येणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.
मानवी भावभावनांची स्पंदनं टिपणारा टीपकागद म्हणजेच पत्र होय. पत्र लिहिणे म्हणजे एकमेकांच्या सुख-दुःखांना वाट करून देणे होय. पत्र म्हणजे मन हलकं करणारा प्रवास. सभोवतालच्या नावडत्या जगात राहात असताना एकांतात प्रिय व्यक्तींच्या आठवणीसह राहाणं पत्र घडवून आणतं. सुखाचे अनेक प्रसंग आणायचे असतील तर पत्र लिहावं व दुःखांना मोकळी वाट करून द्यायची असेल तरीही पत्रही लिहावं हे जीए वाचूनच कळतं. समोरासमोर न बोलणारी माणसं पत्रातून दुथडी वाहिल्याप्रमाणे व्यक्त होतात. जीए यांनी असंख्य पत्र हजाराच्या घरात, महात्मा गांधी नंतर कदाचित त्यांनीच पत्र जास्त लिहिली असावीत.
जीएंच्या पत्रांना वेगळाच गंध आहे. सुनिताबाई देशपांडे, कवी ग्रेस, डॉ. मिथिला ग्रेस या जिव्हाळ्याच्या माणसांना पत्र लिहिणं, हा त्यांचा छंद होता. स्वभाव जुळायला आणि पत्र लिहायलाही एक प्रकारची वेव्हलेंथ आवश्यक असते. सहजासहजी कोणाचेही कोणाशी स्वभाव जुळत नाहीत. आपलीच माणसे जेव्हा अंतर राखतात तेव्हा कुठेतरी माणसे विरंगुळा शोधतात. विश्वासाने मान टेकवावी असे खांदे व वंदनीय पाय आज दुर्मिळ झाले आहेत. मैत्री शोधतात माणसं पण कोणाशीही ती समरस होत नाहीत. आतडं पिळवटून टाकणाऱ्या आतड्याच्या माणसाशीच स्वभाव मिळतात. माणसाचं अस्तित्व ठराविक माणसाच्या सहवासातच, संवादातच, साहित्यातच फुलतं. आतड्याची माणसं हा जीएंचा शब्द. जीएमध्ये एक ग्रेस आहे. काही काही गोष्टी आपल्याला समजत नाहीत, त्या समजल्यावरच त्यातला ग्रेस कळतो, मग ते लिखाण असो, संगीत असो, नृत्य असो, त्यातले बारकावे आणि अर्थ कळला की ते आपलेसे होऊन जातात. माणसं समजायला माणसं वाचावी लागतात.
आपल्या जिव्हाळ्याच्या व्यक्तींना पत्र लिहिणे हा जी.ए. यांचा छंद होता. मैत्रीचा संवाद कवितेपासून सुरू झालेले हे नाते त्या पलीकडे जाऊन त्यामध्ये मनाचे गुंतवणे होते. पत्रात म्हटल्याप्रमाणे हे नाते आयुष्याला सुखावणारे होते. आयुष्यभर टिकणारे कृतज्ञतेचे संबंध निर्माण करणारी जीए यांची पत्रवेळा मनाचा ठाव घेते. पत्र छंद म्हणूनही नाही व कर्तव्य म्हणूनही नाही लिहिलं जात. जी.ए.कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्राबद्दल वाचकांना नेहमीच उत्सुकता वाटली आहे. त्यांच्या निवडक पत्रांचे चार संग्रह प्रसिद्ध झाले असले, तरीही अजूनही अनेक महत्त्वाची पत्रे अप्रकाशित आहेत. पत्र लिहिताना ते एकदा म्हणतात, पत्राला काहीच कारण नाही. पण लिहीत आहे. शिवाय पत्रात मी काय लिहिणार आहे, याचीही कल्पना नाही, येथे मन थोडे मोकाट करून उधळून देणार आहे. ग्रेस असो किंवा मिथिला असो किंवा सुनिताबाई असो सर्वांशी पत्रातून तात्त्विक पातळीवरची चर्चा? कुठेही वैयक्तिक सुखदुःखाची, खुशालीची चर्चा नाही. मैत्रीसंबंध केवळ रक्तात नसतात, तर मनात असतात, पत्रात असतात. यांची पत्रे व त्यांना आलेली पत्रे मानवी संबंधावर, भावभावनांवर प्रकाश टाकतात. शरीराने व्यक्त होणं यांत्रिक असतं, मनानं व्यक्त होणं सांस्कृतिक असतं.
सुनिताबाई देशपांडे आणि जी. ए. कुलकर्णी यांच्या पत्रांनी व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग काय असते आणि ते कसे व्यक्त करायचे ते शिकविले. पत्र नावाचं एक सत्र आमच्या आयुष्यातून अस्तंगत होत चाललं आहे. त्याची मोठी किंमत आम्हाला मोजावी लागत आहे. जी. ए. सारखे आशयाने ओथंबलेले पत्र लिहिण्याचे दिवस पुन्हा यावेत. यासाठी मनाचे पदर मोकळे होण्यासाठी नवीन पिढीला जी. ए. कळायला हवेत.