मुख्याध्यापक अर्जुन कोळी

२४ नोव्हेंबर १९४६ ला सुरू झालेल्या या शाळेने आज डोळ्यात भरेल असे नेत्रदीपक यश कमावले आहे. महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक हे सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा, इतक्या चांगल्या बनवत आहेत की, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी व पालक रांगेत उभे आहेत. या व अशा अनेक यशोगाथा समाजासमोर यायला हव्यात. त्यांचे सार्वत्रिकरण झाले तर परिस्थिती निश्चित सुधारेल. मुलांना शाळा आवडली तरच ते शाळेत येतात व रमतात.



२४ नोव्हेंबर १९४६ ला सुरू झालेल्या या शाळेने आज डोळ्यात भरेल असे नेत्रदीपक यश कमावले आहे. महाराष्ट्रात काही ध्येयवादी शिक्षक, पालक हे सरकारी शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपरिषद शाळा, इतक्या चांगल्या बनवत आहेत की, सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेण्यास विद्यार्थी व पालक रांगेत उभे आहेत. या व अशा अनेक यशोगाथा समाजासमोर यायला हव्यात. त्यांचे सार्वत्रिकरण झाले तर परिस्थिती निश्चित सुधारेल. मुलांना शाळा आवडली तरच ते शाळेत येतात व रमतात.

भौतिक सुविधा, प्रशिक्षित व प्रेरित शिक्षक, लोकसहभाग, सक्षम शालेय व्यवस्थापन समिती, आनंददायी अभ्यासक्रम, अभ्यासात मागे असणाऱ्यांची तयारी करून घेणे, आर्थिक तरतुदीची सोय करणे हे जर निकाल सुधारण्याचे व व्यक्तिमत्त्व विकासाचे निकष असतील तर ते सर्वत्र राबवले जायला हवेत. काही मराठी शाळा व शिक्षक शून्यातून विश्व निर्माण करत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळा वेगाने उघडत आहेत, तरीही मराठी शाळांची संख्या वाढण्यासाठी शिक्षक भरती, पटसंख्या व गुणवत्ता या बाबी मध्ये जर सुधारणा झाली तर निश्चितच चित्र बदलेल. पूर्वी जिल्हा परिषद शाळा नावाजलेल्या असायच्या व खाजगी शाळाही संख्येने कमी असायच्या; पण नंतरच्या काळात खाजगी शाळांनी भौतिक सुविधा व निकाल या निकषावर आपले वेगळे स्थान निर्माण केले व जिल्हा परिषद शाळा या सामान्य शाळा म्हणून मध्यंतरीच्या काळात दुर्लक्षित राहिल्या; पण आता काही नेतृत्व असलेल्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुन्हा अशा शाळा ऊर्जितावस्थेत आणलेल्या आहेत, इतक्या की लाखो मुले इंग्रजी शाळेतून जिल्हा परिषद शाळेमध्ये येत आहेत.

नेतृत्व सक्षम असेल तर कायापालट होतोच. शाळा शासनाची, जिल्हा परिषदेची व नगरपरिषदेची आहे असे न म्हणता विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी त्यांची आहे, असे समजणे आवश्यक आहे. शाळेत, शाळेच्या कारभारात गावसहभाग असणे व तो मिळवणे हे शिक्षकांचे कौशल्य तर आहेच; पण त्यांच्यासमोर आव्हानही आहे, असे आव्हान स्वीकारणारे आज अनेकजण आहेत, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे कराडची न.प.शाळा क्रमांक तीन नगर परिषदेची शाळा.

याबाबतीत राजेंद्र जाधव यांचे मनोगत फार बोलके आहे. ‘शाळेची पायरी चढायला सुरुवात होते ना होते तोच ‘सर’ ही हाक ऐकू येते आणि क्षणात माझ्यातला सामान्य पुरुष हा शिक्षक होतो. घर, संसार, जगरहाट सर्व विसरण्याची ताकद या शब्दात आहे. कोणाशी, कितीही मोठा वाद होऊ दे, केवढाही अपमान होऊ दे, कितीही मोठे दुखणे असू दे, समोर विद्यार्थी बघितले की सारे विसरायला होते आणि त्यांना घडवायची ऊर्मी उफाळून येते. नवीन संकल्पना, विचार आपोआप अभ्यासक्रमात शिरतात. त्यांच्याबरोबर तल्लीन झाल्यावर वेळेचे घड्याळ कधी पुढे सरकते, हेही कळत नाही. वाचता न येणाऱ्या विद्यार्थ्याला हळूहळू वाचता येऊ लागले की, त्याच्या सर या हाकेत मिठास जाणवते. प्रश्न विचारल्यावर ‘सर मी’, ‘सर मी’ असं ओरडणाऱ्या हुशार मुलांच्या हाकेत आत्मविश्वास जाणवतो, तर मस्ती करताना पकडल्यावर, ‘सर मी नाही’, ‘मी नाही’ असे ओरडणाऱ्या हाकेतून फसवेपणा लगेच समजतो. ‘सर’ शब्द तोच, पण वर्गातील प्रत्येकाचा आवाज नाद, लय, वेगळे असल्याने कोणी हाक मारली हे बसल्या जागी नजर न टाकता नुसत्या श्रवणाने समजते व त्यांनी का हाक मारली असावी, हेही न सांगता उमजते. पालक सभेत व पालक भेटीला जेव्हा येतात त्यावेळेला ‘सर, तुम्ही याला समजवा. हा तुमचंच ऐकतो किंवा हिला जरा मला मदत करायला सांगा’, अशा अर्थाची वाक्य ऐकतो, तेव्हा मला या सर शब्दाची ताकत समजते व पालकाचा आपल्यावर विश्वास जाणवतो. ‘ या मनोगतातून शिक्षकांची तळमळ जाणवते.

नगरपरिषद म्हणजे आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं त्याला छेद देणारी ही शाळा होय. नगरपरिषदेची शाळा म्हणजे मर्यादित अनुदानात चालणारी शाळा; पण लोकसहभागातून तिला एका वेगळ्या उंचीवर नेऊन, राज्यातली सर्वात जास्त पटसंख्या असलेली आय. एस. ओ. डिजिटल शाळा करण्याचे श्रेय अर्जुन कोळी यांना जाते. भारावलेली व्यक्तीच कायापालट घडवू शकते याचे हे उदाहरण, इतरांनीही अनुकरण करण्यासारखंच आहे.

शालेय शिक्षण विभागाचे व्हिजन २०२५ नुकतेच प्रकाशित करण्यात आले.

यामध्ये कराड नगर परिषदेच्या शाळा क्रमांक तीनचा आयडियल शाळा म्हणून उल्लेख करण्यात आला आहे व शाळेच्या कामगिरीचे शासनाकडून कौतुक करण्यात आले आहे. या शाळेचा उल्लेख करून या धर्तीवर राज्यातल्या अन्य शाळा आयडियल बनवण्याचा निर्धार करण्याचा शासनाचा मानस आहे.

एक लाख दहा हजार दोनशे एकोणतीस शाळा मधून राज्यात सर्वात जास्त पटसंख्या असलेली ही शाळा ज्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणाऱ्या विद्यार्थी व पालकांच्या रांगा, स्कूल बस सुविधा, डिजिटल क्लासरूम, २३९७ पटसंख्येची ही शाळा, जिची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांची आहे, अशी शाळा आगळीवेगळी अशीच आहे.

२०११ मध्ये चार शिक्षक व २४० पटसंख्या अशी कराड नगरपालिका शाळा क्रमांक तीनची अवस्था होती. मागील आकडेवारीनुसार पटसंख्या २३९७ आणि ७२ शिक्षक अशी होती. बालवाडीमध्ये सातशे बालके शिक्षण घेत होती. एकदा पहिलीच्या प्रवेशाकरिता आलेल्या बाराशे अर्जापैकी ४०० प्रवेशानंतर प्रक्रिया थांबवण्यात आली होती.

