‘It’s not important what you leave for your children, It’s important what you leave in them ” Shannon L Adler ने म्हणलं आहे.
आई, वडील, आजी, आजोबा आपल्यात भौतिक नव्हे तर नैतिक मूल्यं ही ओंजळभर सोडून जातात. ओंजळभर पाणी काय असतं? अर्घ्य देणं काय असतं? पूर्वीच्या काळी काशीयात्रेला काही दिवस नाही तर काही महिने लागायचे. काशीयात्रेला जाणं कष्टाचं तर होतंच पण कधी व्यक्ती जर गेलीच तर तिला एक नेम करावा लागायचा. गंगेच्या पात्रात उभं राहून तीन ओंजळी पाण्याचे अर्घ्य सूर्याला देऊन आपल्याला अत्यंत प्रिय असलेल्या एखाद्या गोष्टीचा जन्मभरासाठी त्याग करायचा आणि अशी शपथ सूर्याच्या साक्षीने घ्यायची. गंगेला दिलेला हा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेघ, त्यामुळे ते वचन कधीच मोडायचं नाही.
आजी, आजोबांनी केलेल्या संस्काराची जाण ठेवून त्यांच्यासाठी आठवणीत व वास्तवात जगणारी पिढी आजही आहे. संस्काराची मुळं जेव्हा घट्ट असतात व खोलवर रुजलेली असतात तेव्हा रोपटंही आत्मविश्वासाने फुलत जातं. स्वतःच्या अस्तित्वाने रोपटं आकाश कवेत घेतं, उंच भरारी मारतं, त्याला जाण असते आपल्याला जमिनीवर ठेवणाऱ्या संस्कारित मुळांची.
माणसे आठवणीवर जगतात, फुलतात, समृद्ध होतात व स्वतःचं विश्व निर्माण करतात. आठवणी नुसत्या येत नाहीत तर त्या मनात रुजतात, आपल्याला घडवतात. मोठमोठ्या व्यक्तींनाही आजी, आजोबांनी घडवले. त्यांच्या गोष्टींनी घडवले. त्यांचे भावनिक पालनपोषण केले. पण आज अनेक कुटुंबातील मुलं त्याला पारखी आहेत. केवळ आजीच पिढीला घडवत होती असं नाही, तर आजीचा बटवा, आजीच्या गोष्टी, आजीचा वावर जाणवून देतो संस्कारांचा एक पॅटर्न. काही माणसांचं अस्तित्व नुसतं असत नाही, तर ते व्यक्तिमत्त्व घडवण्यास पूरक ठरतं.
आपल्या आजी, आजोबांना काशीला जायचं होतं; पण आता काशीला जाणं इतकं सोपं झालं आहे, ही आठवण सांगताना सुधा मूर्ती जेव्हा काशीला गेल्या तेव्हाची ही आठवण आहे. त्या म्हणतात, “मी सूर्याकडे पाहिले आणि वर्तमानात परत आले.” मी हातात गंगेच्या पाण्याची ओंजळ घेऊन म्हणाले, “हे गंगेमाते, आज मी येथे या सूर्याच्या साक्षीने ही पहिली ओंजळ माझ्या आजी-आजोबांच्या वतीने तुला अर्पण करत आहे. त्यांच्या आत्म्याला शांती मिळू दे. ते जिथे कुठे असतील तिथे, सुखात राहू देत.” मला त्यानंतर खूप मोकळं झाल्यासारखं हलकं वाटलं. मला आजोबांनी काही सांगितलं नव्हतं; पण तरीसुद्धा काशीयात्रा पूर्ण करण्याची त्यांची इच्छा मी पूर्ण केली होती. त्यानंतर आणखी एक ओंजळभर पाणी घेऊन मग त्यांना म्हणाले, “हे गंगेमाते, या सूर्याच्यासाक्षीने तू सातत्याने आमच्या देशाची जीवनधारा म्हणून राहिली आहेस. तुझ्या या काठावर अनेक साम्राज्ये उदयास येताना आणि जमीनदोस्त होताना पाहिली आहेस. मी या देशात जन्माला आल्याबद्दल कृतज्ञ आहे आणि या देशाची नागरिक असल्याबद्दल मला अभिमान वाटतो. तुझा असाच उत्कर्ष होऊ देत. मी या ओंजळभर पाण्याशिवाय तुला दुसरं काय देऊ शकणार? ”
पाण्याची तिसरी ओंजळ भरून घेत असताना मला माझ्या आजोबांचे शब्द आठवले, ‘तुला जी गोष्ट सर्वात प्रिय आहे ती सोड.’ मी कुठल्या गोष्टीचा त्याग करू? मी विचारात पडले. हे जीवन, विविध रंग, आकार, निसर्ग, संगीत, कलाकृती, वाचन आणि खरेदी हे सर्वच अत्यंत प्रिय होतं. साडी खरेदी ही माझी अतिशय आवडती गोष्ट होती. मला निसर्गाशी मिळत्याजुळत्या रंगाच्या साड्या आवडायच्या. दरवर्षी बदलत चाललेल्या साड्यांचा विविध डिझाईनची मला नेहमीच भुरळ पडायची. ठरलं तर मग, मला अत्यंत प्रिय असणारी गोष्ट मी सोडली पाहिजे असे या काशी शहराचं म्हणणं आहे, तर आज इथे या उगवत्या सूर्याच्या साक्षीने आजपासून मी सर्व प्रकारच्या खरेदीवर पाणी सोडत आहे. अन्न, औषधपाणी, प्रवास, पुस्तके व संगीत याचा अपवाद वगळता मी इथून पुढे कोणत्याही प्रकारची खरेदी करणार नाही. मी आजपासून हा नेम करत असून माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत मी या गोष्टीचं पालन करेल असं म्हणून मी ओंजळीतले पाणी गंगा नदीच्या प्रवाहात सोडलं. दूरवर कुठेतरी माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर हसू फुटल्यासारखं मला वाटलं. खरं तर, मी तो नेम केला आणि मला एक नवीन स्वातंत्र्य प्राप्त झालं. आता स्वतःसाठी कशाचाही संचय करण्याची इच्छाच मनातून नाहीशी झाली आहे. मला आता भेटी स्वीकारणं हे नकोसं वाटू लागलं. मला आता कोणीही काहीही देऊ नका, असे मी त्यांना सर्वांना सांगितले आहे. हे शेवटच्या ओंजळभर पाण्यानं माझं आयुष्य बदलून टाकलं आहे.
तुम्हीही जर मनापासून एखाद्या गोष्टीचा त्याग करण्याची शपथ घेतली असेल, तर काही काळानंतर तुम्हाला त्या गोष्टींचा मोह पडत नाही, त्या गोष्टीवाचून जगण्याची सवय होऊन जाते. नातेसंबंधापेक्षा कार्टूनच्या सहवासात वाढणारी पिढी केवळ रोबोट नाही तर रोगट होत आहे.
कृतज्ञता ही अशीच नात्यामधून रुजते. नाती बहरली तरच मानवी जीवन सुसह्य होईल. आज नेमकं तेच हरवलंय.