्धा, वरील सर्व कृती निष्फळ ठरल्या. याचे फलित म्हणजे, अंतर्गत बैठकांमध्ये वादावादी आणि दोषारोपण वाढले. कर्मचाऱ्यांचे मनोबल अजूनच कमी झाले. असुरक्षिततेचे आणि संशयाचे वातावरण निर्माण झाले. नवीन नेमलेल्या प्रमुख व्यवस्थापकाची विश्वासार्हता पण कमी झाली. पुन्हा एकदा वरिष्ठ व्यवस्थापक बदलण्याची वेळ आली होती.

आणि त्यानंतर अंदाजे दोन वर्षांपूर्वी रमेशची बदली त्या बिझिनेस मध्ये त्या बिझिनेसचा प्रमुख म्हणून करण्यात आली. तो धंदा रमेशसाठी नवीन होता. त्या धंद्यासाठी लागणाऱ्या तंत्रद्यानाची त्याला पुरेशी जाण नव्हती. तरीही काहीतरी चमत्कार झाला आणि साधारण ४ महिन्यात, महिना अखेरीस त्या धंद्यातील नगद पैशांची [positive cash flow] परिस्थिती खूपच समाधानकारक दिसू लागली. त्यानंतर फक्त बारा महिन्यांनी तो धंदा फायदा [profit] दाखवू लागला. चोवीस महिन्यांनी फायदा दहा टक्क्याच्या वर गेला आणि त्या धंद्यात लावलेल्या पैश्याचा परतावा [return on investments] कंपनीतील इतर बिझिनेसच्या तुलनेत जास्त दिसू लागला. त्याचवेळी ग्राहकांचे समाधान खूपच सुधारले आणि नवीन मागण्यांचा [orders] ओघ सुरु झाला. कर्मचाऱ्यांचे मनोबल सुधारलेले दृश्य स्वरुपात दिसू लागले.

वरिष्ठ व्यवस्थापनाने हे मान्य केले की झालेले बदल हे त्यांच्या अपेक्षेपेक्षाही पलीकडचे जास्त होते. रमेशला मात्र ह्या सर्व बदलातील गोम पूर्णपणे माहित होती आणि त्यामुळे तो स्वतःवर खुश झाला होता.

नवीन जॉब स्वीकारण्यापूर्वी रमेशने कुठले कुठले घटक विचारात घेतले असतील? रमेशने हा जॉब स्वीकारायच्या आधी, आधीच्या मॅनेजरने केलेल्या प्रयत्नात काय त्रुटी राहिल्या असाव्यात, जेणेकरून त्यांना अपेक्षित यश मिळत नव्हते? नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम रमेशने कोणती पावले उचलली असतील?

1. ह्या दोन वर्षात रमेशने असे काय वेगळे केले असेल की ज्यामुळे तो यशस्वी झाला?
2. हा बिझिनेसमधील कायापालट नीट समजण्यासाठी तुम्हाला अजून काय माहिती आवश्यक वाटते?
प्रतिक्रियांसाठी अथवा लेखकाशी चर्चा करण्यासाठी वाचकांनी लेखकाशी अवश्य संपर्क साधावा.

कोणीही स्वबळावर एखादे ध्येय गाठू शकत नाही. ध्येयपूर्ती ही नेहमीच इतर खूप लोकांच्या मदतीने होत असते.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author