अनुदिन प्रकाशन परभणी तर्फे नुकताच प्रसिद्ध झालेला ‘फुलपाखरू’ हा मुलांसाठी लिहिलेला व मोठ्यांना अंतर्मुख करायला लावणारा बालकाव्य संग्रह आहे. कवितेच्या वेडातून अरुण प्रातिनिधीक कविता संग्रह संपादित व प्रकाशित केला. मुका फकीर, निळ्या हिरव्या तळ्यात, पोळा, अशी जिंदगानी हे कविता संग्रह ‘असे माझे हायकू संग्रह’ प्रसिद्ध आहेत. भगवान बुद्धांच्या शिकवणीवर आधारित धम्मपदांचा ओवीरूप धम्मपद या नावाने कविता संग्रह तर ‘फुलांच्या बागेत’ बालकविता संग्रह प्रकाशित आहे. ‘निसर्गसृष्टी’ तसेच ‘हायकू भिमाचे’ दोन हायकू संग्रह संपादित व प्रकाशित आहेत. हिंदी हायकूच्या अनुवादाची दोन पुस्तके ‘सूर्यनारायण गुप्त यांचे निवडक हायकू’आणि ‘हायकू आकाश के छोटे छोटे चांद’ प्रकाशित आहे. तांका प्रकार रूढ करण्यासाठी म्हणून लिहलेला सांज फुले १०११ तांका असलेला मराठीतील पहिला तालुका तांका संग्रह प्रसिद्ध आहे. तांका आणि गझल या काव्य प्रकारासाठी अनुदिन त्रैमासिक संपादित आणि प्रकाशित करतात.त्यांचे हिंदी हायकू लेखन अनेक हिंदी प्रातिनिधीक संग्रहातून प्रसिद्ध आहे.
मोबाईलच्या आहारी गेलेल्या आजच्या मुलांना काहीतरी सकस मनोरंजनात्मक वाचायला, म्हणायला, बडबड करण्यासाठी काही छान छान गाणी कविता आवश्यक आहेत त्याची पूर्तता हा काव्यसंग्रह करतो. मुलांच्या बडबड गीतांनीच मुलें घडतात आणि आनंदाने बागडतात.
चांदोबा चांदोबा लपलास कां, नाच रे मोरा, सांग सांग भोलानाथ,ही गीतं सर्वांच्या ओठावर आहेत. एखादं गाणं व त्याला सुंदर चाल असेल तर पिढ्या न पिढ्या एखादं गाणं लोकप्रिय होतं.
फुलांच्या बागेत जसं फुलपाखरू स्वच्छंद हिंडतं, तसेच मुलांच्या मनात त्यांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी मोठ्यांना भ्रमंती करावी लागतें. ती भ्रमंती मुलांच्या भावविश्वात डोकावून तुकाराम खिल्लारेयांनी केली आहे. सोप्या शब्दातून गहन अर्थ त्यांनी मुलांना सांगितलां आहे. मुलांच्या साहित्याचा दर्जा ते साहित्य त्याला किती ऊर्जा देतों यावर अवलंबून असतं. या संग्रहात एकूण ४५ काव्य आहेत.
काही प्रतिनिधी कवितांचा येथे उवापोह करणे योग्य होईल. ‘अभ्यास खरा’ या कवितेचाआशय खालील प्रमाणे
अभ्यास सोडून
वाचन अवांतर
मनाला देई
आनंद निरंतर
कविता गोष्टी
आवडती किती
नेहमी नेहमीच
भूगोल भूमिती
येता जाता मला
उगी टोचणी
गृहपाठ कराया
उठसूठ बोलणी
वाचन आनंद
घेऊ द्या की जरा
मगच होईल
अभ्यास खरा.
मुलांचे आज वाचन कमी होत चालले आहे.त्यातल्या त्यात अवांतर वाचन करण्याची संधी त्यांना मिळत नाही म्हणून अवांतर वाचनाचे महत्त्व सांगताना वाचन आल्यानंतर मनाला आनंद निरंतर मिळेल… विद्यार्थ्यांना खूप गृहपाठ पूर्ण न झाल्यामुळे त्यांना बोलणींही खावी लागते. वाचन आनंद घेत हसत खेळत जे जे शिकता येईल ते शिकू द्या, तरच होईल अभ्यास खरा.
प्रत्येक कवितेने एक संदेश दिला आहे.
फुलपाखरू
इवले इवले
मन बागडाया
बाहेर आले
छोट्यांना निसर्गाच्या सानिध्यात बागडू द्या तरच ते बरच काही शिकतील.
आजोबा आजी
गोष्ट सांगतात
ऐकता ऐकता
डोळे पेंगतात
मुलें लवकर झोपत नाही म्हणून पालकांची तक्रार असते पण आजी आजोबा असतील तर मुले गोष्ट ऐकता ऐकता झोपी जातात. अनेक घरातून आज आजी-आजोबा हद्दपार झालें आहेत.
आई या कवितेत
बोलली रागे आई जरी
दुखता खूपता सोबत राही
गुण आईचे उतरेनात
संपून जाते सर्व शाई
आई साठी नावे किती
आई जगात मावत नाही
सगळ्यांनाच वाटतं
आई कुठे काय करते?
फुलपाखराला जसे बागडायला अवकाश लागतं, तसेच मुलांना आई नावाचे आकाश लागतं. माझ्या आवडीचे गाणे
अवसान नवे देते
फुलपाखरू होऊन
मन चौफेर धावते
मुलांच्या आवडीची गाणी मुलांमध्ये चैतन्य निर्माण करतात आणि त्यांना सुद्धा फुलपाखरासारखे चौफेर धावावे वाटते. आणि मुलांना आवडतात तीच गाणी ती गुणगुणतात व स्वतः मध्ये हरवून जातात.
फुल आकर्षक सुंदर
रंग नयन मनोहर
त्या सुगंध नसे जर
निरूपयोगी
प्रार्थना या कवितेत
आशीष असे असू दे
जीवनाचे मूल्यं कळू दे
हे जग निर्मात्या
सन्मार्गाने चालू दे
हसत, खेळत,बागडत निसर्ग समजून घेतला तरच मुलांना जगण्याचे मूल्यं कळेल. संतोष घोंगडे यांचे मुखपृष्ठ मुलांचे मन आकृष्ट करून घेण्यासारखे आहे. या कवितांना चांगल्या चाली लावल्या तर मुलांच्या ओठी ही गाणी रूळतील व जे रूळतं तेच रुचतं व रुजतं.
