असेच एकदा निलय (माझा एक हुशार तरुण सहकारी) बरोबर गप्पा मारताना कुठल्या गोष्टी आपल्या कह्यात आहेत आणि त्याच्यावर लक्ष कसे केंद्रित करावे हा विषय निघाला. प्रत्यक्ष आयुष्यात काही गोष्टी आपल्या इच्छेप्रमाणे तर काही गोष्टी आपल्या मनाविरुद्ध घडत असतात. ज्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीवरील उपाययोजना आपल्या कह्यात नसते अशावेळी त्यांच्याकडे आपल्याला असहायपणे बघावे लागते. अशीच एक परिस्थिती एका मोठ्या कंपनीत काम करणाऱ्या माझ्या एका मैत्रिणीच्या सामोरी आली होती. मी तिच्या त्यावेळच्या मानसिकतेशी पूर्णपणे सहमत होतो कारण काही वेळा मला स्वतःला अशाच परिस्थितीतून जावे लागले होते. मला खात्री आहे काही वाचकांनासुद्धा केंव्हा ना केंव्हा अशा परिस्थितीला तोंड द्यावे लागले असणार.
तिची गोष्ट अशी –
सोनियाला, (नाव बदलले आहे) जेव्हा तिने त्या कंपनीत ग्राहक सेवा केंद्राची नोकरी पत्करली तेव्हा अशी जराही कल्पना नव्हती की आपल्या कामात, आपल्याच सहकाऱ्यांच्या विरोधाला एव्हढ्या प्रचंड प्रमाणात तोंड द्यावे लागेल. तिला दिलेल्या जबाबदाऱ्या सांभाळतांना अशी परिस्थिती सामोरी येईल असे कुठेही लिहिले नव्हते. तिला चांगले आठवत होते की त्या कामाची जबाबदारी घेण्यापूर्वी तिला असे सांगण्यात आले होते की ग्राहकाभिमुख [customer friendly] असणे हे कंपनीचे एक मुख्य धोरण होते.
ती कंपनीमध्ये नवीन असल्यामुळे तिच्या कामाच्या संबंधित असलेल्या ह्या धोरणाच्या स्पष्टतेवर ती खुश होती. अशा धोरणामुळे कंपनीच्या उत्पादनांच्या गुणवत्तेची प्रतिमा बाजारात खूपच चांगली होती, ह्यात काही आश्चर्य नव्हते. कंपनीची उत्पादने गुणवत्ता आणि विश्वसनीयता ह्यासाठी चांगलीच नावाजलेली होती.
असे असून सुद्धा एका नव्यानेच बाजारात आणलेल्या उत्पादनाबाबत ग्राहकांच्या खूपच तक्रारी येऊ लागल्या होत्या. आणि त्या हळूहळू धोकादायक पातळीवर पोचल्या होत्या. हे नवीन नाविन्यपूर्ण उत्पादन बाजारात प्रथमच आणले गेले होते, आणि त्याची जाहिरातही भरपूर करण्यात आली होती.
ह्या बहुतांश तक्रारी त्या वस्तू [product] मधील एक भाग निकामी होत असल्याने येत होत्या. सुरुवाती सुरुवातीला तिच्या ग्राहक सेवा केंद्रातर्फे [customer service department] ह्या तक्रारी तो भाग बदलून देऊन सांभाळण्यात येत होत्या. तिच्या तांत्रिक ज्ञानाप्रमाणे तिची खात्री झाली होती की डिझाईनमध्ये अशी काही त्रुटी राहिली होती ज्यामुळे त्या भागावर खूपच अंतर्गत ताण पडत असावा, की ज्यामुळे प्रत्यक्ष वापरत असताना तो भाग लवकरच निकामी / खराब होत होता.
कंपनीच्या उत्पादन विभागातील डिझाईन विभागाला सोनियाने ह्या बद्दलची पुरेशी माहिती पाठवली होती. त्याशिवाय तिने त्यांना असेही कळवले होते की तिच्या विभागाला येणाऱ्या तक्रारींचा पूर दिवसेंदिवस सांभाळणे अवघड होत चालले आहे. आश्चर्य म्हणजे डिझाईन विभागाने स्वतःच्या बचावात्मक पवित्र्यामुळे, तिला असे कळवले की तो product त्यांच्याच कंपनीच्या परदेशात उत्पादन होणाऱ्या वस्तूचा [product] संदर्भ घेऊन डिझाईन करण्यात आलेला आहे आणि परदेशात तिथल्या product बद्दल काहीही तक्रारी नाही येत आहेत. शिवाय त्यांच्यामते तो product सर्व गुणवत्ता निकषांना उतरत होता. कदाचित ग्राहकच त्या वस्तूचा वापर नीट करत नसतील.
