वैयक्तिक स्पष्ट ध्येयातून मिळणारी उर्जा

आयुष्यात कधीकधी कामाच्या संदर्भात, काही खास घटना घडतात किंवा काही वेगळीच माणसे भेटतात. त्यामुळे तुम्ही करत असलेले काम जास्त अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या विचारांना एक नवीनच दिशा मिळते. असाच, ध्येय स्पष्ट असण्याचे महत्व आणि ते पूर्तीस नेण्यासाठी लागणारा ध्यास यावरील एक जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आला.



आधुनिक एकलव्य
आयुष्यात कधीकधी कामाच्या संदर्भात, काही खास घटना घडतात किंवा काही वेगळीच माणसे भेटतात. त्यामुळे तुम्ही करत असलेले काम जास्त अर्थपूर्ण वाटू लागते. आपल्या विचारांना एक नवीनच दिशा मिळते. असाच, ध्येय स्पष्ट असण्याचे महत्व आणि ते पूर्तीस नेण्यासाठी लागणारा ध्यास यावरील एक जिवंत अनुभव माझ्या आयुष्यात आला.

काही वर्षांपूर्वी मी एका बहुराष्ट्रीय, अनेक विभाग असलेल्या कंपनीत क्वालिटी मॅनेजर होतो. माझ्या सुदैवाने माझ्या वरिष्ठांनी मला कंपनीच्या बाहेर सुद्धा मोफत प्रशिक्षण देण्याची पूर्ण मुभा दिली होती.

त्या वेळेचा एक अनुभव माझ्या मनावर चांगलाच कोरला गेला आहे. प्रशिक्षक म्हणून माझ्या सुरुवातीच्या काळात, गुणवत्ता व्यवस्थापनाशी संबंधित प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून, मी आयएसओ ९००० ह्या प्रणालीचे शिक्षण देण्यासाठी आमच्या कंपनी व्यतिरिक्त बाहेरील बऱ्याच कंपन्यांत जात असे. त्या कंपनीतील अनेक अनुभवी आणि तरुण व्यवस्थापक अशा प्रशिक्षणात सहभागी होत असत. त्याशिवाय ही प्रणाली प्रत्यक्ष वापरात आणण्यासाठी मी जे प्रशिक्षण देत असे, त्यात ‘कुठल्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी एखाद्या गोष्टीवर [ध्येय] लक्ष केंद्रित करणे किती आवश्यक असते’ ह्याविषयी पण चर्चा होत असे. एकदा ध्येय ठरले की त्यावर लक्ष केंद्रित करण्याची ‘ताकद’ अथवा उपयुक्तता नीट समजण्यासाठी, मी विविध निरीक्षणे आणि अनुभव यांची उदाहरणे देत असे. एखाद्या गोष्टीवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यामुळे कंपनीला तसेच वैयक्तिक होणारे फायदेही समजावून सांगत असे.

एका बऱ्यापैकी मोठ्या कंपनीत असे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर, एका तरुण मॅनेजरने मला त्याला माझा कार्यक्रम खूप आवडला असून, पुन्हा एकदा एकट्याने भेटायची इच्छा प्रदर्शित केली. त्याच्या चेहेऱ्यावर आणि देह्बोलीमध्ये हुशारी आणि आत्मविश्वास स्पष्ट दिसत होता. मलाही मी दिलेले प्रशिक्षण चांगले झाले असावे या कल्पनेने समाधान वाटले. मीही मोकळेपणाने दुसऱ्या दिवशीचे माझे आधी ठरलेले काम पाहून, सोयीच्या वेळेत त्याला मला माझ्या ऑफिसमध्ये भेटायला बोलावले.

माझा अनुभव असा होता की, बऱ्याचवेळा, प्रशिक्षणानंतर आलेल्या उत्साहापोटी अशा भेटीची इच्छा प्रदर्शित केली जाते. मला थोडे आश्चर्यच वाटले जेव्हा, दुसरे दिवशी तो मुलगा अगदी बरोबर वेळेवर माझ्या ऑफिसात हजर झाला. सुरुवातीला ओळख करून घेतल्यावर आणि थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर त्याने मला सांगितले, “ सर, मी आजच सकाळी माझ्या कामाचा राजीनामा दिला आहे.”

