प्रभाव क्षेत्र – लक्ष आणि उपयुक्तता

माझ्यातील उत्साह आणि अधीरता ओसंडून जात असलेले ते दिवस होते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर पटक1न मन उद्वीग्न होई अथवा खूप राग येई. अर्थात याच्यामागे दिलेल्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्याची प्रबळ इच्छा असे. माझ्या वरिष्ठांना पण या स्वभावाची पुरेशी जाणीव होती. याचा परिपाक म्हणजे मला सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असाव्या असेच वाटे. बाह्य कारणांमुळे एखादी परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेली की माझा संयम सहज सुटे.



माझ्यातील उत्साह आणि अधीरता ओसंडून जात असलेले ते दिवस होते. एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर पटक1न मन उद्वीग्न होई अथवा खूप राग येई. अर्थात याच्यामागे दिलेल्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडवून आणण्याची प्रबळ इच्छा असे. माझ्या वरिष्ठांना पण या स्वभावाची पुरेशी जाणीव होती. याचा परिपाक म्हणजे मला सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असाव्या असेच वाटे. बाह्य कारणांमुळे एखादी परिस्थिती माझ्या नियंत्रणाच्या बाहेर गेली की माझा संयम सहज सुटे.

अशीच एक घटना चंडीगढ येथे झाली की ज्यामुळे मी खूप शिकलो आणि पुढे अधिक परिपक्व पण झालो. सांगतो तीच कथा.

गोष्ट आहे १९८८ सालची पण त्याचा मतितार्थ कालातीत आहे. त्यावेळी मी एका बहुराष्ट्रीय कंपनी मध्ये गुणवत्ता व्यवस्थापक [Quality Manager ] होतो. मी माझ्या परदेशी बॉस बरोबर आमच्या एका सप्लायरला भेटायला चंदीगडला गेलो होतो.संपूर्ण दिवसाच्या भेटीचा कार्यक्रम वेळेवर संपवल्यावर एका अम्बॅसॅडर कारने चंडीगढ विमानतळावर पोहोचलो. आम्हाला सोडून ती कार धुळीचे ढग उडवत परतली. अजूनही आमच्या पुढे काय वाढून ठेवले आहे याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. त्याकाळी चंडीगढ विमानतळाची इमारत अगदीच छोटी होती. दिवसाकाठी फारतर 3-४ विमाने उडत असतील तेथून.

आमच्याकडे इंडिअन एअर लाईन्स ची दिल्लीला जाण्याची पुष्टी केलेली [confirmed] तिकिटे होती. दुसरे दिवशी सकाळी आम्हाला अजून एका सप्लायर कडे दिल्लीहून पुढे अलाहाबादला [ आता प्रयागराज ] जायचे होते. मग तेथून पुढे अजून काही सप्लायर कडे भेटायचा कार्यक्रम होता. बॉसला एक जागी बसायची विनंती करून मी चेक इन करायला गेलो. तेथील कर्मचारी मुलीने “विमान पूर्णपणे भरले आहे आणि त्यामुळे तुम्ही या विमानातून जाऊ शकणार नाही”

अशी धक्कादायक माहिती पुरवली. मी जरा रागानेच कारण विचारल्यावर जरा नरमाईच्या स्वरात तिने अशी माहिती दिली की अत्यंत नाईलाजाने दोन प्रभावशाली राजकारणी माणसांना आमच्या ऐवजी विमानात चढू द्यायला लागले आहे. त्यावेळच्या एकाधिकारशाहीच्या [monopolistic] काळामध्ये अशा घटना सर्रास घडत असाव्यात. त्यावेळी चंदिगढहून फक्त इंडिअन एअर लाईन्सची सेवा असल्याने दुसरे विमान मिळण्याची शक्यता शून्य होती.

मला तर पायाखालून जमीन सरकल्यासारखे झाले. डोळ्यासमोर उद्याच्या चुकलेल्या उड्डाणाचे आणि पुढील सर्व कार्यक्रमाचा बोजवारा झाल्याचे चित्र दिसू लागले. मी थोडा आरडओरडा करून बघितला पण त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही.

