प्रिय पालक
आम्हा सर्व विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हा सर्व पालकांना हे पत्र लिहिण्याची गरज भासली,म्हणून हा पत्रप्रपंच.
आम्हाला घडवायचं सोडून तुम्ही आम्हाला बिघडवायला निघाला आहात की काय अशी शंका येते. आमचे लाड करू नका असे म्हणण्याची पाळी आता आमच्यावर आणू नका.
अब्राहम लिंकन सांगून थकले की माझ्या मुलाला हे शिकवा माझ्या मुलाला ते शिकवा, त्यांनी मुख्याध्यापकांना लिहिलेलं पत्र मुख्याध्यापकांच्या खोलीत फोटो फ्रेम मध्ये बंदिस्त झालं आहे. फ्रेम मध्ये बंदिस्त केले की विचार ही बंदिस्त होतात कां?प्रेरणेच्या पायवाटा या धूळ खाण्यासाठी नसून त्याच्यावरून मार्गक्रमण करण्यासाठी असतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवतात. संस्कार करणं शाळेची जबाबदारी आहे असं परिपत्रक तरी अजून निघालेले नाही कारण परिपत्रकाच्याच मार्गाने काही शाळा मार्गक्रमण करतात.
पूर्वी शाळा शिस्त आणि संस्कारामुळे ओळखल्या जायच्या त्यामुळे विद्यार्थी तेथून निघणारा विशिष्ट ध्येयाने प्रेरित होता.
अनेक पालकांनी आपला तोटा भरून निघावा म्हणून कोटा ला आमच्यापैकी अनेकांना पाठवलं. पप्पा मला हे होणार नाही, मी तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही म्हणून कित्येक विद्यार्थ्यांनी गळफास लावून घेतला. अनेक आजोबा आता कोटा येथे राहत आहेत कारण मुलांना भावनिक पोषण मिळणं फार आवश्यक आहे, मुले एकलकोंडी होत आहेत. मैं हूं ना म्हणणारे घरातलें कुणी नाही म्हणून तेथील जिल्हाधिकारी यांना म्हणावं लागलं मैं हूं ना.मुलांचे सामाजीकरण पूर्ण आवश्यक आहे त्यांनी एकमेकात मिसळून राहणं आवश्यक ठरणार आहे. संवादाच्या जागा वाढल्या तर अनेक प्रश्न सुटणार आहेत.अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना केवळ स्वातंत्र्य नाही दिलं तर स्वैराचार ही दिला. स्वातंत्र्य आणि स्वैराचार मधील फरक आम्हाला
कळू दिला नाही. अनेक काही घरात भ्रष्टाचाराने भौतिक वस्तूंची भरभराट होते, नको त्या गोष्टी आणल्या जातात हे मुले पाहतात.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आपल्या मुलांना मोफत शिक्षण मिळावे म्हणून अनेक पालक खोट्या कागदपत्रांची पूर्तता करतात हे ही मुले पाहतात. यामध्ये काही पालकांना अटक झालेली आहे. आता यापुढे प्रत्येक गोष्टीसाठी पालकांना अटक केली तरच समाज सुधारेल. मुलाला दोन कोटींची कार घेऊन देणारे पालक आहेत गाडीची नोंदणी न करता, फक्त 1700 रुपये लागतात तरीही त्याची पूर्तता न करता त्याला गाडी चालवायला देतात, हॉटेलमध्ये तो दारू पितो त्याचं बिल 48 हजार तो देऊ शकतो एवढा बॅलन्स त्याच्या खात्यावर असतो, हॉटेलवाले सुद्धा मुलांना दारू देतात. यात जोपर्यंत पालक मुलांचा वेगळा विचार करणार नाही तोपर्यंत हे सर्व रसातळालाच जाणार.
पालकांनो आपल्या पाल्यांचा गृहपाठ करू नका तो त्यांनाच करू द्या किंवा त्याबद्दल त्यांना शिक्षा मिळू द्या तरच ते सुधारतील. आमच्यासाठी इतके हळवे होऊ नका.
