“आपले दुबईला जाणारे विमान निघण्यासाठी तयार आहे. कृपया, दुबईला जाणाऱ्या प्रवाशांनी द्वार क्रमांक ४ मधून विमानाकडे प्रस्थान करावे.” हरविलेल्या मनःस्थितीत चिरायूने आपली बॅग उचलली, तिकीट हातात घेतले आणि रांगेत सामील झाला. विमानतळाच्या उबदार वातावरणातून बाहेर पडल्यावर तेथील थंड हवेने त्याला पुन्हा एकदा तो अनुभवत असलेल्या सत्याची आठवण करून दिली. विमानाजवळ आल्यावर त्याने स्वतःला पटविले की ‘हेच तर मला पाहिजे होते. इथल्या सर्व समस्यांपासून, निराशेपासून दूर कुठेतरी. स्वच्छ हवा आणि निळे आकाश असलेल्या ठिकाणी. मनातील सर्व दुःख आणि हताशपणा, सर्व आठवणी विसरून जाण्यासाठी.’
जागेवर बसल्यावर एक कुशंका आली. विमान उडालेच नाही तर? त्यापेक्षा जास्त बरे होईल ते उडता उडता पडले तर. सर्व समस्या एकदम संपतील. अचानक खालच्या इमारती छोट्या खेळण्यासारख्या आणि रस्ते बारीक दोऱ्यासारखे दिसायला लागले आणि एक सुस्कारा सोडून त्याने डोळे मिटून घेतले.
चिरायू भारत सोडून, सर्व वाईट आठवणींपासून खूप दूर चालला होता. जिच्यावर प्राणांहून जास्त प्रेम केले आणि विश्वास ठेवला ती आरती अचानक कुणा नवीन मित्रासोबत त्याला सोडून गेली होती. तो धक्का कमी होता म्हणूनच की काय काही दिवसांनंतर त्याच्या हृदयाचा तुकडा असलेली त्याची लहानगी मुन्नी कर्करोगाने हिरावून नेली. सारे जीवन उध्वस्त होवून जगण्याची इच्छाच मेली. दोन महीने उलटले तरी कशातही लक्ष लागत नव्हते. भूक आणि झोप या कोठेतरी पळून गेल्या होत्या. दारू पण कुचकामी ठरली. त्याची एक विचित्र समजूत झाली की या वातावरणातून, लोकांपासून कुठेतरी अगदी दूर गेल्यास, सर्व दुःख, क्लेश विसरले जातील. दुबईत उतरल्यावर त्याला वाटले की चला आता तरी मनाची नाळ सत्त्यापासून तुटली. थोडे बरे वाटतच, तो हॉटेलच्या खोलीत पोहोचला.
खिडकीतून बाहेरचे भव्य दिव्य विश्व बघून थोड्या वेळाने पलंगावर बसल्या बसल्या त्याला अचानक जाणवले की त्या चारही भिंती त्याला हसत आहेत आणि तो सुटकेचा भुंगा अजून मनाला तसाच पोखरत आहे. कसली सुटका आणि काय? लक्षात आले की कुठेका असेना, मी तर तोच आहे. मन तेच, आत्मा तोच आणि जे घडले ते सत्यही तेच. तो भारतातील चिरायू आणि दुबईतील चिरायू एकच आहेत. स्वतःशी पुटपुटला की काय मूर्ख आहे मी. दुसरीकडे पळून गेल्यावर मला वेगळे वाटेल असे वाटलेच कसे? जिवाची घालमेल जराही कमी झालेली नाही. आरती सोडून गेल्याची सल आणि मुन्नीच्या निधनाचे दुख्ख इथे वेगळे कसे असेल.
पण हे समजण्यासाठी त्याला इथे दुबईला यावे लागले!
असे आढळते की, एखादी गोष्ट मनापासून करायची असल्यास तुमच्याकडे त्यासाठी नक्कीच वेळ असतो. बाकी सगळ्या सबबी असतात.
विश्वास दात्ये यांच्या ऐकलंत का ! या इ-पुस्तकातील लेख.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.१००/-
सवलत किंमत : रु.८०/-
https://marathibooks.com/books/aiklat-ka-by-vishwas-datye/