त्याकाळी मोबाईल फोन आलेले नसल्याने पटकन अलाहाबादला काही कळविणे शक्य नव्हते. शिवाय माझ्या परदेशी बॉसला राजकारणी लोकांसाठी झालेल्या या तद्दन पक्षपाताबद्दल काय वाटेल आणि त्यातून आपल्या देशाची प्रतिमा त्याच्या मनात किती डागाळेल याचे विचार घोंघावू लागले. मन बधीर झाले आणि पायातील त्राण गेल्यासारखे वाटू लागले. या परिस्थितीत बॉसची प्रतिक्रिया काय होईल या भीतीने त्याला तोंड कसे द्यायचे हे ठरवू लागलो. अखेरीस अत्यंत हताशपणे ही बातमी बॉसला कळविण्यासाठी तो बसलेल्या जागी जड पावलाने निघालो.

हे महाशय शांतपणे स्वतःच्या मांडीवर एक फ़ाईल ठेऊन त्यातील काही कागद तपासात बसले होते. अजून लॅपटॉप संगणक प्रचलित झाले नव्हते. मी जरा घाबरत घाबरत त्यांना परिस्थितीची जाणीव करून दिली. ते शांतपणे म्हणाले, “ काय घडत होते त्याचा मला येथूनच साधारणपणे अंदाज येत होता. अर्थातच, तुझ्या रागाने, आरडा ओरड्याने अथवा धमक्यांनी परिस्थितीत काहीही बदल होणार नाही आहे. तुझाही काही दोष नाही. महत्वाचे काय आहे तर आपल्याला उद्या अलाहाबादला पोचायचे आहे. तेव्हा आता कृपया त्यासाठी सद्यपरिस्थितीत काय करता येईल याच्यावर सर्व लक्ष केंद्रीत कर.”

त्यांच्या या अनपेक्षित प्रतिक्रियेमुळे मी क्षणभर स्तंभित झालो. आणि अचानक माझ्या डोक्यात स्वच्छ प्रकाश पडला. माझे बॉस नेहमीच सांगत असत की तुमच्या कह्यात असलेल्या गोष्टींवर तुमचे लक्ष आणि प्रयत्न केंद्रित करा आणि ज्या गोष्टी तुमच्या कह्यात नाहीत त्यांच्यासाठी मन जराही विचलीत होऊ देऊ नका. फक्त कृतीच बदल प्रत्यक्षात घडवू शकतात, भावनांचे प्रदर्शन फक्त मनःस्ताप देऊ शकते. त्या शिक्षणाच्या जिवंत प्रात्यक्षिकाचा मी साक्षीदार झालो होतो.

या वेळेपर्यंत, चेक इन काउंटर बंद होऊन, विमानाचे उड्डाण पण झाले होते. तेथील कर्मचारी पण दिसेनासे झाले. त्या दिवसातील आमचे उड्डाण शेवटचे असल्याने कोपऱ्यातील छोटीसी चहाची टपरी पण बंद झाली होती. संध्याकाळ चाहूल देत होती. आम्हीच काय ते दोघे त्या स्वागतकक्षात शिल्लक राहिलो होतो.

दिल्लीला जाणे आवश्यक असल्याने चंदिगढ गावात परत जाण्याचा विचारही करू शक नव्हतो. आता मन आमच्या ध्येयावर केंद्रित झाल्याने, एकमेव शक्यता, माझ्या लक्षात आली की जर टॅक्सी करून पहाटे पर्यंत दिल्लीला पोहोचलो तर सकाळी अलाहाबाद साठीचे उड्डाण पकडता येईल. नशिबाने माझ्या खिशात काही सुट्टी नाणी होती. भिन्तीवरील टेलीफोन बॉक्सचा उपयोग करून गावातील सप्लायर शी संपर्क साधला. त्याला झालेल्या परिस्थितीची कल्पना दिली आणि आमच्यासाठी एका टॅक्सीची व्यवस्था करण्याची विनंती केली.

त्याने स्पष्ट शब्दात नकार दिला आणि गावात परत येण्याची विनंती केली आणि त्यासाठी टॅक्सी पाठविण्याची तयारी दर्शविली. यामागचे कारण म्हणजे त्या काळात पंजाबमधील खलिस्थानसाठीचे अतिरेकी आंदोलन प्रचंड प्रमाणात वाढलेले होते. अहोरात्र रस्त्यावर गोळीबार व खून होत होते आणि माणसे सर्रास ओलीस घेतल्याच्या बातम्या येत होत्या. रात्रीचे सोडा, लोक दिवसा पण बाहेर पडायला घाबरत होते.

