तीन हजार टाके

काही पुस्तके वाचायला हवीत. पुस्तके प्रेरणा देतात. संघर्षात जगायला शिकवतात. संघर्ष माणसाला घडवतं. अपयशाच्या रस्त्यामधूनच एक दिवस यशाचा रस्ता सापडतो. नैराश्याचे ढगसुद्धा काही काळ अवकाश व्यापून राहातात; पण तेसुद्धा कधीतरी बरसतातच आणि बरसल्यावर अंकुर सोबत घेऊनच आसमंत उजळून टाकतात. पुस्तक आदर्शाचा आरसा असतो. आरशात पाहून स्वत:चं मूल्यमापन करायचं असतं. स्वतःची प्रतिमा सुधारायची असते. आरसा केवळ अस्तित्वच दाखवत नाही, तर व्यक्तित्वही दाखवतो. सामान्य व्यक्तीच्या वर्तनातही असामान्य जीवन असतं. आयुष्य निरनिराळे पदर आपल्याला उलगडून दाखवते व आपण घडतो. प्रतिकूल परिस्थितीत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर सुधा मूर्ती यांनी ३००० स्त्रियांचे जटानिर्मूलन केले. त्या देवदासी म्हणून वेश्या व्यवसाय करायच्या. त्या आपण देवाला वाहिलेल्या आहोत म्हणून जटा काढतच नसत. दोनदा अपयश आल्यानंतरही सुधा मूर्ती मागे हटल्या नाहीत. तिसऱ्यांदा त्यांना समजावण्यात यश आले व हळूहळू देवदासींच्या प्रथेवरील देवदासींचा विश्वास उडून सत्य त्यांना कळू लागले.

१९९६ मध्ये इन्फोसिस फाऊंडेशनची स्थापना झाली. इन्फोसिस फाऊंडेशन सुरू करण्याची कल्पना सामान्य माणसाच्या आयुष्यात काहीतरी सकारात्मक बदल घडवून आणणे ही होती. म्हणजेच ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’. गरजवंताची जात, धर्म, भाषाचा विचार न करता त्यांच्या मदतीला धावून जाणे हे फाऊंडेशनचे मुख्य उद्दिष्ट होतं. देवदासी या शब्दाचा खरंतर अर्थ ईश्वराची सेवा करणारी असा आहे. पूर्वीच्या काळी देवदासी गायन, वादन, नृत्य अशा कलात निपुण असत. कलेच्या माध्यमातून त्या ईश्वराची स्तुती करत, उपासना करत. त्या मंदिरामध्ये आपल्या कलेचे प्रदर्शन करत. काही दिवसांनी देवदासी या शब्दाला शरीरविक्रय करून उदरनिर्वाह करणारी स्त्री असा एक वेगळाच अर्थ प्राप्त झाला. काही मुली देवदासीच्यापोटी जन्माला आल्यामुळे पुढे त्याही देवदासी बनल्या, तर काही मुलींना त्यांचे स्वतःचे आई-वडीलच वेगवेगळ्या कारणाने देवाला अर्पण करायचे. दारिद्र्याने अस्वच्छ, अनारोग्यपूर्ण राहाणीमुळे एखाद्या मुलीला डोक्यात जट आली की, लगेच ती मुलगी देवदासी होण्यासाठी जन्माला आली आहे, असा साक्षात देवानंच कौल दिला असल्याचा अर्थ लावून तिला देवाच्या चरणी सेवेसाठी देवाशी लग्न करण्याची अनिष्ट प्रथा सुरू झाली.

देवदासी समस्याचं काम सुधा मूर्तींनी हातात घेतलं. संवाद साधणं अतिशय अवघड होतं. खूप प्रयत्न त्यांनी अपमान सहन करत केले. तुम्ही काय सरकारी दलाल आहात का? वगैरे अशा प्रकारची हेटाळणी त्यांची झाली. त्यांच्या अंगावर चपला फेकून मारल्या, तरी त्या डगमगल्या नाहीत.

या स्त्रियांना केवळ आर्थिक मदत करून काहीच होणार नाही तर त्यांचा आत्मसन्मानाने त्यांचे मनोबल वाढवण्याची गरज आहे, हे सुधा मूर्तीना कळून चुकलं आणि मग त्यांनी व देवदासींनी एकत्र येऊन एक संघटना उभी केली. परमेश्वराला काही सगळीकडे उपस्थित राहाणे शक्य नसते म्हणून तो काही काही व्यक्तींच्या रूपाने मदतीला धावून येतो, या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास होता.

या उपक्रमाचे यश म्हणजे तीन वर्षांच्या आत बँकेकडे डिपॉझिट स्वरूपात ऐंशी लाख रुपये जमले. पूर्वी देवदासी असलेल्या स्त्रियांना या बँकेत नोकरी देण्यात आली; परंतु या उपक्रमाचे सर्वात मुख्य यश म्हणजे ३००० देवदासी शरीरविक्रय व्यवसायातून बाहेर पडल्या.

या देवदासींपैकी अनेकांची मुलं शिकून मोठी होऊन आपापल्या व्यवसायात यशस्वी झाली. त्यात डॉक्टर, वकील, कारकून, सरकारी नोकर, शिक्षक, रेल्वे कर्मचारी, बँक अधिकारी असे सगळे होते.

देवदासी प्रथेतून बाहेर पडलेल्या महिलांनी एका कार्यक्रमांमध्ये एक भरतकाम केलेली गोधडी सुधा मुर्ती यांना भेट दिली. त्यावर कलाकुसर केलेली होती आणि तीन हजार टाके असलेली ही गोधडी व त्यावर फार सुंदर नक्षीकाम नसली तरी त्यामध्ये प्रत्येकीचा हात लागलेला होता, मायेची ऊब होती.

आपल्या मनोगतात त्या म्हणतात, “ही आमच्या हृदयाकडून तुमच्या हृदयाला भेट. हे पांघरूण तुम्हाला उन्हाळ्यात शीतलता आणि हिवाळ्यात ऊब देईल.

आमची माया यातून तुमच्यापर्यंत पोहोचेल. आमच्या संकटकाळी तुम्ही आमच्यासाठी धावून आलात. आता आम्हाला तुमची साथ सोडायची नाही.”

सुधा मूर्ती म्हणतात, “आजवर मला मिळालेली ही सर्वात सुंदर भेट आहे. ”

सुधा मूर्तीच्या शब्दात सांगायचं झालं तर ‘मानवी स्वभावाचे सर्व पैलू नीट समजावून घेणं आणि संकटात सापडलेल्या माणसांना मदतीचा हात देऊन त्यांना त्या संकटातून बाहेर काढणं हेसुद्धा आपल्या आयुष्याचं ध्येय असू शकतं. आपण सगळेच आयुष्यात छोट्या छोट्या लढाया जरी हरलो, तरी महासंग्राम जिंकू शकतो. आयुष्यात आशेला नेहमीच स्थान असतं. ‘

व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार करायचा असेल तर कोषातून बाहेर यायलाच हवं. एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वानेच बदलाची प्रक्रिया सामूहिक व्हायला सुरुवात होते.

काही पुस्तके, काही माणसे आजच्या पिढीला माहीत व्हायलाच हवीत.

पुस्तकातलं तत्त्वज्ञान माणसांत पाहायचं असतं.

Author