आता मात्र मला आश्चर्याचा धक्काच बसला. माझ्या प्रशिक्षणाचा असा परिणाम मला जराही अपेक्षित नव्हता. न राहवून मी त्याच्या निर्णयाचे स्पष्टीकरण विचारले. “सर, माझ्यासाठी आत्ता थोडा वेळ देऊ शकाल का?”

माझा होकार ऐकून, तो पुढे म्हणाला, “माझे नाव संजय आहे. मी अठ्ठावीस वर्षांचा आहे. सात वर्षे नोकरी झाली आहे. खरे सांगायचे झाले तर, माझ्या मनात बरेच दिवस खळबळ चालली होती. माझ्या आयुष्याची दिशा स्पष्ट होत नव्हती. तुमच्या कालच्या प्रशिक्षणामध्ये, आपण ‘ध्येयावर संपूर्ण लक्ष केंद्रित केल्यास होणारे फायदे’ आणि ते कसे करायचे यावर सखोल चर्चा केली. यालाच तुम्ही ध्यास असे म्हणाला होतात. तुम्ही दिलेली उदाहरणे खूपच चपखल होती. तुम्ही सांगितलेले जिवंत अनुभव पण अगदी समर्पक होते. या सर्वांचा परिपाक म्हणजे अचानक माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि आपले ध्येय निश्चित करून त्यावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्याचे महत्त्व मला पूर्णपणे पटले.” मी कुतूहलाने त्याला विचारले, “तुझ्या ह्या स्पष्टीकरणाचा आणि राजीनामा देण्याचा काय संबंध येतो? तुला सध्या उत्तम नोकरी आहे, तीसुद्धा एका चांगल्या मोठ्या प्रथितयश कंपनीत. तुझ्या कामाचे कौतुक होत आहे आणि पगार पण चांगला असावा.”

“सर, काल तुमचे प्रशिक्षण संपल्यावर, माझ्या वैयक्तिक ध्येयांबद्दल मी खूप विचार केला. मनोमन मला पुढील पाच वर्षात, एखाद्या तरी कारखान्याचा मुख्य व्यवस्थापक होण्याची तीव्र इच्छा आहे.”

मी लक्षपूर्वक ऐकत आहे याची खात्री झाल्यावर, संजय पुढे म्हणाला, “माझ्या वयाचा विचार करता आणि माझ्या आत्ताच्या कंपनीच्या संस्कृती आणि व्यवस्थेचा विचार करता, मी येथे पुढील पंधरा ते वीस वर्षे तरी मुख्याधिकारी होण्याची शक्यता मला जराही दिसत नाही. जरी मला चांगला पगार आणि मान असला तरी माझे ध्येय येथे सत्यात येण्याची शक्यता मला वाटत नाही. त्यामुळे उगीचच अजून वेळ वाया न घालवता, मी माझ्या कामाचा राजीनामा दिला आहे. सर, आत्तापासूनच माझी वाटचाल माझ्या ध्येयाकडे चालू झाली आहे असे मला मनोमन वाटत आहे. व त्यामुळे मी फारच उत्साही झालो आहे.”

मी जे ऐकत होतो तो अनुभव मलाही नवीनच होता. मी विचारले, “मग आता दुसरा जॉब शोधतो आहेस का? का आधीच दुसरा जॉब मिळालाय?”

“सर, माझ्या हातात दुसरा कोणताही जॉब नाही. तसं तर माझ्या लक्षात आले आहे की माझा सध्याचा जॉब आणि त्यामुळे असलेले सुखी आयुष्य, हे माझ्या मनाभोवती असलेला एक सोनेरी पिंजरा झाले होते. सर्व काही सुरळीत चालू होते. दुसरा जॉब आत्ता तरी लगेच शोधण्याची मला अजिबात गरज वाटत नाही आहे. माझ्या आत्ताच्या जॉबमध्ये राहून, येथे मिळणाऱ्या सर्व उत्तम सुविधा आणि मिळणारे फायदे ह्यांच्यामुळे, येथे होणाऱ्या कौतुकामुळे, माझ्या मनावर जे मोहाचे गारुड निर्माण झालेले आहे त्यामुळे, मी माझ्या मनाजोगता दुसरा जॉब शोधू शकलो नसतो. आता मात्र मी फक्त माझे ध्येय समोर ठेवूनच नवीन जॉब शोधायला लागेन. मी तुम्हाला गुरु मानले आहे आणि आज तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहे.”

