महाकवी बाणभट्ट विरचित कादंबरी – महाश्वेता वृत्तांत
संस्कृत साहित्यात ‘ बाणभट्ट’ हे नाव अतिशय प्रसिद्ध आहे. संस्कृत गद्याचे तर ते आचार्य मानले जातात. म्हणूनच ‘गद्यम् कवीनां निकषं वदन्ति ‘ असे म्हटले आहे. बाणांची कविता जितकी सुवर्णमयी आहे तितकेच गद्यलेखनही श्रेष्ठ आहे.
बाणभट्ट सम्राट हर्षवर्धनाचे समकालीन कवी होते. हर्षवर्धनाचा काळ इ. स. ६०६ ते इ. स. ६४८ पर्यंत मानला जातो. म्हणून ७ व्या शतकाचा पूर्वार्ध हाच बाणभट्टाचा कार्यकाळ होय. बाणाच्या जीवनाचा परिचय त्यांच्या ‘ हर्षचरितातून’ प्राप्त होतो.
बाणांच्या ‘कादंबरीमध्ये’ तीन जन्मांची अद्भुत कथा आलेली आहे. काही उपकथानकांमुळे थोडी जटिलता आलेली आहे. शूद्रक राजाच्या राज्यसभेमध्ये एका विलक्षण बुद्धिमान पोपटाला घेऊन एक चांडालकन्या प्रवेश करते, या प्रसंगाने कथेची सुरुवात होते.
* महाश्वेता वृत्तांत कथासार :-
ज्यावेळी किन्नर जोडीचा पाठलाग करीत चंद्रापीड अत्यंत थकलेल्या अवस्थेत अच्छोद सरोवराजवळ पोहोचतो तेव्हा तेथे विश्रांती घेत असता त्याला गायन ऐकू येते. त्याचा मागवा घेत पुढे गेल्यावर कैलास पर्वताच्या पायथ्याशी ‘चंद्रप्रभ’ नावाच्या ठिकाणी शिव मंदिरात ‘पाशुपत व्रतधारिणी’ एक कन्या दिसते.
तिथे तिची भेट झाल्यानंतर ती चंद्रापीडला आपल्या आश्रमात घेऊन जाते.तेथे यथोचितत्याचा अतिथी सत्कार करते चंद्रापिडने तिला तिच्या भूतकाळाविषयी विचारले असता ती दुःखी होते.
‘महाश्वेता’ नाव असलेली ती आपल्या भूतकाळाविषयी सांगू लागते. एकदा वसंत ऋतूमध्ये अच्छोद सरोवराच्या जवळ श्वेतकेतू तसेच कपिंजल नामक ऋषी कुमार यांची भेट, पुंडलिक आणि तिची कामाभिभूत मनोवस्था, पुंडरीकाने तरलिकेसोबत पाठविलेले प्रेमपत्र, पुंडलिकाच्या विरहावस्थेचे वर्णन, कपिंजलचे प्रस्थान, पुंडरीकाच्या भेटी करिता जाताना केलेल्या प्रवासाचे वर्णन इत्यादी बद्दल ती माहिती सांगते.
तसेच पुंडरीकाचे आकस्मिक निधन, कपिंजलाचे वर्णन, चंद्रपुरुषाचे पुंडरिकाला आकाशात उचलून नेणे, महाश्वेता करिता झालेली भविष्यवाणी इत्यादी वर्णनही महाश्वेताने केलेले आहे.
पुढे ती, तिने स्वीकारलेल्या भगवान शंकरांच्या व्रता विषयी सांगते. त्यानंतर ती चंद्रापीडला निवेदन करते की मी अत्यंतपापी, कमनशिबी ,निर्लज्ज,प्रेमविरहित ,निंदेस पात्र व ब्राह्मणवधाचा दोष असणारी आहे.
चंद्रापीड तिचे रूप, विनय, साधेपणा, मधुर वाणी, अनासक्ती, कठीण तपश्चर्या ,शांत स्वभाव, अहंकाराचा अभाव, आणि पवित्रता इत्यादी कारणांमुळे तिच्याकडे आकृष्ट होतो. कादंबरीमध्ये बाणांनी वेळोवेळी मानव जीवनासाठी उपयुक्त उपदेश यथास्थान केले आहे.
* बाणांची काव्यप्रतिभा :-
कादंबरीमध्ये बाणांनी केलेले प्रणय चित्रण उदात्त आणि रमणीय आहे. सात्विक भावनांचे विशेष वर्णन केले आहे. अच्छोद सरोवराचे वर्णन म्हणजे कवीच्या निरीक्षण शक्तीचे विलक्षण दर्शन होय. कादंबरी म्हणजे जणू चित्रशाळाच, ज्यात चित्रांची प्रदर्शनीच असल्याचा भास व्हावा.
अर्थाची नाविन्यता, सुरुचीपूर्ण स्वभावोक्ती, श्लेष, रसांची स्पष्टता, अक्षरांची विकटबंधता या सगळ्यांचे एकत्रीकरण बाणांच्या कादंबरीमध्ये विनासायास बघायला मिळते. अलंकारांचा विचार केल्यास उपमा, उत्प्रेक्षा, विरोधाभास, रूपक, श्लेष इत्यादी अलंकारांचा अनेक ठिकाणी उपयोग केला आहे. समासप्रचूर आणि ओजगुणाने संपन्न अशी दीर्घ वाक्यरचना हे लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
बाणांनी आपल्या अद्भुत काव्यप्रतिभेने आणि अनुपम वर्णन शैलीने गद्याची ओजस्विता, नाद मधुर प्रवाह मयता आणि भावाभिव्यञ्जनांना कादंबरीच्या रूपाने एकत्र आणले आहे. बाणांनी केलेले वर्णन हे अतिरंजित नसून अनुभव संपन्न असल्याचे दिसते.तर सौंदर्य वर्णन, विरह विलाप, हृद्गत भावना इत्यादी व्यक्त करताना प्रसाद- युक्त, समासरहित लहान वाक्यांचा प्रयोग केला आहे.
त्यांच्या वाणीवर मुग्ध होऊन धर्मदास त्यांची प्रशंसा करताना म्हणतात
“रुचिर स्वरवर्णपदा रसभाववती जगन्मनोहरति |
सा किम् तरुणी? नहि नहि,
वाणी बाणस्य मधुरशीलस्य ||”
कु. अनिता र. देशपांडे
आचार्य पदवी संशोधन केंद्र
लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी
संस्कृत विभाग.
दि. ०७. १२. २०२२
