निरंजन – भाग ५८ – अवतरले रुप दिगंबर…!

झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर। मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥



वेदवेदांचे ज्ञान घेऊन। ज्यांनी यज्ञ केले प्रसन्न।
ऋषिअत्रींना पतिरुपात पाहुन। अनुसुयामाता धन्य॥

त्यांच्या पतिव्रतेचा गंध। चौफेर असा दरवळला।
की कौतुकांचा ध्वनी। त्रिदेवांच्या सौं. ना कळला॥

आमच्यासारखे गुणी। भुवरी अवतरले तरि कुणी।
यावे त्यांस भेटुनी। लागला एकच ध्यास मनी॥

त्रिमातेंच्या आधी। अवतरली त्रिदेवांची वारी।
उभे राहिले येऊन| माता अनुसुयेच्या दारी॥

केला ऋषिमुनींचा वेश| मुक्त वासुकी आणि शेष|
केले मानव रुप धारण| सोडला देवांचा गणवेश॥

चहुदिशेला सुंदर। मन मोहुन घेई परिमल।
कुटिभोवती वलये। फिरती महाध्यानाची मंगल ॥

वाणीमधला लयकार। गातो लखअलख निरंजन॥
धाऊन आली माता। ऐकुन त्रिध्यानाचे गुंजन॥

ही पवित्रतेची साक्ष। कि पातिव्रत्याची शिक्षा॥
साक्षात त्रिदेवांकडुन होईल। आज देवाईची परीक्षा॥

आगळी वेगळी इच्छा ही। प्रश्न पडला इच्छेवरी।
म्हणे निर्वस्त्र होऊनी वाढावे। आम्हा अन्न पानावरी॥

केले डोळे गच्च बंद। पाहिले पतीत परमेश्वर।
संकेत मिळाला मनी। तुझ्या समोर बसलेत त्रिश्वर॥

मी करेन इच्छा पूर्ण। तुम्ही व्हावी लहान बाळ ।
साक्षात त्रिमूर्तीने जाणले। स्त्रीच्या पतिव्रतेचे बळ ॥

केवळ शब्द मुखातूनी येता। रुप बाळांचे घडविलेl
आपल्या ध्यानाने मातेने। त्रि-देवांना अडविले॥

झाले प्रसन्न मातेवरी। ब्रह्मा विष्णु आणि महेश्वर।
मार्ग भक्तीचा देण्याकरिता। अवतरले रुप दिगंबर॥

अवतरले रुप दिगंबर l अवतरले रुप दिगंबर ll

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →