योगवाशिष्ठ

योगवाशिष्ठ हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते. तरीही या ग्रंथाचे रचनाकार रामायणकर्ते वाल्मीकी हेच आहेत की अन्य कोण याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आढळतात.



योगवाशिष्ठ हा ग्रंथ उत्तररामायण, वसिष्ठ महारामायण, मोक्षोपायसंहिता या नावांनी देखील ओळखला जातो. हा ग्रंथ वाल्मिकींची रचना आहे, असे मानले जाते. तरीही या ग्रंथाचे रचनाकार रामायणकर्ते वाल्मीकी हेच आहेत की अन्य कोण याविषयी विद्वानांमध्ये मतभेद आढळतात.

ग्रंथाचा रचनाकाळही निश्चित रूपाने सांगता येत नाही. इसवी सनाचे पाचवे शतक ते चौदावे शतक यामधील वेगवेगळ्या काळाचा निर्देश विद्वानांनी केला आहे. हा ग्रंथ पद्य स्वरूपात आहे.

वाल्मीकीरचित योगवासिष्ठ हा मान्यताप्राप्त असा ग्रंथ असून वसिष्ठ मुनींनी रामाला दिलेले मोक्षविषयक विस्तृत ज्ञान ह्यात अंतर्भूत आहे. वैराग्य, मुमुक्षु, उत्पत्ति, स्थिति, उपशम व निर्वाण अशा एकूण सहा प्रकरणांमध्ये वर्ण्यविषय विभागलेला असून सुमारे ३२,००० श्लोक एवढा ह्याचा विस्तार आहे.

पहिल्या वैराग्य प्रकरणामध्ये रामाला लाभलेल्या जीवन्मुक्तीविषयी भारद्वाज मुनींनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वाल्मीकी ऋषिंनी रामाला लहान वयातच आलेले वैराग्य आणि त्याअनुषंगाने त्याने विश्वामित्र व वसिष्ठमुनींसमोर केलेले निवेदन व व्यक्त केलेली आत्मज्ञानाची जिज्ञासा यांचे वर्णन केले आहे. अध्ययन पूर्ण झाल्यानंतर रामाने तीर्थयात्रा केली आणि परत आल्यावर त्याचे मन ऐहिक बाबींविषयी उदासीन होऊ लागले, सगळ्या वैषयिक उपभोगांविषयी त्याची मनोभूमिका वैराग्यपूर्ण होऊ लागली. जगाची नश्वरता, संसारातील भ्रामकता, सर्वशक्तिमान काळाचे स्वरूप, विषयोपभोगामुळे घडून येणारा सर्वनाश इत्यादिविषयी त्याचे विचार स्पष्ट होऊ लागले होते. परिणामी उद्भवलेल्या मानसिक अशांततेवर उपाय सांगावा, मोक्षज्ञान द्यावे असा आग्रह त्याने त्या थोर मुनींकडे धरला.

दुसऱ्या मुमुक्षु प्रकरणात विश्वामित्रांनी रामाला आत्मज्ञानाचा उपदेश करण्याचे कार्य वसिष्ठांवर सोपविले. त्यानुसार साक्षात् ब्रह्माने वसिष्ठांना केलेला उपदेश रामाला प्रतिपादन करण्यास वसिष्ठ सुरुवात करतात.

तिसरे प्रकरण उत्पत्तिविषयक असून वसिष्ठ मुनि त्यात चैतन्यमय ब्रह्मस्वरूप, आत्मतत्त्वाचे शुद्ध व अद्वैत रूप, द्वैताचा आभास निर्माण करणाऱ्या मनाचे स्वरूप, जीवन्मुक्ती व विदेहमुक्ती, जगाची उत्पत्ती, परमात्मा हेच जगाचे कारणरूप व कार्यरूप, चिदाकाशव त्याचे महत्त्व, सुख-दु:खविषयक उपदेश केला आहे.

चौथ्या स्थिति प्रकरणात विश्वाच्या स्थितीचे विवेचन येते. जगाच्या अस्तित्वाच्या भ्रमाचे निराकरण, संसाराचे बीज म्हणून आत्मविषयक प्रतिपादन, जाग्रत्, स्वप्न, सुषुप्ता व तुरीया अवस्थांचे वर्णन, जीवन व संसार ह्यांच्या विस्ताराचे प्रतिपादन, सत्य-असत्य निर्णय, कर्तव्य-विचार, मोक्ष-विचार व मोक्षोपाय असे अनेक विषय ह्या प्रकरणात चर्चिले आहेत.

पाचवे प्रकरण ‘उपशम’ असून ह्यात जनकाच्या ठिकाणी झालेली विवेक-उत्पत्ती, चित्ताचे अनुशासन, मनोनाश, तृष्णा आणि तिची चिकित्सा, जीवन्मुक्ताचे वर्णन, आत्मलाभ-चिंतन, समाधि-निश्चय इ. अनेक विषयांचे विवेचन आले आहे.

सहावे निर्वाण प्रकरण दोन विभागांमध्ये विभागलेले असून पूर्वार्धात द्वैत भावनेचे भ्रामकत्व, ब्रह्म-ऐक्याचे प्रतिपादन, अज्ञानाची जडता, अविद्येचे निराकरण, जीवन्मुक्तीचा उपदेश, परमार्थ-योग, परमात्म्याचे रूप-वर्णन, नर नारायणाचे अर्जुन व श्रीकृष्ण या रूपाने अवतार व त्या निमित्ताने कृष्ण-अर्जुन ह्या दोघांतील संवादातून आत्मज्ञानाचा उपदेश करण्यात आलेला आहे.

निर्वाण प्रकरणाच्या उत्तरार्धात स्व-भाव सत्ता, मोक्ष-उपदेश, सर्वशांति-उपदेश, ब्रह्मस्वरूप प्रतिपादन, ब्रह्म-जगत् एकता, विराट्-जीव व विराट्-शरीर यांचे वर्णन, पुरुष-प्रकृति विचार, चैतन्याचे परमज्ञान असे विषय आले आहेत.

योगवाशिष्ठ ह्या ग्रंथात अनेक कथा-उपकथा, त्या कथांमधील अनेक व्यक्तींना वेगवेगळ्या ऋषि-मुनींकडून केले गेलेले जीवनविषयक तसेच मोक्षविषयक उपदेश ह्या माध्यमातून वसिष्ठमुनींचे श्रीरामांना मार्गदर्शन या दृष्टीने हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे.

हर्षाली संजय देवतळे
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
बीए भाग २
दि. १६. ११. २०२२

Author