हे सर्व कळल्यावर माझे बॉस शांतपणे म्हणाले, “विश्वास, जर एखादी घटना घडायचीच असेल तर आत्ता येथेही घडू शकते. अशा भीतीपोटी, आपण आपला कार्यक्रम बदलणार नाही. काहीही करून टॅक्सीची व्यवस्था कर.” मला वचनबद्धतेचे आणि वैयक्तिक धाडसाचे जिवंत प्रात्यक्षिक मिळाले.

एव्हाना बाहेर मिट्ट अंधार झाला होता. माझ्या अट्टाग्रहापुढे नमून अखेरीस आमचा सप्लायर टॅक्सी शोधण्यास तयार झाला. लवकरच त्याने कळविले की धोका लक्षात घेता, कोणताही चालक रात्री दिल्लीस येण्यास तयार नाही. मला अजून एक कल्पना सुचली. त्याला सांगितले की कदाचित शीख चालकाना धोका कमी असेल तरी शीख चालक असलेली टॅक्सी शोध. लागले तर जास्तीच्या भाड्याचे आमिष दाखव. अखेरीस अत्यंत नाखुशीने सप्लायरने एक टॅक्सी शोधली, आम्हाला पुन्हा एकदा धोक्याची जाणीव करून दिली आणि शेवटी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. आमच्या जीवात जीव आला. साधारण एक तासाने एक म्हातारा शीख चालक एक जुनाट आणि जीर्ण टॅक्सी घेऊन हजार झाला. सुदैवाने सप्लायरने त्याच्या बरोबर थोडे अन्न पदार्थांचे पुडे आणि पाण्याच्या बाटल्या पण पाठविल्या होत्या. अखेरीस, साधारण १० वाजता आमची टॅक्सी ३५० किलो मीटर चा पल्ला पार करण्यासाठी दिल्लीकडे निघाली. माझ्या मनात पुढे काय वाढून ठेवले आहे या विचाराने प्रचंड धाकधूक चालू होती. कदाचित माझ्या बॉसना आम्ही कुठला धोका पत्करला आहे याची पूर्ण कल्पना नसावी. बाहेरच्या काळ्या कुट्ट अंधारात आणि सुनसान रस्त्यावर आमच्या गाडीच्या खडखडात ते शांतपणे बसले होते. मध्यरात्रीच्या सुमारास गाडीचे इंजिन खूप गरम झाल्यामुळे आम्हाला एका उघड्या धाब्यावर थांबावे लागले. तेथील खाटेवर बसून मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दिसणाऱ्या भीतीदायक सावल्यांच्या संगतीत आम्ही चहा आणि बिस्किटे घशाखाली उतरवली. एवढ्या रात्री एक गोरा परदेशी माणूस या निर्जन ठिकाणी पाहून तो धाबावाला पण आमच्याकडे विचित्र प्राणी असल्यासारखा बघत होता. आमचा शीख चालक जेंव्हा लघुशंकेसाठी अंधारात दिसेनासा झाला तेंव्हा तर हा कुणाला बोलवायला तर गेला नसेल ना या शंकेने मी घामाघूम झालो होतो. सतत त्या भयाण अंधारात काही संशयास्पद हालचाली दिसत आहेत का याकडे नजर लावून बसलो होतो. अर्थात दिसल्या असत्या तरी मी काही करू शकलो असतो असे नाही.

दिल्लीच्या सीमेवर पहाटे पोहोचल्यावर मी एक दीर्घ निश्वास सोडला आणि कदाचित माझा रक्तदाब पण पूर्व पदावर आला असणार. हॉटेलमध्ये जाऊन पटकन स्नान उरकले आणि लगेचच अलाहाबादचे उड्डाण पकडण्यासाठी दिल्ली विमानतळाकडे टॅक्सी दामटली.

पुढील प्रवास आणि भेटींचा कार्यक्रम सुरळीत पार पडला. माझ्याकडे मात्र एक उत्तम अनुभव जमा झाला होता तो असा, “जेव्हा जेव्हा कठीण प्रसंगाला तोंड देण्याची वेळ येईल तेव्हा तेव्हा भावनांच्या भरात मन विचलीत होऊ न देता, आपल्या कह्यात असलेल्या कृतींवर संपूर्ण लक्ष केंद्रील करणे.” ज्याचा फायदा पुढील अनेक वर्षे वेगवेगळ्या प्रसंगात, पदोपदी होत गेला.

भरोसा करता यायला पाहिजे, संशय तर सारे जग करते.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author