सोविएत रशियन साहित्यिक युरी नगीबीन यांची डॉ.सुनिती देशपांडे यांनी अनुवाद केलेली ही कथा आहे. नगीबीन यांच्या कथांमध्ये पात्रांची गर्दी नसते, पण प्रत्येक पात्र स्वतंत्र रूपाने प्रभावी होऊन उभे राहाते. लेखकासाठी लहान मूल आणि निसर्ग यांच अतूट नातं खास लोभाचं वाटतं.
एका छोट्याशा गावातील रशियन शिक्षिका शाळेत आल्यानंतर वाक्य आणि त्याचे घटक शिकवताना नाम कशाला म्हणायचं? असे विचारल्यावर मुलांनी अनेक नामांची उदाहरणे सांगितली. जसे, विद्यार्थी, पुस्तक, मांजर.
नेहमीच उशिरा येणाऱ्या मुलालाही विचारले. उशीर झालेल्या मुलाने नाम याचे उदाहरण सांगितलं, शिशिरातील वृक्षराज.
शिक्षिकेनं सांगितलं, शिशिरातील कशाला म्हणायला हवं?
शिक्षिकेनं सांगितलं, शिशिरातील हे विशेषण आहे व अजून आपण शिकलो नाही. तू जरा मला सुट्टीत येऊन भेट.
शिक्षिकेनं विचारलं, तू रोज उशिरा का येतो? त्याने सांगितलं की, मी घरातून लवकर निघतो पण मला एवढ्या अंतरासाठी एक तास लागतो. शिक्षिकेनं सांगितले की, तुझ्या घरापासून पंधरा मिनिटांत शाळेसाठी वेळ लागतो. जास्तीत जास्त अर्धा तास; पण त्याने सांगितलं की, मी हमरस्त्यानं नाही येत, पाऊलवाटेने जंगलातून येतो.
उशिरा येणाऱ्या मुलाला शिक्षिकेने त्याच्या आईला भेटायचं ठरवलं. ते दोघे निघाले, मुलाने हमरस्त्यानं न जाता पायवाटेनं न्यायचं ठरवलं. जंगलाची वाट धरताच शुभ्र बर्फाच्या झुंबरांनी सजलेली झाडं पाहून शिक्षिकेला फार प्रसन्न वाटू लागलं. त्यांना वाटलं, ही शुभ्रता किती संकेतांचे प्रतीक असू शकते! आणखी थोडं पुढं गेल्यावर तर त्यांना एखाद्या परीकथेचा आभास होऊ लागला. पानापानांवर, फांदीफांदीवर बर्फाचे तुरे डोलताना दिसू लागले. या डहाळीवरून त्या डहाळीवर हिंदोळे घेणारे पक्षीही पांढुरके पांढुरके दिसत होते. कुण्या चित्रकारानं आपला कुंचला अलगद फिरवून सारी वनराजी शिशिरशुभ्र करून टाकली होती. जवळूनच एक झरा वाहात होता, त्याचं ते अवखळ खळाळतं पाणी ! आणि ते मखमली तुषार ! जणू आपल्याकडे हितगुज करण्यासाठी बोलवीत होतं. सगळीकडे नुसत्या बर्फाच्या शुभ्र शाली अंतराअंतरावर दिसत होत्या. वेगवेगळ्या पोताच्या आणि डौलाच्याही. कुठेतरी झाडी विरळ होत राहायची आणि मग सूर्याची लखलखीत तिरीप पानापानांतून जणू पाठशिवणीचा खेळ खेळत राहायची. शिक्षिकेला वाटलं, याला उगीच नसेल होत उशीर शाळेत यायला. कोणीही भुलून, वेडावून जावं असंच हे मंतरलेलं जग आहे. इथं या जंगलातल्या गर्भागारात अशी नवलाई निसर्गानं जागोजागी पेरून ठेवली आहे. आपण फक्त पाहायचं आणि आश्चर्य करीत थकून जायचं. या प्रत्येक नवलाईचं रूपही वेगळं आणि आकर्षणही वेगळं.
पुढच्याच क्षणी त्यांनी पाहिलं आणि समोर छाती ताठ करून एक वृक्षराज उभा होता. क्षणभर काळजाचा ठोका चुकल्यासारखा वाटला. हे एवढं भव्य सुंदर काय असावं? इतक्यात विद्यार्थ्यांनी सांगितलं, हाच तो ‘शिशिरातील वृक्षराज’ मी तुम्हाला उदाहरण नव्हतं का सांगितलं नाम या व्याकरण प्रकाराचं. या मनोहारी स्वर्गीय वातावरणात तो वृक्षराज नुसताच भव्य नव्हता, तर अनेक जीवमात्रांचा उदार आश्रयदाता होता. काहींना कुशीत विसावू देणारा, अंगाखांद्यावर खेळवणारा, निसर्गाच्या लहरी खेळापासून संरक्षण देणारा. सृष्टीच्या या खजिन्यात अशीच काही रत्न दडली असतील. ज्याला ती दिसतील तोच खरा भाग्यवंत. बाकीचे सारे वाटसरू, अगदी नुसते वाटसरू. शिक्षिकेनी त्याचे हात हातात घेतले आणि आता तू रोज पाऊलवाटेने येऊ शकतोस असे सांगितले.
त्यांना वाटलं, पराभव आपला झाला आहे तो या चिमुकल्यानेच लक्षात आणून दिला आहे. काय हरकत आहे मोकळेपणा त्याची कबुली द्यायला? त्यांना त्यांचा तास आठवला आणि यापूर्वीचे कंटाळवाणं शिकवणं. भाषाही निसर्गाच्या सान्निध्यातच फुलारत, आकारत असते, तिला त्या तांत्रिक नियमात, व्याख्यात डांबून ठेवण्याची गरज काय? त्यांना मुलांची उत्तरे आठवली आणि या विद्यार्थ्यांचे उत्तर ‘शिशिरातील वृक्षराज’ आठवलं. आपण नाही तरी वर्गात मांजर एके मांजर असेच केले. त्यांनी त्या विद्यार्थ्यासमोर त्याच्या हातात हात घेतले आणि म्हणाल्या, “तू रोज याच पाऊलवाटेने यायचं. आज तू माझ्यासमोर हा एवढा खजिना खुला केलास, एवढं काही मला शिकवलंस, कशी उतराई होऊ मी तुझी? सांगशील.” आज शिक्षिकेने त्यांच्या शिक्षकीपेशातील फार मोलाचा धडा घेतला होता.
पहिला धडा तोही कोणा पंडिताकडून नाही, तर या चिमुरड्या पोराकडून. त्याचा तो निसर्गाचा अभ्यास, त्याचे ते शोध आणि तो आत्मविश्वास त्यांना खूप काही शिकवून गेला होता. कशा रीतीने त्या त्याच्या उतराई होणार होत्या?
आजच्या पिढीला निसर्गाच्या सान्निध्यात राहाणे जमत नसल्याने ते एका दुर्मिळ आनंदापासून वंचित आहेत.
मुलांना पालकांनी आणि शाळेने निसर्गाच्या सान्निध्यात नेलं तर अनेक संबोध स्पष्ट व्हायला मदतच होणार आहे.
