पडद्यामागील अनेकांच्या कष्टामुळे व्यक्तिमत्व आकाराला येतं. बी सुप्त अवस्थेत असतं, पण त्याला योग्य ते पोषक वातावरण मिळालं तर ते अंकुरतं व त्यातून सृजन घडतं. आई वडील आपल्या पाल्यांच्या शारीरिक व मानसिक विकासासाठी अनेक त्रास सहन करत व कष्ट करत आपल्या पाल्यांना वाढवतात. प्रेरणादायी व्यक्तिमत्व निर्माण होण्यामागे अनुवंशिकता तसेच अनेकांचे प्रयत्न कष्ट व त्याग असतात. पालकांनी आपल्या मुलांचे छंद व आवडी लक्षात घेऊन, चाकोरी बाहेर जाऊन त्यांना हव्या त्या क्षेत्रात प्रगती करू दिली तर काय होतं याचे उत्तम उदाहरण अनेकांसाठी प्रेरणादायी असतं.
बुद्धिबळ हा अस्सल भारतीय खेळ यामध्ये चेन्नईच्या केवळ १६ वर्षीय बुद्धिबळपटूने तब्बल ५ वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या मॅग्नस कार्लसनचा ‘ऑनलाइन एअरथिंग मास्टर्स’ स्पर्धेत काळ्या प्याद्यांसह खेळून पराभव करण्याचा चमत्कार केला आणि अवघ्या बुद्धिबळ क्षेत्राचे डोळे विस्फारले. आता सध्या प्रज्ञानंदची बहीण व भारताची आर वैशाली हिने FIDE ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेच्या नवव्या फेरीत माजी विश्वविजेत्या बल्गेरियाच्या अँटोनेटा स्टेपनोव्हा हिचा पराभव करण्यात यश मिळविले. कारकिर्दीतील सर्वात मोठी स्पर्धा खेळणाऱ्या वैशालीने या प्रक्रियेत तिची चौथी ‘ग्रँडमास्टर नॉर्म’ही पूर्ण केली.मुलांनी शांत बसावे म्हणून पालक मुलांना टी.व्ही बघायला सांगतात किंवा त्यांच्या हातात मोबाईल देतात. या दोन्ही सवयींपासून दूर राहावे म्हणून बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात या दोन्ही मुलांचे आईवडिलांनी नाव नोंदविले. त्यामुळेच भारताला आर प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली यांसारखे बुद्धिबळातील दोन अव्वल हिरे लाभले आहेत.
प्रज्ञानंदाने त्याच्या न कळत्या वयापासूनच बुद्धिबळाची कास धरली. त्याची बहीण वैशाली हिच्याकडून त्याला बुद्धिबळाचे प्राथमिक धडे मिळाले. वैशाली बुद्धिबळाकडे कशी वळाली याचा किस्साही रंजक आणि सुजाण पालकांसाठी उद्बोधकही आहे. वैशालीला लहानपणी टिव्हीवर कार्टून फिल्म्स बघत बसण्याची आवड होती. ती तासंतास टिव्हीसमोरच बसून असायची. त्यामुळे तिचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तिची आई आणि वडलांनी तिला बुद्धिबळाच्या प्रशिक्षण वर्गात पाठवले. तिला हा खेळ भावला आणि ही आवड तिच्यामुळे तिच्या भावातही रुजली. त्यांच्या आई-बाबांचा हा निर्णय अत्यंत अचूक ठरला. वैशालीही आज ग्रँड मास्टर आहे आणि प्रज्ञानंदाचा पराक्रम तर आपल्या नजरेसमोरच आहे.बुद्धिबळात तरबेज असलेल्या तामिळनाडू मधील प्रज्ञानंद व वैशाली या दोन्ही भावंडांना सतत टी.व्ही, मोबाईल बघत बसणे यांसारख्या वाईट सवय लागू नयेत म्हणून त्यांच्या पालकांनी त्यांना बुद्धिबळ शिकवण्याचा निर्णय घेतला. आई – वडिलांनी या दोन्ही भावंडांना बी . रमेश यांसारख्या अनुभवी बुद्धिबळ प्रशिक्षकाकडे शिकण्यास पाठवले. त्यामुळे या भावंडांमध्ये बुद्धिबळाची आवड निर्माण झाली नसती तर ते मोठे नवलच होते. अर्थात त्यांच्या आईवडिलांना याचे श्रेय द्यावे लागेल. लहान मुलांमधील प्रावीण्य ओळखण्याची आणि त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत रमेश यांच्यासारखा दुसरा प्रशिक्षक मिळणार नाही हे ओळखून प्रशिक्षण दिले.सुरुवातीच्या काळात वैशालीचा धाकटा भाऊ म्हणूनच प्रज्ञानंदची ओळख होती. मात्र आता या दोन्ही भावंडांनी केवळ भारतातच नव्हे तर जागतिक स्तरावर आपला स्वतंत्र्य ठसा उमटविला आहे. प्रज्ञानंदची बहीण वैशाली हिने सुरुवातीपासूनच आपल्या बुद्धिबळाच्या करिअरमध्ये आश्चर्यकारक विजय मिळवले आहेत. आपल्या दोन्ही मुलांनी बुद्धिबळाच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याचा आनंद तर निश्चितपणे आहेच. मात्र, ते खेळाचा मनसोक्त आनंद घेत आहेत याचा आम्हाला अधिक आनंद आहे, असे ते नमूद करतात. त्यांची आई नागलक्ष्मी या दोघांसोबत विविध ठिकाणच्या स्पर्धांसाठी त्यांच्याबरोबर जातात. वडील रमेश बाबू एका सहकारी बँकेत नोकरी करतात, त्यामुळे घरची सगळी जबाबदारी तसेच या दोन्ही भावंडांच्या करिअरची जबाबदारी देखील त्याची आई नागलक्ष्मी या समर्थपणे सांभाळतात. परदेशातील खाद्यपदार्थांचा आपल्या मुलांना विशेष त्रास होऊ नये म्हणून त्या सतत काळजी घेत असतात. विश्वचषक स्पर्धेतही प्रज्ञानंदला कसलाही त्रास होऊ नये म्हणून त्या स्वतः इंडक्शन स्टोव्ह आणि २ ते ३ भांडी घेऊन गेल्या होत्या. प्रज्ञानंदाने बुद्धिबळाच्या क्षेत्रात स्वतःच स्वतःचा मार्ग तयार केला आणि सन २०१८ मध्ये त्याने वयाच्या केवळ १० व्या वर्षी प्रतिष्ठित ग्रँडमास्टर पदवी मिळवली. तो देशातील सर्वात लहान वयातला आणि जगातील आतापर्यंतचा दुसरा सर्वात तरुण ग्रॅंड मास्टर ठरला.प्रत्येक यशा मागे एक पायवाट असते हेच खरं.
