श्रीमुद्गलपुराण

भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाला समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्री मुदगल पुराण. हा शब्दच किती सुंदर आहे. मुद्गल. मुद म्हणजे आनंद. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आत मध्ये पूर्णपणे भरलेला आनंद ओसंडून वाहतो त्या महान गाणपत्य आचार्यांना श्रीमुद्गल असे म्हणतात.



भगवान गणेशांच्या निर्गुण निराकार स्वरूपाला समजून घेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे श्री मुदगल पुराण. हा शब्दच किती सुंदर आहे. मुद्गल. मुद म्हणजे आनंद. ज्यांच्या प्रत्येक कृतीतून आत मध्ये पूर्णपणे भरलेला आनंद ओसंडून वाहतो त्या महान गाणपत्य आचार्यांना श्रीमुद्गल असे म्हणतात.

महर्षी मुद्गलांनी आत्मविस्मृत झालेल्या प्रजापती दक्षाला केलेला दिव्य उपदेश म्हणजे श्रीमुद्गलपुराण. दक्ष यज्ञाचा विध्वंसानंतर, भगवान शंकरांनी त्याला बोकडाचे मस्तक बसवले. हे प्रतीक व्यवस्थित समजून घ्यायला हवे. बोकडाचे मस्तक म्हणताना त्याचा आवाज आधारभूत आहे.

बोकड सतत मे मे मे मे करतो. संस्कृत भाषेत मे हे अस्मत् सर्वनामाचे चतुर्थी आणि षष्ठी विभक्तीचे एक वचन आहे. चतुर्थी एक वचनाचा अर्थ मला असा होतो तर षष्ठी एक वचनाचा अर्थ माझे असा होतो.

दिवसभर मला, मला, मला आणि माझे, माझे, माझे करणाऱ्या संसारासक्त जीवाचे प्रतीक आहे बोकड. अशा जीवाच्या उन्नतीचा मार्ग आहे श्रीमुद्गलपुराण.

या पुराणाचा आरंभ मोठा मजेदार आहे. महर्षी शौनक प्रश्न विचारतात, हे सूत महर्षी आपण प्रत्येक पुराणात वेगळीच देवता श्रेष्ठ म्हणून सांगता. बाकी सर्व देवता अगदी ईश्वर, महेश्वर देखील वेगवेगळ्या संकटात सापडतात आणि त्या पुराणाच्या प्रधान देवतेला शरण येतात असे आपण सांगितले. मात्र दुसऱ्या पुराणात ती देवता संकटात येते आणि त्या दुसऱ्या पुराणाच्या प्रधान देवतेला शरण जाते असे आपण सांगितले. या सगळ्याने आम्ही संभ्रमित झालो आहोत. यापैकी नेमके श्रेष्ठ कोण? कोणते तरी एक अंतिम तत्त्व सांगा.

या प्रश्नावर महर्षी सूतांनी श्रीमुद्गल पुराण सांगायला आरंभ केला आहे. याचा अर्थ ते स्पष्टपणे सांगत आहेत की एक अंतिम तत्त्व भगवान श्री गणेश आहेत.

श्रीमुद्गलपुराणाच्या वरपांगी वाचनाने देखील आपल्या ज्या पूर्वग्रहांचा पूर्ण विनाश होणार आहेत ते पूर्वग्रह म्हणजे, भगवान श्रीगणेश पार्वतीच्या मळापासून निर्माण झाले. भगवान श्री गणेश शंकर यांचे पुत्र आहेत.शिवगणांचे प्रमुख आहेत. हे शिवपार्वती पुत्रत्व स्वरूप अज्ञान दूर करून त्यांच्या निर्गुण निराकार स्वरूपाचे यथार्थ प्रतिपादन करणे हाच या पुराणाच्या उद्देश आहे.

पुराणांची रचना ही कथात्मक स्वरूपाची असते.मात्र या कथांचे प्रयोजन केवळ कथा सांगणे नसून त्यामागील कथनीय प्रतिपादन करणे हे आहे.

देवी अदिती आणि कश्यप यांच्या घरी झालेला विनायक अवतार, शेषाच्या घरी झालेला शेषात्मज अवतार, भगवान विष्णू च्या घरी झालेला पूर्णानंद अवतार अशा अनेक अवतारांच्या माध्यमातून भगवान गणेश केवळ शिवपार्वती पुत्र नाहीत हे पुराणाने स्पष्ट केले आहे.

भगवान शंकरांच्या घरी झालेले देखील श्री गुणेश, श्री मयुरेश्वर, श्री पुष्टीपती, श्री गजानन, श्री उमांगमलज अशा विविध अवतारांचे वर्णन करून शिवपार्वती यांचे माता पिता स्वरूप केवळ अवतार सापेक्ष आहे हे पुराणाने सहज वर्णिले आहे.
या पुराणाच्या नऊ खंडांपैकी आठ खंडात आठ विनायकांची चरित्रे प्रधान विषय म्हणून वर्णन केली आहेत. अष्टविनायक हा शब्द सर्वप्रथम श्रीमुद्गलपुराणाने योजिलेला आहे.

