मन कल्लोळ

एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.



एरिक फ्रॉम नावाचा प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणायचा, ‘ए मॅन शुड बी नोन फॉर व्हॉट ही इज दॅन व्हाट ही हॅज.’ अनेकांचे सुप्त गुण वेळीच ओळखायला हवेत. आपण कसे आहोत? आपल्यात कोणते सुप्त गुण आहेत? हे अनेकांना आयुष्याच्या उत्तरार्धापर्यंत समजतच नाहीत.

भोवतालच्या परिस्थितीला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्यात काय विशेष आहे, याचा शोध प्रथम घ्यायला हवा. आपणच आपल्याला ओळखायला हवं. आपणच आपल्यातून उमलायला हवं. आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार असतो. मी कळणं आणि वळणं महत्त्वाचं असतं.

माणसाजवळ काय आहे, यापेक्षा माणूस कसा आहे हे महत्त्वाचं आहे. माणसाजवळच्या वस्तू कायम त्याच्याजवळ असत नाहीत; पण माणूस त्याचाच स्वत:चा असतो. माणूसपण त्याचंच असतं. माणूसपण असणं व जपणं हीच व्यक्तिमत्त्वाची ओळख असते. माणसाच्या ऐहिक संपत्तीवरून तो ओळखला जात नाही, तर त्याच्या वैचारिक संपत्तीवरून, मृत्यूनंतरही तो ओळखला जातो.

आपल्याकडे काय आहे व शेजाऱ्याकडे काय आहे, या स्पर्धेतच माणसं सतत विचार करत असतात व समाधान न मिळाल्यामुळे कुठेच थांबत नाहीत. लोक काय म्हणतील असं आपण लहानपणापासूनच मुलालाही शिकवतो, त्यामुळे आत्मसन्मान आणि आत्मविश्वास कमी व्हायला लागतो आणि आपल्यामध्ये न्यूनगंड तयार व्हायला लागतो. ‘न्यूनगंड म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट येत नाही असं वाटणं न्यूनगंड नव्हे, तर आपल्याला असं वाटतं की, इतरांना असं वाटतं की आपल्याला ती गोष्ट येत नाही’, या सगळ्यातून पुन्हा नैराश्य, चिंता, अनेक मानसिक समस्या उभ्या राहातात.

स्वतःच स्वतःत गुंतून राहिल्यामुळे मनोविकार वाढत जातात. अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया या देशात मागील तीस वर्षांत टोकाचे स्पर्धात्मक, आत्मकेंद्री धोरण स्वीकारले गेले आणि कल्याणकारी संस्था म्हणून न स्वीकारणे अशा देशात फक्त मनोविकाराचे प्रमाण लोकसंख्येच्या २६% होतं, तर इंग्लंडमध्ये २१% होतं; पण या उलट स्वीडन, फीनलंड, डेन्मार्क आणि इतरही ज्या राष्ट्रांनी कल्याणकारी योजना कायम टिकवल्या आणि जिथे विषमता कमी आहे, अशा देशात विकारांचे प्रमाण ११.५% आहे, असं वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशनला आढळलं.

मनोविकार आपल्याला कमी करायचे असतील तर आपल्याला समाज, कुटुंब आणि व्यक्ती या सगळ्यांचा विचार करायला हवा. कारण अनेक विकारांना सामाजिक परिस्थिती जबाबदार असली तरीही मनोविकार, जेनेटिक्सवर आणि त्याची वाढ, संस्कार, कुटुंब, परिस्थिती यांच्यामुळे होत असते.

२०२५ सालापर्यंत जगातल्या २५% लोकांना नैराश्य किंवा इतर कुठल्या तरी मनोविकारांनी ग्रासलेलं असेल असं भाकित वर्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं केलं होतं.

मनोविकार कमी करण्यासाठी विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच पुस्तकांच्या पलीकडे पाहायला, शिकवायला हवं किंवा आपल्याविषयी विचार न करता समाज, देश याबद्दल आपलं उत्तरदायित्व काय आहे. त्यासंबंधीचे बाळकडू त्यांना पाजायला हवं. दुसऱ्यांची मने जपताना कधी कधी स्वतःचे मन दुभंगते हे अनेकांच्या लक्षातच येत नाही. शरीराकडे लक्ष देण्याबरोबरच मनाकडेही लक्ष द्यायला आपण शिकवलं पाहिजे. पालकांनीही लहान मुलांकडे लक्ष दिले पाहिजे. लहानपणी असुरक्षिततेची भावना, प्रसंग पुढील आयुष्यात मानसिक विकाराला कारणीभूत ठरू शकतात.

पुस्तकांच्या पलीकडे जसे पाहायला हवं तसं प्रत्येकाने स्वतःच्या पलीकडेही पाहायला हवं. आपल्या दृष्टिकोनाचं क्षितिज आपल्यालाच विस्तारायला हवं. वैचारिक उंचीची त्रिज्या विस्तारली, तरच सामंजस्याच्या क्षितिजाला गवसणी घालता येईल. स्वतःच्या कोषातून बाहेर पडलं तरच भवतालाची जाणीव होते.

समाधान नावाच्या थांब्यावर लोकं थांबतच नाहीत. यशाच्यामागे धावताना लोक स्वतःला विसरत चाललीत, भवताल विसरत चाललीत. स्वतःच्या ऐहिक सुखासाठी झाडांची कत्तल करायला तयार झाली आहेत. स्वतः पुढे समाज, पर्यावरण, देश हे दुय्यम ठरवत आहेत. पुस्तकाच्या पलीकडेच समाज, पर्यावरण, देश आहे, याचं भान ठेवायला हवं.

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अशा तीन पातळ्यांवर निरोगी असणाऱ्या माणसाचे आरोग्यच माणूस म्हणून आरोग्यपूर्ण आहे, असे योग मानतो. चंगळवादी माणसाकडे कितीही वस्तू असल्या तरी तो असमाधानी असतो. समाधानाचं मूळ हे माणसाच्या दृष्टिकोनामध्ये आहे म्हणून आयुष्यात असलेली परिस्थिती आणि घटना यांच्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहातो, यावर सर्व अवलंबून असतं. Aptitude ने विद्यार्थ्यांचा कल समजेल; पण Attitude ने दृष्टी समजेल. मनोविकार होऊ नये यासाठी जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला, विद्यार्थ्यांना शिकवायला हवं. एकाच व्यक्तिमत्वामध्ये व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे असतात, ते फुलवायला हवेत.

पुस्तके दृष्टिकोन देतात; पण पुस्तकाच्या पलीकडे काही घटना जीवनाकडे पाहाण्याची दृष्टी देतात.

Author