तिच्याच कंपनीच्या डिझाईन विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणाने सोनियाला चांगलाच धक्का बसला. तसे पाहिले तर एखादे उत्पादन व्यवस्थित वापरूनसुद्धा, नीट काम करत नसेल तर ग्राहकांच्या मते त्या गोष्टीला त्या उत्पादनाचा उत्पादकच पूर्णपणे जबाबदार असतो, मग तो product कुठल्या का कारणाने खराब झाला असेल. पुढची पायरी म्हणून सोनियाने तिच्या जवळील ह्या तक्रारींची माहिती वरिष्ठ व्यवस्थापकांच्या कमिटीपर्यंत पोहोचविली.
त्याचवेळी कंपनीची त्या उत्पादनाची जाहिरात मात्र जोरदारपणे चालू होती. त्याचा परिणाम असा होत होता की विक्री जेव्हढी जास्त होत होती त्या प्रमाणात तक्रारीही वाढत होत्या. या तक्रारी निवारणासाठी लागणारा प्रचंड खर्च कंपनीला सोसावा लागत होता आणि त्यांची बाजारातील प्रतिमा खराब होत होती, ते वेगळेच.
दर महिन्याच्या कार्यकारी मीटिंगमध्ये सुद्धा सोनियाने असा प्रश्न टाकून बघितला की विक्रीपश्चात सेवा अधिकाऱ्याने, तक्रार करणाऱ्या ग्राहकाला अशा तक्रारीबद्दल कसे उत्तर द्यावे. वरिष्ठ अधिकाऱ्याने तिला असे सांगितले की एकतर आत्ता करत आहात तसे ते उत्पादन दुरुस्त करून ग्राहकांना परत द्या किवा एखाद्या ग्राहकाने फारच कटकट केली तर त्याला त्याचे पैसे परत करा. मात्र ह्या उत्तरात कंपनीच्या नाव आणि पत ह्यांच्या नुकसानाबद्दल उल्लेखही नव्हता.
सोनियाने जास्त वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बोलून प्रयत्न करण्याचे ठरविले. त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंग विभागाच्या प्रमुखास भेटण्यासाठी, भेटीची वेळ ठरवून ती आपल्या कारने शहराच्या दुसऱ्या टोकास असलेल्या त्यांच्या मुख्यालयात पोचली. कदाचित बाजारातून येणाऱ्या तक्रारींचा तिच्या सर्विस विभागाने पाठविलेला अहवाल [रिपोर्ट] त्यांच्यापर्यंत पोहोचला नसेल अथवा त्यांनी तो वाचला नसेल असे गृहीत धरून तिने आपल्याबरोबर त्या रिपोर्टची एक प्रत आणली होती. विभाग प्रमुखाने, त्यांच्या अत्यंत महागडया गालिच्या पसरलेल्या कक्षात तिचे अत्यंत आदरपूर्वक स्वागत केले. ती स्थानापन्न झाल्यावर महागडया चहापात्रातून तिला चहाही दिला. तिच्या विभागाच्या रिपोर्टची एक प्रत त्याच्या टेबलावर असलेली पाहून सोनियाला थोडे बरे वाटले. ती चहा घेत असताना त्याने तिला ग्राहकांच्या मागणीचे आणि प्रत्यक्ष विक्रीचे तक्ते दाखवायला सुरुवात केली. ह्या शिवाय त्यांच्या जाहिरातीचा बाजारात होणारा परिणाम ह्याचे रिपोर्ट पण दाखवले. दिवसेंदिवस त्या उत्पादनाच्या वाढत्या विक्रीचे आकडे दाखविताना तर त्याचा चेहरा आनंदाने फुलून गेला होता. थोडक्यात सांगायचे तर तो स्वतःच्या जाहिरात आणि विक्री विभागाच्या कामगिरीवर खूष दिसत होता.
अत्यंत नम्रपणे त्याने तिला चहा संपवायला सांगितला आणि तिच्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्यायला सांगितले की ज्यामुळे तो स्वतः त्याच्या स्वतःच्या विक्री वाढविण्याच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकेल. त्यानंतर त्याने सावकाशपणे तिच्या सर्विस विभागाचा रिपोर्ट टेबलाखालील कचरा कुंडीत टाकून दिला तेव्हा मात्र सोनियाच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही.