३०० मुलांना स्कॉलरशिप, १०० मुले गुणवत्ता यादीत हा बदल २०१८ पासून घडून आला आहे. दोन मजली इमारत व बारा खोल्या डिजिटल करण्याचे श्रेय मुख्याध्यापक व शिक्षकांनाच आहे. आता राज्यातील ही एकमेव कार्पोरेट शाळा आहे. प्रत्येक वर्ग डिजिटल आहे व वर्गात ए.सी. आहे. राज्यातील पहिल्या आय.एस.ओ. नामांकन प्राप्त या शाळेसाठी मागील पाच वर्षांत लोकसहभागातून ७० लाख रोख जमा झाले होते. शाळेचे विद्यार्थी आज अनेक मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत, यासाठी शाळेने विशेष प्रयत्न केले. येथील शिक्षक माझी शाळा समजून काम करतात. दररोज मुख्याध्यापक, शिक्षक संवाद होतो, नियमित पालक सभा होते. मुख्याध्यापक अर्जुन कोळी हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून पालकांशी संवाद साधतात व पालकांना इथे आपलेपणाची वागणूक मिळते. शिक्षक इथे शिकवण्यासाठी अतिरिक्त वेळ देतात. इयत्ता पहिलीचा पाया भक्कम करण्यावर शाळेत भर दिल्याने, पुढचा मार्ग सुकर होतो. शाळेच्या यशात महिला शिक्षकांचाही अमूल्य वाटा आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद होत्या तेव्हा ऑनलाइन अभ्यासक्रम शिकवला जात असे. टीव्हीद्वारे अभ्यास घेण्याचे शासनाचे नियोजन सुरू असतानाच येथील या शाळेने पुढाकार घेत स्थानिक केबल चॅनलद्वारे तसेच युट्युब चॅनेल तयार करून शिक्षण देण्यास सुरुवात केली होती, यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. शाळा बंद काळात विद्यार्थ्यांना सुलभ पद्धतीने अभ्यास करता यावा, यासाठी शहरासह तालुक्यातील केबलवर प्रक्षेपित होणारे स्थानिक चॅनल दोन महिन्यांसाठी घेतले होते. त्याद्वारे दररोज सकाळी साडेदहा ते साडेबारा या वेळेत शाळेतील शिक्षकांचे पाठ दाखवले जात असत. शिवाय सकाळच्या सत्रात ज्या विद्यार्थ्यांना ते पाहाता येणे शक्य होत नसेल त्यांच्यासाठी सकाळी झालेल्या पाठाचे पुनः प्रक्षेपण सायंकाळी दाखवले जात असे. पाचवी, सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी हे स्थानिक केबल चालू होते. त्यासाठी शाळेत स्टुडिओही बनवला होता, तेथे शिक्षक दोन तास शिकवायचे व त्याचे चित्रीकरण केले जात असे. दुसऱ्या दिवशी ते चॅनेलवर वेळापत्रकानुसार प्रक्षेपित केले जात असे. दरम्यान, प्रत्येक अर्ध्या तासाला वर्गनिहाय व विषयानुसार पाठाचे वेळापत्रक तयार केलेले असे. सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा अभ्यासक्रम पोहोचतो का यासाठी व विद्यार्थ्यांकडे चॅनेल दिसते का याचा सर्व्हे केला गेला. त्यात ७० टक्के पालकांकडे हे चॅनल दिसत असल्याचे समोर आले, तरी यापूर्वीच केलेल्या सर्व्हेत ९५% पालकांकडे स्मार्ट मोबाईल असल्याचे पुढे आले. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना टी.व्ही. चॅनेल उपलब्ध होत नाही, त्यांच्यासाठी शाळेने youtube वर पाठाचे व्हिडिओ अपलोड करण्याची व्यवस्था केली होती. त्याद्वारे या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला. दरम्यान, स्थानिक चॅनलमुळे केवळ पालिकेच्या शाळेतीलच नव्हे, तर तालुक्यात प्रक्षेपित होणाऱ्या भागातील सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना याचा लाभ झाला. दरम्यान, शासनाच्या निर्देशानुसार शाळेने पहिली, दुसरीतील विद्यार्थ्यांसाठी गाणी व गोष्टींचे, शिक्षकांचे व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपवरसुद्धा टाकले होते. तिसरी, चौथीचे शिक्षक फेसबुक, व्हॉट्सअप, झूम आदीद्वारे विद्यार्थ्यांशी थेट बोलून अभ्यास घेत होते, त्याद्वारे शिक्षकांचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद होत असे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या चांगल्या शाळा पाहून इतर शाळांनी केवळ अनुकरण करू नये, तर आपली स्वतःची अशी वेगळी ओळख शिक्षणक्षेत्रात निर्माण करणे आज प्रत्येक शाळेला अस्तित्वासाठी व शाळेच्या लौकिकासाठी आवश्यक आहे.

Author