व्यक्तिमत्त्व घडविणारं संतसाहित्य

संतसाहित्यातील जीवनमूल्ये समजण्यासाठी मुलांनी संतसाहित्यही वाचायला हवे. संतांनी सांगितलेल्या म्हणी, सुविचारमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे.



संतसाहित्यातील जीवनमूल्ये समजण्यासाठी मुलांनी संतसाहित्यही वाचायला हवे. संतांनी सांगितलेल्या म्हणी, सुविचारमध्ये जीवनाचं तत्त्वज्ञान त्यांनी थोडक्यात सांगितलं आहे.

मनाचे श्लोक, रामरक्षा, गीतापठण, अभंगाची गोडी लागली तर पाठांतर करण्याची सवयही लागते. शाळेमधील प्रार्थना मुलांना अंतर्मुख करते. तसेच शिस्त लावते. संस्कार, वळण लावण्यामध्ये संतसाहित्याची कामगिरी उल्लेखनीय आहे.

मूल्यांमुळेच व्यक्तीला आणि समाजाला मूल्य आहे. संतांनी दिलेल्या जीवनमूल्यांवरच आज समाजाचा उरलासुरला डोलारा उभा आहे. देवाच्या अनुपस्थितीत संतांनी समाज घडविला. मूल्य रुजवली. ती आजतागायत समाजाचं भलं करत आहेत. संतांनी देवाच्या अस्तित्वाबद्दलही प्रश्न उपस्थित केले व त्यामुळे पसरणाऱ्या अंधश्रद्धेवरही प्रहार केलेला आहे.

संतांचे कोणतेच मूल्य, कोणतीही शिकवण आजही कालबाह्य झालेली नाही. ‘Values are caught and not taught’.

शाळेत मूल्यं रुजावी म्हणून परिपाठ आहे; पण त्या प्रमाणात मूल्यं झिरपली का?

उंबरठ्याच्या आत उंबरठ्याबाहेर मूल्य पायदळी तुडवली जात आहेत. कोणत्याही प्रकारचे संस्कार जाणीवपूर्वक मुलांवर केले जात नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे वर्तन, समाजातील लोकांचे वर्तन मुले पाहातात आणि त्याचेच अनुकरण करतात.

एक संस्कारहीन पिढी मुलांना संस्कार काय देणार? संतांनी केवळ उपदेश केला नाही, त्यांचे आचरण हाच उपदेश होता.

‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ तुकाराम महाराजांचा एक अभंग घेतला तरीही संतसाहित्याची अनुभूती येईल.
सुख म्हणजे नक्की काय असतं? आनंद म्हणजे नक्की काय असतं? हे केवळ भौतिक गोष्टींवरून कळणार नाही.

संतसाहित्यातील परमेश्वराच्या सान्निध्याचा आनंद, अशी अनुभूती व त्यातून मिळणारा आनंद हा वैयक्तिक पातळीवर वेगवेगळा असू शकतो.

कोण, किती व कशात समरस होतो, यावरून आनंदाचे परिमाण ठरतं. प्रत्येकाचा आनंद वेगळा, आनंदाचे क्षण वेगळे, सोहळे वेगळे.

यशोशिखरावर जाऊन, नैराश्याच्या गर्तेत स्वतःला झोकून द्यायचं नसतं.

‘ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावें समाधान’ हे संतांनी शिकविले आहे.

यशाच्या रस्त्यावर समाधानाचे थांबे क्षणभर विश्रांतीसाठी आवश्यक असतात. सगळ्यांना सुखी माणसाचा सदरा हवा आहे. सुख म्हणजे नक्की काय असतं याची व्याख्या हवी. ऑनलाइन सुख विकत घ्यायची तयारी सर्वांची आहे. ऑफलाइन संघर्ष केला तरच ऑनलाइन सुख मिळेल. संतसाहित्य हे ऑफलाइन समजण्याची व अंगीकारण्याची गोष्ट आहे. सुख ऑनलाइन डाऊनलोड करता येत नाही.
दुःखही ऑनलाइन डिलीट करता येत नाही.

भोगणं, जगणं हे ऑफलाइन असतं. संतसाहित्यातील जीवनमूल्ये अंगीकारली तर वर्तमान सुसह्य असतं. संतसाहित्यातली मूल्यं आज फक्त ऐकली जातात. वर्तमानात माणसे वागू नये तशीच वागत आहेत. संतसाहित्य कळतं पण वळत नाही. संतांनी अंधश्रद्धेवर प्रहार केले, त्यातील पितळ उघडे केले तरी अंधश्रद्धेचं रोपटं फोफावतंच आहे. संतांच्या फोटोंचा वापर करून संतांची शिकवण ही फोटोमध्येच बंदिस्त केली आहे. आपल्याकडे आवडत्या गोष्टी फोटोत बंदिस्त करून भिंतीवर टांगल्या जातात.

घरात माणसे व चौकाचौकांत आदर्शांचे पुतळे धूळ खात पडलेले असताना विषाणूपेक्षाही जलदगतीने माणसे एकमेकांवर जळण्यात व एकमेकांना संपवण्याचा आराखडा तयार करण्यात मग्न असताना माणसांनी देवांना बंदिस्त केलं का देवांनी माणसांना बंदिस्त केलं? हे आवाक्याबाहेरचं असताना देव ऑनलाइन उपलब्ध आहेत; पण भक्ती अजून ऑनलाइन उपलब्ध नाही.
भक्ती म्हणजे मनातून मनाकडचा प्रवास जीवनाचाही अभ्यासक्रम असतो. तो बदलला की नव्याने सामोरे जावं लागतं. नव्या अभ्यासक्रमाला जुनी प्रश्नपत्रिका चालत नाही. अनेक प्रश्न असताना जोड्या लावा व संदर्भासहित स्पष्टीकरण द्या? हे प्रश्न कसे सोडवणार? माणसे आता चेहऱ्यावरून ओळखलेच जात नाहीत, अशा युगात अचानक उद्ध्वस्त व्हायला होतं. परंतु संपलं वाटत असतानाच नवीन अंकुर येतो. जीवन जगण्याची नवी आशा दाखवून जातो. आज अचानक कुणीतरी यावं, भेटावं. जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकावा असं वाटत असतानाच अचानक लक्ष जातं अडीअडचणीत, कपारीत उगवणारे इवलेसे कोंब जगायला प्रवृत्त करतात. संतसाहित्य हे जगण्यासाठी असंच उपयोगी पडतं.

मनाचे खेळ कधी कुणाला समजलेत. स्वतःच्या मनाचे खेळसुद्धा स्वतःला समजत नाहीत. मनाची उकल करण्यास संतसाहित्य उपयोगी पडते.

मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होईपर्यंत मनाचं ऐकत राहातात. संतसाहित्य त्याला लगाम घालतं. मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच यशस्वी होतो. अंतरंगात आपण कधी डोकावतच नाही. संतसाहित्य आपल्याला स्वतःच्या अंतरंगात पाहायला शिकवतं. आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळते. तुमच्या मनाची राख करते. सारखं आरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तृत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.

माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारतच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत. नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चीकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? नैराश्य यावर उतारा संतसाहित्य आहे. मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतंय. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतात. मन प्रसन्न करा हे ठीक आहे; पण सभोवताली तसा निसर्ग हवा, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवा व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत राहा, मनाचे काहीच प्रश्न राहाणार नाहीत.

कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जाते जळणं स्वतःला संपवतं. प्रेमाचा संदेश देणारे संतसाहित्य द्वेषाला थारा देत नाही. संतसाहित्य हा आरसा आहे. आरशात पाहून प्रतिमा सुधारायची असते.

Author