अनुभूतीशिवाय संबोध स्पष्टता नाही. संबोध स्पष्ट नसले की बोध होत नाही. अर्थ माहीत नसताना बऱ्याचशा वेळेला अनेक विद्यार्थी पाठांतर करतात. पाठांतर जर समजून केलं तर संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. अनेक वेळा पाठांतर करून गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जातो, विद्यार्थ्यांना अर्थ विचारला असता ते निरुत्तर होतात.
जीवनाचा संबोध स्पष्ट नसला की जीवन आत्महत्या जवळ करतं. जीवन जगायला जीवन समजलं पाहिजे. माणसांचेही संबोध काही वेळा कळत नाहीत, ते समजून घ्यायला हवेत, यांच्याशी संवाद साधायला हवा. अनेक माणसे अशी का वागतात हे आपल्याला कळत नाही. कारण आपण त्यांना समजून घेतलेलं नसतं. आपण जेव्हा म्हणतो, ‘तू मला समजूनच घेतलं नाही. तुला मी कळालोच नाही.’ बऱ्याच वेळेला माणसांचे मन कळत नाही. माणसांच्या मनाचा तळ गाठायला सहवास हवा, संवाद हवा.
एखादी गोष्ट आपल्याला समजतच नाही; पण जर ती कुणी चांगली समजावून दिली तर आपल्याला ती कळते. केवळ पुस्तकं वाचून काही संबोध स्पष्ट होत नाहीत, जीवन जगताना त्याची उकल होत जाते. एखादी कविता नाही कळली की ती दुर्बोध वाटायला लागते, काही गोष्टींचे संदर्भ कळाले की तिची उकल होत जाते. संदर्भ बदलले की, अर्थ बदलतो म्हणून बदलते संदर्भ लक्षात घेणेसुद्धा आवश्यक असते. जीवनाचे संदर्भही सतत बदलत असतात, त्या परिस्थितीत आपण स्वतःला बदलायचे असते. बदलत्या संदर्भात जीवनाचे अर्थ शोधायचे असतात. विज्ञानातील अनेक संशोधनानी संकल्पना बदलण्यात मदत झालेली आहे. संबोध स्पष्ट झाल्यावर अनेक संभ्रम दूर होतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते का सूर्य पृथ्वीभोवती फिरतो, हा संभ्रम विज्ञानाच्या संशोधनाने आज दूर झाला आहे.
आज परीक्षा ‘घोका, ओका’, ‘पाहा, लिहा’ या पद्धतीने काही ठिकाणी चालल्यामुळे, मुलांचे संबोध स्पष्ट नाहीत.
पाठांतराने पोपट तयार होतात, पोपटपंचीने प्रश्नांची उकल होत नाही किंवा करता येत नाही. विचार करण्याची क्षमता जर विद्यार्थ्यांमध्ये रुजली तर अनेक प्रश्नांची उकल होऊन संबोध स्पष्ट व्हायला मदतच मिळेल.
आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांच्या विचारशक्तीला चालना मिळेल, अशा प्रकारचे गृहपाठ,अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेत यायला हवेत. शिक्षणाने परीक्षेतील प्रश्न नव्हे, तर जीवनातील प्रश्न सोडवणे सुकर व्हायला हवं. विद्यार्थी जर तयार प्रकल्प दुकानातून खरेदी करून शाळेमध्ये जमा करत असतील तर त्यांचे संबोध कसे स्पष्ट होणार? विद्यार्थी कॉपी करून पास होत असेल तर संबोध न स्पष्ट होता तो वरच्या वर्गात जातो. मिळालेल्या शिक्षणाचा उपयोग जीवन जगण्यासाठी व्हायला हवा. शिक्षण व शिक्षणातली स्पर्धा जर आत्महत्या करण्यापर्यंत नैराश्य आणत असेल तर शिक्षण कशासाठी व का घ्यायचं हाच संबोध स्पष्ट नसतो.
सुख म्हणजे नक्की काय असतं याचे संबोध अनेकांचे स्पष्ट नाहीत. एका विषाणूने आरोग्यासंबंधी अनेक संबोध स्पष्ट केले. अनेक संबोध वाचून कळत नाही, तर जगून कळतात. प्रवासवर्णन वाचून संबोध स्पष्ट होत नाहीत, तर प्रवास करून, स्थळांना भेट देऊन अधिक चांगल्या प्रकारे स्पष्ट होतात. विद्यार्थ्यांना निसर्गकविता निसर्गाच्या सान्निध्यात जास्त समजेल, हिरवे हिरवे गार गालिचे पाठ करून कळत नाहीत, तर हिरव्या गार गालिच्यावर चालल्यानंतर कळतात.
अनुभूतीशिवाय संबोध स्पष्ट होत नाहीत. आजच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुभूतीच मिळत नाही. अनेक कर्वीनी चंद्राच्या सौंदर्यासंदर्भात अनेक संबोधांना जन्म दिला, संशोधनाने अनेक संबोधांना धक्का बसला व चंद्राचे वास्तवस्वरूप आपल्या लक्षात आले.
एखाद्या घटनेला आपण जेव्हा चमत्कार म्हणतो, तेव्हा खरं तर त्या मागील कार्यकारणभाव समजून घ्यायला पाहिजे म्हणजे संबोध स्पष्ट व्हायला मदत होते. मुलांना अनेक प्रश्न पडले पाहिजेत, अनेक कल्पना करता यायला हव्यात. निरीक्षण करता यायला हवं.
आपलेही अनेक संबोध स्पष्ट नसतात. जीवनाचा संबोध तरी आपला कुठला स्पष्ट असतो, तरीही आपण जगत राहातो अर्थहीन. काही ठरवून आयुष्य जगतात, काहींचं आयुष्य भरकटत राहातं.
संगीताचं विशेष करून शास्त्रीय संगीतातल्या जागा जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत त्या आकलनाच्या पलीकडे असतात. संगीताचे संबोध स्पष्ट झाल्यावर त्यात आपण तल्लीन होऊन जातो. आयुष्याचंही असंच आहे. शब्दातच अडकलो की संबोध स्पष्ट होत नाहीत, त्यासाठी शब्दांच्यापलीकडे जायला हवं.