श्री वक्रतुंड, श्री एकदंत असे हे आठ विनायक आठ असुरांच्या विनाशासाठी प्रगट होतात. या आठ राक्षसांची नुसती नावे जरी वाचली तरी श्रीमुद्गलपुराणाचे अलौकिकत्व सहज लक्षात येऊ शकते. आठ खंडामध्ये अनुक्रमे मत्सरासुर, मदासुर, मोहासुर, लोभासुर, क्रोधासुर, कामासुर,ममासुर आणि अहंकारासुर अशा आठ राक्षसांचे वर्णन आहे.
आपल्याच आत विद्यमान असणाऱ्या विविध विकारांना आपल्यासमोर राक्षस म्हणून वर्णिले आहे. हे विकार रुपी राक्षस आपल्याच आत विद्यमान असल्याने त्यांचे नियंत्रण करणे अत्यंत कठीण आहे. अर्थात आपल्याच आत असणारे हे विकार राक्षस म्हणून वर्णन करण्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट पुराणकार सुचवतात ती म्हणजे जर राक्षस आत असेल तर त्याचे नियंत्रण बाहेरून शक्य नाही. त्या विकारांचा नियंत्रक आपल्याच आत मध्ये असायला हवा. या स्वरूपात आपल्याच आत विद्यमान असणाऱ्या आठ असुरांवर अष्टविनायकांनी मिळवणाऱ्या विजया ची गाथा आहे श्रीमुद्गलपुराण.

महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण पुराणात त्यापैकी एकाही राक्षसाचा वध वर्णिलेला नाही. कारण यापैकी कोणताही विकार नष्ट होतच नसतो ही श्रीमुद्गलपुराणाची स्पष्ट धारणा आहे. या कामक्रोधादिक विकारामुळेच ही जीव दशा, हे जीवन प्राप्त झाले आहे. त्यामुळे जोपर्यंत हे जीवन किंवा पुढे जाऊन ही जीवदशा आहे तोपर्यंत विकार राहणारच आहेत. मग या विकारांचे नेमके करायचे काय? या मूलभूत प्रश्नाचे चिंतन आहे श्रीमुद्गलपुराण. श्रीमुद्गलपुराणामध्ये प्रत्येक कथेच्या शेवटी त्या राक्षसाला भगवान गणेशांच्या परब्रह्म परमात्म स्वरूपाचे ज्ञान होते आणि तो राक्षस शरण येतो असे समान वर्णन आहे.

नेमकी हीच गोष्ट या पुराणाला आपल्या समोर ठेवायची आहे. या सर्व विकारांचे नियंत्रण करून त्यांना श्री गणेश उपासनेसाठी उपयोगात आणावे हाच पुराणाचा उपदेश आहे. यासाठी भगवान गणेशांनाच शरण का जायचे ? या प्रश्नाचे उत्तर म्हणून या आठ विनायकांचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.

पहिला असुर आहे मत्सरासुर. कोणाच्याही बद्दल मनात असूया निर्माण होणे यापेक्षा अधिक निम्न अवस्था नाही. मत्सराचे हे स्वरूपच व्यवस्थित समजून घ्यायला हवे. मत्सर नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्तीचा होत असतो.मत्सर हा व्यवहारातील साधनसामुग्रीचा किंवा देहाच्या सौंदर्याचा होत असतो. या सगळ्या मायिक गोष्टींमध्ये वाटणारी आसक्ती आणि त्याचे वाटणारे सत्यस्वरूप हाच मत्सराचा आधार असतो.

अशा मत्सराच्या विनाशासाठी भगवान श्री वक्रतुंड स्वरूपात प्रगट होतात. श्री वक्रतुंड या शब्दाचा अर्थ सामान्य मराठी द्वारे समजू शकणार नाही. त्याचा नेमका अर्थ आपल्याला मुद्गल पुराण सांगते. वक्रा हे मायेचे स्वरूप आहे. माया वेडीवाकडी काम करते. त्या मायेला जो आपल्या तोंडाने म्हणजे अक्षरशः फुंकरीने उडवून लावतो त्याला श्री वक्रतुंड असे म्हणतात.

अशा स्वरूपात मोरयाच्या प्रत्येक गोष्टीचा एक वेगळाच लोकविलक्षण अर्थ श्रीमुद्गलपुराण आपल्यासमोर ठेवते. ज्याद्वारे प्रत्येक जागी थक्क होण्याची आपली अवस्था निर्माण होते.

आठव्या खंडातील अहंकारा पासून माणसाच्या अध:पतनाला, दुःखाला आरंभ होतो. शेवटच्या मत्सर दशेची दुःखमय अवस्था सगळ्यात निम्न पातळी वर येते. स्वाभाविक तेथे आता सांगितल्याप्रमाणे भगवान श्री वक्रतुंडांची उपासना करायची असते.

त्या पुढे एकदंत, महोदर, गजानन उपासना व्यक्तिगत पातळीवरची आत्मविकास यात्रा आहे. तर लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण ही समष्टी पातळीवरील विकासयात्रा आहे.

या प्रत्येक पातळीवर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशा असंख्य पैलूंचे निरूपण करीत शेवटी तत्त्वज्ञानाचा महानतम सिद्धांत असणाऱ्या स्वानंद योगाची प्राप्ती हे मुद्गल पुराणात चे अंतिम उद्दिष्ट आहे.

पुराणांची कथात्मकता स्वीकारून उपनिषदांचे तत्त्वज्ञान साध्या सोप्या शब्दात वाचकांच्या हृदयात स्थिर करण्याची अद्वितीय पद्धती आहे मुद्गलपुराण.

या पुराण कथां कडे केवळ कथा म्हणून न पाहता धर्मशास्त्रीय, अध्यात्मशास्त्रीय सोबतच समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, नीतिशास्त्रीय आणि अगदी वैज्ञानिक रहस्यांचा उलगडा करणारे हे पुराण खरोखरच आपल्या सर्वांगीण विकासाचा एक सुंदर आराखडा आहे.

मोरेश्वर गजानन पुंडशास्त्री
आचार्य पदवी संशोधन केंद्र
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
संस्कृत विभाग.
दि. ०१. १२. २०२२

Author