ह्या स्पष्ट संभाषणानंतर माझे तर बोलणेच खुंटले. मी त्याच्या स्पष्ट विचारांमुळे चांगलाच प्रभावित झालो होतो. मी त्याला शुभेच्छा देऊन, त्याला कधी लागलीच तर मदत करण्याची इच्छा व्यक्त केली आणि संपर्कात राहण्यास सांगीतले.

माझा असा अनुभव आहे की प्रशिक्षणानंतर बरेच लोक अत्यंत प्रभावित होऊन, तात्कालिकरीत्या मनातल्या मनात खूप काही योजना तयार करतात. काही जण एकत्रित अथवा वैयक्तिक वागणुकीत बदल करण्याचे ठरवितात. काहीजण तशी वचने देतात अथवा प्रतिज्ञा पण करतात. परंतु बहुतांश वेळा या ना त्या सबबीखाली हा परिणाम फार काळ टिकत नाही. ज्यांच्या बाबतीत आणि जेवढा हा चांगला परिणाम दूरगामी टिकतो, तीच एखाद्या प्रशिक्षणाची परिणामकता असते.

कदाचित याच भावनेमुळे, त्या नंतर माझ्या धकाधकीच्या जीवनात मी हळूहळू ही घटना आणि संजयला विसरूनही गेलो. वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये माझे प्रशिक्षणाचे कार्यक्रम मात्र भरपूर प्रमाणात चालू होते.

एके दिवशी सकाळी मला अचानक एक फोन आला. “सर, नमस्कार. मी संजय बोलतोय. वेळ असेल तर आत्ता बोलू का?” त्याने नाव सांगितल्यावर, माझ्या जुन्या आठवणी चाळवल्या गेल्या. संजयची शेवटची भेट आणि त्याचे संभाषण पण आठवले. हेही लक्षात आले की आमच्या शेवटच्या भेटीला चार पाच वर्षे उलटून गेली असावीत. आपण व्यस्त असताना काळ कसा भरभर सरकतो याची जाणीव झाली.

माझा होकार ऐकून संजय पुढे म्हणाला, “सर, आपल्यामधील शेवटचे संभाषण तुम्हाला कदाचित आठवत असेल. मला सांगायला आनंद वाटतो की, सध्या साधारण दोनशे पन्नास कर्मचारी असलेल्या एका कारखान्याचा मी मुख्य व्यवस्थापक झालो आहे. पाच वर्षांपूर्वी मी जेव्हा ह्या छोट्या कंपनीत कामावर रुजू झालो, त्या वेळी माझा पगार आणि इतर सुविधा मला आधीच्या कंपनीत मिळणाऱ्या पगार आणि सुविधांपेक्षा काहीशा कमी होत्या. मला त्याचे फारसे वाईट वाटले नाही कारण मला येथे मिळालेल्या कामामुळे, मला इथल्या मुख्य प्रमुखाबरोबर वैयक्तिक काम करण्याची संधी मिळाली होती.”

आता माझे कुतूहल चांगलेच जागृत झाले होते. मी त्याला म्हणालो, “अरे वा फारच छान. अभिनंदन! जरा सांगतोस का की हे उत्तम यश कसे घडवून आणलेस?”

“सर, तुमची शिकवणूक तंतोतंत पाळली एवढेच. तुमचा पाच वर्षापूर्वी दिलेला एक संदेश माझ्या मनात घर करून राहिला आहे. सर्वात प्रथम म्हणजे, ध्येय स्पष्ट पाहिजे. ते तर माझे होतेच. साधारण पाच वर्षात मला मुख्य व्यवस्थापक व्हायचे होते. आणि खात्रीपूर्वक यशासाठी दुर्दम्य इच्छा, योग्य क्षमता व ध्येयासाठी लागणारी पात्रता आवश्यक असते. माझी इच्छा तीव्र होतीच. माझ्या ध्येयासाठी मी अपात्र असण्याचे काहीच कारण नव्हते. राहता राहिली योग्य क्षमता.” थोडा दम घेउन, संजयने विचारले, “ सर तुम्हाला वेळ आहे ना? मला तर तुम्हाला काय सांगू आणि किती सांगू असे झालय.”

मलाही या आदर्श चेल्याला जराही थांबविण्याची इच्छा नव्हती. माझ्या टेबलवरील दुसरा फोन बाजूला काढून ठेवला, संगणक बंद केला आणि म्हणालो, “ संजय, बोल. माझ्याकडे तुझ्यासाठी भरपूर वेळ आहे.”