स्तंभित होऊन, कसेबसे आपल्या अंतर्गत रागावर नियंत्रण ठेवत, तिने आपले ऑफिस गाठले. क्षणभर मनातल्या मनात तिने आपले राजीनामा पत्र पण तयार केले. असे भ्रमनिरास करणारे क्षण बहुतेक सर्व व्यवस्थापकांना त्यांच्या कारकिर्दीत अनुभवावे लागतात. थोडेसे शांत झाल्यावर ती तिच्या समोर असलेल्या पर्यायांबद्दल विचार करू लागली.
काही काळानंतर नाईलाजाने कंपनीला तो प्रोब्लेम मान्य करून सोडवावा लागला. त्यासाठी भारतीय परिस्थितीशी जुळणारे बदल त्या उत्पादनात घडवून आणावे लागले आणि ह्या सर्व कृतींसाठी कंपनीला बरीच मोठी किंमत मोजावी लागली ते वेगळेच.
बऱ्याच कंपन्यात असेच अनुभव अनेक कर्मचाऱ्यांना येतात की जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वर्तन प्रथमदर्शनी कंपनीच्या मूल्यांशी अथवा धोरणांशी संयुक्तिक नसते. अशा परिस्थितीत कर्मचारी हताश होणे अगदी साहजिक असते कारण योग्य कृती त्यांच्या कह्यात नसते. अशा वेळी त्यांच्यासमोर तीनच पर्याय राहतात हताश होऊन परिस्थिती बघत बसणे, दुसरीकडे काम शोधणे, अथवा थोडा संयम दाखवून आपल्या वैयक्तिक क्षमता वाढवत राहणे की ज्यातून कंपनीमध्ये स्वतःची प्रगती होत राहील. अर्थात एक काळ असा येतो की त्या कर्मचाऱ्याकडे पुरेसे अधिकार येतात की ज्यातून तो त्याला हवे तसे बदल घडवून आणू शकतो. सोनियाच्या लक्षात आले की त्या उत्पादनातील समस्येबद्दल [प्रॉब्लेमबद्दल] तिला कोणीच दोष देत नव्हते. सोनियाने बऱ्याच विचारानंतर तिसरा पर्याय निवडला. रागारागात राजीनामा देऊन काहीच साध्य होत नाही कारण मूळ समस्या [प्रॉब्लेम] तशीच राहाते. नवीन कामावर [जॉब] मध्ये अशीच परिस्थिती अथवा असेच वरिष्ठ असणार नाहीत असं कशावरून?
ह्या निर्णयानंतर तिचा उद्वेग बराच कमी झाला आणि आपले सर्व लक्ष तिने स्वतःचे काम उत्तम करण्यावर आणि वेगवेगळ्या क्षमता सुधारण्यावर केंद्रित केले. लवकरच ती एक उत्तम व्यवस्थापक म्हणून ओळखली जाऊन त्याच कंपनीत स्वतः वरिष्ठ अधिकारी पण झाली. कंपनीच्या मुल्ये आणि धोरणांप्रमाणे ती आता अगदी सहजी निर्णय घेऊ लागली. मुख्य म्हणजे तोवर ती स्वतःच्या विभागापलीकडे जाऊन संपूर्ण कंपनीचा विचार करायलाही शिकली होती. निलयच्या चेहऱ्यावर मला आनंद दिसू लागला आणि लवकरच माझे आभार मानून तो घरी परतला.
दुसऱ्याचे बोलणे लक्षपूर्वकपणे ऐकून घेणे ही व्यवस्थापनातील एक दुर्मिळ कला आहे. परवाच, एक तरुण मुलगा भेटायला आला होता. पदवीधर आहे चांगल्या सुखवस्तू घरातला आहे. पण चेहेऱ्यावर उद्विग्नता स्पष्ट दिसत होती. जरा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मीच विषय काढला.
“सदानंद, काय करतोस सध्या ?”
काही सेकंद शांततेत गेली. कदाचित सांगावे का नाही अशा द्विधा मनस्थितीत असावा. मग म्हणाला, “ साहेब, गेले वर्षभर बेकार आहे. प्रयत्न करतोय पण अजून कुठे यश आले नाही. खर सांगायचे तर पहिले काही महिने जरा मजेत गेले. पण आता वेळ अक्षरशः खायला उठतोय. रिकामे मन म्हणजे राक्षसाचे निवास स्थान याची पूर्ण प्रचीती येत आहे. काहीही काम चालेल पण हा मोकळा वेळ नको आहे. काही वेळा तर हे आयुष्य संपवून टाकावे असे पण विचार येवू लागले आहेत. म्हणूनच आज मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो.”
