मोठया अंडयाची छोटी गोष्ट

एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले.



एका जंगलात एक कोंबडी रहात होती. एका काटेरी कुंपणाजवळ तिने चार अंडी ठेवली. त्यानंतर ती चारापाणी शोधायला जंगलात गेली. थोड्या वेळानंतर ती परत आली. तिला तेथे तिच्या चार अंड्यांशेजारी आणखी एक पाचवे अंडे दिसले. ते अंडे इतर चार अंडयांपेक्षा खूपच मोठे होते. “हे अंडे आपले नाही, मग ते कुणाचे असेल?“ असा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. तिने त्याचा तपास करायचा ठरवले. तिने एका टोपलीत ती सर्व पाच अंडी ठेवली आणि ती टोपली घेऊन जंगलात फिरू लागली. प्रथम तिला एक ससा भेटला. तिने ससोबाला विचारले, “ससोबा, ससोबा, हे अंडे तुझे आहे का?” ससोबा म्हणाला, “नाही गं बाई, हे अंडे माझे कसे असेल? दुसऱ्या कुणाला विचार?” त्यानंतर ती पुढे चालत राहिली. रस्त्यात तिला एक हरीण भेटले. तिने हरिणीला विचारले, “हरिणीताई, हरिणीताई, हे मोठे अंडे तुझे आहे का?” हरिणताई म्हणाली, “नाही गं बाई, हे अंडे माझे कसे असेल? मी कोठे अंडे देते?” ती चालतच राहिली. वाटेत तिला गाय, बकरी, मैना असे अनेक प्राणी-पक्षी भेटले. प्रत्येकाला तिने तोच प्रश्न केला. पण सगळ्यांनीच एकच उत्तर दिले, “ते अंडे आमचे नाही.” कोंबडी बिचारी थकली. झाडाखाली बसली. टोपलीतली अंडी पहात बसली. तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी दबकत दबकत येत असल्याची तिला चाहूल लागली. तो कोल्हा होता. कोल्हा म्हटला म्हणजे लबाडी करणारच, म्हणून तिने टोपली जवळ ओढून घेतली. कोल्हा म्हणाला, “कोंबडीताई, इथे जंगलात काय करते आहेस?” कोंबडी म्हणाली, “अरे बाबा, या टोपलीतली अंडी पाहिलीस का? ही चार छोटी अंडी माझी आहेत; पण हे पाचवे मोठे अंडे कोण ठेवून गेले ते कळतच नाही. मी सगळ्यांना विचारत फिरते आहे की, हे अंडे तुमचे आहे का? कोल्होबा म्हणाला, “बरे झाले, तू भेटलीस. माझे अंडे हरवले होते. हे मोठे अंडे माझ्या कोल्हिणीचेच आहे. मला तू ते परत दे. माझी बायको खुष होईल!”
कोंबडीला आनंद झाला! ज्याचे अंडे त्याला परत देता येत आहे, याने ती
खुष झाली. ती कोल्होबाला म्हणाली, “तुझे तू घेऊन जा.” कोल्हा ते अंडे
उचलायला लागला तेवढ्यात ते अंडेच फुटले, त्यातून एक मोठ्या पक्षाचे पिलू
बाहेर पडले. इतर चार अंडीही पाठोपाठ फुटली. त्यातून कोंबडीची चार पिले
बाहेर पडली. मोठ्या अंड्यातले पक्षाचे पिलू पाहिल्याबरोबर कोंबडीला
कोल्ह्याची लबाडी कळली. तिने ती पिले टोपलीत भरली आणि धावत सुटली.
आपल्या चार पिलांसोबत पाचव्या पिलाचीही आई झाली. तिने ते पिलू
लहानाचे मोठे केले. एक दिवस हे पिलू झाडावर चढले आणि उडून गेले. कोंबडीने आपले कर्तव्य पूर्ण केले होते. पिलू उडून गेले, तरी लबाडाचे भक्ष्य होण्यापेक्षा ते स्वावलंबी होऊन स्वतंत्र झाले, आणि मुक्त संचार करू लागले, याचा तिला आनंदच
झाला होता!

Author