आम्हाला संघर्ष न करू देण्यात अनेक पालकांची भूमिका आहे, अनेक जण म्हणतात तुला जमणार नाही तू करू नको.
गाडी देणाऱ्या पालकाला अटक, दारू देणाऱ्या बार मालकाला अटक हे असंच झालं तरच पालक सुधारतील व पालक सुधारले तर मुले सुधारतील. या व्यवस्थेतील पालकांनी सुद्धा विचार करायला हवा. निबंध लिहणें ही शिक्षा असू शकते का ?
आपल्या मुलांना आपण ही अशी शिक्षा दिली असती का? निबंध लिहिण्यावरून आज समाजामध्ये एक चेष्टेचा विषय झाला आहे. पालकांनो केवळ आपल्या मुलांच्या विचार करू नका.
गरिबीतील, दुःखातील ,दारिद्र्यातील पालकांनी आपल्या पोटाला चिमटा काढून आपल्या मुलांना वाढविले शिकविले, चांगले संस्कार केले. श्रावण बाळ सारखी मुलें उपजली.
पूर्वी शिक्षेमुळे न्यायाधीश ओळखले जायचे. आता निबंध प्रेमी न्यायाधीश आहेत. ज्यांनी सत्याला चिरडलं ते शब्दांचा कल्पनाविस्तार काय करणार? पोलिसांनी, न्यायाधीशांनी बारमालकांनी समोरचं मुल आपलं आहे असं ओळखून वागायला हवं.
मुलांना पौष्टिक आहार न देण्यात,श्रमप्रतिष्ठा मूल्य न रूजवण्यात, वैज्ञानिक दृष्टिकोन न रूजवण्यात काही पालक कुठेतरी कमी पडले.
मुलं वागण्यात चुका करतात तेव्हा त्यांना त्यापासून परावृत्त करणं पालक म्हणून जबाबदारी पार पाडायलाच हवी. अन्यथा आता प्रत्येक मुलांच्या चुकीसाठी पालकांना शिक्षा
परवडणारी नाही. मुलांच्या कृत्यासाठीची शिक्षा आता केवळ वडिलांना नाही तर आजोबांनाही मिळत आहे. अनुवंशिकतेने चांगले तसेच वाईट गुणही मुलांमध्ये येतात.
मला आमच्या मर्जीने व आवडीने काय करायचे ते ठरवू द्या तुमच्या इच्छा आमच्यावर लादू नका. घरातला सचिन तेंडुलकर ओळखा. तुमच्या घरात लेखक, संगीतकार, गायक, दिग्दर्शक ,सैनिक, नेता,नट आहे त्यांना वेळीच ओळखा, सरसकट सगळ्यांना एकाच चरकात उसाप्रमाणे घालू नका. मी डॉक्टर झालो नाही म्हणून माझ्या मुलांना डॉक्टर करेल हे मुलांना विचारून ठरवा. मुलांमधील सुप्त गुणांना पूर्ण ओळखा वं त्याला वाव द्या. मुलांच्या प्रत्येक आवास्तव इच्छा पूर्ण करू नका, मुलांना नाही म्हणायला शिकवा. असे म्हणायची वेळ आता आली आहे. लाड करा पण बंधने ही घाला.
तुम्ही आम्हाला अनेक सुट्टीतील शिबिरासाठी पाठवता पण तेथे फक्त वरवरची माहिती आम्हाला मिळते तेवढ्यावरून आमच्यात कसा बदल होईल. कारण शिक्षण आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. उद्या शिबिरांची जाहिरात अशीही होईल आमच्या इथे पोर्षे कार चालवणें व निबंध लिहायला शिकवले जाईल.
तेव्हा पालकांनो तुम्ही सुधारा, तरच आम्ही तुमचं नाव घेण्यासारखं काहीतरी करून दाखवूं. तुमचे असंख्य विद्यार्थी.