“मित्रांच्या बरोबर वेळ चांगला जात असेल की.”
“साहेब, त्यांना तरी किती वेळ असणार माझ्यासाठी. संध्याकाळी थोडा वेळ असतो आम्ही एकत्र. खर तर तेवढाच वेळ जरा मजेत जातो. बाबा, आई, ताई सर्वजण आपल्या दिनक्रमात व्यस्त असतात. टीव्ही किती वेळ पाहणार? वर्तमानपत्र किती वेळ वाचणार?”
“काही छंद जोपासले आहेस का?”
“चांगली चित्रे काढतो. पण त्यात सुद्धा फार वेळ मन लागत नाही हल्ली. मनात सतत चलबिचल चालू असते.” मला एक जुनी घटना आठवली. आमच्या कारखान्यात एक अत्यंत आळशी, कामचुकार आणि उर्मट कामगार होता. कामगार संघटनेकडून त्याला मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे त्याला सहजी शिक्षाही करू शकत नव्हतो. तसाही माझा शिक्षा करण्यावर कधीच भर नव्हता. सरळ सांगून सर्व उपाय थकले. मग मी एक प्रयोग करून बघायचे ठरविले. त्याला एक खुर्ची दिली आणि सांगितले दिवसभर तू इथे आरामात बसायचे. वेळेवर चहा, नाश्ता आणि जेवण घ्यायचे. तुझा पगार पण कापणार नाही. मात्र उगीच इकडे तिकडे फिरून इतरांच्या कामात व्यत्यय आणायचा नाही. स्वारी एकदम खूष झाली. ‘कसे नमविले वरिष्ठांना’ असा भाव चेहेऱ्यावर होता. जस जसे दिवस जात होते तस तसा चेहेर्यावरचा भाव बदलू लागला. अखेरीस पूर्णपणे काकुळतीला येउन म्हणाला, “ साहेब, सांगाल ते काम करतो पण हे असे बिनाकामाचे बसणे नको. आक्खा दिवस खायला उठतोय. कुठल्याना कुठल्या कामात व्यग्र असणे हे, माणसासाठी किती महत्वाचे असते हे आता मला उमजले आहे.” मी पण जास्त ताणून न धरता हसत हसत त्याला त्याच्या नेहमीच्या कामावर पाठविले.
“सदानंद, मी तुझ्या मनःस्थितीची कल्पना करू शकतो. नोकरीच्या विश्वात चढाओढ किती वाढली आहे याची तुला आता कल्पना आली असेल. नोकरी देणाऱ्यांच्या अपेक्षा पण खूप वाढल्या आहेत. ज्ञानाबरोबर कौशल्यांचे महत्व वाढत आहे. तू हुशार आहेस. व्यक्तिमत्व पण चांगले आहे. काम हे फक्त पैसे मिळविण्यासाठी नसते तर मन व्यस्त राहण्यासाठी पण असते. इंग्रजीमध्ये एक चांगली म्हण आहे. Empty mind is devil’s paradise. हो, कामात पण मजा असते.
नोकरी शोधताशोधता मोकळ्या वेळात तुझ्याकडे असलेली कौशल्ये वाढवीत रहा आणि सतत नवीन कौशल्य शिकून घे. ज्ञान वाढविण्यासाठी तुझ्या क्षमतांशी संबंधित विषयातील नवीन पुस्तके वाचत रहा. व्यायाम वाढव. काहीही कर पण दिवसभर व्यस्त रहाशील असे बघ. मी खात्रीलायक पणे सांगतो की तुझ्या मनावरचे हे मळभ कमी होईल. आत्मविश्वास वाढेल.”
सदानन्दाच्या सुदैवाने त्याला माझे म्हणणे पटले असावे कारण लवकरच पुढे सगळे चांगलेच झाले.
आपल्या शरीराची लक्षपूर्वक काळजी घ्या कारण जन्मभर तुम्हाला त्याच आणि तेवढ्याच जागेत राहायचे असते.
आठवडाच्या शेवटी, शनिवार व रविवार संपल्यावरचे पुढील पाच दिवस सर्वात कठीण असतात.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/