“सर, प्रथम मी माझ्या क्षमता वाढविण्यावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. माझ्या ध्येयपूर्तीसाठी उत्तम प्रकृतीची साथ आवश्यक असल्याने, मी अत्यंत सातत्याने व्यायाम आणि योगाची साधना सुरु केली. कुठलेही व्यसन जवळ येउन दिले नाही. लोकांसमोर उभे राहून भाषण करण्याची कला शिकण्यासाठी स्वखर्चाने त्याचे खास प्रशिक्षण घेतले. नवीन जॉब करता करता, संध्याकाळच्या वेळात अर्धवेळ बिझिनेस मॅनेजमेंटची पदविका मिळविली. त्यामुळे धंद्यातील इतर प्रक्रिया व अर्थकारणाची माझी समज चांगलीच सुधारली. ह्या शिवाय व्यवस्थापन आणि नेत्याला आवश्यक असणारे मॅनेजमेंट आणि लीडरशिप संदर्भातील गुण, ह्यांचे निरनिराळे पैलूही चांगले समजले. आणि हे सर्व करू शकण्यासाठी, हातात असलेल्या वेळाचे उत्तम नियोजन करण्यासाठी लागणाऱ्या टाईम मॅनेजमेंटच्या वेगवेगळ्या क्लुप्त्या आत्मसात केल्या. आता मला पुरेसा वेळ नाही ही सबब सहसा कधीच द्यावी लागत नाही.”

“सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला लोकांमधील, वैषम्य आणि पाय खेचण्याच्या वृत्तीचे अनुभव पण आले. सहकाऱ्यांकडून बऱ्याच वेळा टोमणे ऐकावे लागले. तुम्ही सांगितलेल्या इतर काही अडचणीही समोर आल्या. पण तुमच्या कडून अशा गोष्टींची आधीच कल्पना मिळाल्यामुळे जराही त्रास वाटला नाही. उद्विग्न तर कधीच झालो नाही.”
थोडा विचार करून संजय पुढे म्हणाला, “या सर्व गोष्टींचा सुयोग्य वापर केल्यामुळे, माझ्या कामाच्या जबाबदारीच्या पलीकडे वेगवेगळी कामे स्वतःहून अंगावार घेऊ शकलो. ह्याचा फायदा असा झाला की मला कंपनीच्या कामाची सर्वांगीण समज आली. ह्या सर्वांचा परिणाम असा झाला की माझ्या टीमची आणि विभागाची कामगिरी सतत उत्तम होऊ लागली आणि याशिवाय मी मिळवलेले ज्ञान खुल्यादिलाने इतरांशी वाटून, कंपनीच्या वाढीत चांगलाच हातभार लावू शकलो.

कंपनी छोटी असल्यामुळे लवकरच माझे काम आणि पुढाकार माझ्या वरिष्ठांच्या लक्षात येऊन त्याबद्दल माझे कौतुकही होऊ लागले. माझा स्वतःचा असा ठाम विश्वास आहे की गाईचे शेपूट असण्यापेक्षा उंदराचे डोके व्हावे. त्यामुळेच की काय, माझ्या वरिष्ठ प्रमुखांची, दुसऱ्या ठिकाणी बदली झाल्यावर, माझी माझ्या कामाच्या जागी मुख्याधिकारी म्हणून आमच्या कारखान्यात नेमणूक करण्यात आली आहे. सर, मी पुन्हा एकदा तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे. सर, तुम्ही जर सवडीनुसार माझ्या कारखान्याला भेट दिलीत तर मला खूप आनंद वाटेल.”

एखाद्या प्रशिक्षकाला यापेक्षा चांगली गुरुदक्षिणा काय पाहिजे? तेव्हापासून मी माझ्या सर्व प्रशिक्षण कार्यक्रमात जेव्हा जेव्हा स्पष्ट ध्येय आणि ध्यास, तसेच त्यावरील अणुकुचीदार लक्ष ह्यांचे महत्त्व पटविण्याचा योग येतो तेंव्हा तेंव्हा वरील अनुभव आठवणीने नमूद करत असतो.

जर लोकांना तुमच्याबद्दल काही समस्या असेल तर, कायम ध्यानात ठेवा,ती त्यांची समस्या आहे. तुमची नाही.

विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.

किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/

Author